सद्‌गुण : ‘ गुण ’ या शब्दाला ‘ सत् ’ हा उपसर्ग लावून ‘सद्गुण’ हा शब्द बनतो. ‘ सत् ’ शब्द अस्तित्व, साधुत्व किंवा चांगलेपणा आणि प्रशस्त या तीन अर्थी योजिला जातो (भगवद्गीता १७·२६), म्हणून ‘ सद्गुण ’ याचा व्युत्पत्यर्थ चांगला किंवा प्रशंसनीय गुण असा होतो. सुरी, लेखणी अशा साधनरूप वस्तूंचे कापणे, लिहिणे इ. विशिष्ट कार्य सुकर होण्यासाठी उपयुक्त किंवा उपकारक गुण ( गुड फॉर ) म्हणजे त्या वस्तूचा सद्गुण. शिक्षक, खेळाडू , सुतार म्हणून काम करताना आवश्यक प्रावीण्य, नैपुण्य किंवा कौशल्य मिळविण्यासाठी जे गुण लागतात, ते व्यावसायिक सद्गुण होत. परंतु व्यक्तीला चांगली व्यक्ती म्हणून संयम, धैर्य, प्रामाणिकपणा, दयाळूपणा, न्यायबुद्धी इ. जे गुण आवश्यक असतात, ते ‘ नैतिक सद्गुण ’ होत. हे सद्गुण व्यक्तीचे चारित्र्य घडवितात. ते नीतिमत्तेचे घटक असतात. त्यांना स्वत: मूल्य ( गुड-इन-इटसेल्फ ) असते. चांगली व्यक्ती म्हणजे चारित्र्यसंपन्न, सज्जन, सत्प्रवृत्त व्यक्ती. दैनंदिन व्यवहारात सद्गुण ही संकल्पना ‘ नैतिक सद्गुण ’ या अर्थीच बहुतांशी वापरली जाते.

नैतिक सद्गुणांविषयी नीतिशास्त्रात मुख्यत: पुढील प्रश्न चर्चिले जातात : सद्गुणांचे स्वरूप काय ? सद्गुण किती व कोणते ? ते शिकविता येतात का? शिकविता येत असल्यास कसे ? सद्गुण अनेक असल्यास त्यांतील कोणते प्रमुख – पायाभूत ( कार्डिनल ) ? सद्गुणांत एकता साधता येते का ? सद्गुणांचा कर्तव्य, हक्क, न्याय, सुख, श्रेयस यांच्याशी संबंध कोणता ? ज्ञानात्मक किंवा बौद्धीक, कलात्मक किंवा भावनिक, धार्मिक, आध्यात्मिक तसेच व्यावसायिक इ. नैतिकेतर अंगांशी संबंधित सद्गुण आणि नैतिक सद्गुण यांत फरक कोणता व त्यांतील संबंधांचे स्वरूप काय ?

नैतिक सद्गुणांचे स्वरूप : सत्यवचन, धैर्य, प्रामाणिकपणा, परोपकार, न्याय, संयम ही सर्व नैतिक सद्गुणांची उदाहरणे आहेत. परंतु सद्गुण म्हणजे काय ? असा प्रश्न सॉकेटिस विचारतो. ‘ सद्गुण म्हणजे ज्ञान ’ हे सॉकेटिसचे मत प्रसिद्ध आहे. परंतु हे ज्ञान ( क ) गंथ वाचन व श्रवणातून प्राप्त होण्याऱ्या आणि स्मृतीत साठविल्या जाण्याऱ्या माहितीज्ञान किंवा बौद्धीक औपपत्तिक ज्ञानाहून तसेच ( ख ) सरावातून प्राप्त होण्याऱ्या तंत्रज्ञान किंवा कौशल्याहून वेगळे असते. नैतिक, धार्मिक आध्यात्मिक ज्ञान हे विवेकज्ञान असते. ते विद्वत्ता किंवा पांडित्य तसेच कौशल्य, प्रावीण्य किंवा नैपुण्य या दोन्हींहून वेगळ्या प्रकारचे असते. म्हणूनच मला या प्रश्नाचे उत्तर माहीत होते, पण मी ते आता विसरलो किंवा मला क्रिकेट हा खेळ खेळता येत होता, पण गेली कित्येक वर्षे मला सराव नाही, असे म्हणणे सयुक्तिक असते, तसे मला दयाळूपणा माहीत होता, पण आता विसरलो किंवा मला प्रामाणिकपणाचा हल्ली सराव नाही, असे म्हणणे संयुक्तिक नसून हास्यास्पद ठरते. मला शास्त्रीय संगीत गाता येते, पण मी हल्ली गात नाही असे म्हणणे संयुक्तिक असले, तरी मला सचोटीने वागता येते, पण मी हल्ली वागत नाही हे म्हणणे हास्यास्पद आहे. याचे कारण सद्गुण हा माहितीज्ञान किंवा क्षमता या स्वरूपाचा नसून तो सत्प्रवृत्ती किंवा विवेकी वागणूक या स्वरूपाचा असतो. सद्गुण म्हणजे हिताहित, योग्यायोग्य यांच्यातील विवेक व तद्नुसार वागण्याची प्रवृत्ती व प्रयत्न. कोणीही जाणून बुजून आपले अनहित करण्यास प्रवृत्त होत नाही असे सॉकेटिस म्हणतो. म्हणून दुर्गुण म्हणजे अज्ञान.

