माना: पॉलिनीशिया या पॅसिफिक महासागरातील बेटसमूहावर राहणाऱ्या पॉलिनीशियन नामक आदिवासी जमातीच्या धर्मातील विशिष्ट संकल्पना ‘माना’ या संज्ञेने व्यक्त केली जाते. आर्. एच्. कॉडरिंग्टन या मानवशास्त्रज्ञाने प्राथमिक जमातींच्या धर्मशास्त्राच्या संदर्भात वापरण्यास योग्य अशी माना ही संकल्पना दाखविली आहे. हा शब्द पॅसिफिक महासागराच्या परिसरातील लोकांमध्ये धार्मिक संदर्भात व्यापक प्रमाणात वापरला जातो. धर्ममीमांसेला उपयुक्त होईल असाच या शब्दाचा लोकभाषेतील भावार्थ आहे. काही व्यक्तींमध्ये किंवा काही पदार्थामध्ये अतींद्रिय व विलक्षण असलेली आणि आश्चर्य व आदर निर्माण करणारी शक्ती म्हणजे माना होय. ही शक्ती त्या त्या व्यक्तींमध्ये किंवा पदार्थांमध्ये राहते, टिकते किंवा त्या व्यक्तींमधून किंवा त्या पदार्थांमधून निघूनही जाते. ही शक्ती भौतिक शक्तीसारखी नाही तिचा हिताकरता किंवा अहिताकरताही उपयोग होतो परंतु ज्याच्यात ती शक्ती असते, त्याला ती राखणे आणि वापरणे हे अत्यंत अनुकूल असते. ती शक्ती म्हणजे गुण किंवा विशिष्ट अवस्था म्हणून निर्दिष्ट करता येते. एखाद्या शूर पुरुषाला एका पाठीमागून एक यशाची मालिका प्राप्त होत गेली, तर त्याच्या यशोमालिकेचा उलगडा त्याच्या बुद्धिमत्तेने, सावधपणाने, बाहूच्या ताकदीने किंवा अन्य कशानेही पूर्ण होऊ शकत नाही, तेव्हा त्या पुरूषाच्या ठिकाणी ‘माना’ आहे असे स्पष्टीकरण पॉलिनीशियन संस्कृतीचे लोक करतात. त्यांचे डुकरांचे कळप असतात. एखाद्या डुकरिणीला मोठी वीण झाली तर उलगडा होत नाही मानामुळेच उलगडा होतो. अनेक उद्याने फुलत व फळत असतात परंतु एखाद्या वर्षी एखाद्या उद्यानालाच बहर येतो. इतर भोवतालच्या उद्यानांची साधमसामग्री कमी नसते परंतु हेच उद्यान भरभराटीस विलक्षण रीतीनेयेते. तेव्हा म्हणतात त्यात माना शिरला आहे. माना ही विजेसारखी संचार करणारी शक्ती मानली जाते. एखाद्या व्यक्तीच्या भोवताली माणसे सतत गोळा होत असतात त्याचा शब्द निक्षून पाळतात त्याची छाप त्याच्या भोवतालच्या समाजावर खोल पडलेली असते. अशा वेळी पॉलिनीशियन लोक म्हणतात, त्या माणसामध्ये माना शक्तीने वसती केली आहे.

यातु-धार्मिक परिभाषा म्हणून हा शब्द धर्माच्या मानवशास्त्राने प्राथमिक धर्मसंस्थांचा उलगडा करण्याकरता वापरला आहे. या माना शक्तीच्या साधनेकरता अनेक प्रकारच्या प्रार्थना, पूजा आणि होम-हवने प्राथमिक धर्मसंस्थांमध्ये आचरली जातात. अनेक आश्चर्ये या माना शक्तीने घडून येतात, अशी सामान्य जनांची श्रद्धा असते. रोगपरिहार होतो, शुभचिन्हांचा अर्थ समजतो, भविष्यकथन करता येते, त्याकरिता माना शक्तीला आवाहन दिले जाते. वारा पडला असताना सुरू करणे, पाऊस पाडणे, स्वच्छ सूर्यप्रकाश प्राप्त करून घेणे यांकरिता मानाची अनुकूलता प्राप्त करून घेता येते. अपघात, दुर्दैवाचा घाला, शाप, अनेक तऱ्हेच्या अडचणी हा सर्व मानासंबंधीचा व्यवहार होय. माना ही जपून, अदबीने वागविण्याची वस्तू असते. ती वस्तू, गुण वा क्रिया म्हणता येते आणि शक्तीही म्हणता येते. माणसात माना असतो त्याप्रमाणे माणूसही माना असतो. ज्या माणसात माना असतो तो मेल्यानंतर त्याच्या आत्म्यात म्हणजे भूतात माना असतो. यातु-धार्मिक असे कोणत्याही प्रकारचे असो, तेथे एक प्रकारचे भय, आदर बाळगावाच लागतो. माना शक्ती ज्या वस्तूत, व्यक्तीत, गुणात किंवा क्रियेत असते त्याबद्दल काही निर्बंध पाळावे लागतात. हे निर्बंध म्हणजेच ताबू म्हणजे ⇨ निषिद्धे होत. प्राथमिक धर्मविषयक तत्त्वज्ञानात माना आणि ताबू या दोन संकल्पनांची किंवा द्वंद्वांची महती मानावी लागते.

अशाच तऱ्हेच्या ‘माना’ सारखी संकल्पना व्यक्त करणाऱ्या अनेक संज्ञा मानवजातिशास्त्रज्ञांनी प्राथमिक जमातींच्या भाषासमूहातून हुडकून काढलेल्या आहेत ऑरेंडा, वाकन, मानीतू, हासिना, बाराका, मान्नगुर इत्यादी.

पहा : अतिभौतिक शाक्तिवाद अलौकिक सृष्टि जादूटोणा धर्म पवित्र व पवित्रेतर.

संदर्भ : 1. Durkheim, Emile Trans. The Elementary Forms of the Religious Life, London, 1954.

           2. Harrison, J. E. The- mis, a Study of the Social Origins of Greek Religion, Cambridge, 1912.

           3. King, l. The Development of Religion, New York, 1910.

           4. Leuba, J. H. A Psychological Study of Religion, New York , 1912.

           5. Levy-Bruhi, Lucien Trans How Natives Think, London, 1926.

           6. Marett, R. R. The Threshold Of Religion, London, 1914.

           7. Tregear, E. Maori- Polynesian Comparative Dictionary, Wellington, N. Z., 1891.

जोशी, लक्ष्मणशास्त्री