शिकार : वन्य श्वापदे तसेच इतर पशुपक्षी यांचा पाठलाग करून त्यांना पकडणे, ठार मारणे अशा क्रियांचा समावेश असलेला एक साहसयुक्त खेळ. रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठी ‘हंटिंग’ तर बंदुकीने नेम धरून केलेल्या लहान पक्ष्यांच्या शिकारीसाठी ‘शूटिंग’ अशा संज्ञा ग्रेट ब्रिटन, पश्चिम युरोप येथे वापरल्या जातात. अमेरिकेत व इतरत्र मात्र ‘हंटिंग’ हीच संज्ञा दोन्ही प्रकारांसाठी सररास वापरली जाते. पारध, मृगया हे अन्य मराठी पर्याय शिकारीसाठी योजले जातात.
प्राचीन काळी मनुष्यसमाजाच्या प्रारंभावस्थेत, शिकार करणे हा मानवाच्या उपजीविकेचा एकमेव मार्ग होता. प्राण्यांच्या मांसाचा वापर अन्न म्हणून, कातडीचा वापर वस्त्रप्रावरणांसाठी, तर हाडे, खूर, शिंगे इत्यादींचा वापर अणकुचीदार हत्यारे बनविण्यासाठी करण्यात येई. प्राण्यांची शिकार करणे, ही आदिम जमातींची जीवानावश्यक गरज होती. पुढील काळात अन्न मिळविण्याबरोबरच स्वसंरक्षण, पिकांचे व पाळीव जनावरांचे रक्षण करणे, अशा उद्देशांनीही वन्य प्राण्यांच्या शिकारी करणे माणसाला क्रमप्राप्त ठरले. कालांतराने शेतीचा शोध लागून उपजीविकेची अन्य साधने उपलब्ध झाल्यानंतर शिकारीमागील अन्नसंपादनाचे उद्दिष्ट हळूहळू मागे पडून, त्यातून क्रीडानंद घेण्याची शिकारी प्रवृत्ती वाढू लागली. शिकारीची प्रवृत्ती माणसासकट सर्वच सजीवांत निसर्गतःच आढळते. मानवाच्या विकासक्रमातील काही मूलभूत घटनांच्या प्रभावामुळे शिकारीच्या खेळास उत्तरोत्तर अधिक चालना मिळत गेली. परिणामतः अन्नासाठी शिकार करण्याची गरज कमी होत गेली. तथापि अद्यापही अवशिष्ट राहिलेल्या आदिवासी जमाती उपजीविकेसाठी पशुपक्ष्यांची शिकार करतात.
शिकारीच्या खेळात शिकारी व सावज यांच्यात एकमेकांवर मात करण्याची जीवघेणी चढाओढ असते. त्यामुळे शिकारीच्या खेळाला साहसयुक्त, रोमहर्षक स्वरूप प्राप्त होते. हिंस्र पशूंची शिकार म्हणजे मर्यादित प्रमाणात एक चढाईच असते. शिकाऱ्याजवळ असलेली शस्त्रे, आयुधे ही या चढाईत त्याला उपयोगी पडतात. जनावरांना स्वसंरक्षण करण्याची उपजत बुद्धी व शक्ती असते. उदा., ती चपळ असल्याने अधिक वेगाने धावू शकतात. त्यांची घ्राणेंद्रिये व श्रवणेंद्रिये जास्त तीक्ष्ण, संवेदनाक्षम असल्याने त्यांना शिकाऱ्यांची चाहूल चटकन लागते. शिवाय ती राहत असलेल्या भूप्रदेशाची चांगली जाण त्यांना असल्याने ती शिकाऱ्याला गुंगारा देऊ शकतात. आपल्या अंगभूत गुणांनी हे प्राणी काही प्रसंगी शिकाऱ्यावरही मात करतात. शिकाऱ्यांना प्रण्यांच्या सवयींचे, वर्तनविशेषांचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. या दृष्टीने प्राण्यांचे निरीक्षण करण्यातही शिकाऱ्यांना आनंद मिळतो. प्राण्यांना ठार मारण्यापेक्षाही त्यांना पकडण्यात व जेरीला आणण्यात कित्येक शिकाऱ्यांना शिकारीचा आनंद