शपथ : धर्म आणि कायदा या दोन्ही विषयांत शपथ ही संकल्पना विशिष्ट पण काहीशा परस्परपूरक अर्थाने वापरली जाते. या नोंदीत प्रथम धर्माच्या आणि नंतर कायद्याच्या आनुषंगाने शपथेचे स्वरूप स्पष्ट केले आहे.
शपथ (धर्म) : आपल्या विधानाच्या, निवेदनाच्या किंवा वचनाच्या सत्यतेची ग्वाही देण्याची एक सार्वत्रिक पद्धत. शपथेच्या रूपाने एक प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यात येते. शपथ खोटी ठरल्यास प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे काही प्रायश्चित्त वा शिक्षा आपणास भोगावी लागेल, अशी जाणीव शपथ घेणाऱ्या व्यक्तीच्या मनात असते.
प्राचीन काळापासून शपथ घेण्याची पद्धत बहुतेक सर्व समाजांत आणि संस्कृतीत आढळून येते. काही अभ्यासकांच्या मते शपथ घेण्यामागे ⇨ वस्तुविनियमासारखा आर्ष आकृतिबंध असावा. वस्तुविनिमयात एकाच वेळी देणारा देताही होतो व घेताही होतो. त्यामुळे उभयपक्षी काही हक्कांची व कर्तव्यांची जाणीव जोपसली जाते आणि ती नीतीने पाळली जाते.
शपथ घालण्याचाही एक प्रकार असतो. काही गोष्टीना प्रतिबंध करण्यासाठी वा काही गोष्टी करून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला दुसरी एक व्यक्ती शपथ घालते. उदा., ‘तू पुन्हा आपल्या भावाशी भांडलास, तर तुला माझी शपथ आहे’ अशी आईने आपल्या एका मुलाला घातलेली शपथ. हा मुलगा पुन्हा आपल्या भावाशी भांडल्यास आपले (आईचे) काहीतरी बरेवाईट घडून येईल, अशी भीती घातलेली असते.
शपथ अनेक प्रकारे घेतली जाते. काही प्रकार असे : (१) परमेश्वराला किंवा इतर इष्टदेवतेला किंवा वस्तूला स्मरून व साक्षीदार म्हणून आवाहन करून शपथ घेणे. उदा, ‘ईश्वरसाक्ष खरे सांगेल’ अशी प्रकारे घेतलेली शपथ. (२) केवळ स्वतःच्या नैतिक सत्त्वाचा हवाला देऊन शपथ घेणे. (३) अपली शपथ खोटी ठरल्यास अमुक एका स्वरूपाची आपत्ती आपणावर कोसळो, असे शिक्षावचन उच्चारून शपथ घेणे. (४) शपथ घेताना आपल्याला प्रिय असलेली वस्तू वा व्यक्ती ओलीस ठेवल्याप्रमाणे भाषा वापरणे. उदा., ‘माझ्या तान्ह्या बाळाची शपथ’, ‘आईशपथ खरे सांगतो’ इत्यादी.
अनेकदा शपथ घेताना काही कृती करावी लागते आणि कृती काही वेळा एखाद्या धार्मिक कर्मकांडाच्या स्वरूपाची असते. सामोआमध्ये शपथ घेणाऱ्या व्यक्तीला असे सांगितले जाते, की ‘तू म्हणतोस ते खरे असल्यास, तुझ्या डोळ्यांना स्पर्श कर’. शपथ खोटी ठरल्यास त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर संकट यावे असा शाप अभिप्रेत असतो. प्राचीन रोमन लोक आपल्या डोळ्यांची आणि मस्तकाची शपथ घेत असत. त्यांतून शपथेच्या खरेखोटेपणात अतिमानुष शक्तींची गुंतवणूक प्रस्थापित होते, अशी श्रद्धा असावी.
धर्मकल्पना अधिक उन्नत झाल्यानंतर शपथविधीत काहीसा बदल झाला. देवाला किंवा पवित्र धर्मग्रंथाला केले जाणारे आवाहन याचे निदर्शक आहे. शपथ घेतली जाताना त्या प्रसंगाला काही व्यक्ती साक्षीदार असाव्यात, असा आग्रह कधीकधी धरला जातो. प्राचीन जर्मनिक समाजात असे साक्षीदार आवश्यक मानले जात. प्रतिज्ञा आणि ⇨ दिव्य हे शपथेचेच विशेष प्रकारचे आविष्कार होत, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.
