शिलाँग : भारताच्या ईशान्येकडील राज्यांपैकी मेघालय राज्याची राजधानी. लोकसंख्या १,३१,७१९ (१९९१). खासी टेकड्यांच्या प्रदेशातील शिलॉंग पठारावर सस.पासून १,५२० मी. उंचीवर हे शहर वसले आहे. आल्हाददायक हवामान व निसर्गसुंदर परिसर यांमुळे एक थंड हवेचे ठिकाण म्हणूनही शिलॉंगला महत्त्व आहे. १८६४ मध्ये ‘युनायटेड खासी अँड जैंतिया हिल्स’ या जिल्ह्याचे प्रमुख ठाणे चेरापुंजीवरून शिलाँगला हलविण्यात आले आणि तेव्हापासून शिलाँग विषेश प्रसिद्धीस आले. १८७४ मध्ये आसाम प्रांताची ही राजधानी करण्यात आली. १२ जून १८९७ रोजी झालेल्या तीव्र भूकंपामुळे शिलाँगची प्रचंड हानी झाली व संपूर्ण नगराच्या पुनर्बांधणीची गरज निर्माण झाली. १९७२ पर्यंत नॉर्थईस्ट फ्राँटिअर एजन्सी ऑफ आसामचे शिलाँग हेच मुख्य ठाणे होते. २१ जानेवारी १९७२ रोजी स्वतंत्र मेघालय राज्याची निर्मिती करण्यात येऊन शिलाँग ही या नवनिर्मित राज्याची राजधानी बनली.
शिलाँग हे ईशान्य भारतातील सर्वांत मोठे शहर व कृषिमालाच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. येथील ‘शिलाँग पीक’ वरून शहरास हे नाव पडले. येथे दुग्धशाळा, फलसंवर्धन केंद्र, रेशमी किडे पैदास केंद्र, लसनिर्मिती संस्था, वैद्यकीय संशोधन संस्था व दोन रुग्णालये आहेत. शहरात पोलो व गोल्फ खेळांची अनेक मैदाने, तसेच घोड्यांच्या शर्यतीचे मैदान आहे. येथे नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी (स्था. १९७३) व लष्करी छावणी आहे. उत्तरेस काही अंतरावर बरपानी जलविद्युतनिर्मिती केंद्र आहे. उत्तरेस १०० किमी.वरील ब्रह्मपुत्रा नदीखोऱ्यातील गौहाती (आसाम) हे शिलाँगचे जवळचे लोहमार्ग-स्थानक असून ३५ किमी. वरील उमरोई येथे विमानतळ आहे. वॉर्डस लेक, हिदारी पार्क, प्राणिसंग्रहालय, एलेफंट फॉल्स, शिलाँग पीक हे उंच ठिकाण, कॅथीड्रल इ. शहरातील आकर्षणस्थळे आहेत.
चौधरी, वसंत