शेषाद्रि, तिरूव्यंकट राजेंद्र : (३ फेब्रूवारी १९००-२७ सप्टेंबर १९७५). भारतीय रसायनशास्त्रज्ञ. अँथोसायनिने, अँथोझँथिने व कार्बनी रसायनशास्त्रातील सूक्ष्म विश्लेषण यांविषयी विशेष संशोधन.

जन्म कुली-तलाई (तमिळनाडू) येथे. प्रेसिडेन्सी महाविदयालय (चेन्नई) येथे शिक्षण. रसायनशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादन केली (१९२२). चेन्नईच्या रामकृष्ण मिशन संस्थेच्या विदयालयात काही दिवस त्यांनी अध्यापन केले. भारतीय औषधी वनस्पती व कौमरीन अनुजात यांवरील संशोधनाबद्दल त्यांना मद्रास विदयापीठाने गौरविले. नवीन हिवतापरोधी शोध व अँथोसायनिनाचे संश्लेषण या विषयांवरील प्रबंधाबद्दल त्यांना मँचेस्टर विदयापीठाने पीएच्.डी. पदवी दिली (१९२९).

शेषाद्री यांच्या संशोधनाचा मुख्य भर वनस्पतींपासून मिळणाऱ्या पदार्थांच्या रासायनिक अभ्यासावर होता. निरनिराळे रंग, औषधे, कीटकनाशके इ. मिळविण्याच्या दृष्टीने मौल्यवान वनस्पतींतील क्रियाशील घटक अलग करून त्यांची रासायनिक वैशिष्ट्ये ठरविणे, त्यांच्या चाचण्या घेणे, त्यांची प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीने निर्मिती करणे इ. महत्त्वपूर्ण संशोधन त्यांनी केले. वनस्पती घटकांचे जैविक संश्लेषण कशा पद्धतीने व कसे करता येईल हा त्यांच्या संशोधनाचा मूळ उद्देश होता. या अनुषंगाने रेट्रॉरसीन अल्कलॉइडावरही त्यांनी संशोधन चालू ठेवले.

नोबेल पारितोषिक विजेते ⇨ फ्रिट्‌स प्रेगल यांच्या ग्रात्स (ऑस्ट्रिया) येथील प्रयोगशाळेत काही काळ काम करण्याची शेषाद्री यांना संधी लाभली. एडिंबरो विदयापीठाच्या वैदयकीय रसायनशास्त्र विभागातही काही काळ त्यांनी काम केले.

इंग्लंडमधील तीन वर्षांच्या वास्तव्यानंतर शेषाद्री कोईमतूर येथील ॲगिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन अधिकारी म्हणून दाखल झाले (१९३०). वॉल्टेअर येथे नव्यानेच सुरू झालेल्या आंध्र विदयापीठात रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची सन्मानाने नियुक्ती करण्यात आली (१९३३).

भारत सरकारच्या विविध विभागांत तज्ज्ञ, लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो, युनेस्कोचे सल्लागार व करंट सायन्स चे अध्यक्ष म्हणून त्यांनी मौलिक कार्य केले. भारतातील अनेक विदयापीठांनी त्यांना डी.एस्‌सी. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारच्या पद्मभूषण (१९६३) किताबासह त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले.

केमिस्ट्री ऑफ व्हिटॅमिन्स अँड हॉर्मोन्स हा त्यांचा गंथ प्रसिद्घ आहे.

जठर व्रणाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्यांचे दुर्दैवाने निधन झाले.

जाधव, ज्योती