शेंड : (इं. आफ्रिकन मिल्क बुश लॅ. सिनॅडेनियम ग्रँटाय कुल- यूफोर्बिएसी). हे मांसल व रसाळ झुडूप मूळचे उष्णकटिबंधीय आफ्रिकेतील असून भारतात सर्वत्र आढळते. त्याची उंची ६ मी. पर्यंत असते. फांद्या सरळ व उभट असतात. खोड जाडजूड, हिरवे, शूलाकृती असते. पाने व्यस्त अंडाकृती, चमच्यासारखी, ७–१० सेंमी. लांब व ३–५ सेंमी. रुंद, विशालकोनी, साधारण जाड व मांसल असतात. त्यांची मध्यशीर गोलसर असते. छदमंडल ६-७ मिमी. व्यासाचे असते. ते वलयाकार, लवदार, फुगीर व लाल-निळे असते. त्याच्या आतील कडेवर पाच रुंद उभे दातेरी खवले असतात. नोव्हेंबर–फेब्रुवारीत यास फुलांच्या बहुशाखी वल्लरी आल्यावर ते सुशोभित दिसते.
पटवर्धन, शां. द.