कुलकर्णी, अ. र.
शपथ (कायदा) :न्यायालयातील साक्षीदारांनी, विशिष्ट सार्वजनिक पदाधिकाऱ्यांनी व न्यायाधीशांनी सत्यकथन, राजाशी व राज्यघटनेशी एकनिष्ठता, कर्तव्यनिष्ठा, निःपक्षपाती न्यायदान, गोपनीयता इ. उद्देशांनी प्रचलित विधीनुसार विहित नमुन्यात, स्वखुशीने व जाहीररीत्या स्वतःवर घालून घेतलेले मौखिक बंधन म्हणजे शपथ. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, इतर मंत्रिगण, सर्वोच्च व उच्च न्यायाधीश, इतर न्यायाधीश, संसदेचे तसेच राज्य विधिमंडळांचे सभासद, सहकारी बँकेचे संचालक यांना अधिकारग्रहणापूर्वी व न्यायालयात पुरावा देऊ इच्छिणाऱ्यांना साक्ष देण्यापूर्वी, विहित नमुन्यात शपथ घ्यावी लागते. न्यायालयामध्ये अशी शपथ घेताना भगवतगीता, कुराण, बायबल, अवेस्ता यांसारख्या धर्मग्रंथावर आपापल्या श्रद्धेप्रमाणे हात ठेवावा लागतो. ज्यांचा धर्मग्रंथावर विश्वास नसेल, त्यांना ‘मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा कथन करतो’, असा प्रारंभ करण्याची मुभा आहे. शपथ देण्याचे अधिकार निरनिराळ्या पदाधिकाऱ्यांना असतात. उदा., राष्ट्रपतीने प्रधानमंत्र्यांला, सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींने अनुक्रमे सर्वोच्च व उच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्तींना, सभापतीने संसदेच्या व विधिमंडळाच्या सभासदांना तसेच न्यायालयाने साक्षीदाराला कायद्याच्या तरतुदीनुसार शपथ द्यावी लागते.
न्यायालयामध्ये शपथ घेतल्याखेरीज साक्षीदाराला पुरावा देता येत नाही. साक्षीदाराने शपथ घेण्याचे नाकारल्यास अशा नकाराची कारणे न्यायाधींशाना नोंदवून ठेवावी लागतात. शपथ घेतल्यावर संपूर्ण व निर्भेळ सत्य सांगण्याचे बंधन साक्षीदारावर असते. एके काळी शपथेमागे एवढे नैतिक सामर्थ्य होते की, अकराव्या –बाराव्या शतकांत इंग्लंडमध्ये एखाद्या वादीने, आपली तक्रार वा गाऱ्हाणे याच्या पुष्टर्थ ‘वादीचे म्हणणे खरे आहे’, एवढेच शपथपूर्वक सांगणारे बारा साक्षीदार उभे केले, तर न्यायाधीश ताबडतोब वादीच्या बाजूने निकाल देत. पूर्वी धर्मग्रंथावर हात ठेवून खोटे बोलण्याचे धैर्य दाखविणारे बारा साक्षीदार गाठणे दुष्कर किंवा अशक्यप्राय होते.
शपथ घेऊन खोटी साक्ष देणे, हा भारतीय दंडविधानाच्या तरतुदीनुसार गंभीर गुन्हा मानला जाते व त्यासाठी दंड किंवा तुरूंगवास अशा शिक्षा देता येतात. इंग्लंडमध्ये बंधनकारक शपथ अधिनियम १८६८ व भारतामध्ये भारतीय शपथ अधिनियम १८७३ यांमध्ये शपथेसंबंधीच्या सर्व कायदेशीर तरतुदी एकत्रित केलेल्या आहेत. वयाने अज्ञान असलेल्या व्यक्तीना मात्र शपथ देता येत नाही आणि घेताही येत नाही.
रेगे, प्र. वा.