शाकंभरी : एक शक्तिपीठ देवता. हिला बनशंकरी असेही म्हणतात. कर्नाटकात ह्या देवतेची मंदिरे आढळतात. तेथील अनेक व महाराष्ट्रातील काही कुटुंबांची ही कुलदेवता आहे. एका आख्यायिकेप्रमाणे कर्नाटकातील बनशंकरी क्षेत्रात एकदा शंभर वर्षांचा दुष्काळ पडला, तेव्हा ह्या देवीने आपल्या शरीरातून शाकभाज्या निर्माण केल्या (शाकान् बिभर्ति इति). त्याचप्रमाणे पाताळातून हरिद्रातीर्थाचे पाणी आणून लोकांच्या जीविताचे रक्षण केले.
कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील बादामी शहराजवळच्या चोलचगुडू (या भागाचे प्राचीन नाव तिलकवन असे होते.) येथे असलेल्या शाकंभरीच्या मूळ मंदिराची बांधणी सुमारे तेराशे वर्षांपूर्वी झाली असावी. विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील निर्मल शहराचा राजा पद्मराज ह्याने हे मंदिर बांधले, असे पुराणग्रंथात निर्देश आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर हरिद्रातीर्थ तलाव आहे. मूर्ती अष्टभुजा असून ती सिंहारूढ असल्याचे दिसते. सिंहाच्या गळ्यात रुंडमाळा आहेत. दुर्गेचे एक नाव कांतारवासिनी आहे. बनशंकरी ह्या नावाशी त्याचे साधर्म्य दिसते.
ह्या देवीच्या नवरात्राचा उत्सव पौष शुद्ध सप्तमीपासून (काही ठिकाणी अष्टमीपासून) सुरू होऊन, तो पौर्णिमेला संपतो. हे शाकंभरी नवरात्र होय.
संदर्भ : प्रभुदेसाई, प्र.कृ. देवीकोश, खंड २ रा, पुणे, १९६८.
कुलकर्णी, अ.र.