प्रयोगशाळा : प्रयोगशाळा म्हणजे नियंत्रित परिस्थितीत काही विशिष्ट घटनांची व गुणधर्मांची निरीक्षणे करण्यासाठी व आवश्यक राशींची मापने करण्यासाठी जरूर ती साधने, उपकरणे व सुविधा जेथे उपलब्ध करून दिलेल्या असतात आणि जेथे या निरीक्षणांची व मापनांची छानी करून त्यावरून तर्कशुद्ध निष्कर्ष काढले जातात ते स्थळ होय. आधुनिक विज्ञान, तंत्रविद्या व औद्योगिक उत्पादन पद्धती संपूर्णपणे प्रयोगाधिष्ठित असल्यामुळे त्यांच्या संदर्भात प्रयोगशाळेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. भाषाशास्त्र, मानसशास्त्र यांसारख्या विषयांतील संशोधनासाठी व शिक्षणासाठीही प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत [⟶ भाषाशास्त्र प्रायोगिक मानसशास्त्र]. औद्योगिक उत्पादन व आर्थिक सुबत्ता यांबाबतीत एकोणिसाव्या शतकात पाश्चिमात्य राष्ट्रे पुढे गेली ती प्रयोगांचे महत्त्व पटल्यामुळेच. प्रयोगशाळांचे महत्त्व आता वादातीत असले, तरीही सामाजिक व आर्थिक परिस्थितीतील फरकांमुळे वेगवेगळ्याराष्ट्रांतील प्रयोगशाळांचे स्वरूप, कार्यक्षेत्र, सुविधा इत्यादींमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आढळून येते.

हेतू : शिक्षण देणे, मूलगामी किंवा शुद्ध वैज्ञानिक संशोधन करणे, विशिष्ट उत्पादनासाठी इष्टतम उत्पादन पद्धती निश्चित करणे, कारखान्यांतील उत्पादनाची गुणवत्ता नियंत्रित करणे, नवनवीन तंत्रे विकसित करणे असे वेगवेगळे अनेक हेतू ठेवून प्रयोगशाळा उभारल्या जातात. त्या हेतूनुसार तेथील उपकरणे, तेथे काम करणारे शास्त्रज्ञ व इतर कर्मचारी नियुक्त करावे लागतात. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यांना वाहिलेल्या प्रयोगशाळांचे एकूण स्वरूप सर्वस्वी भिन्न असते. अशा प्रकारे भिन्नभिन्न असलेल्या सु. १०० प्रकारच्या प्रयोगशाळांची जंत्री देता येईल परंतु येते जास्त तपशीलात न शिरता प्रयोगशाळांविषयी सर्वसामान्य चर्चा केली आहे.

आवश्यक गोष्टी : कोणत्याही प्रयोगशाळेची उद्दिष्टे सफल होण्यासाठी काही बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे. एक तर प्रयोगशाळेचा प्रमुख हा उत्तम नेतृत्त्व करणारा असला पाहिजे. आपल्या सहकाऱ्यांकडून अपेक्षित काम करून घेण्याची हातोटी त्याला असली पाहिजे. त्याचबरोबर प्रयोगशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम करताना शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.

संशोधन प्रयोगशाळेत कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी त्या क्षेत्रात पूर्वी काय कार्य झाले आहे, ते माहीत नसल्यास प्रयोगांची निष्फळ पुनरावृत्ती होण्यात पैसा, श्रम व वेळ यांचा अपव्यय होण्याचा धोका असतो. संशोधन हाती घेतल्यानंतरही त्या विशिष्ट क्षेत्रात इतर ठिकाणी होत असलेल्या कार्यासंबंधी अद्ययावत माहिती मिळवत राहणे आवश्यक असते. यासाठी प्रयोगशाळेला चांगले ग्रंथालय व माहिती केंद्र यांची जोड देणे आवश्यक आहे. त्यासाठी खास प्रशिक्षण दिलेले अधिकारीही नेमले पाहिजेत.

प्रयोगशाळेतील उपकरणांची देखभाल व जरूर तेव्ही दुरुस्ती करण्यासाठी त्याचप्रमाणे किरकोळ उपकरणे जरूरीप्रमाणे तयार करून घेण्यासाठी सुसज्ज कर्मशालेची नितांत आवश्यकता असते.

प्रयोगशाळा हवेशीर, धूळरहित व सुप्रकाशित असणे जरूरीचे आहे. त्याचप्रमाणे विद्युत् पुरवठा (जरूर तर त्याचा दाब स्थिर ठेवण्याची यंत्रणा), पाणीपुरवठा, कित्येक प्रक्रियांसाठी व मापनासाठी जरूर असणारे वातानुकूलन, जास्त दाबाने हवा पुरविण्यासाठी तसेच निर्वात करण्याची यंत्रे इ. गोष्टी किरकोळ वाटल्या तरीही महत्त्वाच्या आहेत.

प्रयोगशाळेच्या स्वरूपानुसार तेथे सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक आहे. सर्वच प्रयोगशाळांमध्ये आगप्रतिबंधक व्यवस्था व आग लागल्यास ती विझविण्याची व्यवस्था करावी लागते. त्याचप्रमाणे प्रथमोपचार व प्राथमिक वैद्यकीय उपचाराचीही सोय असावयास पाहिजे. अपायकारक वायू उत्पन्न होणाऱ्या प्रक्रिया करण्यासाठी हवाबंद वाफार कोठीची सुविधा असली पाहिजे. किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारी) द्रव्ये हाताळण्यासाठी विस्तृत प्रमाणावर व्यवस्था करावी लागते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना या द्रव्यांपासून निघणाऱ्या किरणांचे किती उद्‌भासन झाले (किती किरण-ऊर्जा शरीरावर पडली) त्यावर लक्ष ठेवावे लागते. प्रयोगशाळेच्या सांडपाण्यातून अपायकारक द्रव्ये बाहेर जाऊन प्रदूषण निर्माण होत नाही. याची काळजी घेणेही बंधनकारक असते.

शैक्षणिक प्रयोगशाळा : शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे यांना वेगवेगळ्या विषयांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळांची जोड दिलेली असते. विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन प्रयोगाभिमुख करणे, पद्धतशीर प्रयोग करण्याचे त्यांना शिक्षण देणे व प्रत्येक विषयांतील प्रयोगांसाठी लागणाऱ्या उपकरणांचा उपयोग कसा करावा हे त्यांना शिकविणे, हे त्यांचे मुख्य कार्य असते. त्यामुळे त्यांची एकूण साधनसामग्री मर्यादित व तुलनेने स्वस्त किंमतीची असते. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गटांकडून पुनःपुन्हा तेच ते प्रयोग केले जातात. या प्रयोगांवरून मिळणारे निष्कर्ष प्रमाणित निष्कर्षांशी कितपत जुळतात हे पाहून ते प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जोखली जाते. यापलीकडे या निष्कर्षांना काही महत्त्व नसते.

