भिरूड : विशेषतः आंब्याच्या खोडास उपद्रव करणारे हे भुंगेरे कोलिऑप्टेरा गणाच्या क्रिसोमेलॉयडिया अधिकुलात मोडतात. यांचा समावेश सेरँबिसिडी कुलात होत असून यांचे शास्त्रीय नाव बॅटोसेरा रुफोमॅक्युलेटा हे आहे. याला आंब्यावरील खोडकिडा असेही म्हणतात. यांचा प्रसार आंब्याची लागवड असणाऱ्या बहुतेक देशांत म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगला देश, ब्रह्मदेश व श्रीलंका येथे आहे. या भुंगोऱ्यांच्या अळ्या फांद्यांना भोके पाडतात व साल वेगळी करतात. परिणामी फांदी मरून जाते. या भुंगेऱ्यांचा उपद्रव फणस, अंजीर, रबर, युकॅलिप्टस इ. झाडांसही होतो. भिरूड पिवळट उदी रंगाचा असून साधारणपणे ५ सेंमी. लांब असतो. त्याच्या वक्षावर दोन गुलाबी ठिपके असतात व वक्षाच्या बाजूंस काटे असतात. शृंगिका (लांब सडपातळ सांधेयुक्त स्पर्शेंद्रिये) शरीराइतकी किंवा कधी कधी त्यापेक्षाही जास्त लांब असतात.

 

मादी सालीखाली किंवा खोडात भोक करून किंवा खोडाच्या भेगांमध्ये एक एक अंडे घालते. अंड्यातून एक ते दोन आठवड्यांत अळी बाहेर पडते व साल पोखरण्यास सुरुवात करते. तीन ते सहा महिन्यांत अळीची पूर्ण वाढ होते. अळीचा रंग पिवळसर पांढरा असतो. ती गुबगुबीत असून १० ते १२ सेंमी. लांब असते. खोडाच्या भोकात असतानाच ती कोशावस्थेत जाते. कोशावस्था ४ ते ६ महिन्यांत पूर्ण होऊन प्रौढ भुंगेरा बाहेर पडतो. विश्वकोशाच्या पहिल्या खंडातील चित्रपट ५९ वरील भिरूडाची आकृती पहावी.

 

भिरुडाच्या नियंत्रणासाठी अळीने पाडलेल्या भोकात तार घालून किंवा कार्बन डायसल्फाइडाचे क्लोरोफॉर्म व क्रिओसोटसह केलेले बोरर नावाचे द्रावण पिचकारीने घालून अळ्या मारणे हा योग्य उपाय होय. याखेरीज या भुंगेऱ्यांच्या उपद्रवामुळे मेलेल्या फांद्या काढून त्या जाळून टाकणे हाही उपाय योजितात. पेट्रोल किंवा पॅरा-डायक्लोरोबेंझीन हे भोकात घालून भोके बंद करणे व डिल्ड्रिनाचे फवारे मारणे यांचाही अवलंब केला जातो.

पहा : आंबा.

तलगेरी, ग. मं.