व्हिलसिंगेन : नेदरर्लंडच्या नैर्ऋत्य भागातील झीलंड प्रांतातील एक सागरी बंदर. लोकसंख्या ४४,०२२ (१९८९ अंदाज). व्हालकरन बेटाच्या दक्षिण किनाऱ्यावर, वेस्टर स्केल्ट नदीमुखखाडीच्या मुखाशी हे वसले आहे. मध्ययुगीन काळात एक व्यापारी केंद्र म्हणून तसेच हेरिंग मासेमारीसाठीही याला महत्त्व होते. बेल्जियममधील अँटवर्पशी या नगराचा संपर्क असे. इ.स.१५७२ मध्ये स्पॅनिश शासनाच्या विरोधात बंड उभारणारे हे पहिले नगर होते. त्यानंतर बंडखोरांच्या नौसेनेचे हे मुख्य केंद्र बनले. डचांना मदत करण्याच्या करारानुसार एक ‘सुरक्षा नगर’ म्हणून इंग्लंडने व्हिलसिंगेन १५८५ ते १६१६ या काळात आपल्या ताब्यात ठेवले होते. पुढे पहिल्या नेपोलियनने येथे नौसेना तळ उभारला. नेदर्लंड्सच्या स्वातंत्र्यानंतर शहराची भरभराट झाली. १८७५ मध्ये येथे जहाजबांधणी गोदीची उभारणी करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धकाळात नगराची खूप हानी झाली. १९५३ मधील महापुराचा तडाखाही त्यास बसला.
जहाजबांधणी, अभियांत्रिकी, तेलशुद्धीकरण व तंत्रनिर्मिती हे उद्योग येथे चालतात. इंग्लंडमधील हार्विच या ठिकाणाशी येथून आगबोट वाहतूक चालते.
सेंट जेम्सचे चर्च (१३०८), प्रिझनर्स टॉवर्स (१५६३), जुना सराफबाजार (१६७२), नगरभवन (१७३३), शहराच्या जुन्या प्रवेशद्वाराचा भाग ही शहरातील काही प्रमुख ऐतिहासिक स्थळे आहेत. अँडमिरल मिकील अँड्रीअँन्सन रॉइटर याचे हे जन्मस्थळ असून त्याचे स्मारक – संग्रहालय येथे आहे.
चौधरी, वसंत