शीलाइट : एक खनिज व टंगस्टनचे महत्त्वाचे धातुक. स्फटिक चतुष्कोणीय, वडीसारखे चापट किंवा अष्टकफलकीय असून याचे अन्योन्यवेशी (एकमेकांत घुसलेले) व संलग्न जुळे स्फटिकही आढळतात. शीलाइट मूत्रपिंडाकार व कणमय राशींच्या रूपातही आढळते. ⇨ पाटन (011) सर्वाधिक स्पष्ट. कठिनता ४·५–५. वि.गु. ५·९–६·१. ठिसूळ. भंजन खडबडीत. चमक काचेसारखी ते हिऱ्यासारखी. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. रंग पांढरा, पिवळसर, हिरवट, लालसर किंवा उदसर. कस पांढरा. रा.सं. CaWO4.  कॅल्शियमच्या जागी मॉलिब्डेनम किंवा थोडे तांबे (कॉपर शीलाइट) आलेले असते. यावर जंबुपार किरण पडल्यास यातून तेजस्वी निळसर पांढरे अनुस्फुरण (प्रकाश) बाहेर पडते. हे सहजपणे वितळत नाही. हायड्रोक्लोरिक अम्लात उकळल्यास याचे अपघटन होऊन टंगस्टिक ऑक्साइडचा पिवळसर अवशेष मागे राहतो. हे स्पर्शरूपांतरित निक्षेपांत आढळते उदा., ग्रॅनाइट व पट्टिताश्माशी निगडित असलेल्या पेग्मटाइटाच्या शिरा किंवा उच्च तापमानात बनलेल्या धातुक शिरा. गार्नेट, डायप्सॉइड, ट्रेमोलाइट, एपिडोट, बोलॅस्टोनाइट किंवा मॉलिब्डेनाइट ही याच्याबरोबर आढळणारी खनिजे आहेत. काही ठिकाणी शीलाइट सोन्याबरोबर आढळते. ऑस्ट्रेलिया, म्यानमार, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, सायबीरिया, बोहीमिया, इटली, स्वित्झर्लंड, फ्रांस, फिनलंड, मेक्सिको इ. प्रदेशात शीलाइट आढळते. भारतात आंध्र प्रदेश व प. बंगाल येथे टंगस्टनच्या धातुकांत हे अल्प प्रमाणात आढळते.

अमेरिकेत टंगस्टन मुख्यतः शीलाइटपासून मिळवितात. टंगस्टनचा शोध लावणाऱ्या ⇨ कार्ल व्हिल्हेल्म शेले (शील) या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञांच्या नावावरून या खनिजाचे शीलाइट हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.