शाउशिंग : चीनच्या पूर्व भागातील जजिआंग प्रांतातील शाउशिंग परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,००,००० (१९८० अंदाज). हांगजो उपसागराच्या दक्षिणेकडील किनारपट्टीतील – चेटुंग कालव्याच्या काठावर, निंगपो-हांगजो लोहमार्गावर हे वसले आहे. हे एक प्राचीन शहर असून इ.स.पू. सातव्या शतकात यूए या प्रभावशाली राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. इ.स. १२९ मध्ये क्वाची अधिसत्तेचे हे मुख्य ठाणे बनले. मध्यम दर्जाचे व्यापारी केंद्र म्हणूनही शाउशिंग महत्त्वाचे आहे. सुपीक व जलसिंचित प्रदेशामुळे येथील कृषिक्षेत्र समृद्ध बनले आहे. पूर्वी येथे सूत, रेशीम, लाख, कागद तयार करणे व कथलाचा मुलामा देणे इत्यादींचे हस्तव्यवसाय चालत. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात या व्यवसायांचे आधुनिकीकरण करण्यात आले. येथे चहावरील प्रक्रिया, तेलघाण्या, भातसडीच्या व पिठाच्या गिरण्या पोलादकाम व मातीची भांडी तयार करणे, यांसारखे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले. येथील मद्यनिर्मितीच्या परंपरागत उद्योगाचेही मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण करण्यात आले असून, मद्याच्या निर्यातीसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. लू स्युन (१८८१–१९३६) या चिनी लेखकाच्या स्मरणार्थ येथे एक संग्रहालय उभारण्यात आले आहे. इतरही काही स्मारके येथे आहेत. शहराच्या जवळच कोळसाखाण आहे.

चौधरी, वसंत