व्हालेरी, पॉल : (३० ऑक्टोबर १८७१ – २० जुलै १९४५). श्रेष्ठ फ्रेंच कवी, निबंधकार आणि समीक्षक. सेत येथे जन्म. त्याचे वडील तेथे सीमाशुल्क अधिकारी होते. माँपेल्ये येथे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्याला कवितेत आणि वास्तुकलेत स्वारस्य निर्माण झाले. ह्याच सुमारास प्येअर ल्वी आणि ⇨ आंद्रे झीद ह्या साहित्यिकांशी तसेच विख्यात फ्रेंच प्रतीकवादी कवी ⇨ स्तेफान मालार्मे ह्याच्याशी त्याचा परिचय झाल. विशेषत: मालार्मेच्या कवितेचा त्याच्यावर गाढ प्रभाव पडला. १८९२ मध्ये तो पॅरिसला आला. पॅरिसमधील त्याच्या आरंभीच्या काही कवितांवर प्रतीकवादी चळवळीचा – विशेषत: मालार्मेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. पुढे त्याने काव्यलेखनाकडे पाठ फिरविली आणि आपल्या विचारप्रक्रियेत मनाचे कार्य कसे चालते, यासंबंधीचे संशोधन हाती घेतले. रोज सकाळी लवकर उठून आपले विचार कसे वाहतात, कशी वळणे घेतात, हे तो नोंदवीत असे. यांतून ज्या नोंदवह्या तयार झाल्या, त्या पुढे ले काय्ये (१९५७-६१) ह्या नावाने प्रसिद्ध झाल्या. कवितालेखन सोडून दिल्यानंतर व्हालेरीने लिहिलेले दोन लहान गद्यग्रंथ म्हणजे इंट्रोडक्शन टू द मेथड ऑफ लिओनार्दो दा व्हिंची (१८९५, इं.भा. १९२९) आणि ॲन ईव्हनिंग विथ मस्यर तेस्ते (१८९६, इं.भा. १९२९) हे होत. ‘मस्यर तेस्ते’ ही केवळ बुद्धिजीवी अशा माणसांची व्यक्तिरेखा आहे. हे दोन्ही ग्रंथ लिहिताना काही तात्त्विक प्रश्नांनी व्हालेरीचे मन झपाटलेले दिसते. प्रतिभेचे आणि सर्जनप्रक्रियेचे स्वरूप कलेच्या संदर्भात कलावंताच्या भावना आणि बुद्धी ह्यांचे महत्त्वमापन कसे करावे, यांसारखे ते प्रश्न होते. ह्या प्रश्नांचा प्रभाव व्हालेरीच्या नंतरच्या लेखनावरही आढळून येतो. १९१२-१३ च्या सुमारास आंद्रे झीदच्या प्रेरणेने व्हालेरीच्या काही संस्कारित कविता आल्बँ द व्हॅर झांसियां- १८९०-१९०० (१९२०, इं.शी. द अल्बम ऑफ अर्ली व्हर्स) ह्या नावाने प्रसिद्ध झाल्या. या निमित्ताने व्हालेरी पुन्हा काव्यलेखनाकडे वळला. त्यातूनच त्याची ला जन पार्क (१९१७, इं.शी. द यंग फेट) ही सुंदर काव्यकृती निर्माण झाली. ही एक दीर्घ, काहीशी अवघड, गूढ, प्रतिकात्मक आणि नाट्यात्मक एकभाषिताच्या स्वरूपाची अशी कविता आहे. हे एकभाषित एका अमर्त्य स्त्रीच्या तोंडी दिलेले आहे. परस्परविरोधी इच्छांच्या ताणामधून स्वत:पुढेच जे प्रश्न उभे राहातात – उदा., एक अमर्त्य म्हणून आपले शांत, तणावहीन अस्तित्व जपावे, की मर्त्य मानवांचे सुखदु:खानी भरलेले जिणे पत्करावे? – त्यांचा वेदनामय अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न ह्या कवितेत दिसून येतो. शरीराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी मनाची धडपड, अशा दृष्टीनेही ह्या कवितेचा अर्थ लावला जातो. तिच्यात काही आत्मचरित्रात्मक संदर्भही आहेत, असे म्हटले जाते. एकीकडे शांत, चिंतनशील जीवन जगण्याची इच्छा आणि दुसरीकडे कृतिशील आयुष्याबद्दल