एक्लिस, सर जॉन (कॅऱ्यू) : (२७ जानेवारी १९०३ – ). ऑस्ट्रेलियन शरीरक्रियाविज्ञान विद्. तंत्रिकासंवेदना (मज्जातंतूंद्वारे होणारी संवेदना) एका कोशिकेतून (पेशीतून) दुसरीत कशी प्रविष्ट होते, याबद्दलच्या संशोधनकार्याबद्दल एक्लिस व त्यांचे सहकारी ए. एल्. हॉजकिन आणि ए. एफ्. हक्सली या तिघांना १९६३चे वैद्यक आणि शरीरक्रियाविज्ञान या विषयांचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.

एक्लिस यांचा जन्म मेलबोर्न या शहरी झाला. १९२५ मध्ये मेलबोर्नची वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर ते इंग्लंडात ऑक्सफर्ड येथे गेले आणि तेथे १९२९ मध्ये डी. फिल. ही पदवी त्यांनी मिळविली. १९२९–३४ या काळात ऑक्सफर्ड येथेच काम केल्यानंतर १९३४–३७ मध्ये ते मॅगडालेन कॉलेज (ऑक्सफर्ड) येथे फेलो होते. १९३७ मध्ये ऑस्ट्रेलियात परत आल्यानंतर १९४४ पर्यंत सिडनी हॉस्पिटलाच्या वैद्यकीय संशोधनसंस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. १९४४–५१ पर्यंत न्यूझीलंडमधील ड्यूनेडीन येथील ओटागो वैद्यक विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील राष्ट्रीय विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.

तंत्रिका तंत्राचे (मज्जा संस्थेचे) एकक म्हणजे तंत्रिका-कोशिका. या कोशिकांचे प्रवर्ध (बारीक तंतुमय वाढी) एकमेकांस जोडलेले नसून संलग्न अथवा चिकटून बसविल्यासारखे असतात. त्या स्थानाला ‘उपागमस्थान’ असे म्हणतात. या उपागमस्थानी तंत्रिकासंवेदना एका कोशिकेपासून दुसरीत प्रविष्ट होते. तेथे होणारे हे संवेदनासंचरण उत्तेजक आणि रोधक अशा दोन स्वरूपांचे असते. उत्तेजक संवेदनेमुळे कोशिका उत्तेजिक होऊन तिच्यातून त्या संवेदनेचे क्षेपण होते. रोधक संवेदनेमुळे उपागमस्थानी रोध उत्पन्न झाल्यामुळे संवेदना पुढे जाऊ शकत नाही. संवेदनासंचरणाबद्दलचे हे ज्ञान पूर्वीच झालेले होते.

उपागमस्थानी हे संवेदनासंचरण कसे होते याबद्दल एक्लिस यांचे संशोधन होते. कोशिकेमध्ये काचेच्या अतिसूक्ष्म (०·०१३ मिमी.) नळ्या खोचून ठेवून तेथे होणारी क्रिया त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. या नळ्यांतून सोडियम, पोटॅशियम वगैरे लवणांचे विद्राव कोशिकाशरीरात घालून त्यामुळे काय प्रतिक्रिया दिसते, त्याचे त्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले. एक्लिस व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे दाखवून दिले की, कोशिकेच्या पृष्ठभागावरील विद्युत् भार उत्तेजक संवेदनांमुळे कमी होतो, तर रोधक संवेदनांमुळे तो वाढतो. या त्यांच्या शोधाकरिताच त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले.

त्यानंतर या संशोधकांनी हेच काम पुढे चालवून असे सिध्द केले की, कोशिका-आवरणातील अतिसूक्ष्म (१०–१० मिमी.) रंध्रे उघडल्यामुळे पोटॅशियम व क्लोराइड हे आयन कोशिकाशरीरात प्रवेश करतात व त्यामुळे संवेदनासंचरणाला रोध उत्पन्न होतो. कोशिका-आवरणावरील जवळजवळ दुप्पट आकाराची रंध्रे उघडल्यास सोडियमासारखे अधिक मोठे आयन (विद्युत् भारित अणू वा रेणू) कोशिकाशरीरात प्रविष्ट होऊ शकतात व त्यामुळे कोशिकेचे उत्तेजन होते. उपागमस्थानी होणारे हे मूलभूत तंत्रिकाकार्य त्यानंतरच्या इतर संशोधकांनी प्रयोग करून मान्य केलेले आहे.

द न्यूरोफिजिऑलॉजिकल बेसिस ऑफ माइंड : द प्रिन्सिपल्स ऑफ न्यूरोफिजिऑलॉजी (१९५३), द फिजिऑलॉजी ऑफ नर्व्ह सेल्स (१९५७) आणि द फिजिऑलॉजी ऑफ सायनॅप्सेस (१९६४) हे एक्लिस यांचे ग्रंथ विशेष प्रसिध्द आहेत. १९४१ साली त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. १९५८ मध्ये त्यांना ‘नाईट’ किताब देण्यात आला. ऑस्ट्रेलियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे ते १९५७–६१ या काळात अध्यक्ष होते.

ढमढेरे, वा. रा.