शरीरक्रिया मानसशास्त्र : (फिजिऑलॉजिकल सायकॉलॉजी). शरीरक्रियाविज्ञानाशी संलग्न असलेले मानसशास्त्र. शरीरक्रियाविज्ञान आणि मानसशास्त्र या जीवशास्त्राच्या दोन शाखा आहेत. मानसशास्त्रवर्णित वर्तनक्रियांचे प्रधान वैशिष्ट्य असे की, त्या क्रियांद्वारे मानव (तसेच अन्य सजीव प्राणी) आपल्या परिसरीय जगताशी मिळतेजुळते घेऊन समायोजन साधत असतो. प्राण्यांच्या या समायोजनात्मक वर्तनक्रियांशी त्यांच्या देहाच्या बाह्य तसेच अंतर्गत प्रक्रिया अतूट रीत्या निगडित झालेल्या असतात. वर्तनक्रियांच्या देहप्रक्रियांशी असलेल्या या संबंधाचा अभ्यास शरीरक्रिया मानसशास्त्र करते.

 

काही तत्त्ववेत्यांच्या मते मनोव्यापार आणि देहव्यापार या दोहोंत अविरत आंतरक्रिया चालू असते. म्हणजेच, कधीकधी देहव्यापारांनी मनोव्यापार प्रेरित होतात तर कधीकधी, मनोव्यापारांनी देहव्यापार प्रेरित होतात. याउलट अन्य काही तत्त्वज्ञांच्या मते, मनोव्यापार आणि देहव्यापार या दोहोंत कधीच आंतरक्रिया घडत नाही या दोहोंचे वेगवेगळे प्रवाह समांतर दिशेने वाहत असतात. मनोव्यापार व देहव्यापार यांचे नाते आंतरक्रियात्मक असो वा समांतर असो, ते नाते मात्र अतिशय निकटचे आहे यात वाद नाही.

शरीरक्रिया मानसशास्त्र : अध्ययनाचा विषय व पद्धती : ज्या देहव्यापारांशी मनोव्यापारांचे नितांत निकटचे नाते आहे, ते देहव्यापार हे त्यांच्या विशिष्ट मनोव्यापारांच्या संदर्भात अभ्यासणे, हा या शास्त्राचा मुख्य विषय आहे. वर्तनाच्या मुळाशी असलेल्या शारीरिक घटनांचे अध्ययन करणे म्हणजेच देह-मनांविषयीची समस्या हाताळणे होय. ही समस्या पुरातन असून तिच्या संदर्भात अनेक भिन्नभिन्न मते आढळतात. शरीरक्रिया मानसशास्त्राचा कल, श्रद्धांकित धर्म वा अंतःप्रज्ञाप्रिय तत्त्वज्ञान यांच्याकडे नसून, विवेकप्रिय शास्त्र आणि निरीक्षणप्रिय विज्ञान यांच्याकडे आहे. या शास्त्रात पुढील दोन पद्धतीचा वापर करतात : (१) वैद्यकीय निरीक्षण, (२) प्रयोग पद्धती. वैद्यकीय निरीक्षणात मानवाच्या तसेच मानवेतरांच्या वर्तनव्यापाराचे बारीक निरीक्षण करतात आणि लक्षणीय वर्तनविकृतींची वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून कारणमीमांसा व चिकित्सा करतात. दुसऱ्या प्रायोगिक पद्धतीत काहीएक वर्तनविषयक समस्या डोळ्यांपुढे ठेवून, निरीक्षणीय प्राण्याचे अथवा मानवी व्यक्तीचे विशिष्ट वर्तन घडून येईल अशी परिस्थिती अथवा प्रसंग, प्रयोगशाळेत अथवा अन्य सोयीच्या जागी निर्माण करतात आणि त्या परिस्थितीत तो प्राणी अथवा ती व्यक्ती कशा प्रकारे वर्तन करते, याचे बारकाईने निरीक्षण करतात. तथापि प्रायोगिक पद्धतीला या शास्त्रात पुष्कळच मर्यादा पडतात. वैज्ञानिक अभ्यासात निरीक्षण-प्रयोगांसोबत सैद्धांतिक गृहीतकांचाही वापर करतात. तथापि प्रत्यक्ष निरीक्षण हे अशा गृहीतकापेक्षा अधिकतर विश्वासार्ह असते.

