व्हिएटनाम युद्ध : आग्नेय आशियात ⇨ इंडोचायनाच्या नियंत्रणासाठी सतत तीस वर्षे जो सशस्त्र संघर्ष झाला, त्यास व्हिएटनाम युद्ध म्हणतात. हा संघर्ष ⇨ हो-चि-मिन्ह यांचा कम्युनिस्ट पक्ष, त्यांचे लाओस व कंबोडियातील साथीदार आणि अमेरिका यांच्यात झाला. व्हिएटनामला सोव्हिएट संघ व चीनचा पाठिंबा होता. अमेरिका व सोव्हिएट संघ यांच्यातील शीतयुद्धाचा त्यावर परिणाम झाला. दुसर्यां महायुद्धानंतर इंडोचायनाच्या राजकारणात फ्रेंचांची जागा अमेरिकेने घेतली आणि जुन्या वसाहतवादी व्यवस्थांची नव्या परिस्थितीत आपल्या हिताप्रमाणे रचना करण्याचा प्रयत्न केला. तेथील जनतेला हा नवसाम्राज्यवादाचा प्रकार वाटला. अंतिमत: ३० एप्रिल १९७५ रोजी दक्षिण व्हिएटनामचा पाडाव होऊन हे प्रदीर्घ युद्ध समाप्त झाले. [→ व्हिएटनाम (इतिहास व राजकीय स्थिती)].
व्हिएटनाम युद्धाचे मुख्यत: तीन टप्पे पडतात : (१) १९४५ ते १९५४, (२) १९५४ ते १९७३ व (३) १९७३ ते १९७५. या तिन्ही टप्प्यांत दुसरा टप्पा सर्वांत महत्त्वाचा मानला जातो.
या युद्धाचा पहिला टप्पा १९४५ साली सुरू झाला. त्या वेळी हे युद्ध फ्रेंच वसाहतवादी सैन्याविरुद्ध लढले गेले. १८५४ च्या व्हिएन्ना परिषदेनंतर ते संपुष्टात आले. या युद्धात व्हिएटनामचे सेनापती जनरल जियाप यांनी गनिमी काव्याचा वापर करून फ्रेंच सैन्याचा अनेकदा पराभव केला. व्हिएन्ना कराराप्रमाणे व्हिएटनामची उत्तर व दक्षिण व्हिएटनाम अशी विभागणी झाली. लाओस व कंबोडियात तटस्थ सरकार स्थापन झाले पण पॅथेट लाओ व ख्मेर इसराक हे सशस्त्र कम्युनिस्ट गट ग्रामीण भागात प्रभावी ठरले. व्हिएन्ना करारावर द. व्हिएटनाम व अमेरिका यांनी सह्या केल्या नाहीत व कराराचा भाग असलेला सार्वमताचा निर्णय अमलात आणला नाही. त्यामुळे युद्ध जास्त भडकणे अपरिहार्य ठरले.
या युद्धाचा दुसरा टप्पा १९५४ पासून सुरू झाला पण खर्याह अर्थाने युद्ध भडकण्यास १९६४-६५ मध्ये सुरुवात झाली. दक्षिण व्हिएटनाममध्ये व्हिएटकाँग सैनिकांच्या कारवाया वाढल्या. त्या रोखण्यासाठी प्रथम राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकेचे सैन्य पाठविले. फेब्रुवारी १९६५ मध्ये अध्यक्ष लिंडन जॉंन्सन यांनी सु. दोन लाख अमेरिकी सैनिक व्हिएटनाम मध्ये उतरवले. याच काळात द. व्हिएटनाममध्ये सत्तर टक्के लोकसंख्या असणारे बौद्ध व तीस टक्के लोकसंख्या असणारे कॅथलिक यांच्यात संघर्ष सुरू झाला. राष्ट्राध्यक्ष द्येम व खान्ह यांची धोरणे त्यास जबाबदार होती. तेथे यादवी युद्धच सुरू झाले. लष्करातील असंतोष वाढला व सत्ताधारी गटात बेदिली निर्माण झाली. ऑगस्ट १९६४ मध्ये युद्धाबाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षास पूर्ण अधिकार देण्यात आले.