सॉकेटिसच्या या मतावर महत्त्वाचा आक्षेप म्हणजे बहुसंख्य व्यक्तींना आपले हित कळत असते, पण तसे आचरण होत नाही. “ कळते पण वळत नाही ”, “ जानाभि धर्मं न च प्रवृत्ति: । जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति: ” । अशी स्थिती असते. याला ‘ नैतिक दौर्बल्य ’ ( वीकनेस ऑफ विल ) म्हणतात. काही व्यक्ती दृष्टप्रवृत्त, दुष्ट असतात. त्यांना नैतिक चाड नसते, तर अन्य व्यक्ती निर्णय चुकीचा घेतात ( मॉरल एरर ). सॉकेटिस मात्र या तिन्ही प्रकारच्या दोषांना अविवेक-अज्ञानच म्हणेल. सद्गुण म्हणजे ज्ञान असे म्हणताना सॉकेटिसला या ज्ञानात सम्यक् निर्णय, सत्प्रवृत्ती आणि निर्णयानुसार आचरणाचे सामर्थ्य हे तिन्ही घटक अंतर्भूत असले पाहिजेत असे वाटते.

अरिस्टॉटलच्या मते विचारशक्ती किंवा बुद्धी ( रीझन ) हे मानवाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. विचारशक्तीचा विनियोग सत्याचा शोध व चिंतन ह्यांसाठी करणे हा ‘ बौद्धीक सद्गुण ’, तर विकार व वासना ह्यांना विवेकाने घालून दिलेल्या नियमांच्या आणि तत्त्वांच्या मर्यादांचे पालन करण्याचे वळण म्हणजे नैतिक सद्गुण होय. वासनेची गुलामी आणि वासनेचे निर्मूलन ही दोन्ही टोके ( अतिरेक ) टाळून सुवर्णमध्य साधणे म्हणजे ‘ संयम ’ हा सद्गुण. उधळपट्टी आणि कंजुषी टाळून मध्यममार्ग स्वीकारणे म्हणजे उदारपणा किंवा औदार्य हा सद्गुण. प्रधान ( कार्डिनल ) सद्गुण : प्लेटोने बुद्धी, वीर्य ( स्पिरिट ) आणि कामना ( अपिटाइट ) अशी आत्म्याची तीन अंगे स्वीकारून त्या अंगांशी संबंधित अनुकमे प्रज्ञान ( विजडम ), धैर्य ( करेज ) आणि संयम ( टेंपरन्स ) असे तीन आणि या तिन्ही अंगांत समतोल साधणारा न्याय ( जस्टिस ) असे चार सद्गुण प्रधान मानले. व्यक्तीप्रमाणेच समाजाचेही प्लेटोने तत्त्वज्ञ संरक्षक सैनिक आणि उत्पादक कामगार असे तीन वर्ग कल्पून त्यांचे अनुकमे ज्ञान, धैर्य आणि संयम हे सद्गुण आणि या तीन वर्गांतील समतोल म्हणजे न्याय, असे चार प्रधान सद्गुण मानले. वैदिक परंपरेतही व्यक्तीचे मुख, बाहु, ऊरू आणि पाय आणि समाजपुरूषाचे बाह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार अवयव मानून त्यांचे अनुकमे ज्ञान, संरक्षण, व्यापार आणि सेवाभाव असे चार स्वाभाविक सद्गुण मानल्याचे दिसते (भगवद्गीता १८·४२-४४).

व्यक्ती किंवा समाज यांची तीन किंवा चार अंगे व चार प्रधान सद्गुण ही कल्पना अरिस्टॉटल स्वीकारीत नाही. त्याने संयम, मैत्री, औदार्य, धैर्य असे अनेक सद्गुण स्वीकारले. भगवद्गीते त दैवी संपत्तीचे सद्गुण ( अध्याय १६), स्थितप्रज्ञाची लक्षणे ( अ. २), भगवद्भक्ताचे सद्गुण ( अ. १२), त्रिगुणातीताचे सद्गुण ( अ.१४), ज्ञानी पुरूषाचे सद्गुण ( अ. १३), चार वर्णांचे सद्गुण ( अ. १८) असे नैतिक, धार्मिक, आध्यात्मिक सद्गुणांचे विवरण आढळते. अशाच प्रकारचे सद्गुणांचे विवरण विविध धर्मगंथ, रामायणमहाभारत हे इतिहासगंथ, पुराणे आणि संतवाङ्मय ह्यांतही आढळते.

हक्क, कर्तव्य, श्रेयस यांतील एक संकल्पना केंद्रस्थानी ठेवून आधुनिक पाश्चात्त्य नीतिशास्त्राची मांडणी केली गेली आहे. सध्या प्राचीन नीतिशास्त्राचे प्रारूप स्वीकारून सद्गुणकेंद्री नीतिशास्त्राची ( व्हर्च्यू एथिक्स ) मांडणी केली जात आहे.

संदर्भ : 1. Jowett, B. Trans. The Dialogues of Plato, 2Vols., New York, 1937.

2. Mackenzie, J. S. A Manual of Ethics, London, 1957.

3. Thomson, J. A. K. Trans. The Ethics of Aristotle ( The Nicomachean Ethics ), Harmondsworth, 1953.

4. Von Wright, G. H. The Varieties of Goodness, 1964.

५. रेगे, मे. पुं. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास, पुणे, १९७१.

अंतरकर, शि. स.