व्हुपरटाल : जर्मनीच्या नॉर्थ–ऱ्हाईन–वेस्टफेलिया राज्यातील एक शहर. लोकसंख्या ३,७४,५०० (१९९८). ड्युसेलडॉर्फपासून पूर्वेस २४ किमी. अंतरावर हे शहर आहे. ऱ्हाईनची उजव्या तीरावरील उपनदी व्हुपर हिच्या दोन्ही काठांवरील तीव्र उताराच्या प्रदेशात १६ किमी. लांबीच्या पट्ट्यात ह्या शहराचा विस्तार आहे. व्हुपरटालच्या परिसरातील बार्मन शहराचा उल्लेख अकराव्या शतकातील, तर एल्बरफेल्टचा उल्लेख बाराव्या शतकातील आढळतो. कठीण खडकाच्या प्रदेशातून वाहणाऱ्या नदीच्या स्वच्छ पाण्यामुळे विणकर लोक या प्रदेशाकडे आकर्षिले गेले. बेर्गिश लँडकडे पाठविण्यात येणाऱ्या सूत – विरंजनकामात बार्मन व एल्बरफेल्ट या दोन्ही नगरांची मक्तेदारी निर्माण झाली होती (१५२७). १९२९ मध्ये बार्मन, एल्बरफेल्ट, रॉन्सडॉर्फ, बेयेनबर्ग, क्रॉनेनबर्ग व व्हॉहविंकेल या नगरांचे बार्मन-एल्बरफेल्ट या नावाने एकत्रिकरण करण्यात आले. १९३०मध्ये त्याचे व्हुपरटाल (व्हुपर खोरे) असे नामांतर झाले.
गोरगरिबांच्या मदतीसाठी प्रसिद्ध एल्बरफेल्ट पद्धती १८५३ मध्ये येथे सुरू झाली. या पद्धतीचा स्वीकार पुढे जर्मनीत व इतरत्रही करण्यात आला. या पद्धतीत सुस्थितीतील नागरिकांना शहरातील दरिद्री, निराधार, बेकार लोकांच्या गरजा कोणत्या आहेत, याचा शोध घेऊन त्या गरजा पुरवाव्या लागतात. तसेच गरजू लोकांच्या क्षमतेनुसार योग्य त्या कामात त्यांना सहभागी करून घेण्याचे त्यांवर बंधन असते.
चौधरी, वसंत