शिकारपूर : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक प्रमुख व्यापारी शहर. लोकसंख्या ८८,१३८ (१९८१). सिंध प्रांताच्या उत्तर भागात सिंधू नदीपासून पश्चिमेस २९ किमी. अंतरावर हे वसले आहे. शिकारापूरपासून आग्नेयीस ३२ किमी. वरील सक्कर, वायव्येस ४२ किमी. वरील जेकबाबाद आणि नैर्ऋत्येस ६४ किमी. वरील लार्कान या शहरांशी शिकारपूर रस्ते व लोहमार्ग यांनी जोडले आहे. सिंध कालव्याचे दोन फाटे शहराच्या दोन्ही बाजूंनी गेलेले आहेत. बोलन खिंडीतून अफगाणिस्तान–इराणकडे जाणाऱ्या काफिल्याच्या मार्गावरील एक व्यापारी केंद्र म्हणून इ. स. १६१७ मध्ये शिकारपूरची स्थापना करण्यात आली. पितळी व धातूच्या वस्तू, गालिचे, सुती कापड व उत्तम कशिदाकाम यांसाठी हे प्रसिद्ध आहे. येथे भरणारा बाजार तर संपूर्ण तुर्कस्तान व दक्षिण आशियात प्रसिद्ध आहे. १८५५ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. येथे शासकीय महाविद्यालयही आहे.

शिकारपूरचा परिसर सिंधू नदीच्या गाळाच्या संचयनामुळे सखल व सुपीक बनला असून तो भातशेती व मेषपालनासाठी प्रसिद्ध आहे. गहू, हरभरा, शिरस बी (सरसू), ऊस व कापूस ही येथील इतर पिके होत. येथील रहिवाशांत पुश्तू हा प्रमुख वांशिक गट आहे.

चौधरी, वसंत