मिळतो. शिकाऱ्यांना शिकारी कुत्र्यांचे मोलाचे साहाय्य मिळते. ते वासावरून प्राण्याचा माग काढण्यात पटाईत असतात. सेटर, पॉइंटर, स्पॅनियल ह्या शिकारी कुत्र्यांच्या जाती प्रसिद्ध आहेत. शिकारीच्या प्रारंभीच्या काळात अणकुचीदार दगड, काठ्या, धनुष्यबाण, कुऱ्हाड, कोयता, भाला यांसारखी साधी शस्त्रे वापरली जात. फुंकनळी वा फुंकबंदुका (ब्लो गन) यांच्या साहाय्याने विषारी टोकाचे भाले प्राण्यांवर फेकण्याचे तंत्र अनेक आदिवासी जमाती वापरतात. शिकारीसाठी बंदुकीचा वापर केल्याचे उल्लेख सोळाव्या शतकापासून आढळतात. आधुनिक काळात गुंतागुंतीची, प्रभावी वेगावान मारा करणारी अनेक धारदार शस्त्रे शिकारीसाठी वापरली जाऊ लागली. वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिकारीसाठी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे वापरली जातात. उदा., मोठ्या प्राण्यांच्या शिकारीसाठी सामान्यतः रायफली, बंदुका तर छोट्या प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या शिकारीसाठी कमी-अधिक पल्ल्याच्या व क्षमतेच्या शॉटगन वापरल्या जातात.
प्राचीन काळीही शिकारीचा खेळ राजेरजवाडे, अमीर–उमराव, सरदार वर्गांत लोकप्रिय होता. भरपूर फावला वेळ व श्रीमंती असलेल्या ह्या वर्गांत रिकामा वेळ घालवण्याचे एक साधन म्हणून शिकारीचा छंद प्रचलित होता. प्राचीन ईजिप्तमध्ये शिकाऱ्यांचा एक प्रतिष्ठित, सामाजिक वर्ग होता. ॲसिरियन व बॅबिलोनियन लोकांची शिकारीतील पाठलागाची दृश्ये मंदिरांच्या, प्रासादांच्या भिंतींवर रंगवलेली आढळतात. असुरबनिपाल (इ. स. पू. सातवे शतक) हा ॲसिरियन राजा सिंहाची शिकार करीत असल्याचे दृश्य एका तत्कालीन कोरीव शिल्पात आढळते. बहिरी ससाण्याची शिकार (फॉकनरी) प्राचीन ॲसिरियामध्ये तसेच भारत, चीन इ. देशांतही लोकप्रिय होती. शिकारीचा खेळ प्राचीन काळी ग्रीक लोकांमध्येही रूढ होता. झेनोफच्या Kynegetikos (इ. शी. ‘ऑन हंटिंग’, इ. स. पू. चौथे शतक) या निबंधात सशाच्या शिकारीचे स्वानुभवाधिष्ठित वर्णन आहे. रोमन लोकांमध्ये शिकारीचा खेळ समाजातील कनिष्ठ वर्ग व व्यावसायिक शिकारी यांच्यापुरताच मर्यादित होता. मध्ययुगीन सरंजामशाहीमध्ये शिकारीचा हक्क फक्त जमिनीची मालकी असणाऱ्यांनाच होता. उत्तरेकडील देशांत गुलामांना शिकारीची मनाई होती. कारण त्यांना शस्त्रे बाळगता येत नसत. इंग्लंडमधील एडवर्ड द कन्फेसर (अकरावे शतक), सॅक्सनीचा इलेक्टर दुसरा जॉन जॉर्ज (कार. १६५६–८०), फ्रान्समधील पंधरावा लूई (अठरावे शतक), रशियातील झार निकोलस ही शिकाऱ्यांची काही उल्लेखनीय नावे होत. काही युरोपीय स्त्रियाही शिकारीसाठी मशहूर होत्या. आयझनाकची प्रिन्सेस फ्रेडेरिका, नेदरर्लंड्सची गव्हर्नेस मारिया, फ्रान्समधील डायना दी प्वॉत्ये, इंग्लंडची पहिली एलिझाबेथ इत्यादींचा निर्देश उदाहरणादाखल करता येईल.