काही अभियांत्रिकी महाविद्यालयांना जोडलेल्या प्रयोगशाळांतून वेगवेगळी उपकरणे (उदा., मोटारगाडीचा भाडेमापक) तपासून किंवा सामग्री तपासून त्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र देण्यात येते. उदा., मुंबई येथील व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये या प्रकारचे काम केले जाते.

विद्यापीठांच्या प्रयोगशाळा त्यामानाने पुष्कळच जास्त सुसज्ज असतात. थोड्याफार प्रमाणात तेथे मूलगामी वैज्ञानिक संशोधन केले जाते. विशेषतः अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील विद्यापीठे या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावी आहेत. यासाठी त्यांना लागणारा पैसा सरकार, व्यापारी कंपन्या किंवा फोर्ड फाउंडेशनसारखे विश्वस्त निधी उपलब्ध करून देतात. भारतीय विद्यापीठांची याबाबतीतील कामगिरी विशेष उत्साहवर्धक नाही.

मूलगामी संशोधन प्रयोगशाळा : या प्रकारच्या प्रयोगशाळांत विविध शास्त्रीय विषयांत शुद्ध विज्ञानविषयक संशोधन केले जाते. शुद्ध विज्ञानातील एकेका शाखेचाही विस्तार आता इतका मोठा झाला आहे की, त्यांच्या प्रत्येक उपशाखांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभाराव्या लागतात. संशोधनाचा खर्चही आता इतका प्रचंड झालेला आहे की, तो भागविण्यासाठी मोठमोठ्या व्यापारी संस्था व राष्ट्रीय सरकारे यांची मदत घेणे आवश्यक ठरते. इतकेच नव्हे, तर यूरोपात यूरोपियन कौन्सिल फॉन न्यूक्लियर रिसर्च (CERN, सर्न) किंवा यूरोपियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यासारख्या संशोधन संस्था अनेक देशांच्या सहकार्याने चालविल्या जातात. मूलगामी संशोधनापासून तात्कालिक आर्थिक लाभ उठविणे शक्य नसले, तरी शेवटी सर्व अनुप्रयोग आणि औद्योगिक प्रगती मूलभूत संशोधनावरच अवलंबून असल्याने पुढारलेल्या राष्ट्रांत त्याला फार महत्त्व दिले जाते.

शुद्ध विज्ञानातील ज्या उपशाखेत संशोधन करावयाचे असेल तिला अनुरूप अशा खास उपकरणांनी प्रयोगशाळा सुसज्ज करावी लागेल. उदा., किरणोत्सर्गी द्रव्याबद्दल संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेत या द्रव्यांशी प्रत्यक्ष संपर्क येऊ न देता किंवा त्यांच्या फार जवळ न जाता सर्व प्रक्रिया करता येतील असे चिमटे, हातमोजे, यांत्रिक हात इत्यादींची सोय करावी लागेल. या द्रव्यांपासून निघणाऱ्या किरणांची तीव्रता मोजणारी उपकरणे [उदा., गायगर गणित्र ⟶ कण अभिज्ञातक], त्यांची भेदकता मोजण्याची उपकरणे, त्यांची अर्धायुष्ये (मूळ क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारे कालावधी) मोजण्याची व्यवस्था, रासायनिक किंवा भौतिकीय पद्धतींनी ती अपद्रव्यापासून वेगळी करण्याची सोय, त्यांची शुद्धता अजमाविण्यासाठी वर्णपटलेखक [⟶ वर्णपटविज्ञान]किंवा त्यासारखी काही उपकरणे लागतील. याशिवाय नित्य लागणारी अचूक कालमापक, विद्युत् उपकरणे, सूक्ष्ममापक तराजू [⟶ तराजू], निर्वात पंप, भट्ट्या अशा विविध उपकरणांची जरूरी लागेल.

सूक्ष्म रसायनशास्त्रविषयक संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेत सूक्ष्ममापक तराजू, गालनपत्रे, प्लॅटिनमाच्या मुशी, शुष्कन पात्रे, केंद्रोत्सारित्रे [⟶ केंद्रोत्सारण], विविध प्रकारच्या भट्ट्या, गरम पेट्या, बारीक शोशषळ्या व मोजनळ्या [⟶ अनुमापन], प्रमाणित व विशुद्ध रसायने इ. खास वस्तूंचा समावेश करावा लागतो.


अनुप्रयुक्त संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा : विज्ञानातील तत्त्वांचा उपयोग करून नवनवीन औद्योगिक उत्पादने व उत्पादन पद्धती शोधून काढणे हे या प्रकारच्या प्रयोगशाळांचे उद्दिष्ट असते [⟶ औद्योगिक संशोधन]. भारतात अशा प्रयोगशाळा सरकारतर्फे [⟶ राष्ट्रीय प्रयोगशाळा]किंवा औद्योगिक कंपन्यांकडून चालविल्या जातात. विशिष्ट उद्योगातील खास संशोधनासाठी त्या उद्योगात गुंतलेल्या कंपन्यांनी संयुक्तपणे[उदा., अहमदाबाद टेक्स्टाइल इंडस्ट्रीज रिसर्च ॲसोसिएशन ⟶ कापड उद्योग]चालविलेल्या प्रयोगशाळा

इतर देशांप्रमाणे भारतातही आहेत परतु अमेरिकेतील बेल टेलिफोन लॅबोरेटरीज किंवा जनरल इलेक्ट्रिक कंपनी, जर्मनीतील बायर कंपनी यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाला आधारभूत म्हणून स्वतःच्या खास प्रयोगशाळा स्थापल्या आहेत. त्यांमध्ये अनुप्रयुक्त संशोधनाबरोबर अनेकदा मूलगामी संशोधनही करण्यात येते व त्याबद्दल संशोधकांना नोबेल पारितोषिके मिळाल्याचीही काही उदाहरणे आहेत.