वाटणारी ओढ, ह्यांतून मानवी मनात उभा राहणारा संघर्ष आणि त्याचे ताण हा विषय व्हालेरीच्या लेखनात विविध रूपे धारण करून अनेकदा येत राहिलेला दिसतो. लिओनार्दो दा व्हिंचीवर लिहिताना, तसेच त्याच्या स्वत:च्या नोंदवह्यांमध्ये मानवी मनाच्या अनंत अंत:शक्ती, कृतींच्या अनंत शक्यता आणि प्रत्यक्ष मानवी कृतींची अपूर्णता ह्यांच्यातील तफावत त्याने पुन:पुन्हा व्यक्त केली आहे. आपल्या सार्वजनिक जीवनातील अटळ ताण आणि एकांताची व्यक्तिगत आवड ह्यांतून होणाऱ्या मनस्तापाबद्दल व्हालेरीने आपल्या अनेक व्यक्तिगत पत्रांतही लिहिले आहे. ‘द यंग फेट’ पूर्ण करावयास त्याला काही वर्षे लागली. तथापि ती प्रसिद्ध झाल्यानंतर व्हालेरीला श्रेष्ठ कवी म्हणून त्वरित मान्यता आणि कीर्ती प्राप्त झाली.
ह्यानंतरच्या व्हालेरीच्या काव्यकृतींमध्ये ‘ल् सिमतियॅर मारँ’ (१९४६, इं.भा. ‘द ग्रेव्हयार्ड बाय द सी’) ह्या कवितेचा समावेश होतो. ही कविता म्हणजे मृत्यूवरील कवीचे स्वगतच होय. सेत ह्या व्हालेरीच्या जन्मभूमीतील एका उंच पहाडाच्या टोकाशी एक दफनभूमी, वर निरभ्र आकाशात तळपणाऱ्या दुपारच्या सूर्याचे छप्पर, तिथून दिसणारा समुद्र, शून्याशी एकरूप होऊन शांत झालेले मृतात्मे येथील दफनभूमीत आहेत आणि जे जिवंत आहेत, ते निष्क्रिय चिंतनात मग्न आहेत. कवितेच्या अखेरीस कवीची जीवनेच्छा वाऱ्याच्या स्पर्शाने जागृत होते. त्याची ही कविता शार्म उ पोएम (१९२२) ह्या संग्रहात अंतर्भूत आहे. १९२२ नंतर व्हालेरीने विशेष उल्लेखनीय असे काव्यलेखन केले नाही.
व्हालेरीचे चिंतनशील गद्यलेखन विविध विषयांवर आहे. उदा., साहित्यिक आणि साहित्य, तत्त्वज्ञ व भाषा इत्यादी. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वैचारिकतेचा ठसा ललित कलांविषयक लेखनावर आहे. मनाचे कार्य कसे चालते, हे समजून घेण्याच्या दृष्टीने त्याने गणित, भौतिकी, मानसशास्त्र यांचाही अभ्यास केला.
फ्रान्सच्या युद्ध-कार्यालयात आणि फ्रेंच प्रेस असोसिएशनमध्ये व्हालेरीने नोकरी केली. १९२२ साली ती नोकरी संपली, तेव्हा सामाजिक जीवनात त्याला मोठे स्थान प्राप्त झाले होते. १९२५ साली फ्रेंच अकादमीवर त्याची निवड झाली. कॉलॅज द फ्रांसमध्ये खास त्याच्यासाठी कवितेचे अध्यासन निर्माण करून त्यावर त्याची नियुक्ती करण्यात आली (१९३७).
पॅरिस येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ: 1. Berne-Joffroy, A. Paul Valery, Paris, 1960.
2. Grubbs, Henry A. Paul Valery, New York, 1968.
3. Hytier, Jean, La Poetique de Valery, Trans. The Poetics of Paul Valery, New York, 1966.
4. Ince, W.N. The Poetic Theory of Paul Valery Inspiration and Technique, London, 1970.
5. Matthews, Jackson, Ed. The Collected Works of Paul Valery, New York, 1956.
6. Scarfe, F. The Art of Paul Valery, London, 1954.
7. Sewell, Elizabeth, Paul Valery: The Mind in the Mirror, New York, 1952.
कुलकर्णी, अ. र.