क्लब : समान अभिरूची वा हितसंबंध असणाऱ्या लोकांचा विशिष्ट उद्दिष्टांकरिता एकत्र जमणारा संघ, मंडळ, मेळा, समाज किंवा संस्था. पथिकाश्रमातील सख्य, अशी क्लबची व्याख्या जॉन ऑब्रीने केली आहे. असे क्लब आहार-विहारादी गोष्टींबरोबरच पत्ते खेळण्यापासून ते राजकीय वा सामाजिक कार्य करण्यापर्यंत कोणत्याही हेतूने स्थापन होऊ शकतात. क्लबच्या नियमांनुसार क्लबच्या सभासदास विशिष्ट अधिकार उपभोगण्याचा अधिकार असतो.

क्लबचे सभासदत्व स्वीकारण्यामागे अनेक कारणे असतात. काही वेळा क्लबच्या ध्येयधोरणावर विश्वास म्हणून, तर काही वेळा समानशील व्यक्तींचा सहवास हवा म्हणून लोक क्लबचे सभासद होतात. काही लोकांना क्लबमधील विशिष्ट मर्यादित जीवन आवडते. आपल्यासारख्या व्यक्तींचे अनुभव जाणून घेण्याच्या दृष्टीनेही काही लोक क्लबचे सभासदत्व स्वीकारतात.

मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती समूह किंवा गट करून राहण्याची असल्यामुळे फार पुरातन काळापासून क्लबसारख्या संस्था अस्तित्वात असल्याचे दिसून येते. प्राचीन काळी निरनिराळ्या वयोगटांतील व्यक्तींच्या संस्था असत. त्यांपैकी काही गुप्त स्वरूपाच्याही असत. ग्रीक व रोमन लोकांत आधुनिक क्लबच्या कल्पनेशी साधर्म्य असलेली गुप्तदेवतांच्या उपासकांची तसेच वेगवेगळ्या व्यापारी लोकांची मंडळे असत. भारतातही अशी मंडळे होती. त्यांना सभा म्हणत. या सभांत गोष्टी सांगणे, वाङ्‌मयीन चर्चा करणे, आख्याने, प्रवचने इ. कार्यक्रम असत. मध्ययुगातील युरोपीय व्यापारी संघ (गिल्ड्स), सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांसारखेच कार्य करीत. प्रबोधनकाळात अनेक विचारवंतानी विविध विषयांना चालना दिली. सामाजिक कार्यासाठी विचारवंत एकत्र जमू लागले. त्यामुळे मंडळे वा संघ यांची संख्याही वाढत गेली. पंधराव्या शतकानंतर विशेषतः इंग्लंडमध्ये असे क्लब स्थापन होऊ लागले. आधुनिक क्लबांचा उगम त्यातून झालेला दिसतो.

पथिकाश्रमात (टॅव्हर्न) एक विचाराच्या अनेक व्यक्ती एकत्र जमत. तेथे नवीन विचार, परिस्थिती व त्यातून लागणार्‍या संधी यांविषयी चर्चा होत असे. नियमितपणे एकत्रित जमण्यासाठी सोयीस्कर जागा नसल्यामुळे पथिकाश्रमाचीच निवड करण्यात येत असे व येणारा खर्च आपपासांत वाटून घेण्यात येत असे. अशा पथिकाश्रमात भरणाऱ्या भोजनभाऊंच्या मंडळाचा टॉमस हॉक्लीव्ह हा कवी सभासद होता. मर्मेड पथिकाश्रमात भरणाऱ्या फ्रायडे क्लबचा संस्थापक सुप्रसिद्ध संशोधक व लेखक सर वॉल्टर रॅले हा होता. या क्लबच्या सभासदांत शेक्सपिअर, जॉन फ्लेचर इ. साहित्यिक होते. कवी आणि नाटककार बेन जॉन्सनने डेव्हिड पथिकाश्रमात भरणाऱ्या अपोलो क्लबचे प्रथम नियम तयार केले.