या प्रयोगशाळांत सामान्यतः काही निश्चित ध्येय समोर ठेवून कार्य केले जाते. या कार्याचा ज्या वेगवेगळ्या शास्त्रशाखांशी संबंध येत असेल त्यांमधील तज्ञ अशा शास्त्रज्ञांचा एक गट एकत्रितपणे हे संशोधन करतो. त्यामुळे सामान्यतः अशा संशोधनातून विकसित होणाऱ्या नवीन उत्पादन पद्धती किंवा नवीन उत्पादने यांच्या ⇨ एकस्वावर (पेटंटवर) प्रयोगशाळा चालविणाऱ्या कंपनीची मालकी असते. विमाने, मोटारी, वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे, औषधे, प्रसाधने, विविध प्रकारची रसायने, वस्त्रे, ग्राहकोपयोगी वस्तू, धातुकाम इ. उत्पादन वा प्रक्रिया करणाऱ्या विविध उद्योगांना त्या त्या क्षेत्रातील संशोधनाचा पाठिंबा लागत असतो. त्यानुसार त्यांच्या प्रयोगशाळांमधील उपकरणे व सामग्री निश्चित होते. या प्रकारच्या संशोधनात त्यापासून कंपनीला काय आर्थिक लाभ होऊ शकेल हाच मुख्य विचार असतो. त्या दृष्टीनेच या संशोधनाची सर्व आखणी केली जाते. त्यामुळे बाजारपेठेची पाहणी ग्राहकाचा प्रतिसाद या गोष्टींच्या अभ्यासालाही या संशोधनात महत्त्वाचे स्थान आहे. [⟶ औद्योगिक संशोधन].

परीक्षण करणाऱ्या प्रयोगशाळा : औद्योगिक कारखान्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता कायम राखणे हे या प्रयोगशाळांचे कार्य असते. यासाठी कारखान्याला पुरविल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची परीक्षा करून तो योग्य त्या गुणवत्तेचा आहे की नाही, हे या प्रयोगशाळांत पारखून घेतले जाते. याचबरोबर कारखान्याच्या उत्पादित वस्तूंच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करून त्या ठराविक कसोट्यांना उतरतात की नाही, हेही पाहिले जाते [⟶ गुणवत्ता नियंत्रण]. मोठे कारखाने यासाठी बहुशः स्वतःच्याच प्रयोगशाळा चालवितात परंतु वेगवेगळ्या कारखान्यांसाठी शुल्क आकारून ही कामे करून देणाऱ्या स्वतंत्र प्रयोगशाळाही अनेक आहेत. वैद्यकीय उपचारांना जोड म्हणून रक्त, मूत्र इत्यादींची जीवरासायनिक व विकृतिवैज्ञानिक परीक्षा करणाऱ्या प्रयोगशाळा, शेतजमिनीतील घटक निश्चित करणाऱ्या प्रयोगशाळा, त्याचप्रमाणे मृदेची सिच्छिद्रता, चिकटपणा इ. अभियांत्रिकीय गुणांचे मूल्यमापन करणाऱ्या प्रयोगशाळाही याच वर्गात मोडतील.

करावयाच्या परीक्षणानुसार या प्रयोगशाळांना लागणारी उपकरणे वेगवेगळी असतात. उदा., रासायनिक उत्पादने, औषधे, प्रसाधने इत्यादींच्या कारखान्यांना जोडलेल्या परीक्षण प्रयोगशाळांत रासायनिक विश्लेषणासाठी जरूर ती उपकरणे लागतील. यंत्रे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचा माल सामान्यतः धातूचे पत्रे, सळया, ठोकळे या स्वरूपात असतो. या धातूतील घटकांचे विश्लेषण करणारी उपकरणे (उदा., वर्णपटलेखक), यांचे स्थितिस्थापकीय गुणांक [⟶ स्थितिस्थापकता]मोजणारी व कठिणपणा अजमावणारी यंत्रे तसेच त्यांची तन्यता (ताणले जाण्याची क्षमता), सुनम्यता, धावतीय शिणवटा, गज जास्तीत जास्त सहन करू शकेल तो ताण (अंतिम ताणसामर्थ्य) इत्यादींची मापने करणारी सुयोग्य अशी उपकरणे अशा कारखान्यांच्या प्रयोगशाळांत लागतील [⟶ पदार्थांचे बल]. तयार यंत्रांच्या सुट्या भागांचीही या प्रकारची परीक्षा करावी लागेल. त्याचप्रमाणे संपूर्ण यंत्र संकलित केल्यावर ते प्रत्यक्ष चालवून त्याच्या कसोट्या (उदा., त्याची अश्वशक्ती मोजणे, ते गरम किती होते, त्यात कंपन गती कितपत होते, फिरत्या भागांचे योग्य संतुलन झाले आहे की नाही, त्यांचे क्षरण व झीज कितपत होते इत्यादी) पहाव्या लागतील. यासाठी काही प्रमाणित कसोट्या व पद्धती निश्चित केलेल्या असतात.

जीवरसायनशास्त्रीय परीक्षा करणाऱ्या प्रयोगशाळेत रुग्णाचे रक्त, मूत्र, विष्ठा, मतिष्क-मेरुद्रव [मेंदू व मेरुरज्जू यांना यांत्रिक आधार म्हणून उपयोगी पडणारा द्रव⟶ तंत्रिका तंत्र]इत्यादींचे विशिष्ट दृष्टिकोनातून विश्लेषण केले जाते (उदा., रक्तातील शर्करा, कोलेस्टेरॉल, ग्लिसरॉइडे, यूरिया, कॅल्शियम, प्रथिने, एंझाइमे इत्यादींचे प्रमाण पहाणे मूत्रातील शर्करा, अल्ब्युमिने, यूरिक अम्ल, रक्त इत्यादींचे मापन करणे). परीक्षणासाठी येणाऱ्या नमुन्याचे अपघटन (घटक विलग होण्याची क्रिया) होऊ शकते त्याचप्रमाणे त्यात काही विक्रिया होऊन त्याचे मूळ स्वरूप बदलू शकते. याकरिता नमुना शक्य तो ताजा घेतात. तो ठेवणे आवश्यकच असल्यास (अनेकदा त्यात काही रसायने घालून) तो प्रशीतकात ठेवतात. रक्तातील घटक वेगळे करण्यासाठी केंद्रोत्सारित्र किंवा अतिकेंद्रोत्सारित्र, नमुना जरूरीनुसार तापविण्यासाठी गरम पेट्या, परीक्षणासाठी प्रकाश विद्युतीय वर्णमापक [⟶ वर्ण व वर्णमापन], ज्योत प्रकाशमापक [⟶ ज्योत प्रकाशमापन]. विद्युत् निसरण उपकरण, घनतामापक, pH मापक [⟶ पीएच मूल्य], वर्णपट प्रकाशमापक [⟶ प्रकाशमापन], सूक्ष्मदर्शक इ. उपकरणे लागतात. अलीकडे रक्ताचे संपूर्ण जीवरासायनिक विश्लेषण एकदम देणारी स्वयंचलित उपकरणेही निघाली आहेत. याशिवाय वितळबिंदू मोजण्याचे उपकरण, ऊर्ध्वपातन यंत्र (द्रव मिश्रणाची वाफ करून व ती परत थंड करून मिश्रणातील घटक अलग करणारे यंत्र), वाफेने निर्जंतुक करण्याचे उपकरण इत्यादींचीही जरूरी लागते.

