शब्दप्रक्रियक : (वर्ड प्रोसेसर). शब्दांवर प्रक्रिया करून लेख, कगदपत्रे इत्यादींच्या लेखनासाठी शब्दरूप साहित्याची रचना करण्याचे कार्य करणारी प्रणाली म्हणजेच शब्दप्रक्रियक होय. शब्दप्रक्रियाच्या कार्यामध्ये शब्दरूप साहित्याची निर्मिती, मांडणी, संपादन, स्मृतीमध्ये व चुंबकीय तबकडीवर संचय आणि छापाई (मुद्रण) ही कार्ये येतात. यांशिवाय आधुनिक शब्दप्रक्रियक शब्दरूप साहित्यासोबत असलेली छायाचित्रे, रेखाचित्रे इ. चित्ररूप साहित्यावरही संस्करण करतात.

शब्दरूप साहित्य छापील (टंकित वा मुद्रित) स्वरूपात व्यक्तिगत रीतीने निर्माण करण्याची सुरूवात टंकलेखन यंत्रांपासून झाली. चावी दाबून त्यानुसार समोरील कागदावर अक्षरे उमटविणे व योग्य प्रकारे कागद सरकविणे ही प्राथमिक कार्ये टंकलेखन यंत्रे करतात. टंकलेखन करताना झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी अक्षरांवर फुली उमटविणे, पांढरी शाई लावणे किंवा टेप वापरून अक्षरे झाकणे असे केवळ प्राथमिक उपायच टंकलेखन यंत्रांच्या बाबतीत उपलब्ध असतात. यामुळे काही शब्दांच्या मजकूर समाविष्ट करण्यासाठीसुद्धा अनेकदा संपूर्ण लेख वा पृष्ठ पुन्हा टंकलिकित करणे आवश्यक होते. त्यापुढील टप्पा म्हणजे इलेक्ट्रॉनीय टंकलेखन हा होय. त्यामध्ये मजकुराच्या एका ओळीतील शब्द एका एल. सी. डी. (लिक्किड क्रिस्टल डिस्प्ले) किंवा द्रव स्फटिक दर्शक पडद्यावर दिसतात. हा मजकूर इलेक्ट्रॉनीय स्मृतीमध्ये साठविला जातो. त्यात दुरुस्त्या करून त्या ओळीचा मजकूर पक्का झाल्यानंतर छापायची आज्ञा देऊन तो छापता येतो. काही इलेक्ट्रॉनीय टंकलेखन यंत्रांच्या स्मृतीमध्ये एका वेळी अनेक ओळींचा मजकूर साठविण्याचीही सोय असते.

इ. स. १९८०–९० या दशकाच्या सुरुवातीस शब्दप्रक्रिया करणारी व अंतर्गत ⇨ सूक्ष्मप्रक्रियक (मायक्रोप्रोसेसर) असणारी खास यंत्रे उपलब्ध झाली. यांत अनेक पृष्ठांचे लेखन स्मृतीमध्ये व चुंबकीय तबकडीवर साठवून ठेवण्याची सोय होती. त्यामुळे मजकूर संपादित करून त्याला अंतिम स्वरूपात छापाई करण्यापूर्वी त्यात सुधारणा करणे सोयीचे झाले.

