जलपिंपळी : (रातोलिया गु. रातवेलिये क. नीर-हिप्पली सं. जल पिप्पली लॅ. फायला (लिपिया) नोडिफ्लोरा कुल-व्हर्बिनेसी). ही जमिनीवर पसरत वाढणारी ⇨ओषधी  कालवे, पाण्याचे पाट व नद्यांच्या किनाऱ्यांवर, वालुकामय व गवताळ पण ओल्या जागी आढळते. तिचा प्रसार ९०० मी. उंचीपर्यंत भारतात सर्वत्र, शिवाय श्रीलंका, बलुचिस्तान, आफ्रिका इ. उष्ण व उपोष्ण प्रदेशांत आहे. खोडावरील पेऱ्यांपासून मुळे फुटतात. पाने समोरासमोर, फार लहान देठाची, त्रिकोणी, चमच्यासारखी व टोकास दातेरी असतात. फुले बिनदेठाची, लहान, पांढरी किंवा फिकट गुलाबी असून पानांच्या बगलेतल्या स्तबकासारख्या फुलोऱ्यात बहुतेक वर्षभर येतात [→ फूल] फळ गोलसर, लांबट, लहान व शुष्क असते. इतर सामान्य लक्षणे साग कुलात [→ व्हर्बिनेसी] वर्णिल्याप्रमाणे. ही ओषधी शीतकर (थंडावा देणारी), ज्वरनाशी, मूत्रल (लघवी साफ करणारी) असून तिचे पोटिस गळवे पुवाळण्यास बांधतात. पानांचे आणि कोवळ्या देठांचे फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) मुलांना अजीर्णावर व स्त्रियांना प्रसूतीनंतर देतात. या वनस्पतीपासून नोडिफ्लोरीन ए व बी ही ग्लुकोसायडीक रंगद्रव्ये मिळतात पोटॅशियम नायट्रेटही त्यात असते. ईजिप्तमध्ये हिरवळीसाठी ही ओषधी लावतात. श्रीलंकेमध्ये हिची पाने खातात व फिलिपीन्समध्ये पाने भिजवून काढलेला रस चहाप्रमाणे पितात. भारतात परम्यावर शामक म्हणून वापरतात. कोकणात पानांची व फळांची चटणी आतील मूळव्याधीच्या वेदना थांबविण्यास वापरतात.

जमदाडे, ज. वि.