प्रयोगशाळांच्या कायपद्धतीची कल्पना येण्यासाठी काही निवडक (पण प्रातिनिधिक) प्रयोगशाळांच्या कार्यपद्धतीची रूपरेषा खाली दिली आहे.


वायुगतिकीय प्रयोगशाळा : या प्रयोगशाळेत वेगवेगळ्या आकाराच्या पृष्ठभागांवरून वायूचे प्रवाह सोडले असता त्यांचे होणारे परिणाम आणि त्या प्रवाहांचे स्वरूप यांचा अभ्यास केला जातो [⟶ वायुगतिकी]. एखादे विमान किंवा क्षेपणास्त्र वातावरणातून उड्डाण करीत असताना त्याच्या पृष्ठभागावर असेच प्रवाह निर्माण होतात. विमानांचे व क्षेपणास्त्रांचे सुयोग्य आकार विकसित करण्यासाठी अशा प्रयोगांची जरूरी असते. उदा., विमानाच्या पंखांचा आकार व काटच्छेद कसा असावा, त्याचा उड्डाणाच्या दिशेशी किती कोन ठेवावा म्हणजे कमीत कमी इंधना खर्च होऊन विमानाला जास्तीत जास्त वेग देता येईल, हे अभ्यासावयाचे असते (या पुढील वर्णना ‘विमान’या शब्दात क्षेपणास्त्राचाही अंतर्भाव आहे असे मानावे).

संपूर्ण वायुगतिकीय प्रयोगशाळेमध्ये तीन प्रकारची माहिती मिळविण्याची सोय असली पाहिजे : (१) वेगवेगळ्या आकाराच्या पृष्ठांवरून वाहणाऱ्या वायुप्रवाहाची सर्व वैशिष्ट्य अभ्यासणे, (२) या आकारानुसार (गणित करून) विमानाचा आराखडा तयार केल्यानंतर त्यावरून ते विमान अपेक्षित गुणधर्मांचे होईल की नाही याची चाचणी घेणे. (३) विमान बांधून तयार झाल्यानंतर ते प्रत्यक्ष उडवून उड्डाणातील त्याच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे (उदा., वेग, इंधनाचा व्यय, दिशा बदलण्याची सुकरता, उड्डाणातील स्थैर्य इत्यादी).

यांतील पहिल्या दोन बाबींसंबंधीची माहिती प्रयोगशाळेत ⇨ वातविवर या उपकरणाच्या साहाय्याने मिळविता येते. तिसऱ्या बाबीसाठी मात्र प्रत्यक्ष विमानतळ व रॉकेट उडविण्यासाठी फारच मोठ्या व्याप्तीचे क्षेत्र लागते. एकूण पाहता या प्रयोगशाळेची जिम्मेदारी फारच खर्चाची असल्याने (बोइंगसारख्या काही प्रचंड कंपन्या वगळता) ती सबंध राष्ट्रानेच घ्यावी लागते.

वातविवर कसोट्या : वातविवर हा एक मोठा बोगदा असून त्यातून एकविध वेगाने वाऱ्याचा प्रवाह (पंखे वगैरेंच्या मदतीने) चालू ठेवता येतो. अभ्यासविषयानुसार वाऱ्याचा वेग सु. २०० किमी./तास पासून ते ६,००० किमी./तास किंवा त्याहूनही जास्त असावा लागतो. या वेगानुसार विवराचे आकारमान बदलावे लागते. हवेमधून जाताना विमानावर हवेचे जे परिमाण होतात व ते त्या दोहोंमधील सापेक्ष गतीमुळे होतात. म्हणून स्थिर विमानाभोवती इष्ट वेगाच्या वाऱ्याचे प्रवाह सोडून ते जास्त सुलभतेने मोजता येतात.

विविध प्रचलांची मापने : (प्रचल म्हणजे विशिष्ट परिस्थितीतच अचल राहणाऱ्या राशी). ध्वनीच्या वेगापेक्षा कमी वेगासाठी रेनल्ड्झ अंक व ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगासाठी माख अंक [⟶ द्रायुयामिकी]लक्षात घेऊन विमानाची आटोपशीर आकारमानाची प्रतिकृती (मॉडेल) तयार केली जाते. तिच्यावरील उत्प्रणोदन प्रेरणा (स्थिर वायूमध्ये अर्धवट किंवा पूर्णपणे बुडविलेल्या घन पदार्थांवरील निष्पन्न उदग्र आणि ऊर्ध्वाभिमुख प्रेरणा) मोजण्यासाठी तराजूच्या दांड्याच्या एका बाजूवरून ती तारांनी टांगून वातविवरात सोडतात (किंवा ती लहान सळ्यांवर उभारतात). या प्रतिकृतीला दिलेल्या आधारांचा वायुगतिकीय परिणाम विचारात घेऊन अंतिम निष्कर्ष काढावे लागतात.

प्रतिकृतीच्या पृष्ठभागावर निर्माण होणारे दाब द्रवीय दाबमापकाच्या साहाय्याने किंवा जास्त औद्योगिक ⇨ ऊर्जापरिवर्तकाच्या साहाय्याने मोजतात. निर्माण होणारी वेगवेगळ्या ठिकाणची तापमाने बहुशः तपयुग्माच्या (दोन निरनिराळ्या धातूंच्या विद्युत् संवाहकांची टोके एकत्र जोडून व उरलेली टोके विद्युत् प्रवाहमापकास जोडून तयार होणाऱ्या व एकत्र जोडलेल्या, टोकांचे तापमान मोजणाऱ्या साधनाच्या) साहाय्याने मोजतात. सीमास्तरातील व पृथग्भवन [⟶ द्रायुयामिकी]होते तेथील दाब मोजण्यासाठी विशेष तंत्र वापरावे लागते.