वर्तनाची शरीरक्रियात्मक पार्श्वभूमी : मानवासकट सगळ्या ⇨ प्राण्यांचे वर्तन हे आत्मरक्षण आणि वंशसातत्य या दोन प्रधान जीवशास्त्रीय उद्दिष्टांनी प्रेरित होत असते. हे वर्तन प्राण्यांच्या एकूण शरीररचनेवर अवलंबून असते. शरीररचनेतील प्रतिक्रिया यंत्रणेत⇨ ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व परिसरीय मज्जासंस्था यांचा अंतर्भाव होतो. ज्ञानेंद्रियांचा मज्जासंस्थेद्वारे, कर्मेंद्रियांशी संबंध येतो आणि संपूर्ण देहयंत्रणेत एकात्मता राखली जाते. सगळ्याच प्रतिक्रिया मेंदूकडून आलेल्या आदेशानुसार घडतात असे नव्हे. उदा., ⇨ प्रतिक्षेपी क्रिया. शरीररचनेतील अंतर्भागीय यंत्रणेतील रक्ताभिसरणामुळे शरीराच्या विविध अवयवांना पोषक द्रव्यांचा पुरवठा होऊन प्राण्यांच्या वर्तनक्रिया उचित कार्यक्षमतेने घडून येतात. जैवरसायने देहावयवांच्या वाढीला हातभार लावतात आणि वाढत्या वयानुसार जीवनोपकारक क्रिया करण्यास प्राणी सज्ज होतो.

अनुवंश आणि आसमंत : देहयंत्रणा अनुवंश आणि आसमंत या दोहोंच्या प्रभावानुसार आकार घेते. व्यक्तीचे वर्तनवैशिष्ट हे नुसत्या निसर्गदत्त गुणसूत्रांनी ठरत नसते. ते आसमंतातील घटकांनीही ठरत असते. व्यक्तीच्या वर्तनपद्धतीवर तिच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक घटकांचा व संस्कारांचा खोलवर प्रभाव पडत असतो. व्यक्तीच्या शारीरिक – मानसिक विकासाची सीमारेषा अनुवंशाने ठरते. [→ आनुवंशिकता व आसमंत].

हेतुप्रेरण : सगळ्या वर्तनाच्या मुळाशी हेतुप्रेरण असते. हेतुप्रेरणांच्या परितुष्टीसाठी सगळ्या सजीवांच्या वर्तनक्रिया सुरू होतात आणि उद्दिष्टप्राप्ती होईपर्यंत चालू राहतात. वर्तनक्रिया बाह्य उद्दिपकांनी तसेच देहांतर्गत प्रेरणांनीही घडतात. हेतुप्रेरणजनित देहांतर्गत क्रिया-प्रतिक्रियांमुळे प्राप्त परिस्थितीला तोंड द्यावयास व्यक्ती सज्ज व समर्थ होते. हेतुप्रेरण हे निश्चितच देहक्रियासंलग्न असते. भय, क्रोध यांसारख्या भावनांनी प्रेरित होणाऱ्या क्रियादेखील शरीर-व्यापारांशी संलग्न असतात. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨ विल्यम जेम्स यांच्या सुप्रसिद्ध उपपत्तीनुसार भावना म्हणजे त्या त्या प्रसंगी तत्काळ घडून येणाऱ्या शरीरव्यापी आंतरिक घडामोडींची जाणीव वा बोधावस्था होय [→ प्रेरणा-१].

मज्जासंस्था : मज्जासंस्था ही शरीरातील अत्यंत गुंतागुंतीची संदेशवहन यंत्रणा आहे. तिच्याद्वारे, शरीरातील विविध अवयवांचा परस्परांशी संबंध जुळून येतो. व्यक्तीला तिची शारीरिक एकात्मता प्राप्त होते नित्य बदलत्या परिसराशी समायोजन साधणाऱ्या नवनवीन वर्तनक्रियांचे संयोजन होते व्यक्तीची वा प्राण्याची कार्यक्षमता व कार्यकुशलता यांचा प्रत्यय येतो. [→ तांत्रिका यंत्र].