संगणकाच्या विकासानंतर शब्दप्रक्रियकाचे स्वरूप हे संगणकावर वापरेल जाणारे एक उपयोजन (अनुप्रयुक्ती) सॉफ्टवेअर असे बनले. शब्दप्रक्रियक सॉफ्टवेअरच्या कार्याची विभागणी पुढील प्रकारे करता येते : (१) चावीफलकावरून भरलेले (पुरविलेले) शब्दरूप साहित्य संगणकाच्या स्मृतीमध्ये साठविणे. (२) चावीफलक व माऊस यांद्वारे भरलेल्या सूचनांबरहुकूम मजकूर, आलेख, चित्रे यांची मांडणी करण्यासाठी लागणारे संकेत त्या मजकुराबरोबरच साठविणे. (३) भरलेला मजकूर संगणकाच्या पडद्यावर दर्शविणे. यामध्ये मांडणीच्या सूचना वगळून फक्त अक्षर मजकूरच दर्शविला जातो. मांडणीसाठी भरलेल्या सूचना दडविल्या जातात. त्यामुळे दिसते, तसे मिळते (व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट) हे तत्त्व पाळले जाते. (४) मजकूरामध्ये केलेल्या दुरुस्त्या व सुधारणा अमलात आणून सुधारित मजकूर स्मृतीमध्ये ठेवणे व पडद्यावर दर्शविणे. (५) स्मृतीतील मजकूर व मांडणी या विषयासंबंधीच्या सूचना चुंबकीय तबकडीवर फाईलच्या (न्यस्तीच्या) स्वरूपात ठेवणे. एखाद्या मजकूर जेंव्हा प्रथम असा ठेवला जातो, तेंव्हा फाइलमध्ये साठविताना पुढील प्रत्येक वेळी मात्रा तो आपणहून पूर्वीच्या फाईलमध्ये ठेवला जातो. (६) मजकूर भरल्यानंतर मसुदा स्वरूपात किंवा अंतिम स्वरूपात तो छापाई यंत्रावर छापणे. अनेक शब्दप्रक्रियक छापील पानावर जसे दिसेल, तसेच पृष्ठ पडद्यावरही दर्शवू शकतात. यासाठी छापील मजकुराचे पूर्वनिरीक्षण करण्याची सुविधा असते.

सुरुवातीचे शब्दप्रकीयक संकलन वा संपादन या प्रकारचे होते. त्यात मुख्यतः मजकूर संपादित करण्याच्या सुविधाच उपलब्ध होत्या. मजकुराची विविध प्रकारे मांडणी करण्यासाठी लागणाऱ्या  त्यातील सोयी प्राथमिक स्वरूपाच्या होत्या. मजकूर संकलकांची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) चावी फलकावरून मजकूर भरणे. (२) भरलेल्या मजकुरातील नको असलेली अक्षरे, शब्द गाळणे. (३) मजकुरात कोणत्याही स्थळी अधिक अक्षरे, शब्द समाविष्ट करणे. (४) ओळी आणि परिच्छेद बनविणे. (५) मजकुराची निरनिराळ्या पृष्ठांमध्ये छपाईच्या दृष्टिकोनातून विभागणी करणे. (६) एखाद्या शब्दसमुहावर खूण करून तो एका स्थळातून दुसऱ्या स्थळी हलविणे.

मजकूर संकलकांमध्ये भरलेला मजकूर एका दर्शक पडद्यावर दिसतो. पडद्यावर चौकोनी किंवा अधोरेखनाच्या स्वरूपातील एक सरक चिन्ह (कर्सर) असते. चावी फलकावर दाबलेले पुढील अक्षर मजकुरातील कोणत्या स्थळी उमटणार ते सरक चिन्हाद्वारे दर्शविले जाते. मजकूर भरण्याचे मूलभूत कार्य करण्यासाठी ॲस्की (ASCII अमेरिकन स्टॅंडर्ड कोड फॉर इन्फर्मेशन इंटरचेंज) हे संकेत वापरले जातात. या संकेतांमध्ये सर्व इंग्रजी मूळाक्षरे, अंक, `विरामचिन्हे’ व *,@ यांसारखी विशेष चिन्हे स्मृतीमध्ये पूर्णांकाच्या स्वरूपात भरली जातात. ह्या संख्या ० ते २५५ इतक्या मर्यादेत सामावलेल्या असतात. या मर्यादेतील संख्या आठ द्विमान अंकांनी बनलेल्या अष्टकांमध्ये (बाइट) मांडता येत असल्याने संगणकासाठी सोयीच्या आहेत. उदा., ‘a’ या अक्षरासाठी ९७ ही संख्या, तर ‘A’ या अक्षरासाठी 65 ही संख्या ठरलेली आहे. ॲस्की संकेतांमध्ये मजकुराच्या मांडणीच्या दृष्टीने काही चिन्हांचा समावेश केलेला आहे. 10 या संख्येने सरक चिन्हाला सध्याच्या ओळीच्या अग्रभागी जाण्याचा निर्देश दिला जातो, तर १४ ही संख्या पुढील ओळीत जाण्याचा निर्देश करते. तसेच १२ या संख्येने सध्याच्या पृष्ठावरून पुढील पृष्ठाच्या अग्रभागी जाण्याचा निर्देश दिला जातो. मजकूर मांडणीच्या दृष्टीने ॲस्की संकेतांमध्ये टॅब (TAB) हे महत्त्वाचे चिन्ह आहे. या चिन्हाच्या उपयोगासाठी मजकुरातील प्रत्येक ओळीतील विशिष्ट स्थाने नियोजित केली जातात. हे चिन्ह एकदा मिळाले की, सरक चिन्ह त्या ओळीतील स्थानाच्या पुढील नियोजित स्थानी जातो. या चिन्हाचा उपयोग तक्त्याची मांडणी करण्यासाठी तसेच परिच्छेदाच्या पहिल्या ओळीत जागा सोडण्यासाठी केला जातो.