भारतात प्राचीन काळापासून राजघराण्यातील व्यक्तींना शिकारीचा छंद असल्याचे दिसते. मोगल सम्राटांनाही शिकारीची आवड होती. अकबर, जहांगीर, शहाजहान इत्यादींच्या शिकारीची वर्णने इतिहासात नमूद आहेत. एवढेच नव्हे, तर मोगलकालीन चित्रकारांनी त्यांच्या शिकारीची चित्रे काढली आहेत. शहाजीराजे भोसले, छ. संभाजीराजे यांनाही शिकारीचा छंद होता. पेशवेकालातही सरदार-जहागीरदार शिकारीच्या मोहिमा काढीत असत. तत्कालीन भित्तिचित्रांतून शिकारीची अनेक चित्रे आढळतात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात व नंतर अव्वल इंग्रजी अंमलात बंदुकीचा वापर वाढला. अलीकडच्या काळात कोल्हापूरचे छ. शाहू महाराज, छ. शहाजी महाराज, ग्वाल्हेरचे माधवराव शिंदे तसेच जिम कॉर्बेट, केनेथ अँडरसन इ. व्यक्ती साहसी शिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.
शिकार करण्याची तंत्रे व पद्धती : शिकार करण्याच्या काही पद्धती व तंत्रे यांची माहिती पुढे थोडक्यात दिली आहे :
हत्तीवरून शिकार : भारतात संस्थानिक आणि सरदार पूर्वी हत्तीवर हौद्यात बसून शिकार करीत. शिकारीसाठी हत्तीलाही प्रशिक्षण द्यावे लागते आणि माहूतही धैर्यवान व अनुभवी लागतो. उंच आणि दाट वाढलेल्या जंगलात घुसलेले जनावर हुसकून काढल्यानंतर ते हौद्यात बसलेल्या शिकाऱ्याच्या टप्प्यात आले, म्हणजे बार काढीत. वाघासारख्या हिंस्र जनावराच्या वर्मावर गोळी न लागता ते जखमी झाले, तर दाट गवतात व झाडीत ते दबा धरून बसते आणि अचानकपणे हत्तीवर हल्ला करते. हत्ती जखमी होऊन खाली बसला, तर माहूत आणि शिकारी दोघेही खाली पडण्याची भीती असते. हत्ती घाबरून पळू लागला, तरी अपघाताचा संभव असतो. याच्या उलट बेडर हत्ती सोंडेच्या तडाख्याने व दातांच्या साहाय्याने जनावरालाही गारद करतात. हौद हलत असल्याने शिकाऱ्याच्या नेमबाजीने कौशल्य पणाला लागते.
हाक्याची शिकार : हाक्याच्या शिकारीचे अनुभवसिद्ध असे तंत्र आहे. अशा शिकारीसाठी जंगलविभागाची परवानगी काढावी लागते. गोंड, कातकरी, भिल्ल इ. वन्य जमाती हाका काढण्याच्या कामी कुशल असतात. वाहत्या वाऱ्याच्या दिशेवर आणि माऱ्यांच्या जागांवर शिकाऱ्यांना बसवून वाऱ्याच्या उलट बाजूने फळी धरून हाके काढणारे हाका काढतात. या आवाजाने विश्रांती घेत पडलेली जनावरे बाहेर पडतात. घळीच्या दोन्ही अंगांस उंच झाडांवर बसलेल्या टेहळ्यांच्या साहाय्याने त्यांना शिकाऱ्यांचा बाजूकडे नेमके नेण्याचे विशिष्ट तंत्र आहे. जनावरांच्या हालचालीची टेहेळणी करणारी माणसे दरीच्या दोन्ही अंगांस उंच जागांवर, झाडांवर बसतात व जनावर निघताच झाडावर ठोके टाकून त्यास खिंडीच्या तोंडाशी बसलेल्या शिकाऱ्याकडे नेतात. काही हुशार जनावरे हाक्यांच्या फळीतून पळूनही जातात. केवळ जखमी झालेले जनावर उलटले, तर हाकाऱ्यांना तशी सूचना देतात. फऱ्यातून सटकलेली व उलटलेली जनावरे मारण्यासाठी आणि हाकाऱ्यांच्या संरक्षणासाठी हाकाऱ्यांच्या पिछाडीवर काही अंतरावर सशस्त्र माणसांची योजना करावी लागते. या लोकांना शस्त्र वापरताना हाकाऱ्यांची काळजी घ्यावी लागते, नाहीतर अपघाताची भीती असते.
