शाक्त पंथ : भारतीय तंत्रमार्गातील एक पंथ. शैव, शाक्त, वैष्णव, बौद्ध, जैन तंत्रग्रंथ हे ⇨आगम, संहिता, तंत्र अशा विविध नावांनी ओळखले जातात. पारंपरिक ग्रंथांमध्ये तंत्रमार्गातील विविध शाखांच्या उद्गमासंबंधी उल्लेख सापडतात. शक्त तंत्रे शिवाच्या ऊर्ध्व मुखातून प्रसृत झाली असल्याने त्यांना ‘ऊर्ध्वम्नाय’ असे समजले जाते. तांत्रिक उपासनेचे लक्ष्य ‘भोग’ आणि ‘मोक्ष’ असे द्विविध आहे. काही शाक्त तंत्रांमध्ये भोग हा शब्द संभोग ह्या अर्थाने वापरला जातो. त्या विशिष्ट संदर्भात त्या तांत्रिक उपासनेला कुलाचार किंवा वामाचार म्हटले जाते. तथापि सर्वच शाक्त पंथ किंबहूना समस्त तंत्रसंप्रदाय हा वामाचार आहे, असा गैरसमज काही वेळा दिसून येतो.
शाक्त पंथ हा एकूण शैव संप्रदायाचा एक भाग असला, तरी त्याचे वेगळेपण दिसून येते. शैव पंथ हा शिवप्रधान असून शाक्त पंथ हा शक्तिप्रधान आहे. बऱ्याचशा ग्रंथांची रचना शिव व शक्ती यांच्या संवादाच्या रूपात केलेली आहे. ज्या ग्रंथात शक्ती किंवा ⇨पार्वती ही पृच्छा करणारी असून शिव हा उत्तर देणारा असतो, तो शैव संप्रदायातील ग्रंथ होय. शाक्त ग्रंथांमध्ये त्याच्या उलट स्थिती दिसून येते. शाक्तागमांमध्ये सृष्टी, स्थिती, संहार, अनाख्य व भासा अशा पाच परा शक्ती मानलेल्या आहेत. त्यांचे विवेचन काही शाक्तागमांमध्ये वेगळ्या पद्धतीने केलेले आढळते.
शैव संप्रदायाच्या प्राचीनतेसंबंधी विवेचन करताना संशोधकांनी शिवाची उपासना सिंधू संस्कृतीइतकी प्राचीन असल्याचे मत व्यक्त केले आहे. महाभारतात शैव व शाक्त पंथांचे अस्तित्व सूचित करणारे उल्लेख आढळतात. ८४ सिद्धांपैकी मत्स्येन्द्रनाथ किंवा ⇨मच्छिंद्रनाथ (सुमारे दहावे शतक) हे नाथपंथाचे तसेच कौलतंत्राचे प्रवर्तक मानले जातात.[→ नाथ संप्रदाय]. कौलमार्ग हा शाक्तांमधील एक उपपंथ आहे. कुब्जिकामत, कुब्जिकोपनिषद, मतोत्तर, चिद्गगनचंद्रिका इ. ग्रंथ शाक्त परंपरेचे आधारभूज ग्रंथ आहेत.