प्रवाह दृग्गोचर करणे : सीमास्तरातील प्रवाहांचे स्वरूप दिसण्यासाठी संप्लवन होणाऱ्या (घनरूपातून द्रवरूपात न जाता एकदम बाष्परूप होणाऱ्या) ॲसिनॅप्थीन व ॲझोबेंझीन या द्रव्यांचा उपयोग करतात. संक्षुब्ध प्रवाहात या द्रवांचे जास्त चांगल्या प्रकारे संप्लवन होते. रेशीम किंवा नायलॉनच्या धाग्यांचे झुबके वापरूनही प्रवाहांचे स्वरूप समजू शकते. आणखी एका पद्धतीत उदबत्तीपासून निघते तशी धुराची शलाका प्रवाहात सोडतात आणि तिच्या चलनावरून प्रवाहाबद्दल माहिती मिळवतात. हवेतील आघात तरंगांचा (दाबामध्ये फार मोठे फेरबदल घडून येतात अशा तरंगांचा) अभ्यास करण्यासाठी प्रकाशीय पद्धती वापरतात. तरंगांमुळे हवेच्या घनतेत जो बदल होतो त्यामुळे प्रकाशकिरणाचे प्रणमन (एका घनतेच्या माध्यमातून निराळ्या घनतेच्या दुसऱ्या माध्यमात शिरताना होणारा दिशाबदल) होते. या गुणधर्मावर या पद्धती आधारलेल्या आहेत.

गतिकीय परीक्षण : विमानाच्या प्रतिकृतीचे गतिकीय परीक्षण करण्यामध्ये तिची कोलांट्या खाण्याची प्रवृत्ती आणि तिच्या विविध भागांमध्ये वायुगतिकीय प्रेरणांमुळे कंपने उत्पन्न होण्याची प्रवृत्ती यांचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर विमानातून सोडलेल्या बाँब, अन्नाची पुडकी यांसारख्या वस्तूंच्या गतीचाही अभ्यास केला जातो. भागांच्या कंपनामुळे ते भाग (एखादे वेळी) तुटून जाण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे विमानाच्या वजनाचे विविध भागांवर सुयोग्य वितरण साधून कंपने किमान मर्यादेत आणणे, हे फार महत्त्वाचे असते.

मुक्त उड्डाण कसोट्या : एंजिन न बसविता विमानाच्या प्रतिकृतीच्या उड्डाणांच्या ज्या कसोट्या घेतात त्यांना मुक्त उड्डाण कसोट्या असे म्हणतात. वातविवरात शक्य असते त्यापेक्षा बऱ्याच जास्त वेगासाठी व रेनल्ड्झ अंकासाठी या प्रकारच्या कसोट्या घ्यावा लागतात या कसोट्या घेण्यासाठी विमानाचे वजन व निरूढी (वस्तूच्या स्थितीत–स्थिर वा गतिमान–बदल होण्यास तिच्याकडून होणारा विरोध) यांचे अचूक प्रमाण ठेवून प्रतिकृती तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रतिकृती उड्डाण करू लागावी यासाठी ती उंचावर नेलेल्या फुग्यामधून किंवा रॉकेटाला जोडलेल्या पेटिकेमधून सोडली जाते.

उड्डाण करणाऱ्या प्रतिकृतीच्या वेगवेगळ्या भागांवर पडणारे दाब व भार आणि निष्पन्न होणारी तापमाने ⇨ दूरमापन तंत्राने वेळोवेळी मोजून रेडिओ प्रेषकाद्वारे जमिनीवरील ग्रहणीकडे पाठविली जातात. प्रतिकृतीच्या गोळबेरीज गतीचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यावर ⇨ प्रवेगमापक, ⇨ घूर्णी यांसारखी साधने ठेवलेली असतात. जमिनीवरून रडारच्या साहाय्यानेही ही गोष्ट साध्य होऊ शकते. या प्रकारच्या कसोट्या घेण्यासाठी खूप मोठे मैदान उपलब्ध होणे जरूरीचे असते.

प्रत्यक्ष विमानाच्या कसोट्या : प्रतिकृतीवरील प्रयोग पूर्ण झाल्यानंतर त्यातील निरीक्षणांवरून योग्य ते फेरफार करून प्रत्यक्ष विमान बांधले जाते परंतु व्यापारी उपयोगासाठी ते उपलब्ध करून देण्याच्या आधी त्याच्या सर्वांगीण कसोट्या घेणे अत्यावश्यक असते. हे काम खास निवड केलेले वैमानिक करतात. अशा विमानाची चाचणी घेणे हे बऱ्याच धोक्याचे काम असते. म्हणून या चाचण्यांसाठी मोठी धावपट्टी असलेला उत्तम विमानतळ तर लागतोच पण विमानाला उतरण्यास मदत करणारी व मार्गनिर्देशन करणारी अद्ययावत रेडिओ व रडार यंत्रणा, अपघात झाल्यास ताबडतोब कार्यवाहीत येऊ शकेल अशी आग प्रतिबंधक योजना व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणेही अत्यावश्यक असते. या चाचण्यामध्ये (१) विमान जास्तीत जास्त किती वेग घेऊ शकते, (२) किती त्वरेने वर चढू शकते, (३) उड्डाण करण्यासाठी इष्टतम वेग किती आहे, (४) त्याच्या उड्डाणाचा पल्ला किती आहे या गोष्टी पाहिल्या जातात. त्याचबरोबर (५) विमान नियंत्रक साधनांना (उदा., सुकाणू) किती झटपट प्रतिसाद देते, (६) कितपत चटकन दिशा किंवा वेग बदलणे शक्य होते, (७) उड्डाणात स्थैर्य कितपत राहते, (८) एकदम वेग कमीजास्त केल्यास किंवा ते वळविल्यास विमानाच्या सांगाड्यावर कितपत ताण येतात व तो ते कितपत सहन करू शकते, याही गोष्टींची छाननी केली जाते. प्रत्यक्ष उड्डाणाच्या परिस्थितीत विमानावरील सीमास्तर प्रवाह, दाबाचे वितरण, आघात तरंग इत्यादींबद्दलही माहिती जमा करण्यात येते.


