तलैंग : ब्रम्हदेशातील एक जमात. हे स्वतःला मॉन म्हणतात, तर यूरोपीय त्यांचा पेग्युअन असा उल्लेख करतात. १९६० मध्ये ब्रम्हदेशात त्यांची संख्या ३,५०,००० व थायलंडमध्ये ६५,००० होती. काही विद्वानांच्या मते, मॉन पश्चिम चीनमधून ब्रम्हदेशात आले असावेत व त्यांच्यावर हिंदू संस्कृतीचा प्रभाव पडला असावा. इतरांच्या मते मॉन तेलंगणातून आले व म्हणून त्यांचे ब्रम्हदेशात तलैंग असे नाव झाले असावे. तलैंगांची लिपी दक्षिण भारतीय भाषांच्या लिपींशी मिळतीजुळती आहे. मॉन लोकांचा सर्वांत प्राचीन शिलालेख थायलंडमध्ये लॉपबुरी येथील एका खांबावर सापडला, त्यावरील लिपी पाचव्या शतकातील लिपीशी मिळतीजुळती आहे, असे विद्वानांचे मत आहे. अकराव्या शतकात मॉन साम्राज्य पेगूत स्थिर झाले होते. अकराशे ते सोळाशेच्या दरम्यान मॉन व ब्रम्ही लोक यांच्यात बऱ्याच चळवळी झाल्या. सोळाव्या शतकातील ब्रम्हदेश व थायलंडमधील युद्धांमुळे मॉन लोकांची अपरिमित हानी झाली. या काळात त्यांना वेठबिगारीने काम करावे लागले व त्यांची शेती उद्‌ध्वस्त झाली.

मॉन हे हीनयान पंथाचे होते. त्यांच्या आधिपत्याखाली संस्कृत व पाली भाषांना धार्मिक बाबीत समान वागणूक मिळत असे.

ब्रह्मी लोकांनी मॉन यांच्या भाषेतील मुळाक्षरे घेतली आणि त्यावर आपल्या लिपीचा विकास केला. थायलंडमधील मॉन लोकांच्या शिल्पांवर गुप्तकालीन शिल्पांची छाप आढळते.

यांच्या संस्कृती व भाषा यांसंबंधी संशोधन चालू आहे. तत्संबंधी विद्वानांत अजून बरेच मतभेद आहेत परंतु हिंदू संस्कृतीच्या प्रभावाखाली येणारे सर्वांत प्राचीन साम्राज्य म्हणून त्यांचे महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीच्या प्रसाराचे मॉन लोकांस बरेच श्रेय आहे.

संदर्भ : May, Reginald Le, The Culture of South East Asia, Delhi, 1962.

मुटाटकर, रामचंद्र