व्हालाख, ओटो : (२७ मार्च १८४७–२६ फेब्रुवारी १९३१). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. कापूर, सुगंधी द्रव्ये आणि बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारी) तेले यांच्या रासायनिक संघटनावरील त्यांचे संशोधन प्रसिद्ध आहे. नैसर्गिक सुगंधी तेलांचे विश्लेषण केल्याबद्दल त्यांना १९१० सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले.

व्हालाख यांचा जन्म केनिग्झबर्ग येथे झाला. त्यांचे शिक्षण पॉटसडॅम जिम्नॅशियम येथे झाले. १८६७ मध्ये त्यांनी गटिंगेन विद्यापीठात प्रवेश घेतला आणि टोल्यूइन श्रेणीतील संयुगाची समघटकता (रासायनिक संघटन तेच, पण संरचना भिन्न असण्याचा अविष्कार) या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविली (१८६९). १८७६ साली बॉन विद्यापीठात ते प्राध्यापक झाले. पुढे गटिंगेन विद्यापीठातील केमिकल इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून त्यांनी दीर्घ काळ काम केले (१८८९-१९१५).

व्हालाख यांना बॉन विद्यापीठातील एका कपाटात वनस्पतीज बाष्पनशील तेलांच्या अनेक बाटल्या आढळल्या. या बाटल्या ⇨ फ्रीडिख आउगुस्ट केकूले यांनी जमा केल्या होत्या. ही तेले औषधीनिर्मितीत वापरीत असत. यातूनच व्हालाख यांना सुगंधी बाष्पनशील तेलांचे संशोधन करण्याची प्रेरणा लाभली. या विषयातील आपले प्रगतीपर संशोधन त्यांनी अनेक निबंधांतून प्रसिद्ध केले.

व्हालाख यांच्या काळापर्यंत नैसर्गिक मिश्रणांतून खऱ्या अर्थाने शुद्ध संयुगे मिळविता आली नव्हती आणि ज्या पदार्थांना शुद्ध म्हटले जात होते, त्यांना विविध नावे देण्यात आली होती. व्हालाख यांनी पुन:पुन्हा ⇨ ऊर्ध्वपातन करून जटिल मिश्रणांचे घटक अलग केले. या घटकांच्या भौतिकीय गुणधर्माचे अध्ययन करून त्यांनी एकमेकांशी अगदी साम्य असलेल्या संयुगांमधील फरक ओळखले. व्हालाख यांनी आठ शुद्ध टर्पिनांमधील फरक ओळखला आणि ही संयुगे पाच कार्बन अणूंचे भाग म्हणजे आयसोप्रीन या घटकांनी बनलेली आहेत असे दाखवून दिले. यांतील अनेकांच्या बाबतीत संहत (प्रमाण अधिक असलेल्या) अम्लांची क्रिया आणि उच्च तापमान यांच्या साहाय्याने एका टर्पिनाचे दुसऱ्या रूपांतर करणे शक्य असते हेही स्पष्ट केले.

व्हालाख यांना विशेषत: विविध संयुगांमधील संबंधाविषयी कुतूहल होते परंतु नवीन पदार्थ तयार करण्यामध्ये अजिबात रस नव्हता. त्यांनी आपल्या संयुगांचे संश्लेषण करणॆ (घटक द्रव्यांपासून निर्मिती) व संरचना निश्चित करणे, ही कामे इतर सहकार्यां कडे सोपविली. १८९५ साली त्यांनी व त्यांच्या सहकार्यांरनी ∝ – टर्पेनिऑल या संयुगाची संरचना निश्चित केली आणि टर्पिन श्रेणीतील सर्व संयुगांची संरचना निश्चित केली आणि टर्पिन श्रेणीतील सर्व संयुगांची संरचना एकाच वेळी सिद्ध झाली. व्हालाख यांच्या संशोधनामुळे आधुनिक सुगंधी द्रव्य उद्योगाचा पाया घातला गेला व टर्पिन रसायनशास्त्र ही कार्बनी रसायनशास्त्राची महत्त्वाची शाखा ठरली. [→ टर्पिने ].

व्हालाख अनेक विद्यापीठांचे आणि शास्त्रीय संस्थांचे सन्माननीय सदस्य होते. गटिंगेन येथे त्यांचे निधन झाले.

सूर्यवंशी, वि. ल.