साहाय्यक योजना : हे कार्य करणाऱ्या प्रयोगशाळेला, आवश्यक त्या उच्च दर्जाचे व अचूक प्रचल असलेली प्रतिकृती तयार करू शकेल अशी कर्मशाला जोडणे आवश्यक आहे. अशा प्रतिकृती तयार करण्यासाठी अचूक यंत्रे व मापनप्रणाली उपलब्ध असल्या पाहिजेत. त्याचबरोबर विविध मापने करणारी सूक्ष्मग्राही उपकरणे दुरुस्त करू शकणारी व त्यांची देखभाल करून ती कार्यक्षम ठेवू शकेल अशी एक उपकरण-कर्मशालाही असणे अनिवार्य आहे. शेवटी म्हणजे विविध मापने करून मिळालेली वाचने एकत्रित करून त्यांचा अर्थ लावण्यासाठी अंकीय संगणकाचीही [⟶ संगणक]जरूरी असते.

रासायनिक अभियांत्रिकीय प्रयोगशाळा : रासायनिक कारखान्यातील उत्पादनासाठी अनेक रासायनिक विक्रिया व भौतिक क्रियांचा उपयोग करावा लागतो. या क्रिया-विक्रियांचा अलग-अलगपणे व लहान प्रमाणावर अभ्यास करणे हा या प्रयोगशाळेचा उद्देश असतो. याच्या मागचा हेतू म्हणजे प्रत्यक्ष उभारावयाच्या मोठ्या कारखान्यासाठी सर्वांत अधिक कार्यक्षम व काटकसरीचा आकृतिबंध व परिस्थिती निश्चित करणे, हा असतो. प्रथम हे प्रयोग लहान प्रमाणावर करून त्यांची परिणती शेवटी बरीच मोठी जागा व्यापणाऱ्या मार्गदर्शी संयंत्रात करावयाची असते. ही गोष्ट लक्षात घेता या प्रकाराच्या प्रयोगशाळेत पुष्कळच मोठी जागा उपलब्ध करून द्यावी लागेल, हे उघड आहे. मार्गदर्शी संयंत्राच्या रचनेत प्रयोगासाठी वेगवेगळे फेरफार सुलभतेने करता येतील, अशी सोय करावी लागते. त्याचप्रमाणे त्या संयंत्राच्या वेगवेगळ्या भागांतील निरीक्षणे व मापने सहजतेने करता येतील, हेही पहावे लागते.

सर्वच प्रयोगशाळांना लागणाऱ्या प्रशासकीय सुविधांशिवाय रासायनिक अभियांत्रिकीय प्रयोगशाळेला उपकरणांची देखभाल करणारी कर्मशाला, आरेखन दालन, छायाचित्रण प्रयोगशाळा यांची जोड द्यावी लागते. नेहमीच्या प्रकारची मापने करावी लागतातच पण कित्येकदा काही प्रचलांचे (उदा., तापमान, दाब) अखंड मापन व स्वयंचलित पद्धतीने त्यांच्या नोंदी करण्याची व्यवस्था असावी लागते. काही क्रिया-विक्रिया अखंडपणे नियंत्रित कराव्या लागतात. कित्येकदा द्रव्यमान वर्णपटमापकासारख्या [⟶ द्रव्यमान वर्णपटविज्ञान]खास व जटिल उपकरणांचाही वापर करावा लागतो. स्थिर तापमान किंवा स्थिर दाब राखलेल्या खोल्यांची कित्येकदा जरूरी लागते. अशा खोलीत ठेवलेल्या उपकरणांचे नियंत्रण दूरवर्ती नियंत्रण पद्धतीने करता आले पाहिजे. काही प्रक्रिया उच्च दाबाखालीच कराव्या लागतात. त्याचप्रमाणे काही रासायनिक विक्रियांपासून स्फोटक वायू निर्माण होऊ शकतात. या सर्व गोष्टींचीही दखल घेऊन त्यांसाठी योग्य ती तरतूद करावी लागते.

मापनाची तंत्रे : अभ्यासविषय असलेल्या प्रणालीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म आणि त्यांच्यात होणाऱ्या फेरफारांचे मापन करण्यासाठी विशिष्ट परिस्थितीला अनुरूप अशा रूढ तंत्रांचाच शक्य तो जास्त उपयोग केला जातो. उदा., तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे (जसे नळीत द्रव, द्विधातवीय पट्टी, तपयुग्म, विद्युत् रोध इ. प्रकारचे) तापमापक, प्रकाशीय किंवा प्रारण पद्धतीचे उत्तापमापक वापरतात [⟶ तापमापन]. रासायनिक संघटन समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाशीय वर्णपटमापक, द्रव्यमान वर्णपटमापक यांचा उपयोग होतो किंवा द्रवाची औष्णिक किंवा विद्युत् संवाहकता मोजून अथवा त्याचे pH मूल्य मोजून किंवा त्याच्या उकळबिंदूतील वाढ मोजून इ. विविध प्रकारे रासायनिक संघटन अजमावले जाते.

रासायनिक अभियांत्रिकी व वेगवेगळे प्रचल एकसारखे मोजत जाऊन त्यांच्या स्वयंचलित साधनांच्या साह्याने नोंदी ठेवाव्या लागतात. कारण या प्रचलांच्या मूल्यातील बदलांच्या त्वरेला विशेष महत्त्व असते. ही त्वरा कमीअधिक असेल त्यानुसार कमीअधिक निरूढीने नोंद करणारी यंत्रणा वापरणे जरूरीचे असते. काही अभ्यासात प्रणालीचे तापमान किंवा दाब यासारखे काही प्रचल नियंत्रित करून (विशिष्ट मर्यादांत) स्थिर मूल्य असे ठेवावे लागतात. ज्या त्या प्रचलातील बदलाची त्वरा जशी कमीअधिक असेल त्यानुसार नियंत्रक प्रणाली मंद वा शीघ्र गतीची निवडली पाहिजे.

अशा तऱ्हेने वेगवेगळ्या नियंत्रित परिस्थितीत मिळणाऱ्या विक्रियांच्या त्वरा मोजून त्यावरून त्या विक्रियेसाठी इष्टतम परिस्थिती व पद्धती निश्चित केल्या जातात. त्यानुसार मार्गदर्शी संयंत्र प्रणाली बनवून तिच्या साह्याने अपेक्षेप्रमाणे उत्पादन होऊ शकते की नाही, हे पाहिले जाते. त्यात काही न्यून आढळल्यास जरूर तसे फेरफार करून शेवटी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी कारखान्यात प्रत्यक्ष वापरावयाच्या प्रणालीचा आराखडा तयार केला जातो.

