व्हेर्न, झ्यूल : (८ फेब्रुवारी १८२८–२४ मार्च १९०५). आधुनिक विज्ञानकथेचा पूर्वसूरी मानला जाणारा फ्रेंच कादंबरीकार. नांत येथे जन्म. त्याचे वडील वकील होते. १८४७ साली तो पॅरिसला कायद्याचा अभ्यास करण्यासाठी गेला परंतु त्याला लेखक व्हायचे होते. विख्यात फ्रेंच कादंबरीकार आणि नाटककार ⇨ आलेक्सांद्र द्यूमा (थोरला) ह्याच्याशी त्याची मैत्री होती. द्यूमाच्या सहकाऱ्याने ‘द ब्रोकन स्ट्रॉज’ (इं. शी.) हे त्याचे पहिले नाटक १८५०मध्ये रंगभूमीवर आले. त्यानंतर त्याने आणखी काही नाटके, कथा वगैरे लेखन केले. अर्थार्जनासाठी तो शेअरदलालीच्या व्यवसायात पडला. १८६३ साली त्याची फाइव्ह वीक्स इन अ बलून (इं. भा. १८६९) ही लघुकादंबरी प्रसिद्ध झाली. तीत मध्य आफ्रिकेच्या हवाइ प्रवासाचा वृत्तान्त दिलेला होता. ह्या कादंबरिकेस वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ए जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ (१८६४, इं. भा. १८७४), ‘द ॲड्व्हेंचर्स ऑफ कॅप्टन हॅटेरस’ (१८६६, इं. शी.), फ्रॉम द अर्थ टू द मून (१८६५, इं. भा. १८७३), ट्वेंटी थाउजंड लीग्ज अंडर द सी (१८७०, इं. भा. १८७३), अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज (१८७३, इं. भा. १८७३), द मिस्टीरिअस आयलंड (१८७४, इं. भा. १८७५) साहसांच्या अद्भूतरम्य वातावरणाने भारलेल्या ह्या त्याच्या कादंबऱ्या अतिशय लोकप्रिय झाल्या. ए जर्नी टू द सेंटरमध्ये आइसलँड…मधील एका ज्वालामुखीच्या कुंडातून (क्रेटर) खोलवर गेल्यावर तेथे आढळणाऱ्या भूमिगत जगाचे वर्णन आहे. ‘ द ॲड्व्हेंचर्स…’मध्ये उत्तर ध्रुवावर जाण्यासाठी आखलेल्या मोहिमेचा वृत्तान्त आहे. फ्रॉम द अर्थ… ह्या कादंबरीत दोन साहसी अमेरिकन पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राबाहेर जाऊन चंद्रानजीक कसे पोहोचतात, ते दाखवले आहे. ट्वेंटीव थाउजंड…मध्ये गूढ व्यक्तिमत्त्व असलेल्या कॅप्टन नेमोने बांधलेल्या आणि त्याच्याच नेतृत्वाखाली समुद्रात शिरलेल्या नॉटिलस ह्या पाणबुडीने केलेल्या जलपर्यटनांची कथा आहे. केवळ ८० दिवसांत पृथ्विप्रदक्षिणा करून दाखवीन, अशी पैज मारून ती जिंकणाऱ्या एका इंग्रज माणसाची कथा अराउंड द वर्ल्ड…मध्ये सांगितलेली आहे. व्हेर्नच्या एकूण पुस्तकांची संख्या ऐंशीच्या आसपास भरते.