१६५० च्या सुमारास इंग्लंडमध्ये कॉफीगृहे अस्तित्वात येऊ लागली. अशा कॉफीगृहात कॉफीपानाबरोबर मद्यपान आणि बाष्कळ चर्चा व हास्यविनोद चाले. सॅम्युएल पेपिस याने त्यांना कॉफीक्लब हे नाव दिले. पहिली दोन कॉफीगृहे किंवा कॉफीक्लब ऑक्सफर्ड व लंडन येथे स्थापन झाली. काही कॉफीगृहे वैयक्तिक मालकीची झाली व त्यांनी खूप पैसा मिळविला. अशा कॉफीगृहात भरणाऱ्या कॉफीक्लबात नवे सभासद गुप्तमतदान पद्धतीने घेत. त्यामुळे मतभेद, गटबाजी व वैमनस्य यांची वाढ झाली व एकोणिसाव्या शतकात सभासदांच्या अर्जांची तपासणी करण्यासाठी समित्यांची स्थापना झाली.

कॉफीगृहे ही आळशी व असंतुष्ट लोकांची आश्रयस्थाने असत. त्यांचा समाजावर वाईट परिणाम होतो, म्हणून ती बंद करण्याचे फर्मान दुसऱ्या चार्ल्सने काढले. परंतु त्याविरुद्ध बरीच ओरड झाल्यामुळे त्या फर्मानाची अंमलबजावणीच झाली नाही. रोज नावाच्या पथिकाश्रमात जमणाऱ्या अधिकाऱ्यानी दुसऱ्या जेम्स राजाला पदच्युत करून त्याच्या जागी विल्यम ऑफ ऑरेंजला आणावयाचा निर्णय घेतला व त्यातूनच पुढे इंग्लंडमधील १६८८ ची राज्यक्रांती झाली.

पुढे ॲन राणीच्या काळात (१७०२ ते १७१४) बरेच राजकीय पक्ष जन्मास आले. त्यांत व्हिग आणि टोरी हे प्रमुख पक्ष होते. व्हिग पक्षीयांचा किटकॅट क्लब हा, तर टोरी पक्षीयांचा स्टिक क्लब हा बालेकिल्ला असे. याशिवाय अपोलो क्लब (डेव्हिड टॅव्हर्न), लंडन क्लब (मर्मेड टॅव्हर्न), लिटररी क्लब किंवा दी क्लब असे प्रसिद्ध क्लब पथिकाश्रमांत भरत. सर रिचर्ड स्टीलचे टॅटलर, जोसेफ ॲडिसनचे स्पेक्टॅटर इ. नियतकालिकांना मिळालेले स्वरूप व प्रसिद्धी यांचे उगमस्थान अशा क्लबांतच आहे. डॉ. जॉन्सनचा क्लब वाङ्मयीन चर्चेसाठी प्रसिद्ध होता. बर्क, गोल्डस्मिथ, बॉस्वेल हे प्रसिद्ध लेखक व गॅरिकसारखा प्रसिद्ध नट हे त्याचे सभासद होते.

त्यानंतर इंग्लंडमध्ये बऱ्याच राजकीय क्लबांची स्थापना झालेली आढळते. १८३२ साली ड्यूक ऑफ वेलिंग्टनने हुजूर पक्षाच्या सभसदांसाठी कार्लटन क्लब स्थापन केला. त्याच वर्षी ब्रिटिश संसदेत सुधारणा व्हाव्यात असे वाटणाऱ्या लोकांनी रिफॉर्म क्लब स्थापला.

औद्योगिक क्रांतीनंतर व्यावसायिक क्लब तसेच साहित्यिक, क्लब, बँकिंग, व्यापारी, प्रवासी, सैनिक, राजदूत, विचारवंत, मोटरवाले, सायकलप्रवासी, घोड्यांच्या शर्यतीतील जॉकी इ. गटांतील लोकांचे स्वतंत्र क्लब स्थापन झाले. क्रिकेट खेळाचे नियमन व नियंत्रण करणारा सुप्रसिद्ध मेरिलीबोन क्रिकेट क्लब (एम्. सी. सी.) १७८७ साली स्थापन झाला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात १८८३ साली केवळ स्त्रियांचा पहिला क्लब– ॲलेक्झांड्रा क्लब– सुरू झाला. १८८७ साली स्त्रियांच्या युनिव्हर्सिटी क्लब, १९२० साली विमेन युनायटेड सर्व्हिसेस क्लब व १९४४ साली विमेन्स प्रेस क्लब, असे खास स्त्रियांचे क्लब स्थापन झाले.