मजकूर संकलकांचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. संगणकांच्या ‘डॉस’ या प्रणालीमधील ‘एडिट’, तसेच ‘विन्डोज’ या प्रणालीमधील ‘नोटपॅड’ ही सॉफ्टवेअर आजही उपयुक्त आहेत. यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात तयार केलेला मजकूर कोणत्याही आधुनिक प्रक्रियक वापरू शकतो व त्यावर प्रक्रिया करू शकतो. मजकूर संकलक सॉफ्टवेअर शब्दांवर प्रक्रिया करून लेख तयार करण्यासाठी मांडणीच्या सुविधा अत्यंत मर्यादित अशा असतात.

आधुनिक शब्द प्रक्रियक मजकुराची विविध प्रकारे मांडणी करण्यासाठी कित्येक प्रगत सुविधा उपलब्ध करून देतात वा पुरवितात. अशा काही महत्त्वाच्या सुविधा पुढे नमूद केल्या आहेत : (१) मजकुरातील विशिष्ट शब्द किंवा शब्दसमूह शोधणे तसेच एखाद्या शब्दाच्या जागी सर्वत्र किंवा निवडक जागी दुसरा शब्द भरणे. (२) मजकुरातील काही भाग निवडून छायांकित करणे, छायांकित भागातील शब्दाच्या बाबतीत अधोरेखन, ठळकपणा, तिरपी अक्षरे अशा विशेष गुणांचा वापर करणे (३) तक्ते तयार करणे, त्यांतील प्रत्येक रकान्यातील मजकूर स्वतंत्रपणे तयार करण्याची सुविधा देणे. (४) अनुक्रमांक असलेल्या बहुस्तरीय याद्या बनविणे. यासाठी यादीतील निरनिराळ्या स्तरांमध्ये ओळींच्या सुरूवातीस योग्य जागा सोडणे, यामुळे यादीची वाचनीयता वाढते. (५) मजकुरात निरनिराळ्या रंगांचा वापर करणे. (६) अक्षरांच्या विविध शैलीतील (टंक) उपलब्ध करून देऊन एकाच लेखात अनेक शैली वापरण्याची सुविधा पुरविणे. (७) विविध आकारमानाच्या अक्षरांचा वापर करण्याची सोय प्रदान करणे. (८) शुद्धलेखनाच्या किंवा व्याकरणाच्या चुका दाखवून त्यांची दुरूस्ती करणे. (९) समानार्थी शब्द उपलब्ध करून देणे. (१०) पत्रलेखन, अहवाल अशा नित्यावश्यक मजकुरांसाठी नमुना मांडणी तयार करणे व भरलेला मजकुर अशा मांडणी मधये आपसूक बसवीणे. (११) गणितातील समीकरणे वगैरे गुंतागुंतीचया मजकुराचया मांडणीचया सुविधा पुरविणे. (१२) आलेख, रेखाचित्रे, छायाचित्रे असा शब्दांव्यतिरिक्त आशय मजकुरामध्ये समाविष्ट करणे. (१३) वारंवार लागणारी छोटी छोटी कार्ये (मॅक्रो) एकच चावी दाबून करण्याची सुविधा देणे. (१४) एका वेळी एकच लेख (कागदपत्रे, दस्ताऐवज) पडद्यावर उघडून त्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा पुरविणे. यासाठी सरक चिन्ह एका लेखातून दुसऱ्या लेखात नेण्याची सोय असते. (१५) एका लेखातील मजकूर, आलेख, चित्रे दुसऱ्या लेखात समाविष्ट करण्याची सुविधा देणे. (१६) संपूर्ण पृष्ठ किंवा पृष्ठाच्या विशिष्ट भागाभोवती सीमा आखणे. (१७) वृत्तपत्रीय छपाईप्रमाणे पृष्ठावर अनेक रकाने तयार करणे.