शाक्त पंथात शक्ती ही उपास्य देवता असून तिची परमतत्त्व या स्वरूपात उपासना केली जाते. ही संवित्स्वरूपा भगवती आपल्या अंतर्गत असलेल्या सृष्टीस बाह्य स्वरूपात प्रकट करते. ह्या शाक्त पंथामध्ये ⇨काली व त्रिपुरा असे त्या त्या देवतांचे संप्रदाय आहेत. ह्या पंथामध्ये शक्ती व शक्तिमान ह्यांची एकात्मता (अद्वैत) प्रस्थापित केलेली आहे. शुद्ध परब्रह्म ते आदिवर्ण अकार रूपात प्रकट होते. या अकारास शाक्त पंथात ‘अनुत्तर अकार’ असे म्हणतात. ह्या अकाराच्या चार कला असून जया, विजया, अजिता आणि अपराजिता अशा परब्रह्माच्या चार शक्ती त्या चार कलांच्या रूपात प्रकट होतात. परब्रह्माच्या चार परा शक्ती, चार परापरा शक्ती व चार अपरा शक्ती मानल्या आहेत. जया इ. चार गुह्य शक्ती ह्या चार अपरा शक्ती होत. योगवासिष्ठात ह्या चार शक्तींसमवेत सिद्धा, रक्ता, अलम्बुषा व उत्पला अशी आणखी चार शक्तींची नावे येतात. ह्या आठ शक्ती मातृकांमध्ये श्रेष्ठ असून त्यांचा स्वभाव रौद्र आहे. त्या तुंबरू नामक रुद्राच्या आश्रित आहेत. नित्या नामक शाक्त संप्रदायात त्या शक्तीचे नाव नित्या असे आहे. नित्या, त्रिक, क्रम, कुल इ. शाक्त पंथ हे अद्वैतवादी असून त्यांमध्ये शक्ती ही परम शक्ती मानली जाते. शिवादी सर्व तत्त्वांची उत्पत्ती भगवती अंबेपासून झाली आहे. सर्व विश्व हे मूलत: शक्तीमध्ये आस्थित असून ती त्यास बाह्य स्वरूपात प्रकट करते. ह्या सिद्धांतास शक्तिपारम्यवाद असे नाव आहे. पुढील काळात शैव व शाक्त दर्शन मिळून ‘शांभव दर्शन’ निर्माण झाले. त्यामध्ये शिव व शक्ती यांची समानता प्रस्थापित केली गेली.
काश्मीरमध्ये प्रस्थापित झालेला क्रम संप्रदाय हा ह्या शक्तिपारम्यवादाचा प्रमुख पुरस्कर्ता आहे. त्या संप्रदायाच्या मतानुसार काली पाच प्रकारची कृत्ये करते. क्षेप, ज्ञान, प्रसंख्यान, गती आणि नाद ही ती पाच कृत्ये होत. स्वात्म्याचे भेदन म्हणजे क्षेप. त्याची निर्विकल्प स्थिती म्हणजे ज्ञान, सविकल्प रूप हे प्रसंख्यान, प्रतिबिंबाच्या रूपात प्रकट होणे ही गती आणि आत्मस्वरूपात पुन्हा विलीन होणे हा नाद. अशा प्रकारे ही पाच कृत्ये करणारी – कलनांना करणारी – देवी काली होय. सृष्टी, स्थिती, संहार व अनाख्या असा चार तत्त्वांचा क्रम मानणारा संप्रदाय क्रम या नावाने प्रसिद्ध आहे. काही आचार्य भासा हे पाचवे तत्त्वही मानतात. महेश्वरानंदविरचित महार्थमंजरी व त्या ग्रंथातील परिमल टीका क्रमदर्शनाचे विस्ताराने विवेचन करतात.
त्रिपुरा हाही संप्रदाय क्रमदर्शनाप्रमाणेच कौल संप्रदायाचे अनुकरण करतो. त्रिपुरा संप्रदायात तीन शक्ती, तीन चक्रे तीन धाम, तीन बीजे, तीन तत्त्वे इ. तीन पदार्थांची जननी ‘त्रिपुरा’ आहे, असे मानले जाते. शिव, शक्ती व नर या तीन स्वरूपांचे विशेष विवेचन या संप्रदायात आढळते. अशा व इतर कारणांमुळे यास ‘त्रिक दर्शन’ असे म्हणतात. त्रिपुरा दर्शनाचा प्रसार काश्मीरमध्ये झाला. राजा ⇨अवंतिवर्मन् (कार. इ.स. ८५५–८३) हा राज्य करीत असताना कौल आणि क्रम हे संप्रदाय प्रतिष्ठित झालेले होते. त्रिपुरा दर्शनाचा प्रसार ह्या सुमारास होऊ लागला. ह्या दर्शनाचा काश्मीरप्रमाणे बंगाल व केरळातही प्रसार झालेला दिसतो.