मितपान प्रचारकांनी कामगारांच्या कल्याणासाठी कामगार क्लबांची स्थापना १८६२ साली केली. त्यात कामगारांसाठी करमणूक, शिक्षण, वाचनालय इत्यादींची सोय करण्यात आली. युनियन जॅक क्लब (१९००) हा खास सैनिकांना रजेच्या काळात भोजन, निवास इ. सोयी उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन झाला. याच क्लबाच्या कल्पनेवर आधारलेले सैनिकांचे अनेक क्लब दोन जागतिक महायुद्धांच्या काळात स्थापन झाले होते. ख्रिस्ती युवकवर्गाच्या विकासासाठी यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (वाय्. एम्. सी. ए. १८४४) व यंग विमेन्स ख्रिश्चन असोसिएशन (वाय्. डब्ल्यू. सी. ए. १८७७) या संस्था प्रथम इंग्लंडमध्ये स्थापन झाल्या आणि पुढे अमेरिकेत त्यांचा विशेष प्रसार झाला. या संस्थांच्या शाखाही जगभर आढळतात.

इंग्लंडप्रमाणे यूरोपातील अनेक देशांत राजकीय, धार्मिक, व्यावसायिक स्वरूपांचे क्लब स्थापन झाले. विशेषतः फ्रान्समधील सॅलान क्लब हा कलावाङ्‌मयीन कार्याबद्दल प्रसिद्ध होता. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात व नेपोलियनची सत्ता अस्तगत होण्याच्या वेळी अशा संस्था आणि क्लब फार वाढले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मताला महत्त्व प्राप्त झाले. जर्मनीत कैसरच्या राज्यत्यागानंतर अनेक राजकीय मंडळे उद्यास आली. त्यांतील जर्मन वर्कर्स पार्टी म्यूनिक शहरी कार्य करी. तीच हिटलरच्या नाझी चळवळीची जनक होती.

अमेरिकेतील अनेक जुने क्लब इंग्लंडमधील क्लबांच्या धर्तीवर चालत. अमेरिकेत यादवी युद्धानंतर एकराष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली त्यामुळे अनेक नवनवीन क्लब व संस्था उदयास आल्या. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेत जवळजवळ सर्व प्रकारचे क्लब स्थापन झाले. पुरुषांच्या मंडळांप्रमाणेच स्त्रियांचीही मंडळे व क्लब निर्माण झाले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी अमेरिकेतील शिकागो शहरी स्थापन झालेले कारखानदार, व्यापारी व इतर सधन प्रतिष्ठित लोक यांचे रोटरी इंटरनॅशनल (१९०५) व लायन्स इंटरनॅशनल (१९१४) हे जगप्रसिद्ध क्लब आहेत. बहुतेक देशांत त्यांच्या शाखा आहेत. आंतरराष्ट्रीय सामंजस्य साधणे हे त्यांचे ध्येय आहे.

अलीकडे भारतातही लहानमोठ्या शहरांत अनेक तऱ्हेची मंडळे, सभा, संस्था व क्लब स्थापन झालेले आहेत. ही मंडळे धर्म, संस्कृती, वाङ्‌मय, क्रीडा इ. बहुतेक सर्व क्षेत्रांत कार्य करीत आहेत. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (मुंबई), डेक्कन जिमखाना (पुणे), यूरोपियन जिमखाना म्हणजेच हल्लीचा पूना क्लब इ. उदाहरणे क्लबांचीच आहेत. स्त्रियांचेही अनेक क्लब, महिलामंडळे, वनितासमाज अनेक शहरांत स्थापन झालेले आहेत. परप्रांतांत स्वकीयांच्या सोयीसाठी अनेक मंडळेस्थापन झाली आहेत. उदा., दिल्ली, अजमीर, मद्रास, कलकत्ता येथील महाराष्ट्रमंडळे. इंग्लंडातही परप्रांतीयांचे म्हणजे स्कॉटिश, आयरिश, वेल्श इ. लोकांचे स्वतंत्र क्लब आहेत.

गोखले, श्री. पु. शहाणे, शा. वि.