वर्तनविकृतींची शारीरिक पार्श्वभूमी : सामान्यतः देहाच्या कोणत्याही अवयवाला अथवा इंद्रियाला दुखापत झाली की, माणसाच्या वर्तनात थोडीफार विकृती निर्माण होते. तसेच शारीरिक व्यंगाच्या जाणिवेनेही माणसाच्या मनात ⇨ न्यूनगंड निर्माण होऊन वर्तनात अपसामान्यता दिसू लागते. पूर्वी वर्तनविकृतींचे कार्यसंलग्न विकृती (फंक्शनल डिसऑर्डर्स) आणि शरीरसंलग्न विकृती (ऑरगॅनिक डिसऑर्डर्स) असे दोन प्रकार मानले जात. तथापि, आधुनिक संशोधनात अनेक वर्तनव्याधींच्या मुळाशी शारीरिक कारणे असतात असे आढळून आले आहे. सगळ्या वर्तनविकृतींच्या जोडीने विपरीत शारीरिक प्रक्रिया घडत असतात. वर्तनविकृती अनेक कारणांनी घडू शकते. काही विकृती या निसर्गदत्त, जन्मजात, आनुवंशिक स्वरूपाच्या असतात. तसेच सदोष शिक्षणप्रक्रिया, तापदातक आसमंत, दुःखदायक अनुभव यांनी व्यक्तीला वर्तनविकृती जडू शकते. कुपोषण. रोगराई, अपघात, प्रदूषण यांनीही विकृती जडू शकते. देहयंत्रणेतील बिघाडामुळे विकृतीची बाधा होऊ शकते. मनावर पडणारा सततचा ताणतणाव विकृती निर्माण करू शकतो. मेंदूला होणाऱ्या दुखापती या हमखास विकृतिजनक असतात. त्यांच्यामुळे स्मृतिभ्रंश, वाचाभंग, क्रियाअक्षमता किंवा कार्यक्षमताभंग यांसारखे वर्तनदोष निर्माण होतात. मेंदूला झालेली दुखापत सौम्य असली, तर वर्तनघोटाळा अल्पकाळ टिकतो. अनेकदा मेंदूच्या दुखावलेल्या भागाचे कार्य मेंदूच्याच अन्य भागांकडून घडू लागते. दुखापतीमुळे झालेली कार्यहानी भरून काढण्याच्या कामी मेंदूचे सारे भाग सारखेच सक्षम असतात. याला ‘मेंदूविभागांची समान क्षमता’ म्हणतात. [→ मेंदू]. काही माणसांच्या शरीरयंत्रणेची आनुवंशिक, रासायनिक, मज्जासंस्थीय घडणच अशी असते, की ती माणसे अल्पशा कारणानेही विकृतींना बळी पडतात. न्यूनगंडाने पछाडलेली काही माणसे नको त्या प्रसंगांना तोंड देण्याची पाळी स्वतःवर येऊ नये, म्हणून मुद्दाम विकृती ओढावून घेतात. [→ वर्तनविकृती].

मानसशास्त्रात व्यक्तिगत विभिन्नता विचारात घ्यावीच लागते. कोणत्याही दोन व्यक्ती तंतोतंत एकसारख्या नसतात. वर्तनविकृतीनी पछाडलेल्या व्यक्तींच्याही बाबतीत अशी व्यक्तिगत विभिन्नता असते. त्या भिन्नतेची दखल घ्यावीच लागते.

पहा : अपसामान्य मानसशास्त्र उद्दीपन-अवसाद चित्तविकृती चित्तविकृती तांत्रिका तंत्र मनोदौर्बल्य मानसशास्त्र मेंदू वर्तनविकृती शरीरक्रियाविज्ञान.

संदर्भ : 1. James, W. Principles of Psychology 2 Vols., New York, 1890.

           2. Morgan, C. T Stellar, E. Physiological Psychology, New York, 1950.

           3. Waston, J. B. Behaviorism, New York, 1925.

           4. Wundt, W. Priniciples of Physiological Psychology, Engleman, 1908.

केळशीकर, श. हि.