कोणत्या जनावराची शिकार करावयाची ते पूर्वनियोजित असते. त्यामुळे इतर जनावरांवर मारा करीत नाहीत. केवळ जखमी झालेले जनावर हुडकून मारावेच लागते. जखमी जनावर शोधावयासाठी कुत्री व पाळीव गुरे वापरता येतात. कुत्र्यांच्या भुंकण्याने हिंस्र जनावर दबून राहते आणि इतर गुरे त्याच्या वासाने बिचकू लागतात. त्यामुळे प्राण्याची दडण्याची जागा लक्षात येते व त्याला मारण्याची संधी मिळते.
मचाणावरील शिकार : ही शिकार रात्री करावी लागते. हिंस्र पशू मारण्यासाठी झाडात उंचावर तयार केलेल्या छुप्या बैठकीस ‘मचाण’ असे म्हणतात.
मचाणावरून शिकाऱ्याला व्यवस्थित रीतीने दिसेल आणि शस्त्राच्या टप्प्यात राहील, अशा अंतरावर बिबळ्यासाठी आमिष म्हणून कुत्रा वा बकरे तर वाघासाठी रेडकू बांधतात. या आमिषाची हालचाल मचाणावरच्या शिकाऱ्याला कळावी, म्हणून त्याच्या गळ्यात घंटा बांधतात. मचाणावर कोणी बसलेले आहे, याची कल्पना त्या बांधलेल्या जनावराला येऊ न देता सर्व मदतनीस निघून गेले, म्हणजे एकाकी पडलेले जनावर ओरडू लागते. जनावर ओरडू लागले म्हणजे जंगलात दडलेले हिंस्र श्वापद त्याच्याजवळ येते व शिकाऱ्याला नेम मारता येतो. बांधलेल्या जनावरावर हल्ला झाल्याबरोबर घाईने त्याच्या अंगावर विजेचा झोत न टाकता, आलेल्या श्वापदाचा संशय फिटून तो आपल्या भक्ष्याचे रक्त शांतपणे पिऊ लागला, म्हणजे बार काढतात.
घोले : एखाद्या झाडाच्या बुंध्याभोवती किंवा करवंदीच्या जाळीत बसण्यासाठी तयार केलेली जागा. जेथे मचाण बांधण्यासारखी उंच झाडे नसतात, तेथे घोले करावयाची पद्धत आहे. घोल्यात दोनतीन माणसांची सोय करतात. करवंदीची जाळी पोखरून किंवा प्रथम तंबूप्रमाणे बांबू रोवल्यावर गवत टाकून त्यावर हिरव्या व काटेरी फांद्या टाकतात. दरवाजावरही काटेरी फांद्या लावून त्यात बंदुकीसाठी झरोके ठेवतात.
टव : कर्नाटकात शिकारीसाठी गोल खड्डा खणून भोवती मातीचा बांध घालून काट्याकुट्यांनी झाकून टाकतात. या बांधामध्ये हत्यारांसाठी झरोके ठेवतात. हे टव वाऱ्याच्या उलट दिशेवर तयार करतात. रानातील हिरवा किंवा सुकलेला पालपाचोळा वापरून टव झाकतात. मात्र वरून ते उघडेच असते व त्यात दोनच माणसांची व्यवस्था असते. डुकरांच्या शिकारींसाठी केलेले टव वाघाच्या शिकारीसाठी वापतराना वर गाडीचे चाक बसवून ते बंद करतात.