शब्दप्रक्रियक वापरून मोठ्या लेखाचा अथवा पुस्तकाचा मजकूर तयार केला असेल, तर त्याची अनुक्रमणिका व शब्द-सूची आपणहून तयार करण्याची व्यवस्था अनेक सॉफ्टवेअरांमध्ये असते. त्यासाठी मजकूर तयार करताना त्यातील अनुक्रमणिकेत घालायची शीर्षक व सूचीत समाविष्ट करायचे शब्द यांना चिन्हांकित वा छायांकित करावे लागते.

अनेक प्रकारचे शब्दप्रक्रियक सॉफ्टवेअर उपलब्ध असल्याने त्यांत बनविलेल्या लेखांची देवाणघेवाण करण्यासाठी एका सॉफ्टवेअरमध्ये बनविलेला लेख दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये वाचता येणे आवश्यक असते. त्यासाठी एका प्रकारात बनलेल्या लेखाचे दुसऱ्या प्रकारात रूपांतर करण्याची सुविधा बहुतेक सर्व सॉफ्टवेअरमध्ये असते. एखाद्या विशिष्ट शब्दप्रक्रियकासाठी अशी सोय उपलब्ध नसेल, तर रूपांतरासाठी साध्या शब्दसंकलकाचा वापर करावा लागतो.

शब्दप्रक्रियक सॉफ्टवेअर हे एक गुंतागुंतीचे सॉफ्टवेअर असून वरून साध्या दिसणाऱ्या कार्यासाठीदेखील संगणकाचे अंतर्गत कार्य बरेच गुंतागुंतीचे वा गहन बनते. उदा., मजकुरातील एखादी ओळ मध्यावर तोडून नवीन परिच्छेद करायचा असेल, तरी मध्ये जागा सोडणे, पुढील ओळीतील योग्य जागी पुढील अक्षर ठेवण्याची सूचना भरणे, पुढील सर्व मजकूर तितक्या अष्टकांनी पुढे सरकविणे, पृष्ठांच्या विभागणीवर परिणाम होत असल्यास सर्व मांडणी पुनश्च करणे अशा अनेक गोष्टी त्यासाठी कराव्या लागतात.

शब्दप्रक्रियामध्ये बनविलेले एकाच मजकुराचे पत्र अनेक पत्त्यांवर पाठविण्याचे साधन म्हणून टपाल यादीची सोय असते. यामध्ये पत्रांमधील बहुतांश मजकूर सारखाच असला, तरी पत्र ज्याला पाठवायचे, त्याचे नाव व पत्ता आणि तदनुसार पत्रातील काही छोटे शब्दसमूह बदलता येतात. उदा., पत्त्यानुसार संदर्भ क्रमांक, उत्तर वा प्रतिसाद देण्याची शेवटची तारीख असे काही भाग प्रत्येक पत्रावर निराळे असू शकतात.

