शॅकल्टन, अर्नेस्ट हेन्री : (१५ फेब्रुवारी १८७४ – ५ जानेवारी १९२२). दक्षिण ध्रुवप्रदेशाचे समन्वेषण करणार ब्रिटिश समन्वेषक. जन्म आयर्लंडमधील किल्की येथे. डलिच महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यावर (१८८७-९०) तो ब्रिटिश व्यापारी सागरसेवेत दाखल झाला (१८९०). पुढे ‘रॉयल नेव्हल रिझर्व्ह’ मध्ये त्याला लेफ्टनंट पद मिळाले (१९०१). त्याच सुमारास कॅप्टन रॉबर्ट फॉल्कन स्कॉट याच्या नेतृत्वाखालील दक्षिण ध्रुव प्रदेशाच्या मोहिमेत (१९०१–०४) शॅकल्टन सहभागी झाला. या मोहिमेत अंटार्क्टिकामधील आइस शेल्फ असलेल्या भागाचा प्रवास करून तो ८२०–१६’–३३” दक्षिण अक्षांशापर्यंत पोहोचला. प्रकृती बिघडल्यामुळे तो मार्च १९०३ मध्ये घरी परतला. त्यानंतर रॉयल स्कॉटिश जिऑग्राफिकल सोसायटीचे सचिवपद (१९०४-०५) आणि ग्लासगोमधील अभियांत्रिकी कंपनीतील पगारी नोकरी यांसारख्या संधी त्याला मिळत गेल्या. परंतु त्याचे महत्त्वाकांक्षी मन अंटार्क्टिक मोहिमेतच गुंतून राहिले. १९०७ मध्ये त्याने दुसऱ्यासफरीचा बेत केला. त्याच वेळी ब्रिटिश अंटार्क्टिक एक्स्पिडिशन (१९०७-०९) या समन्वेषण-दलाच्या कमांडरपदी त्याची नेमणूक झाली. परंतु हिमवृष्टीमुळे ही मोहीम ‘एडवर्ड सेव्हन पेनिन्‌शुला’ या अपेक्षित स्थळी पोहोचू शकली नाही. निमरॉड ही त्याची देवमासे पकडणारी लहानशी बोट जानेवारी १९०८ मध्ये रॉस आइस शेल्फ प्रदेशात पोहोचली. त्या वेळी शॅकल्टनने बिअर्डमोअर या हिमनदीचा शोध लावला. मॅक्‌मूर्डो साउंडमधील रॉस बेटावर त्याने हिवाळा काढला. त्यानंतर स्लेज गाडीवरून आपल्या सहकाऱ्यांसह तो दक्षिण ध्रुवाकडे निघाला. ९ जानेवारी १९०९ रोजी तो अंटार्क्टिक पठारावरील ८८० –२३’ दक्षिण अक्षांशापर्यंत (प्रत्यक्ष दक्षिण ध्रुवापासून १६० किमी. पेक्षा कमी अंतरावर) पोहोचला. सर्वाधिक दक्षिणेस जाण्याचा हा तत्कालीन विक्रम होता. त्यानंतर तो ३,७३६ मी. उंचीच्या मौंट एरेबसवर चढून गेला. १६ जानेवारी १९०९ रोजी तो दक्षिण चुंबकीय ध्रुवाजवळ पोहोचला. हे ठिकाण ७२० –२५’ दक्षिण अक्षांश व १५४पूर्व रेखांशावर आहे. ‘व्हिक्टोरिया लँड’ या प्रदेशावर त्याने ब्रिटिशांचा हक्क सांगितला. त्याच्या या सफरीतील काही शास्त्रीय पुरावे महत्त्वाचे ठरले. १९०९ मध्येच तो इंग्लंडला परतला. त्याला ‘सर’ हा किताब देऊन गौरविण्यात आले. त्याला अनेक सन्मान व पारितोषिकेही मिळाली. ब्रिटिश शासनाने सफरीचा खर्च म्हणून त्याला २०,००० पौंड दिले. शॅकल्टनने आपल्या या सफरीचा वृत्तांत दी हार्ट ऑफ द अंटार्क्टिक (१९०९) या पुस्तकात दिला आहे.

ब्रिटिश इंपीअरिअल ट्रान्स-अंटार्क्टिक एक्स्पिडिशन (१९१४–१६) ह्या तिसऱ्या सफरीचा तो कमांडर होता. या मोहिमेत २५ ऑक्टोबर १९१५ रोजी त्याचे जहाज वेडेल समुद्रातील बर्फात अडकून पडले. तेव्हा सुरक्षिततेसाठी त्याने आपल्या तुकडीला स्लेज गाडीने उत्तरेस सुमारे २९० किमी. अंतरावरील एलिफंट बेटावर आणले (१५ एप्रिल १९१६). बावीस लोकांना बेटावरच ठेवून शॅकल्टन आपल्या पाच सहकाऱ्यांसह एका लहानशा देवमासे पकडणाऱ्या बोटीतून सुमारे १,३०० किमी.चा खडतर प्रवास करून जॉर्जिया बेटाच्या उत्तर किनाऱ्यावरील एका व्हेल मासेमारी केंद्रापर्यंत येऊन पोहोचला (३० ऑगस्ट १९१६). तेथे त्याला मासेमारी बोटींची मदत मिळाली. साउथ (१९१९) या पुस्तकात त्याने आपल्या या सफरीचा वृत्तांत दिलेला आहे. १९२१ मध्ये ‘एंडर्बी लँड’ प्रदेशाच्या अभ्यासासाठी त्याने मोहीम आखली. परंतु या मोहिमेत साउथ जॉर्जियामधील ग्रीटव्हिकेन येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले.

चौधरी, वसंत