याच प्रकारची, पण तीनचार माणसे शस्त्रे घेऊन ऐसपैस बसू शकतील असा खड्डा करून जमिनीत दडून बसण्याची ‘नेलटव’ नावाची जागाही तयार करतात. नैसर्गिक वाटेल अशा रीतीने यावर बांबू, पालापाचोळा पसरतात. नेलटवच्या मागच्या बाजूला चर खणून त्यावरून झुडपे पसरून बारीक वाट ठेवतात. नेलटव सैनिकी धर्तीच्या बुरुजासारखे फसवे व सुरक्षित असते. जमिनीच्या सपाटीवर शस्त्र चालविता येत असल्याने नेलटव शिकारीसाठी चांगले असते.
पायी शिकार : पायी फिरून जनावर हेरावयाचे आणि त्याची शिकार करावयाची ही पद्धत अल्पखर्चिक, मात्र शिकाऱ्याच्या कौशल्याची परीक्षा पाहणारी मानली जाते. या शिकारीत शिकाऱ्याला जनावरांच्या सवयींची, स्वभावांची आणि रानाची चांगली माहिती असावी लागते. एकट्याने वाऱ्याच्या उलट बाजूने जात शिकार साधण्यासाठी कुशलता लागते. पावलांचा व पालापाचोळ्याचा आवाज न करता व जनावराच्या दृष्टीस न पडता लपतछपत मार्ग काढत जावे लागते. सावज नजरेस पडून शस्त्राच्या माऱ्याच्या टप्प्यात आल्यावर आडोसा घेऊन नेम मारावा लागतो. क्वचित प्रसंगी सावज अचानक समोरच आले, तरी घाबरून न जाता शस्त्र वापरावे लागते. नेम वर्मावर मारावा लागतो. जनावर फक्त जखमी झाले तर ते अंगावर झेप घेण्याची भीती असते. अशा प्रसंगी धीर न सोडता लगोलग दुसरी गोळी मारावी लागते.
शिकारीचे विविध प्रकार : वन्य श्वापदांच्या वा मोठ्या प्राण्यांच्या शिकारी (बिग गेम हंटिंग) मध्यम वा लहान आकाराच्या प्राण्यांच्या शिकारी (स्मॉल गेम हंटिंग) आणि पक्ष्यांच्या शिकारी (गेम बर्ड्स) असे प्रमुख गट मानले जातात. मोठ्या प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, हत्ती, चित्ते, गवे, अस्वले, गेंडे, रानडुकरे, रेडे, रानमेंढे, आयबेक्स, प्यूमा, हरिणांच्या वेगवेगळया जाती (रेनडियर, सांबर, काळवीट), कांगारू इ. प्राण्यांच्या शिकारी केल्या जातात. छोट्या सावजांमध्ये कोल्हे, लांडगे, ससे, खारी, रानमांजरे, इत्यादींचा समावेश होतो. पक्ष्यांमध्ये मुख्यतः कबुतरे, तितर पक्षी, फेझंट, कृकण पक्षी, लावा, ग्राउस, रानकोंबडे, पाणकोंबडे-बदके, हंस, मोर, लांडोर इ. पक्ष्यांची शिकार करतात. ह्यांपैकी काही प्रकारांचे थोडक्यात वर्णन पुढे दिले आहे :
वाघ-सिंहांची शिकार : वाघाची शिकार करताना विशेष सावध राहावे लागते. वाघ आपली शिकार एकदम खाऊन टाकत नाही. मुद्दाम वाघासाठी बांधलेल्या रेड्यावर बसूनही वाघाची शिकार करतात. याशिवाय वाघाच्या पाणी पिण्याच्या जागांवर बसून त्याची शिकार करता येते. पायी किंवा हत्तीवरून हाका काढूनही वाघाची शिकार करतात. नरभक्षक वाघाची तसेच बिबळ्याची शिकार करणे फारच धोकादायक असते.
