व्हाग्नर, फोन यौरेक, यूलिउस: (७ मार्च १८५७ – २७ सप्टेंबर १९४०). ऑस्ट्रियन विकृतिवैज्ञानिक, तंत्रिका तंत्र विशारद व मानसोपचारतज्ञ. त्यांनी अंशपक्षाघाताच्या नियंत्रणासाठी मलेरियाच्या जंतूंचा वापर करण्याच्या चिकित्सेचा शोध लावला. ह्या त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांना १९२७ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले.
व्हाग्नर यांचा जन्म ऑस्ट्रियातील व्हेल्स येथे झाला. त्यांनी व्हिएन्ना विद्यापीठातून वैद्यकशास्त्रातील एम्.डी. ही पदवी मिळविली (१८८१). १८८३ मध्ये याच विद्यापीठातील रुग्णालयाच्या तंत्रिका व मानसिक रोग विभागाचे संचालक म्हणून पुढील ३५ वर्षे त्यांनी काम केले. मानसोपचारतज्ञ व मानसिक रोगतज्ञ म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविली.
व्हाग्नर यांना १८८७ साली आकस्मिकपणे सिफिलिटिक डेंमेटिया या मानसिक रोगाने पछाडलेल्या रुग्णास मलेरिया झाल्यास त्याच्यात मानसिक सुधारणा होते असे आढळून आले. त्यावर त्यांनी अधिक संशोधन केले. सुरुवातीस त्यांनी मानसिक रुग्णास ट्यूबरकल बॅसीलस जंतूंची लस टोचली परंतु त्यांना मर्यादित यश मिळाले. त्यांनी १९१७ साली अंशपक्षाघात झालेल्या रुग्णास मलेरियाचे जंतू असणारी लस टोचण्याची उपचार पद्धत चालू केली. ह्या पद्धतीमुळे रुग्णात प्रगती झाल्याचे आढळले. त्यांनी मलेरियाचे जंतू असणारी लस वापरली. कारण मलेरिया हा क्विनीन औषधाने नियंत्रित ठेवता येतो. त्यांची ही उपचार पद्धत अवसाद चिकित्सा स्वरूपाची आहे [→ अवसाद] . तिच्यामुळे असाध्य पद्धतीत नंतर सुधारणाही झाल्या.
व्हाग्नर यांनी ⇨ अवटू ग्रंथीवर केलेले संशोधनही महत्वाचे मानले जाते. हे संशोधन अवटू ग्रंथीच्या स्त्रावाच्या अभावामुळे होणाऱ्या जन्मजात दोषांसंबंधी आहे. ते व्हिएन्ना येथे मरण पावले.
पाटील, चंद्रकांत प.