शिवनेरी : महाराष्ट्रातील एक प्रसिध्द डोंगरी किल्ला व छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. जुन्नर किल्ला या नावानेही तो ओळखला जातो. तो पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात पुण्याच्या उत्तरेस ८८ किमी. व जुन्नरच्या नैऋत्येस सु. दोन किमी. वर सस. पासून सु. ६०० मी. उंचीवर वसला आहे. किल्ल्यावर सु. अडीच चौ. किमी. क्षेत्रफळाचे त्रिकोणी आकाराचे पठार आहे. त्याच्या परिसरातील हीनयान पंथीय बौध्द लेणी आणि सातवाहन राजांचा नाणेघाटातील कोरीव लेख यांवरून इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत हा किल्ला बांधला असावा, हे सूचित होते. शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन हे एकाच आसमंतातील चार किल्ले प्राचीन काळी नाणेघाट व माळशेजघाट या मार्गांवरील संरक्षक दुर्ग होते. किल्ल्याचा बहमनी काळापर्य़ंतचा इतिहास ज्ञात नाही. बहमनी सेनापती मलिक-उत-तुज्जार याने इ.स. १४४५ मध्ये या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. पुढे तो निजामशाही अंमलाखाली आला (१४९०). निजामशाहाची सुरुवातीची राजधानी शिवनेरी येथे होती. पुढे निजामशाहाने १५९९ मध्ये मालोजी भोसले (छ. शिवाजी महाराजांचे आजोबा) यांस तो दिला. मालोजीनंतर तो काही काळ मोगलांच्या ताब्यात होता. पुढे मोगलांनी विश्वासराव ऊर्फ सरनाईक श्रीनिवासराव या आपल्या सरदारास तो दिला. शहाजीराजे भोसले विश्वासरावाच्या आश्रयाने काही दिवस राहत होते. शहाजीराजांचा थोरला मुलगा संभाजी यांचा विवाह विश्वासरावाच्या जयंती नामक मुलीशी झाला (सु. १६२९). या सोयरिकीचा फायदा घेऊन शहाजीराजांनी लखूजी जाधवरावांच्या मृत्युनंतर (२५ जुलै १६२९) गरोदर जिजाबाईंस या किल्ल्यावर ठेवले आणि तेथेच पुढे शिवरायांचा जन्म झाला. मोगलांनी निजामशाही जिंकून (१६३६) शिवनेरीवर ताबा मिळविला. पुढे सारातच्या छ. शाहू महाराजांनी (कार. १७०७–४९) तो १७१६ मध्ये घेतला. पेशवाईच्या अखेरपर्यंत (१८१८) तो मराठी अंमलाखाली होता. दुसऱ्या बाजीरावाने येथे नाना फडणीसांना दोन वर्षे (१७९३–९५) नजरकैदेत ठेवले होते. इंग्रजांनीही येथे काही चिनी कैदी १८४८ मध्ये ठेवले होते.
शिवनेरीवर जुन्या वास्तू फार थोड्या आहेत. किल्ल्याची भक्कम तटबंदी, पाच प्रमुख दरवाजे व बुरुज लक्ष वेधून घेतात. किल्ल्यात पाण्याची अनेक टाकी असून एक मशीद, इदगाह, शिवाईचे मंदिर, अंबरखाना व अदम सुभेदाराची कबर या अवशिष्ट वास्तू आहेत. मशिदीचे बांधकाम पाणथळ दगडी खाणीवर केलेले असून तिचे दोन मनोरे एका आकर्षक कमानीने जोडले आहेत. तटबंदीच्या डोंगर उतारावर काही गुंफा आहेत. शिवरायांच्या जन्मस्थानाचा जीर्णोद्धार केला असून दरवर्षी शिवजयंती उत्सव येथे दिमाखात साजरा होतो. अलीकडे बालशिवाजी-जिजाबाई यांचे मंदिर येथे उभारण्यात आले आहे.
संदर्भ : 1. Toy, Sidney, The Fortified Cities Of India, London, 1965.
२. घाणेकर, प्र. के. साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची!! पुणे, १९८५.
३. दांडेकर, गो. नी दुर्गभ्रमणगाथा, मुंबई, १९८३.
४. पाळंदे, आनंद, डोंगरयात्रा, पुणे, १९९४.
५. मेहेंदळे, ग. भा. श्री राजा शिवछत्रपती, खंड १, भाग १, पुणे, १९९६.
कुलकर्णी, मकरंद