चर्मोद्योगातील कसोट्या करणारी प्रयोगशाळा : कारखान्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या कसोट्या घेऊन त्यांवरून उत्पादनाची गुणवत्ता कायम ठेवली जाते. यासाठी चर्मोद्योगातील कच्च्या मालाच्या म्हणजे चामड्याच्या वेगवेगळ्या कसोट्या घेण्यात येतात. या कसोट्या चर्मोद्योगातील व्यावसायिकांनी प्रमाणित केल्या आहेत.

कसोट्या घेण्यापूर्वी चामडे २३°±३° से. या प्रमाणित तापमान ६५±२ टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणात ४८तास ठेवले जाते व सामान्यतः याच बाह्य स्थितीत कसोट्याही घेतल्या जातात.

बळकटीच्या कसोट्या : दाबामुळे कातड्याचा किती संकोच होतो हे पाहण्यासाठी त्याच्यावर वेगवेगळ्या मूल्यांचे भार ठेवून त्यामुळे त्याची जाडी किती कमी होते ते मोजतात. पुढील सूत्रावरून कातड्याचा ‘घट्टपणा’किंवा संकोचाला होणारा विरोध काढला जातो.

संकोचाला होणारा विरोध =

एकक क्षेत्रफळावरील भारातील वाढ

एकक जाडीतील घट

प्रमाणित दाबाने एक पोलादी गोळी चामड्यावर दाबून त्यामुळे पडणाऱ्या खड्ड्याची खोली मोजतात. त्यावरून या प्रकारच्या विकृतीच्या दृष्टीने कातड्याची बळकटी मोजली जाते.

चामडे वाकविले असता त्याच्यावरील नैसर्गिक रेषांवरून त्याच्यात बारीक चिरा पडतात व ते चामडे पुढे फाटू लागते. या बाबतीतली चामड्याची गुणवत्ता अजमावण्यासाठी चामडे एका दंडगोलावर फिरत्या रुळाच्या साहाय्याने दाबून त्याला निश्चित वक्रता देतात. क्रमाक्रमाने या दंडगोलाची त्रिज्या कमी करून चामड्याला दिली जाणारी वक्रता ( = वक्रता त्रिज्येचा व्यस्तांक) वाढवत नेतात व कोणत्या वक्रतेला चामडे चिराळू लागते ते पाहतात.

न चिराळता चामडे किती ताण सहन करू शकेल ते मोजण्यासाठी एक खास उपकरण असते. यात एका कडीवर चामडे ताणून बसविलेले असते व त्यावर एका बाजूने हळूहळू वाढत जाणारा भार देतात. ही क्रिया दुसऱ्या बाजूला कातडे चिराळू लागेतो चालू ठेवतात.

कातडे पाणी किती शोषून घेऊ शकते हे पाहण्यासाठी प्रथम त्याच्या एका चकतीचे वजन करतात. मग ती १५ मिनिटे पाण्यात बुडवून ठेवतात आणि पाण्याबाहेर काढून टिपकागदाने कोरडी करून तिचे वजन घेतात. या वजनात झालेल्या वाढीवरून १५ मिनिटांत किती पाणी शोषले गेले ते समजते. असेच मापन चकती २४ तास पाण्यात बुचकळून ठेवून घेतात. यासाठी पाणी २०°±२° से. या प्रमाणित तापमानाला ठेवतात.

किती दाबाखाली पाणी कातड्यामधून पलीकडे जाऊ शकेल ते मोजून त्यावरून कातड्याचा पाण्याचा पारगमनाला होणारा प्रतिरोध मोजला जातो.

कातड्याचे प्रमाणित पद्धतीने छेद घेऊन त्या छेदाचे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने सु. ३० पट विवर्धन करून छायाचित्र घेतात. त्यावरून कातड्याची एकूण संरचना समजते.


रासायनिक कसोट्या : या कसोट्या घेण्यासाठी प्रथम दिलेल्या कातड्याचे बारीक तुकडे करून घेतात. त्याच्यातील आर्द्रता मोजण्यासाठी प्रथम त्याचे वजन घेतात. मग १००° ते १०५°से. तापमान असलेल्या उष्ण पेटीत ठेवून त्याच्या वजनात घट होणे बंद होईतो ते वाळवितात आणि यानंतर परत वजन घेतल्यास या दोन वजनांतील फरकावरून कातड्यातील आर्द्रतेचे प्रमाण समजते.

कातड्यातील पाण्यात विद्राव्य असलेल्या (विरघळणाऱ्या) घटकांचे मापन करण्यासाठी प्रथम त्यातील सर्व चरबी (योग्य विद्रावक म्हणजे विरघळविणारा पदार्थ वापरून) काढून टाकतात. नंतर त्याचे वजन घेऊन ते त्या वजनाच्या ५० पट वजनाच्या शुद्ध पाण्यात घालून हे मिश्रण यांत्रिक पद्धतीने दोन तास हालवत ठेवतात आणि या विद्रावापैकी काही ठराविक भाग गाळून घेतात व गाळलेला विद्राव आटवून मिळणाऱ्या घन पदार्थाचे वजन घेतात. याचप्रमाणे पेट्रोलियम ईथर हा विद्रावक वापरून कातड्यातील एकूण तेले व चरबी यांचे प्रमाण काढता येते.

कातड्यातील मुख्य घटक कोलॅजेन हे प्रथिन असते. त्याचे मापन करण्यासाठी कातड्याचे तुकडे मर्क्युरिक ऑक्साइडासारख्या उत्प्रेरकाबरोबर (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिची गती वाढविणाऱ्या पदार्थांबरोबर) सल्फ्यूरिक अम्लात तापवितात. त्यामुळे प्रथिनातील नायट्रोजनाचे अमोनियम सल्फेटात रूपांतर होते. त्यातील अमोनियाचे मापन करून त्यावरून मूळ कोलॅजेन किती होते ते काढता येते.

कच्चा माल कमावलेल्या कातड्याच्या स्वरूपात असल्यास त्यातील टॅनिनाचे प्रमाण मोजण्याच्याही पद्धती आहेत.

