सद्धर्मपुंडरिक : बौद्धांच्या ⇨महायान पंथा चा एक महत्त्वाचा व लोकप्रिय प्राचीन गंथ. त्याची रचना गदयपदयात्मक असून गदयभाग संस्कृतात व पदयभाग मिश्र संस्कृतात आहे. तो इ. स. च्या पहिल्या शतकाच्या सुमारास रचिला गेला असावा, असे दिसते. श्रावाकयान व हीनयान हा पंथ कमी बुद्धीच्या लोकांकरता असून महायान हाच खरोखरी महत्वाचा पंथ होय महायान पंथीयांच्या ‘ धर्मशून्यता आणि धर्मसमता ’ ह्यांसारख्या तत्त्वांचे आकलन झाल्यास व अज्ञानाचे आवरण दूर झाल्यास हीनयान पंथीयांनाही सम्यक् संबुद्धपद ( बोधिसत्त्वावस्था ) मिळविता येईल. अनंत ज्ञान आणि प्राणिमात्रांविषयी असीम करूणा ही या सम्यक् संबुद्धत्वाची प्रधान लक्षणे होत. ती या गंथांत प्रतिपादिली आहेत. ज्याप्रमाणे पुंडरिक ( कमळ ) हे चिखलातून उत्पन्न झालेले असले, तरी चिखलाने माखलेले नसते त्याचप्रमाणे बुद्ध जरी सामान्य जनतेतूनच उत्पन्न झालेला असला, तरी तो किंवा त्याने उपदेशिलेला धर्म सामान्य जनतेच्या दोषांपासून मुक्त असतो, असा गंथकाराचा मूळ सिद्धांत आहे. तो स्पष्ट करण्यासाठी अनेक सुंदर व समर्पक उपमा – दृष्टांत त्याने दिलेले आहेत.
ह्या गंथाचे २७ परिच्छेद आहेत. त्यांपैकी परिच्छेद २१ ते २६ हे एके काळी ह्या गंथात नसावेत असे म्हटले जाते.
बुद्धाच्या शिकवणुकीत काही परस्परविरोध दिसत असला, तर तो त्याच्या उपाय कौशल्यामुळे होय शिष्याच्या मानसिक तयारीप्रमाणे किंवा त्या त्या शिष्याच्या वैयक्तिक धारणाशक्तीला झेपेल अशी बुद्धाची चातुर्ययुक्त शिकवण असते. त्यामुळे काही लोकांना आरंभी श्रावकयानाची वा हीनयानाची, काहींना प्रत्येक बुद्धयानाची, तर काहींना बोधिसत्त्वयानाची शिकवण असते. पण परिणामी सर्वांनाच बुद्धयानाची किंवा खऱ्या महायानात सांगितलेल्या ज्ञानाची, बुद्धत्वाची शिकवण असते, असे गंथकार म्हणतो. हे सिद्ध करण्यासाठी एक सुंदर दृष्टान्त ‘ औपम्य – परिवर्त ’ ह्या तिसऱ्या परिच्छेदात दिलेला आहे एखादया धनवान व बलवान माणसाच्या घराला सगळीकडून आग लागलेली असते. त्याची लहान बालके मात्र आत खेळत – बागडत असतात. ‘ आग लागली आहे ताबडतोब घराबाहेर पडा ’ असे कितीही कंठरवाने सांगितले, तरी त्यांना ते पटत नाही म्हणून तो माणूस त्या बालकांना असे सांगतो की, ‘ मी तुमच्यासाठी संदर बैल जोडलेले, मृग जोडलेले, बकरे जोडलेले असे खेळातील गाडे आणलेले आहेत. ते घेण्यासाठी ताबडतोब बाहेर या ’, हे ऐकताच ती बालके ताबडतोब बाहेर येतात व आपल्या पित्याला ते खेळातले गाडे मागतात. पण त्या वेळेस पिता त्यांना खेळातले गाडे न देता खरे बैल जुंपलेले, सुंदर वस्त्रालंकारांनी विभूषित व रत्नखचित असे गाडे देतो. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध ह्या दु:खमय – त्रैधातुक – जगातून लोकांना बाहेर काढण्यासाठी निरनिराळ्या यानांचे आमिष दाखवतो व अंती बुद्धयानाचीच शिकवण देतो. ह्या गंथात ह्या सूत्राचेच महत्त्व परोपरीने विशद केलेले आहे. त्यातील गर्भितार्थयुक्त भाषेचा ( संधा – भाष्य ) खरा अर्थ न समजल्यामुळे लोकांत गैरसमज उत्पन्न होतात, असे सांगितले आहे.
हीनयान पंथापासून महायान पंथापर्यंतच्या संकमणकाळाचा हा गंथ प्रतिनिधी आहे, असे दिसते. त्यात स्तूप व ⇨ अवलोकितेश्वर ह्यांची महतीही गायिली आहे. ह्या गंथाची तिबेटी, चिनी, फ्रेंच व इंगजी भाषांतरे उपलब्ध आहेत. त्याची सर्वांत प्राचीन चिनी भाषांतरे धर्मरक्ष व कुमारजीव ह्यांनी केलेली आहेत ( इ. स. २८६ व ३८३). जपानमधील थ्येनदाय व निचिरेन ह्या संप्रदायांत हा गंथ अत्यंत लोकप्रिय आहे.
बापट, पु. वि.