 

कार्यालयीन उपयोगासाठी असलेल्या शब्दप्रक्रियक सॉफ्टवेअरसोबत हिशेब तक्ते, माहिती पेढी (डेटाबेस) अशा आनुषंगिक सॉफ्टवेअरप्रणाली एकत्रितपणे मिळतात. यांतील एका प्रणालीत केलेले काम दुसऱ्या प्रणालीत वापरता येते. एखाद्या संस्थेने आपला वार्षिक अहवाल शब्दप्रक्रियक वापरून बनविला, तर त्यातील ताळेबंद बनविण्यासाठी हिशेब तक्ता वापरता येतो व तो एकूण अहवालाचा भाग बनू शकतो. ताळेबंदामध्ये काही दुरुस्ती केली, तर ती अहवालात आपणहून प्रतिबिंबित होते.

संगणकीय प्रकाशन (डेस्क टॉप पब्लिशिंग डीटीपी) प्रणाली या शब्दप्रक्रियक प्रणालीहून पुढारलेल्या मानल्या जातात. शब्दप्रक्रियेमध्ये तयार झालेला मजकूर या प्रणालीमध्ये आदान (इनपूट) म्हणून देता येतो. या प्रकारच्या सॉफ्टवेअरमध्ये साध्या कागदांखेरीज इतर अनेक माध्यमांवर छपाई करण्याच्या दृष्टीने खास सुविधा असतात. त्यामुळे वृत्तपत्रे, परिपत्रके, कार्डे अशी अनेक माध्यमे सुलभतेने हाताळता येतात. आधुनिक शब्दप्रक्रियक अनेक प्रगत सुविधा देत असल्याने काही विशिष्ट कामांसाठीच संगणकीय प्रकाशन वापरण्याची आवश्यकता असते.

शब्दप्रक्रियक सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या अनेकविध सुविधांमुळे ते वापरण्यासाठी सरावाची गरज असते. सर्व सुविधा वापरणे सुलभ होण्यासाठी त्यामध्ये मजकूर भरता भरता मदत घेण्याची अंगभूत सोय असते. मजकूर भरताना एखादी विशिष्ट कृती कशी करायची याचे मार्गदर्शन याद्वारे पडद्यावरच सहजपणे मिळते. अशी मदत देण्यासाठी दर्शक पडद्याचे अनेक भाग पडलेले असतात. यातील सर्वात मोठा भाग पडद्याच्या मध्यावर असून तो भरलेला मजकूर दर्शविण्यासाठी राखून ठेवलेला असतो. वरच्या व खालच्या भागांत निरनिराळ्या क्रिया करण्यासाठी सेवा-यादी (मेनू), प्रतिके (आइकॉन) अशा स्वरूपात मार्गदर्शक असतात. निरनिराळ्या क्रियांविषयी माहिती देण्यासाठी एक मदत सेवा-यादीही उपलब्ध असते.

भरलेल्या मजकुरातील निरनिराळ्या विभागातील किंवा उपविभागांमधील दुवे दर्शविण्यासाठी ‘हायपरटेक्स्ट’ ही संकल्पना विकसित झाली. ही संकल्पना वापरून लेखातील निरनिराळ्या भागांचे स्थळदर्शक संकेत मजकुरामध्येच ठेवता येतात. पडद्यावर हे संकेत दिसत नाहीत. मात्र ज्या शब्दावरून ती दिशा दाखवायची, तो शब्द निराळ्या रंगात पडद्यावर दिसतो. उदा., अनुक्रमणिकेतील एखाद्या प्रकरणाच्या शीर्षकामागे जर स्थळदर्शक संकेत भरलेला असेल, तर त्यावर चावी दाबताच ते विशिष्ट प्रकरण पडद्यावर दिसते.