व्हिएटनाममध्ये १९६५-६६ मध्ये सु. चार लाख अमेरिकी सैनिक उतरले व त्यांनी व्हिएटकाँग बंडखोरांविरुद्ध कारवाई सुरू केली. व्हिएटकाँगला शस्त्रात्रे व दारूगोळा यांचा पुरवठा उत्तर व्हिएटनामकडून होतो, म्हणून अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी उ. व्हिएटनामवर प्रचंड बाँबफेक केली. या हवाई हल्ल्यांना तोंड कसे द्यायचे, हा प्रश्न उ. व्हिएटनामपुढे उभा राहिला पण त्याही परिस्थितीत सायकली व इतर साधनांचा वापर करून व्हिएटकाँग सैनिकांना शस्त्रात्रे व दारूगोळा यांचा पुरवठा करण्यात आला. अमेरिकेच्या आक्रमणाची तीन उद्दिष्टे होती : (१) उत्तर व्हिएटनामवर बाँबहल्ले करून आर्थिकदृष्ट्या त्याचे खच्चीकरण करणे व व्हिएटकाँग सैनिकांची रसद तोडणे (२) या पाच लाख अमेरिकी सैन्याच्या मदतीने नव्या शस्त्रास्त्रांचा वापर करून व्हिएटकाँग सैन्याचा मोड करणे. (३) दक्षिण व्हिएटनामच्या सरकारला व फौजेला मजबूत व सुस्थिर करणे. दक्षिण व्हिएटनामचा पाडाव झाला, तर संपूर्ण आग्नेय आशिया कम्युनिस्टांच्या ताब्यात जाईल, अशी भीती अमेरिकेला वाटत होती.
अमेरिकी सैनिकी आक्रमणास व्हिएटकाँग सैन्याने मोठ्या शौर्याने दिले. दक्षिण व्हिएटनामच्या ग्रामीण भागातील सत्तर टक्के भूभाग त्यांच्या ताब्यात होता. त्यांनी गनिमी काव्याचा व छापमार तंत्राचा वापर करून अमेरिकी सैन्यास जेरीस आणले. शत्रू सगळीकडेच आहे, याची जाणीव अमेरिकन सैनिकांना झाली कारण व्हिएटकाँग सैन्यास जनतेचा पाठिंबा होता. अमेरिकेची विमाने, हेलिकॉप्टर्स व खुद्द अमेरिकी दूतावासावर त्यांनी हल्ले केले. परिणामत: हे युद्ध जिंकता येत नाही, याची जाणीव अमेरिकी सैन्यास झाली. दक्षिण व्हिएटनामी सैन्याचे मनोबल कधीच उंच नव्हते. या काळात दर वर्षी सु. १,१५,००० सैनिक दक्षिण व्हिएटनामी सैन्यातून पळून जात असत.
या युद्धाविरुद्ध जगभर व खुद्द अमेरिकेतही लोकमत निर्माण झाले. हजारो अमेरिकी सैनिक मारले जात होते. लष्करात भरती होणे अमेरिकन तरुणांसाठी सक्तीचे बनले. जॉन्सन यांच्या धोरणाविरुद्ध जगभर चळवळ सुरू झाली. बर्ट्रंड रसेल, सार्त्र यांच्यासारखे थोर साहित्यिक-विचारवंत तीत सामील झाले. अमेरिकेतील महाविद्यालयांतून व विद्यापीठांतून विद्यार्थ्यांची चळवळ सुरू झाली. सक्तीच्या सैन्यभरतीच्या विरोधात हा उठाव होता. लढाईवरून परतलेल्या अमेरिकन तरुणांनी नव्या, डाव्या व प्रागतिक चळवळींत भाग घेतला. या युद्धाविरोधी वातावरणात जॉन्सन यांनी उत्तर व्हिएटनामवरील बाँबहल्ले थांबवले व वाटाघाटी सुरू केल्या पण त्यांतून फारसे काही निष्पन्न झाले नाही. जॉन्सन यांनी १९६८ ची अध्यक्षीय निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली. १९६८ च्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रिचर्ड निक्सन आपण व्हिएटनाम युद्ध समाप्त करू, या आश्वासनाच्या बळावर निवडून आले. युद्धाची व्याप्ती १९६९ नंतर वाढली. ग्रामीण भागात प्रबळ असणाऱ्या व्हिएटकाँग सैनिकांनी शहरांची