सिंह हा वाघापेक्षा कमी क्रूर, उमदा आणि कळपाने राहणारा प्राणी आहे. वाघ भरल्यापोटीही केवळ रक्तासाठी एखाद्या प्राण्यावर हल्ला करतो परंतु सिंह आपले पोट भरलेले असल्यास कोणाच्याही वाटेला जात नाही. तो हाका काढल्यानंतर शिकाऱ्याच्या समोरून सावकाश आणि बेडरपणे जात असल्याने त्याला नेम मारणे सोपे होते.
हत्तींची शिकार : हत्ती कळप करून राहतात. त्यांचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्याने त्यांना माणसाचा वास दुरूनच येतो. त्यामुळे हत्तींकडून शिकाऱ्याकडे वारा वाहत असेल, तेव्हाच त्यांची शिकार सोपी होते.
हत्तीसारख्या प्रचंड प्राण्याची शिकार उंच मचाणावर बसून करणे सोपे ठरते. परंतु नेम चुकून हत्ती नुसताच जखमी झाला, तर हत्तींचा कळप शिकाऱ्यावर चाल करून येण्याची भीती असते. हत्तीला मारण्यापेक्षा मोठमोठे कळप व कोवळे गवत पसरलेल्या खड्ड्यात त्याला फसवून खेडा पद्धतीने जिवंत पकडणे सोपे ठरते. हत्तीचे बच्चे त्यानंतर माणसाळवून, शिकवून अनेक प्रकारच्या कामांसाठी तयार करता येतात.
आफ्रिकेतील निग्रो जमातींमध्ये हस्तिदंतासाठी धनुष्यबाणानेही हत्तींची शिकार करीत. मात्र आता त्यास बंदी घातली गेली आहे.
रानडुकरांची शिकार : ही शिकार घोड्यावरून भाल्याने किंवा पायी हाके काढून बंदुकीने करतात. गावकरी भाला, बरची, कुऱ्हाड वापरतात. पाठलाग चालू असताना डुक्कर उलटून शिकाऱ्यारच मुसंडी मारण्याची भीती असते. घोड्यावरून भाल्याने शिकार करताना घोडा उत्तम सरावाचा असावा लागतो. अस्वलाची शिकार बंदुकीनेच करतात. अस्वल हे फार घातकी असते. जंगलातील बहुतेक अपघात अस्वलांच्या हल्ल्यांमुळेच होतात.
हरिणांची शिकार : ‘मृगया’ हा शब्द हरिणाच्या शिकारीवरूनच रूढ झालेला आहे. प्राचीन काळी त्यांच्या शिकारीसाठी रथासारखे वेगवान वाहन व धनुष्यबाण हे शस्त्र वापरीत. आता मध्यम प्रतीची रायफल वापरतात. हरिणांचे कळप अत्यंत वेगाने पळतात. त्यांत माद्या पुढे आणि नर मागे असतो. हरिण हे धूर्त, चपळ आणि सावध असल्याने ही शिकार अवघड व आव्हानप्रद ठरते. मादीची शिकार केली, तर तिच्या पोटातील पिलाचीही हत्या होईल म्हणून शक्यतो नरांचीच (काळवीट) शिकार करतात.
पक्ष्यांची शिकार : पक्ष्यांची शिकार हाही अनेक शिकाऱ्यांचा आवडीचा छंद आहे. बदके, कबुतरे आदींच्या शिकारीची अनेकांना विशेष आवड असते. बदकांची शिकार करणे, हाही एक कौशल्याचा खेळ आहे. फासेपारध्यांसारख्या भारतातील भटक्या जमाती गलोलीवजा साधनांनी पोपट, पारवा, तितर, ससाणा यांसारख्या पक्ष्यांना मारून आपला उदरनिर्वाह करतात. उडत्या पक्ष्यांना मारण्यासाठी भिल्ल धनुष्यबाण वापरतात.