त्रिपुरा संप्रदायात वामकेश्वर दर्शन हे एक महत्त्वाचे शास्त्र आहे. त्या मतानुसार परमतत्त्वास संविच्छक्ती म्हणतात. तिच्यापासूनच सर्व सृष्टी निर्माण होते. शिव व शक्ती अशी दोन तत्त्वेही तिच्यापासून निर्माण होतात. हीस महात्रिपुरसुंदरी असेही नाव आहे. तिच्या उपासनेचे अंतर्याग व बहिर्याग असे दोन प्रकार आहेत. या प्रकारे उपासना करणाऱ्या साधकास भोग आणि मोक्ष ह्या दोहोंचीही प्राप्ती होते. या संप्रदायातील ग्रंथांमध्ये मातृका (= वर्ण), मंत्र व मुद्रा ह्यांच्या साह्याने केल्या जाणाऱ्या उपासनेचे विस्ताराने वर्णन आढळते. नित्याषोडशिकार्णव अथवा वामकेश्वर तंत्र हा संप्रदायातील एक प्रमुख ग्रंथ होय. सौंदर्यलहरी हे प्रसिद्ध स्तोत्रही या संप्रदायाचे प्रतिपादन करते.
त्रिपुरसुंदरी हे परमोच्च शक्तीचेच स्वरूप आहे. ती सुंदर युवतीच्या रूपात प्रकट होते. तिच्या संप्रदायास सौभाग्यसंप्रदाय असे नाव आहे. श्रीचक्र आणि श्रीविद्या ह्यांची उपासना ह्या संप्रदायाची महत्त्वाची अंगे आहेत. श्रीचक्र किंवा श्रीयंत्र ही नऊ त्रिकोणांनी बनलेली रेखाकृती आहे. श्रीविद्या ही १५ संस्कृत वर्णांची मालिका असून लौकिक भाषेच्या दृष्टिकोणातून अर्थहीन आहे. ती वाग्भव, कामराज व शक्ती अशा तीन विभागांनी युक्त आहे. अमृतानंद, शिवानंद, लक्ष्मीधर, भास्करराव इ. आचार्यांनी नित्याषोडशिकार्णव, योगिनीहृदय इ. ग्रंथांवर लिहिलेल्या टीकांमध्ये या संप्रदायाचे तत्त्वज्ञान विस्तृत स्वरूपात सापडते.
शाक्त संप्रदायातील ग्रंथ संस्कृतप्रमाणे बंगाली, मैथिली, हिंदी, राजस्थानी, ब्रज, पंजाबी अशा भाषांमधूनही निर्माण झाले. या संप्रदायातील चंडीमंगल, कालिकामंगल इ. गीते व स्तोत्रे या भाषांमध्ये रचली गेली. प्राचीन काळापासून चालत आलेल्या ह्या संप्रदायाने अठराव्या शतकात नवे स्वरूप धारण केले. शक्तीची उपासना व भक्तिसंप्रदायाचे मिश्रण असलेल्या ह्या संप्रदायातील महान साधक ⇨रामकृष्ण परमहंस हे होत. त्यांच्या उपदेशात ह्या नवशाक्त पंथाचे सार सापडते.
पहा : काश्मीर शैव संप्रदाय तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म शैव संप्रदाय.
संदर्भ : 1. Goudriaan, Teun Gupta, Sanjukta, Hindu Tantric and Shakta Literature, Wiesbaden, 1981.
2. Rastogi, Navjivan, The Krama Tantricism of Kashmir, Vol. I, Delhi, 1979.
3. Woodroffe, Sir John, Shakti and Shakta, Madras, 1959.
४.द्विवेद, व्रजवल्लभ, तन्त्रागमीय धर्म-दर्शन, भाग १ व २, वाराणसी, २००१.
५. द्विवेद, व्रजवल्लभ, संपा. नित्याषोडशिकार्णव, वाराणसी, १९६८.
६. द्विवेद, व्रजवल्लभ, संपा. नेत्रतंत्र, दिल्ली, १९८५.
बहुलकर, श्रीकांत