नाकेबंदी करावयास सुरुवात केली. व्हिएटकाँगला शस्त्रास्त्रे व सैनिक पुरविणारे तळ कंबोडियात आहेत. त्यामुळे ही रसद तोडण्यासाठी कंबोडियासारख्या तटस्थ राष्ट्रात सैन्य घुसविण्याचा अमेरिकेने निर्णय घेतला. तेथील सेनाप्रमुख मार्शल लॉन नॉल याने कंबोडियातील राजकुमार सिंहनूक यांचे तटस्थ सरकार उलथवून सत्ता बळकावली. मार्च १९७० मध्ये कम्युनिस्ट तळ उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकी सैन्य कंबोडियात घुसले. लाओस व कंबोडियातील तटस्थ राजवटी कोसळल्या व संपूर्ण इंडोचायनात लष्करी हालचाली करावयास व्हिएटकाँग सैनिकांना संधी मिळाली. या काळात अमेरिकेने आपले सैन्य मोठ्या प्रमाणावर मागे घेतले होते. अमेरिकेने उत्तर व्हिएटनामच्या हायफाँग व इतर बंदरांभोवती सुरुंग पेरले आणि उत्तर व्हिएटनाम व कंबोडियावर तुफान बाँबफेक केली पण त्याचा अमेरिकेला लष्करी दृष्ट्या फारसा फायदा झाला नाही.
दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे बदल होत होते. १९६३-६४ पासून चीन व सोव्हिएट संघ यांत मतभेद निर्माण झाले. सोव्हिएट संघाची सामाजिक साम्राज्यवादी म्हणून चीनने संभावना केली. १९६९ साली दोन्ही देशांतील सैन्यात चकमकी सुरू झाल्या. उत्तर व्हिएटनामला दोघांचाही पाठिंबा होता पण व्हिएटनामचे सरकार सोव्हिएट संघाकडे अधिक झुकू लागले. १९७१ नंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री किसिंजर यांच्या पुढाकाराने चीन व अमेरिका यांच्यातील संबंध सुधारले. १९७३ मध्ये राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी चीनला भेट दिली. या सर्वांचा परिणाम म्हणून अमेरिका व उत्तर व्हिएटनाम यांच्यात चर्चा सुरू झाली. शेवटी जानेवारी १९७३ मध्ये पॅरिस येथे शांतता करार झाला. या करारानुसार अमेरिकेने आपले सैन्य व्हिएटनाममधून मागे घ्यावे आणि दक्षिण व्हिएटनामचे भवितव्य स्वयंनिर्णयाच्या तत्वानुसार तेथील लोकांनी ठरवावे, असे ठरले. या अत्यंत अटीतटीच्या राजकीय मुत्सद्देगिरीच्या युद्धात उत्तर व्हिएटनामने बाजी मारली. यद्धाच्या या दुसऱ्या टप्प्याच्या अखेरीस त्याच्या भावी अंतिम पर्यवसानाची दिशा स्पष्ट झाली.
व्हिएटनाम युद्धाचा तिसरा टप्पा १९७३ पासून सुरू झाला. दक्षिण व्हिएटनामचे सरकार वाचविण्यासाठी अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप करू नये, म्हणून अमेरिकी काँग्रेसने राष्ट्राध्यक्षांच्या सैनिकी वापरावरच्या अधिकारावर बंदी घातली. सैन्याच्या वापरासाठी काँग्रेसची पूर्वसंमती आवश्यक करण्यात आली. सुमारे वर्षभराच्या तयारीनंतर मार्च १९७५ मध्ये व्हिएटकाँग सैन्याने द. व्हिएटनाममधील आक्रमणास सुरुवात केली. शेवटी दक्षिण व्हिएटनामच्या सैन्याने ३० एप्रिल १९७५ रोजी शरणागती पत्करली आणि दक्षिण व उत्तर व्हिएटनाम एकत्र आले. कंबोडियात ख्मेर राउज आणि लाओसमध्ये पॅथेट लाओ पक्ष सत्तेवर आले. अशा प्रकारे व्हिएटनाम, कंबोडिया व लाओस हे तिन्ही देश कम्युनिस्टांच्या ताब्यात गेले.