जलचर प्राण्यांची शिकार : जलचर प्राण्यांच्या शिकारीत मच्छीमारीला केवळ खेळाचेच नव्हे, तर व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. [→ मत्स्योद्योग]. जलाशयाच्या काठावर बसून गळ किंवा जाळी टाकण्याच्या रूढ पद्धतीपासून ते नदी-सागरात दूर आणि खोल जाऊन आधुनिक साधनांनी जलचर प्राणी पकडण्यापर्यंत विविध पद्धती रूढ आहेत. माशांपैकी मरळ या जातीचाच मासा फक्त बंदुकीने मारता येतो. दर दहा-पंधरा मिनिटांनी श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याची या माशाची सवय आहे. त्यावेळी तो बंदुकीने टिपता येतो.
त्याचप्रमाणे मगरी आणि सुसरी यांचीही शिकार केली जाते. आफ्रिकेतील नद्यांतून ज्या मोठ्या सुसरी आढळतात, त्यांची शिकार तेथील लोक भाल्याने करीत असले, तरी इतरत्र त्यासाठी बंदूक वापरतात. एस्किमो लोक सील या सस्तन प्राण्याच्या शिकारीसाठी भाले वापरतात.
सफारी : नियोजनबद्ध, सामुदायिक शिकारीच्या आफ्रिकेतील मोहिमांना उद्देशून ‘सफारी’ ही संज्ञा वापरली जाते. सफारीचे नेतृत्व सामान्यतः व्यावसायिक शिकाऱ्याकडे असते व त्यात इतर शिकारी सहभागी होतात. या शिकारीसाठी साधनसामग्री, बंदुकादी शस्त्रे वाहून नेण्यासाठी साहाय्यकांचा मोठा ताफा पूर्वी असे. नंतरच्या काळात त्यासाठी जीपसारखी वाहने वापरली जाऊ लागली. सफारीमध्ये सामील झालेल्या शिकाऱ्याना अजस्र रानरेडे, हत्ती, चित्ते, सिंह, गेंडे अशा मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याची संधी मिळते. वन्य श्वापदांची छायाचित्रे घेण्याच्या नियोजनबद्ध सहलींना उद्देशूनही ‘सफारी’ ही संज्ञा वापरली जाते. बहुतेक सफारी शिकारी या तीन ते सहा आठवड्यांच्या असतात. कित्येकदा ह्या मोहिमा सफारी कंपन्यांकडून आयोजित केल्या जातात. अनेक आफ्रिकी देशांनी सफारीमध्ये ठार मारल्या जाणाऱ्यांप्राण्यांची संख्या व जाती यांवर निर्बंध घातले आहेत. काही देशांनी विशिष्ट प्राण्यांना मारण्यासाठी कोणती शस्त्रे वापरावीत, ह्याचेही नियम घालून दिले आहेत.
गोखले, श्री. पु.
