व्हॅलेंशिया-१ : स्पेनमधील लोकसंख्येनुसार तिसऱ्या क्रमांकाचे शहर, सागरी बंदर तसेच याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या ७,३९,४१२ (१९९८). भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर पूर्व स्पेनच्या तुरीआ नदीमुखापासून आत पाच किमी. अंतरावर हे वसलेले आहे. येथून बॅलीॲरिक बेटांबरोबर सागरी व विमान वाहतूक चालते.इ.स.पू. १३८ मध्ये येथे रोमन सैनिकी वसाहत होती. रोमनांनी केलेली येथील गोलाकार तटबंदी १८७१ मध्ये पाडण्यात आली. इ.स. ४१३ मध्ये व्हिसीगॉथ लोकांनी, तर ७१४ मध्ये मूर लोकांनी ही वसाहत ताब्यात घेतली. आठव्या शतकात कॉर्दोव्हा येथील खिलाफतीच्या ताब्यात हे शहर होते. इ.स. १०२१ मध्ये स्वतंत्र मूर राज्याची ही राजधानी बनली. सतराव्या शतकापर्यंत या वसाहतीची भरभराट झाली. पुढे मात्र व्हॅलेंशियाचे महत्त्व कमी होऊ लागले. व्यापारात पारंगत असणाऱ्या मूर लोकांना १६०९ मध्ये हद्दपार करण्यात आले. स्पेनमधील सत्ता स्पर्धेत ऑस्ट्रियाच्या चार्ल्स राजाची बाजू घेतल्याबद्दल दंडात्मक कारवाई या रूपाने या शहराचे विशेष हक्क काढून घेण्यात आले (१७०७). नेपोलियनच्या काळात १८१२ मध्ये मार्शल लुईस सचेटने शहराचा ताबा घेतला. जून १८१३ मध्ये व्हॅलेंशिया फ्रेंच आधिपत्यापासून मुक्त झाले. स्पॅनिश यादवी युद्धकाळात (१९३६-३९) व्हॅलेंशिया प्रजासत्ताकीय शासनाची राजधानी येथे होती.
व्हॅलेंशिया हे एक महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी केंद्र आहे. हे फळबागांच्या परिसरात वसलेले आहे. शेतमालाच्या उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यांचा व्यापार येथे केला जातो. त्यात धान्य, पीठ, तंबाखू, द्राक्षांची दारू, लिंबूवर्गीय फळे व कांदा यांचा समावेश आहे. रेशीम, रंगीत फरशा व कौले, रसायने, कापड, धातूच्या वस्तू, मातीची भांडी यांचेही उत्पादन येथे होते. याशिवाय सिमेंट, लाकडी सामान, वाद्ये, काच, कागद, खेळणी, सुगंधी द्रव्ये व सौंदर्य प्रसाधने ही येथील इतर महत्त्वाची उत्पादने होत. पूर्व स्पेनमधील हे एक महत्त्वाचे लोहमार्ग केंद्र तसेच प्रमुख बंदर आहे. येथून संत्री, द्राक्षे व इतर फळे, कांदे, तांदूळ व भाजीपाला तसेच लाकडी सामान, झिलईयुक्त फरशा व मृत्तिकाशिल्पे, पंखे, कापड व लोखंडी वस्तू इत्यादींची निऱ्या केली जाते.
जुने व्हॅलेंशिया तुरिआ नदीच्या दक्षिण तीरावर दाटीवाटीने वसले होते. त्यावर मूर लोकांचा प्रभाव अधिक होता. शहराची नवीन वस्ती नदीच्या दोन्ही तीरांवर पसरली आहे. नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. तेथे मूरिश शैलीत बांधलेल्या पांढऱ्या रंगातील घरांच्या रांगा, तसेच बाराव्या शतकापासूनच्या अनेक सार्वजनिक इमारती अजूनही आढळतात. प्राचीन तटबंदीचे टॉरेस दे सेरॅनोस हे प्रवेशद्वार (१२३८) तसेच टॉरेस दे क्वार्ते हे दुसरे प्राचीन प्रवेशद्वार प्रसिद्ध आहे.
प्राचीन नगराच्या मध्यभागी तेराव्या शतकातील ला सेओ हे कॅथीड्रल असून त्यात अनेक वास्तुशैलींची वैशिष्ट्ये आढळून येतात. कॅथीड्रलच्या तीन प्रवेशद्वारांपैकी एक रोमन, दुसरे बरोक तर तिसरे गॉथिक शैलीतील आहे. शंभर घंटायुक्त मनो-यांचे शहर म्हणून व्हॅलेंशिया ओळखले जाते. कॅथीड्रललगतच मीगेलेट (मिकालेट) हा गॉथिक शैलीतील मनोरा प्रसिद्ध आहे. इतरही इतिहासकालीन चर्चवास्तू येथे आहेत. येथील ललित कलाविषयक प्रांतीय वस्तुसंग्रहालय विशेष प्रसिद्ध आहे. व्हिवेरॅस, गलोरिएटा इ. बागा व वनस्पतिउद्याने शहरात आढळतात. आसमंतातही अनेक सुंदर बागा व उद्याने आहेत. व्हॅलेंशियाचे हवामान उत्साहवर्धक असल्याने वर्षभर पर्यटक या भागात येत असतात. जुलै व मे महिन्यात येथे मोठे उत्सव भरतात. येथील व्हॅलेंशिया विद्यापीठ प्रसिद्ध आहे.
चौधरी, वसंत