शर्मा, विश्वनाथ : (४ जून १९३०– ). भारताचे भूतपूर्व (पंधरावे) सरसेनापती. जन्म लंडन येथे. त्यांच्या कुटुंबातील दोन-तीन पिढ्यांमध्ये सैनिकी सेवेची परंपरा दिसून येते. विश्वनाथ शर्मांचे वडील मेजर जनरल होते. त्यांचे वडील-बंधू मेजर सोमनाथ शर्मा १९४७ साली श्रीनगरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांविरूद्ध लढताना धारातीर्थी पडले. त्यांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्रदान केले होते. स्वतंत्र भारताचे ‘परमवीर चक्र’ मिळविणारे ते पहिले सैनिक होते. त्यांचे धाकटे बंधू सुरेंद्रनाथ शर्मा अभियांत्रिकी विभागात लेफ्टनंट जनरल ह्या हुद्यावर असताना निवृत्त झाले.
विश्वनाथ शर्मा १९५० मध्ये चिलखती दलात सेकंड लेफ्टनंट म्हणून दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनी, डेहराडून येथे त्यांनी पुढील अभ्यासक्रम पूर्ण केला. संरक्षण सेवा अधिकारी महाविद्यालय, वेलिंग्टन (तमिळनाडू राज्य) व राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, दिल्ली येथून त्यांनी पदव्या प्राप्त केल्या. भारत-पाकिस्तान संघर्षात (१९६५) एका चिलखती तुकडीत त्यांनी अमृतसर – लाहोर आघाडीवर भाग घेतला. पुढे याच तुकडीचे समादेशक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान संघर्षात विश्वनाथ शर्मा यांनी ईशान्य आघाडीवर मिझोराममध्ये पहाडी ब्रिगेडचे व राजस्थानच्या वाळवंटी भागात एका चिलखती ब्रिगेडचे नेतृत्त्व केले. नंतर सिक्कीममध्ये ते एका पहाडी डिव्हिजनचे मेजर जनरल होते. त्यांनी काही काळ वेलिंग्टनच्या सैनिकी सेवा अधिकारी महाविद्यालयात प्रशिक्षण निदेशक म्हणून काम केले. १९८६ मध्ये कोअर कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी नवी दिल्ली येथील सैनिकी मुख्यालयात सैनिकी हालचालींचे उपसंचालक म्हणून पदभार सांभाळला. त्यानंतर महू (मध्य प्रदेश) येथील ‘कॉलेज ऑफ कॉम्बॅट’ येथे त्यांची समादेशक म्हणून नेमणूक झाली. जून १९८७ मध्ये पूर्व सेनाविभागाचे प्रमुख (जनरल ऑफिसर कमांडिंग इन चिफ) म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. भारताच्या राष्ट्रपतींचे परिसहायक (ए.डी.सी.) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २ मे १९८८ रोजी त्यांची सरसेनापती पदावर नियुक्ती झाली. या पदावरून ते ३० जून १९९० रोजी निवृत्त झाले.
सैनिकी पेशात जनरल विश्वनाथ शर्मांनी आपला विशिष्ट ठसा उमटविला. धैर्य, चिकाटी, प्रभावी नेतृत्व हे त्यांचे गुणविशेष होत. आपल्या प्रदीर्घ सैनिकी सेवेत त्यांनी बजाविलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक (१९७७) व परमविशिष्ट सेवा पदक (१९८४) देऊन गौरविले.
जनरल विश्वनाथ शर्मा यांच्या निवृत्तीनंतर जनरल सुनीत फ्रान्सिस रॉड्रिग्ज (१९ सप्टेंबर १९३३– ) यांची भारताचे सोळावे सरसेनापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. (१ जुलै १९९०–३० जून १९९३).
बाळ, नि. वि.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..