व्हिएटनाम युद्धात पाच लाख अमेरिकी सैनिकांनी भाग घेतला. त्यांपैकी सु. ५६,५५५ सैनिक या युद्धात मारले गेले आणि ३,०३,६७४ सैनिक जखमी झाले. दक्षिण व्हिएटनामचे सु. दोन लाख सैनिक मारले गेले. उत्तर व्हिएटनाम आणि व्हिएटकाँगचे लाखो जवान मारले गेले. लाखो निरपराध नागरिक जखमी झाले आणि असंख्य लोक निर्वासित झाले. अमेरिकी हवाई हल्ल्यामुळे उत्तर व्हिएटनामचे प्रचंड आर्थिक नुकसानही झाले.
व्हिएटनाम युद्धात साधनसामग्री, तंत्रज्ञान व शस्त्रास्त्रे यांच्या दृष्टीने वरचढ असणाऱ्या अमेरिकेचा गनिमी काव्याने लढणार्याम व्हिएटनामी सैन्याने पराभव केला. अमेरिकी सैनिकांना व्हिएटनामचा भूभाग परिचित नव्हता. व्हिएटनामची जनता अमेरिकेच्या विरोधात होती आणि जागतिक लोकमत व अमेरिकेतील लोकमत या युद्धात विरोधात गेले. दक्षिण व्हिएटनामी फौजांचे मनोधैर्य ढासळलेले होते. त्यामुळे अमेरिकेला पराभव पत्करावा लागला. या युद्धात अमेरिकेने लढाऊ विमानदळ, हेलिकॉप्टर्स, नापाम बाँब यांचा वापर केला. युद्धशास्त्रातील अनेक नवी तंत्रेही वापरली पण त्यांस यश मिळाले नाही. या युद्धात अमेरिकेने अनेक चुका केल्या. हो-चि-मिन्ह यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व व व्हिएटनाममधील राष्ट्रीय मुक्तीलढ्याचे स्वरूप त्यांनी लक्षात घेतले नाही. तसेच आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीतील नव्याने निर्माण झालेले अंतर्विरोध समजावून घेतले नाहीत. दक्षिण व्हिएटनाममधील लोकद्रोही, प्रतिगामी व जुलमी लष्करशहांना अमेरिकेने पाठिंबा दिला. त्यामुळे अमेरिकेने दक्षिण व्हिएटनाममधील जनतेची सहानुभूती गमावली. व्हिएटकाँग सैन्य हे स्वत:च्या देशामध्ये गनिमी काव्याने लढणारे व राष्ट्रप्रेमाने भारलेले असे असलेले सैन्य होते. त्यांचे मनोधैर्य वरच्या दर्जाचे होते. अशा प्रकारच्या सैन्याचा पराभव करणे अवघड असते. व्हिएटनामच्या एकीकरणामुळे संपूर्ण आग्नेय आशिया कम्युनिस्टांच्या ताब्यात जाईल, अशी भीती अमेरिकेला वाटत होती. ती अनाठायी ठरली कारण पुढे चार-पाच वर्षांतच चीन व व्हिएटनाम यांच्यात लष्करी संघर्ष सुरू झाला. कंबोडियात सत्तापालट झाला. अमेरिकेचे व्हिएटनामविषयक धोरण चुकीच्या गृहीतकावर आधारलेले होते, हे यावरून स्पष्ट होते.
संदर्भ : 1. Arnett, Peter Maclear, Michael, The Ten Thousand Day War: Vietnam, 1945-1975, New York, 1981.
2. Bowman, John S. Ed. The World Almanac of the Vietnam War, New York, 1986.
3. Chavan, R. S. Vietnam-Trail and Triumph, New Delhi, 1987.
4. Singh, Lalita Prasad, Power Politics and South East Asia, Delhi, 1979.
चौसाळकर, अशोक