स्मार्त धर्म : श्रौतसूत्र आणि गृह्यसूत्र ह्यांत सांगितलेल्या विविध यज्ञविषयक व संस्कारविषयक कर्मांचा स्मार्त धर्मात समावेश होतो.चारही वेदांच्या भिन्न भिन्न शाखांच्या श्रौतसूत्रांत सांगितलेल्या यज्ञविषयक कर्मांना श्रौतधर्म असे संबोधले जाते. त्यांना श्रुतींचा म्हणजे वेदांचा साक्षात् आधार असतो. श्रौतसूत्रांत सांगितलेली अग्निस्थापनेपासूनची सर्व यज्ञकर्मे गार्हपत्य, दक्षिण आणि आहवनीय या तीन अग्नींवर केली जातात. गृह्यसूत्रांत सांगितलेली नित्यकर्मे तसेच संस्कार यांचा स्मार्त धर्मात समावेश होतो. गृह शब्द दम्पतीवाचक आहे. दम्पतींना हितकारक ते गृह्यकर्म. गृह्यसूक्तांत सांगितलेली धर्मकृत्ये गृह्य अग्नीवर केली जातात. गृह्य अग्नीलाच आवसथ्य, शालाग्नी औपासन, वैवाहिक किंवा पाकाग्नी म्हटले जाते.

पारस्कर गृह्यसूत्रावरील कर्कोपाध्याया, जयराम, हरिहर, गदाधर इ. भाष्यकारांनी गृह्यसूत्रांनाही स्मार्तसूत्र असे नाव दिले आहे म्हणून गृह्यसूत्रोक्त कर्मे स्मार्त धर्म होत.

गृह्याग्नी विवाहाचे वेळी स्थापन केला जातो. विवाहापासूनची पुढील सर्व स्मार्त कर्मे याच अग्नीवर केली जातात किंवा भावांपासून विभक्त होऊन, पैतृक संपत्तीचा स्वतंत्र वाटा घेऊन वेगळे बिर्‍हाड केले म्हणजे गृह्याग्नीची स्थापना केली जाते. त्या अग्नीवर पुढील गृह्यकर्मे केली जातात. विवाहविधी व त्याची अंगे यांचाही स्मार्त धर्मात अंतर्भाव होतो. पारस्कर गृह्यसूत्रावरील गदाधरभाष्यात यासंबंधी ‘ कर्म स्मार्तं विवाहाग्नौ कुर्वीत पृत्यहं गृही, दायकालाहृते वाऽग्नौ ’ (पारस्कर गृह्यसूत्रभाष्य.१) असा निर्देश आहे. स्मार्त कर्मे वैवाहिक अग्नीवर किंवा दाय-अग्नीवर केली जातात.

यासाठी गृह्याग्नीची स्थापना करावी लागते. पैतृक संपत्तीची भावांनी वाटणी करण्यापूर्वी पैतृक धन सर्व भावांचे साधारण असते. विभक्त झाल्यानंतर विभक्त झालेला भाऊ स्वतःच्या धनाने स्वतंत्र रीत्या स्थापना केलेल्या गृह्याग्नीवर स्मार्त कर्मे करू शकतो.

या अग्नीच्या स्थापनेच्या वेळी स्थालीपाक नावाचा यज्ञ केला जातो. अग्निपवमान, अग्निपावक आणि अग्निशुची या श्रौत अग्नि-आधानाच्या देवता आहेत. या देवतांसाठी तसेच अदिती देवतेसाठी चरूच्या म्हणजे शिजवलेल्या भाताच्या आहुती दिल्या जातात. हा गृह्याग्नी विझू देत नाहीत. त्यावर सकाळी व संध्याकाळी गृहस्थाने आज्याहुती द्यावयाच्या असतात. या होमाच्या वेळी गृहस्थ हजर नसल्यास त्याच्या पत्नीने किंवा पुत्राने किंवा कन्येने किंवा शिष्याने सकाळी व संध्याकाळी आहुती देऊन होम करावयाचा असतो.

दर पौर्णिमेनंतर आणि अमावास्येनंतर येणार्‍या प्रतिपदेस पाक्षिक स्थालीपाक यज्ञ या अग्नीवर पतिपत्नींनी करावयाचा असतो. हे एक व्रतच आहे. या वेळी पतिपत्नींना प्रवासास जाता येत नाही. दैनिक यज्ञाचे वेळीही पती, पत्नी, पुत्र, कन्या किंवा शिष्य यांनी उपस्थित राहून यज्ञ केल्यास अग्नीचा नाश होत नाही. अग्नीचा नाश झाल्यास पुन्हा अग्नीची विधिपूर्वक स्थापना करावी लागते. त्यास पुनराधान म्हणतात.