शिकार तसेच आधुनिकीकरणाच्या अनेक प्रक्रिया व उपक्रम यांमुळे पशुपक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट झाल्या आहेत व होतही आहेत. त्यांचे संरक्षण करणे हे केवळ भूतदयेच्या दृष्टीनेच नव्हे, तर मानवजातीच्या सुखी जीवनासाठी अपरिहार्य असलेल्या नौसर्गिक पर्यावरणाचा समतोल कायम राहण्याच्या दृष्टीनेही इष्ट आहे. या विचाराने जगभर नवीन नवीन कायद्यांची निर्मिती होऊ लागली आहे. भारतामध्ये केंद्रीय सरकारने केलेला ‘वन्य पक्षी आणि प्राणी अधिनियम, १९१२’ हे या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल होय. त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पूर्वीच्या मुंबई सरकारने मुंबई प्रांतापुरता लागू असणारा ‘मुंबई वन्य प्राणी व वन्य पक्षी संरक्षण अधिनियम, १९५१’ अमलात आणला. आधुनिकता व परिपूर्णता या दृष्टीने केंद्रीय सरकारने केलेल्या ‘वन्य जीवन परिरक्षण अधिनियम, १९७२’ यामधील काही तरतुदींचा परामर्श इथे घेणे इष्ट होईल. या अधिनियमामधे ‘प्राणी’ या शब्दाच्या व्यापक व सर्वसमावेशक व्याख्येमध्ये भूजलचर, पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, त्यांची पिलावळ, व पक्षी आणि सरपटणाऱ्यांप्राण्यांच्या अंड्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. तसेच ‘शिकार’ या शब्दाची किंवा संकल्पनेची व्याप्ती वाढविण्याच्या हेतूने त्यामध्ये प्राण्यांना पकडणे, ठार मारणे, विषप्राशन करविणे, फसवून जाळ्यात पकडणे, उपरोक्त हेतू साध्य करण्यासाठी प्राण्यांना हाकलत नेणे इ. सर्व क्रियांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
मानवाच्या बेजबाबदार वर्तनामुळे वन्य जीवनाच्या अस्तित्वाला जो धोका उद्भवला आहे, त्याला आळा वा पायबंद घालण्याच्या हेतूने कायद्याला प्रामुख्याने चार प्रकारच्या तपशीलवार तरतुदी कराव्या लागतात : (१) काही अपरिहार्य अपवाद वगळता वन्य प्राण्यांच्या शिकारीला व तत्सम प्रयत्नांना संपूर्ण प्रतिबंध करणे. (२) ज्यामुळे शिकार हा करमणुकीचा किंवा किफायतशीर धंदा होऊ शकतो, अशा प्रकारांना, म्हणजेच जिवंत वा मृत वन्य प्राण्यांची खरेदी-विक्री, त्यांच्या शिकारीमधून उद्भभवणाऱ्या वस्तूंची म्हणजेच वाघा-सिंहांची मुंडकी हस्तिदंत कासव-सुसर-साप, हरिण, वाघ, सिंह, इत्यादींची कातडी इ. वस्तूंची देवघेव करणे, त्या पदरी बाळगणे किंवा त्यांचा साठा करणे वा प्रदर्शन करणे इ. प्रकारांवर संपूर्ण बंदी आणणे. (३) वन्य जिवांचा संहार टाळण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, प्राणिसंग्रहालये इ. उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवणे. (४) अशा स्वरूपाच्या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकारी अधिकाऱ्यांची यंत्रणा उभारणे. उपरोक्त हेतू साध्य करण्याठी १९७२ च्या अधिनियमामध्ये ज्या विविध व विस्तृत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, त्यांचा फक्त संक्षिप्त संदर्भ इथे देण्यात येत आहे. कलम ९ खाली परिशिष्ट १, २, ३ व ४ यांमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्राण्याची हत्या वा शिकार करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे परंतु कलम ११ या अन्वये एखाद्या वन्य प्राण्यामुळे मानवजीवितास धोका उत्पन्न झाल्यास किंवा एखादा वन्यजीव दौर्बल्य वा काही रोगामुळे बरा होण्याच्या शक्यतेपलीकडे पोचला असल्यास, जिल्हा अधीक्षकांच्या लेखी परवानगीने त्याची हत्या करता येते. तसेच कलम १२ प्रमाणे शिक्षण, शास्त्रीय संशोधन वा शास्त्रीय सुव्यवस्थेसाठी लेखी परवानगीने वन्य प्राण्यांची शिकार करता येते.
त्याचप्रमाणे कलम २४ खाली वन्य जीवोद्भव वस्तूंची वा पकडलेले वन्य जीव वा त्यांचे मांस यांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे. ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संचालक, वन्य जीव परिरक्षण व त्यांच्या हाताखालील अधिकारी, मुख्य वन्यजीवन अधीक्षक व त्यांच्या हाताखालील अधिकारी तसेच राज्यस्तरीय वन्यजीवन सल्लागार मंडळे अशा प्रकारची यंत्रणा प्रस्थापित करण्यात आलेली आहे.
रेगे, प्र. वा.