शब्दकोडी : शब्दप्रभुत्त्वावर व शब्दचातुर्यावर आधारित एक रंजनप्रकार. या प्रकारचे पहिले कोडे आर्थर विन याने २१ डिसेंबर १९१३ च्या न्यूयॉर्क वर्ल्डच्या अंकात प्रसिद्ध केले. एखादे वाक्य दोन्हीकडून जरी शब्द वाचले, तरी एकसारखेच बनते, अशा प्रकारच्या शाब्दिक करामतीवर (उदा., ‘रामाला भाला मारा’) आधारित हे कोडे असावे. शब्दकोड्याच्या प्रचलित प्रकारात एका मोठ्या चौकोनात काही पोकळ आणि काही भरीव काळे लहान चौकोन काढून, त्यांपैकी पोकळ चौकोनांत शब्दाची समर्पक अक्षरे बसवून ती आडवी किंवा उभी कशीही वाचली तरी नेमका, अचूक व अर्थवाही शब्द तयार व्हावा अशी अपेक्षा असते. वाचकाला योग्य शब्द सुचविण्यासाठी आडव्या आणि उभ्या रकान्यांतील शब्दाचे अर्थ सूचक यादीत दिलेले असतात. एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात त्यांतला योग्य, समर्पक शब्द निवडून तो चौकोनाच्या आडव्या व उभ्या ओळींत नेमका बसवावा लागतो. यासाठी योग्य शब्दाबरोबरच त्या शब्दासाठी जेवढे पोकळ चौकोन योजलेले असतील, तितकीच अक्षरे असलेल्या शब्दाची निवड करावी लागते. शब्दकोडी सोडवण्याच्या छंदामुळे ज्याप्रमाणे वाचकाच्या शब्दसंपत्तीत भर पडते, त्याप्रमाणे त्याच्या शब्दसंग्रहाची व शब्दज्ञानाची कसोटीही पाहिली जाते.

अशा शब्दकोड्यांची मूळ सुरूवात इंग्रजी भाषेत झालेली असली, तरी आता ती अनेक भारतीय भाषांतही लोकप्रिय झालेली आढळते. काही शब्दकोड्यांत करमणुकीबरोबरच योग्य उत्तर आल्यास बक्षिसाच्या रूपाने आर्थिक लाभही होत असल्याने शब्दकोड्यांची लोकप्रियता वाढत गेल्याचे दिसून येते.

काही भाषांत (उदा., चिनी) आडव्या आणि उभ्या अक्षरांची कोडी निर्माण करता येत नसल्याने अशा भाषांचा अपवाद वगळल्यास जगातील सर्व भाषांतून शब्दकोड्यांचे अनेकविध प्रकार लोकप्रिय ठरले आहेत. फ्रेंच भाषा ही शब्दकोड्यांसाठी सर्वात सोयीस्कर अशी भाषा आहे. कॅनडामध्ये आडवे किंवा उभे फ्रेंच आणि इंग्रजी शब्द योजोन तयार केलेले द्विभाषिक कोडे लोकप्रिय झालेले आहे. रशियामध्ये शब्दकोड्यांचा उपयोग प्रचारासाठीही करण्यात येतो.

चौकोनांची कोडी अधिक प्रमाणात प्रचलित असली, तरी चित्रचौकटी, साम्याकारी, अनियमित आकाराची आणि ज्यांना शास्त्रीय किंवा गुप्त लेखनाची म्हणता येतील अशी, तात्कालिक विषयांवर आधारलेली वर्तुळाकार, बदामाच्या आकाराची, फुलीच्या खुणेच्या आकाराची इत्यादी कोड्यांचे अनेक प्रकार आढळून येतात. मात्र पोकळ व भरीव छोटे चौकोन असलेल्या चौरस आकाराची कोडीच अधिक लोकप्रिय आहेत. प्रसिद्ध विधाने वा अवतरणे देऊन त्यांचे लेखन ओळखण्यास सांगणे, काही शब्दांतील सोडलेली अक्षरे भरणे, एका शब्दातील अक्षरे फिरवून अनेक नवीन शब्द तयार करणे, अशा कल्पनांवर आधारलेले शब्दकोड्यांचे अनेक प्रकार रूढ आहेत. संगणकीय खेळांमध्ये विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश होतो.

गोखले, श्री. पु.