पतिपत्नींपैकी कुणी मृत झाल्यास याच अग्नीने त्यांचे दहन केले जाते. पत्नी मृत झाल्यास तिचा या अग्नीनेच दहनसंस्कार झाल्यानंतर पतीस पुन्हा स्मार्त धर्माचे अनुष्ठान करावयाचे असल्यास त्यास पुन्हा विवाह करून दुसर्‍या पत्नीबरोबर स्मार्त कर्मे करता येतात. अर्थातच त्यावेळी पुन्हा गृह्याग्नीची स्थापना करावी लागते.

ज्या स्त्रीबरोबर विवाह करताना गृह्याग्नीची स्थापना केली जाते, त्या स्त्रीलाच पत्नी ही संज्ञा प्राप्त होते. गृह शब्द दम्पतीवाचक आहे.म्हणून प्रथमविवाहाच्या वेळी अग्नीची स्थापना केल्यानंतर पतीने पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह केल्यास त्या वेळी त्याला पुन्हा अग्नी स्थापन करता येत नाही म्हणून पहिली पत्नी जिवंत असताना दुसर्‍या स्त्रीशी पतीने विवाह केल्यास, तांत्रिक रीत्या अशा दुसर्‍या विवाहित स्त्रीला पत्नी-पद मिळू शकत नाही.

पाक्षिक स्थालीपाक यज्ञात अग्नी, अग्नीषोमौ, ब्रह्मन्, प्रजापती, विश्वेदेवाः, द्यावापृथिवी इ. देवतांना चरूच्या आहुती दिल्या जातात.याच अग्नीवर पुंसवन, सोष्यन्तीकर्म ही कर्मे केली जातात. राहिलेला गर्भ पुत्राचा असावा यासाठी पुंसवन आणि सुखप्रसूतीसाठी सोष्यन्ती हे संस्कार याच अग्नीवर केले जातात. बालक जन्माला आल्यानंतर, त्याची नाळ कापल्यानंतर त्याच्या ठिकाणी मेधाजननासाठी आणि आयुष्यप्राप्तीसाठी जातकर्म हे संस्कार केले जातात. मध आणि तूप यांत सोने घासून त्याचे चाटण बालकास चाटविले जाते, हे जातकर्माचे स्वरूप आहे.

देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ, अतिथियज्ञ ( मनुष्ययज्ञ ), ब्रह्मयज्ञ हे पंचमहायज्ञ गृहस्थाने करावयाचे असतात. ती कर्मेही गृह्यसूत्रांनी निर्दिष्ट केली आहेत. तीही स्मार्त धर्मात मोडतात.

अग्नीवर दिल्या जाणार्‍या आहुतींना ‘ हुत ’ असे नाव आहे. पाच महायज्ञांपैकी बलिहरण या क्रियेस ‘ अहुत ’ म्हणतात. प्राणिमात्रांसाठी द्यावयाचा जो अन्नभाग, त्यास बलिहरण म्हणतात. पितृयज्ञास प्रहुत म्हणतात आणि ब्राह्मणभोजनास आशित असे नाव आहे. या सर्वांना मिळून ‘ पाकयज्ञ ’ असे नाव आहे. हे सर्व स्मार्त धर्म म्हणून ओळखले जातात कारण ती ‘ आवसथ्य ’ म्हणजेच ‘ पाक ’ अग्नीवर केली जातात. बलिहरणाच्या वेळी वैश्वेदेव यज्ञ होतो.

पुत्राचे उपनयन संस्कार स्मार्त धर्मात अंतर्भूत होतात. ‘सन्ध्या स्नानं जपो होमः देवतातिथिपूजनम् आतिथ्यं वैश्वेदेवं च षट् कर्माणि दिने दिने’ ही धर्मकर्मे पारस्कर स्मृतीने (१.३९) सांगितली आहेत. यांशिवाय सीतायज्ञ, लाङ्गलयोजन (शेत नांगरणीच्या वेळी), नवान्नप्राशन (नवीन धान्याचा आहार घेतेवेळी) अशी शेतीसंबंधांतील कर्मेही स्मार्त या नावाने ओळखली जातात.

घरातील वास्तुशांतीसारखी अनेक गृह्यधर्म कर्मे आणि संस्कार यांचा स्मार्त धर्मात समावेश होतो. यांपैकी काहींचा ब्राह्मणग्रंथांत काही अंशाने उल्लेख येतो. या वेळी वापरावयाचे मंत्रही बव्हंशी वेदांतून निवडलेले असतात. स्मार्त धर्म हे श्रौतयज्ञांइतके प्राचीन असावेत परंतु यांपैकी काहीच आज अस्तित्वात आहेत.

संस्कारांपैकीही उपनयन, विवाह [ विवाहविधि ] हे दोनच संस्कार अंशात्मक स्वरूपाने जिवंत असले, तरी त्यांस फक्त उत्सवाचे स्वरूप आले आहे. अंत्येष्टी म्हणजे अंत्यसंस्कारदेखील सर्वांशाने केले जात नाहीत.

पहा : कल्पसूत्रे.

धर्माधिकारी, त्रि. ना.