शाँपेन : भारतातील एक आदिवासी जमात. तिची वस्ती मुख्यत्वे अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात, विशेषतः निकोबार बेटावर आढळते. त्यांची लोकसंख्या २२३ होती (१९८१) ती हळूहळू घटत चालली आहे. ते पाच – दहा कुटुंबांच्या समूहांनी नदीखोऱ्यात, घनदाट जंगलात तात्पुरते पाल बांधून राहतात. भटके जीवन त्यांना आवडते. या समूहातही पुन्हा छोटे गट आढळतात. त्यांचे प्रमुख अन्न कंदवर्गीय असले, तरी विशिष्ट जातीचे मासे, तसेच डुक्कर व कुत्रा यांचे मांसही ते खातात. मासेमारी व शिकार, विशषतः डुकरांची भाल्याने शिकार करण्यात ते तरबेज आहेत. ते शक्यतो कच्चे किंवा किंचित भाजलेले अन्न भक्षण करतात. मद्यपान व धूम्रपानाचे त्यांना आकर्षण नाही, मात्र पान-तंबाखू ते खातात.
शाँपेन मंगोलॉइड वंशाचे असून मध्यम उंचीचे सामान्यतः बुटके व कृष्णवर्णीय आहेत. त्यांची बोलीभाषा ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील असून निकोबारी भाषेपक्षा ती वेगळी आहे. एकपत्नीकत्व यांच्यात रूढ असून क्वचित द्विपत्नीकत्वही आढळते. प्रसंगोपात्तच एखादा पुरुष सासुरवाडीत राहतो. जंगलातील कंदमुळे, मध, पोफळी इ. गोळा करून वस्तुविनिमय पद्धतीने ते साखर, कपडे इ. वस्तू निकोबारी लोकांकडून घेतात.
शाँपेन जडप्राणवादी असून शिकार वा मासेमारीसाठी बाहेर पडताना संकट निवारणार्थ एका विशिष्ट वृक्षाची पूजा करतात. भूतपिशाच व जादुटोणा यांवर त्यांचा विश्वास आहे. जंगलाच्या अंतर्भागात राहणाऱ्या शॉंपेनचा उल्लेख निकोबारी लोक गॅलॅथिएल शॉंपेन असा करतात.
भारतीय केंद्रशासन ही जमात नष्ट होऊ नये, म्हणून प्रयत्नशील आहे. त्यांच्या विकासासाठी तसेच पुनर्वसनासाठी अनेक योजना शासनाने कार्यान्वित केल्या आहेत. अलीकडे त्यांच्या संबंधीचे मानवशास्त्रीय संशोधन के. के. गांगुली, एस्. एन्.एच् . रिझ्वी इ. अभ्यासकांनी केले आहे.
संदर्भ : 1. Naswa, Sumedha, Tribes of Andaman and Nicobar Islands, New Delhi, 1999.
2. Rizvi, S. N. H. The Shompen : A Vanishing Tribe of the Great Nicobar Island, Calcutta, 1990.
3. Singh, K. S. The Schedules Tribes, Bombay, 1994.
कुलकर्णी, वि. श्री.