इंटरनेटच्या (महाजालाच्या) प्रसारामुळे त्याच्याशी संबंधित कार्येदेखील आता शब्दप्रक्रिय सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट होत आहेत. तयार केलेला लेख नेटवर्कवरील दुसऱ्या एखाद्या संगणकाला थेट पाठविण्याची व्यवस्था त्यात उपलब्ध असते. इंटरनेटवरील निरनिराळ्या लेखांचे एकमेकांशी दुवे जोडण्यासाठीसुद्धा हायपरटेक्स्टचा उपयोग केला जातो. हायपरटेक्स्टमधील स्थळदर्शक संकेत केवळ त्या लेखातील मजकुराकडेच निर्देश करू शकतात असे नाही. असे संकेत वापरून संगणकावर साठवून ठेवलेला दुसरा लेख किंवा नेटवर्कवरील कोणत्याही संगणकावरील कोणताही लेख निर्देशित करता येतो. अशा संकेतांमध्ये निर्देशित लेखाच्या संगणकाचा व त्यावरील त्या लेखाच्या फाइलचा संपूर्ण पत्ता समाविष्ट असतो. ज्या शब्दामागे असा संकेत असतो, त्यावरील त्या विशिष्ट लेखाची नक्कल या संगणकावर उतरवून घेतो व पडद्यावर दाखवितो. अशा रीतीने इंटरनेटवरील कित्येक लेखांची एकमेकांशी साखळी जोडता येते. या तत्त्वाचा वापर जगज्जालक (www वर्ल्ड वाइड वेब) बनविण्यासाठी केला गेलेला आहे.

शब्दप्रक्रियक जी अक्षरे दर्शक पडद्यावर किंवा छपाई यंत्रावर उमटवितो, ती टिंबाटिंबानी बनलेली असतात. त्यामुळे टिंबांचे विविध कित्ते (पॅटर्न) बनवून निरनिराळ्या अक्षरशैली निर्माण करता येतात. बहुतांश शब्दप्रक्रियक एखाद्या विशिष्ट भाषेसाठी, विशेषतः इंग्रजी भाषेसाठी, बनविले गेले आहेत परंतु टिंबांनी निरनिराळ्या अक्षरशैली निर्माण करता येत असल्याने कोणत्याही लिपीतील शब्दांवर प्रक्रिया करणे शक्य झाले आहे. शब्दप्रक्रियकामध्ये बहुतांश कार्ये शब्दार्थाशी निगडित नसल्याने केवळ लिपीमध्ये बदल करून निरनिराळ्या भाषांचे शब्दप्रक्रियक बनविता येतात. शुद्धलेखन, व्याकरण, समानार्थी शब्द अशा कार्यांशी संबंधित मार्गदर्शक समाविष्ट करायचे असल्यास मात्र प्रत्येक भाषेसाठी असे स्वतंत्र मार्गदर्शक बनवावे लागतात.

भारतीय भाषांमधील बहुतेक शब्दप्रक्रियक सॉफ्टवेअर संगणकीय प्रकाशनासाठी बनविले गेले आहे. काही सॉफ्टवेअर निरनिराळ्या लिप्यांचे इंग्रजी लिपीमध्ये रूपांतर (ट्रान्सलिटरेशन) करून ॲस्की संकेत वापरतात, तर काही ॲस्कीच्या धर्तीवर भारतीय भाषांसाठी बनविलेले संकेत वापरतात.

आधुनिक शब्दप्रक्रियक सॉफ्टवेअर संगणकावर उपलब्ध केलेले असते. शब्दप्रक्रियकासारखे सॉफ्टवेअर वापरताना चावीफलक, माऊस, इलेक्ट्रॉनीय स्मृती, चुंबकीय तबकडी, फ्लॉपी तबकडी, व्हिडिओदर्शक अग्र, छपाई यंत्र, इंटरनेटवरून लेख पाठविण्यासाठी किंवा उतरवून घेण्यासाठी संदेशवहन करणारे मॉडेल अशी विविध हार्डवेअर साधने यासाठी उपयोगी पडतात.

पहा: माहिती संस्करण व्यावसायिक व कार्यालयीन उपकरणे संगणक.

संदर्भ : 1. Casady, M. J. Word Processing, 1925.

           2. Merony, J. W. Word Processing, 1995.

           3. Mostafa, y3wuohua, Word Processing : Letters and Mailing, 2000.

           ४. गोखले, भालचंद्र विश्वनाथ, कॉम्प्युटर : संकल्पना व कार्यपद्धती, मुंबई, १९९८.

आपटे, आल्हाद गो.