खनिज तेल प्रयोगशाळा : काही मोठ्या औद्योगिक संस्था त्यांची उत्पादने वापरणाऱ्या उद्योगधंद्यांना त्या उत्पादनांच्या संदर्भात येणाऱ्या अडचणींची विनाशुल्क सोडवणूक करून देण्यासाठी खास प्रयोगशाळा चालवितात. अनेकदा या प्रयोगशाळांच्या कार्याचे स्वरूप गुन्हा अन्वेषण करणाऱ्या गुप्तहेराच्या कामासारखेच असते. त्यामुळे अशा प्रयोगशाळेत विविध शास्त्रशाखा-उपशाखांमधील तज्ञ सहकार्याने काम करीत असतात. या शास्त्रशाखामध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांशिवाय काही खास उपकरणेही या प्रयोगशाळांसाठी मुद्दाम बनवून घ्यावी लागतात. खनिज तेलांचे उत्पादन करणाऱ्या एका मोठ्या संस्थेने चालविलेल्या या प्रकारच्या प्रयोगशाळेने तिच्यापुढे उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची उकल कशी केली याची थोडक्यात चर्चा खाली केलेले आहे. त्यावरून या प्रश्नांची विविधता व प्रयोगशाळेची कार्यपद्धती यांची काहीशी कल्पना येऊ शकेल.

 

(१) धारव्यांचे क्षरण : एका मोठ्या वाहतूक कंपनीच्या मोटारींच्या एंजिनातील धारव्यांचे (पुढे-मागे होणाऱ्या गतीने सरकणाऱ्या वा परिभ्रमी गतीने फिरणाऱ्या भागांना योग्य स्थितीत ठेवणाऱ्या आधारांचे बेअरिंगांचे) फारच झपाट्याने क्षरण होत आहे व हे एंजिनासाठी वापरलेल्या वंगण-तेलातील दोषामुळे होत असावे अशी तक्रार आली. एंजिनात वापरून झालेल्या तेलाचे रासायनिक विश्लेषण करता त्यात मुक्त स्वरूपात गंधक आहे असे आढळून आले. या गंधकामुळे हे क्षरण होत असावे असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला परंतु मूळ तेलात तर गंधक नव्हते. अधिक शोध घेता असे आढळून आले की, त्या कंपनीने तेल गाळण्यासाठी नवीनच बाजारात आलेली (व स्वस्त) तेल गाळणी बसविलेली असून या गाळणीतील भाग गंधकाचा वापर करून परस्परांना चिकटविलेले होते आणि तो गंधकाचा उगम होता. अर्थातच ही गाळणी काढून टाकल्यावर क्षरणही थांबले.

 

(२) त्वचेचा दाह : एका मोटारीच्या कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या खास तेलामुळे तेथील कामगारांच्या हातांच्या त्वचेचा दाह होतो असा संशय कामगार संघटनेने व्यक्त केला व नगरपालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यानेही त्याला पाठिंबा दिला. ही तक्रार तेल प्रयोगशाळेकडे आल्यानंतर तेथील संशोधकांना असे आढळून आले की, तेच तेल वापरणाऱ्या दुसऱ्या मोठ्या कारखान्यात काहीही तक्रार उद्‌भवत नाही. तेव्हा तेलात काहीच दोष नसला पाहिजे. बारकाईने अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले की, हा त्रास फक्त काही कामगारांनाच होत होता. त्यांच्या विशिष्ट कामात तेलाचे अत्यंत बारीक तुषार त्यांच्या हातांवर खूप जोराने (कातडीत प्रवेश होईल इतक्या जोराने) आपटत परंतु कामाच्या जागेपासून हात धुण्याची जागा खूप दूर असल्याने हे कामगार हात धुण्याऐवजी फक्त फडक्याने पुसण्यावरच भागवून घेत. हात धुण्याची तेथेच व्यवस्था केल्याबरोबर सर्व त्रास थांबला.

 

(३) विमानाच्या एंजिनाबद्दल तक्रार : विमान वाहतूक करणाऱ्या एका कंपनीकडून अशी तक्रार आली की, त्यांच्या विमानातील एंजिनाच्या दट्ट्यावरील कड्या फार लवकर झिजतात व त्यामुळे इंधनाचा खर्च फार वाढतो. इतकेच नाही, तर केव्हा केव्हा एंजिन बंदसुद्धा पडते. कंपनीच्या विमानांच्या देखभालीबद्दलच्या नोंदीचा बारकाईने अभ्यास केल्यावर असे दिसून आले की, ती तक्रार फक्त कंपनीने साफ करून पुन्हा वापरात आणलेल्या एंजिन-सिलिंडरांच्या बाबतीतच उत्पन्न होत आहे. कंपनीच्या गुदामात असे साफ करून ठेवलेले कित्येक सिलिंडर होते. ते एका खास विद्रावकाने धुवून निघालेला विद्राव सु. १०० पट विवर्धन करणाऱ्या सूक्ष्मदर्शकातून तपासला तेव्हा असे आढळून आले की, प्रत्येक सिलिंडरात ३४ ते १०४ मिग्रॅ. वजनाची बारीक पूड आहे. या पुडीचे क्ष-किरणांच्या साहाय्याने परीक्षण करता असे दिसून आले की, ती पूड म्हणजे क्वॉर्ट्‌झ, पोलादाचे कण व सिलिकॉन कार्बाइड या अपघर्षक (वस्तूचा पृष्ठभाग घासण्यासाठी व खरवडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या) द्रव्याचे मिश्रण आहे आणि तिच्यामुळेच कड्यांची मोठ्या प्रमाणावर झीज होत होती. सिलिंडर साफ करताना या पुडी वापरलेल्या होत्या परंतु नंतर ते काळजीपूर्वक स्वच्छ केलेले नव्हते.

 

(४) बोटांचे ठसे : वर्तुळाकार करवती तयार करणाऱ्या एका कारखानदाराला असे दिसून आले की, त्याने तयार केलेल्या करवतींच्या पात्यांवर काही डाग–बहुधा गंजाचे–निर्माण होतात व त्यामुळे त्यांच्या खपावर अनिष्ट परिणाम होतो. ही पाती प्रयोगशाळेमध्ये एका जास्त आर्द्रता असलेल्या पेटीत ठेवून त्यांच्यावर अधिक प्रमाणात गंज उत्पन्न होऊ दिला व नंतर त्यांचे सूक्ष्मदर्शकातून परीक्षण केले, तेव्हा हे गंजाचे डाग बरोबर बोटांच्या ठशाच्या आकाराचे आहेत असे दिसून आले. पाती आवेष्टित करणाऱ्या कामगारांना रबरी हातमोजे घालून काम करण्याचा सल्ला देण्यात आला व त्यामुळे वरील उपद्रव थांबला.

संदर्भ : 1. Munby, A. E. Laboratories : Their Planning and Fittings, London, 1931.              2. Parr, N. L. Laboratory Handbook, London,1963.

पुरोहित, वा. ल. ओगले, कृ. ह.