व्हांट-हॉफ, याकोबस हेंड्रीकस : (३० ऑगस्ट १८५२-१ मार्च १९११). डच भौतिकीय रसायनशास्त्रज्ञ. रासायनिक विक्रियेची गती, रासायनिक समतोल आणि तर्षण दाब [→ तर्षण] यांसंबंधी केलेल्या कार्याबद्दल त्यांना १९०१ सालचे रसायनशास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक मिळाले.
व्हांट-हॉफ यांचा जन्म रॉटरडॅम (नेदर्लंड्स) येथे झाला. डेल्फ्ट, लायडन, बॉन व पॅरिस येथील शिक्षणांनंतर १८७४ मध्ये त्यांनी उत्रेक्त विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी संपादन केली. ते उत्रेक्त येथील पशुवैद्यकीय विद्यालयात भौतिकीचे अधिव्याख्याते (१८७६), ॲम्स्टरडॅम विद्यापीठात रसायनशास्त्र, खनिजविज्ञान व भूविज्ञान या विषयांचे प्राध्यापक (१८७७-९५) आणि बर्लिन येथील प्रूसियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसमध्ये (१८९६-१९११) अखेरपर्यंत संशोधन प्राध्यापक होते.
योहान्नेस व्हिस्लीत्सेनुस यांनी लॅक्टिक अम्लासंबंधी केलेल्या कार्याच्या निष्कर्षावरून १८७४ मध्ये व्हांट-हॉफ यांनी कार्बन अणूचे चार संयुजा बंध अवकाशात सुसम चतुष्फलकाच्या चार कोपरांच्या दिशांना बहुतकरून असतात असे दाखविले. या संकल्पनेमुळे असममित (चार भिन्न मूलके किंवा अणू बंधांद्वारे जोडलेल्या) कार्बन अणूबरोबर नेहमी आढळणाऱ्या प्रकाशीय ध्रुवण घूर्णकता या गुणधर्माचे [→ ध्रुवणमिति ] लगेच स्पष्टीकरण देता आले. ही संकल्पना कार्बनी संयुगांच्या त्रिमितीय संरचना अभ्यासात अत्यंत महत्त्वाची ठरली. या सिद्धांताच्या आधारे ⇨ त्रिमितीय रसायनशास्त्राचा पाया घातला गेला.
व्हांट-हॉफ यांच्या Ansichten uber die organischen chemie (१८७७) या ग्रंथामध्ये रासायनिक ऊष्मागतिकी व आसक्ती यासंबंधीचे वर्णन आहे. त्यांनी Etudes de dynamique chimique (१८८४ स्टडीज इन केमिकल डायनॅमिक्स ) यामध्ये रासायनिक गतिविज्ञान विषयक तत्त्वाचा विकास केला रासायनिक विक्रियेची श्रेणी ठरविणाऱ्या नवीन पद्धतीचे वर्णन केले आणि रासायनिक समतोलांना ऊष्मागतिकीचे नियम लावले. त्यांनी रासायनिक गतिविज्ञानाचा नियम व्हांट-हॉफ आयसोकोअर (सममात्रीय) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणितीय समीकरणाने [स्थिर दाबाला रासायनिक विक्रियेच्या उष्णतेच्या रूपात वायूच्या विक्रियेच्या समतोल स्थिरांकात (k) तापमानानुसार (T) होणाऱ्या बदलासंबंधीच्या समीकरणाने → ऊष्मारसायनशास्त्र तर्षण] स्पष्ट केला आणि रासायनिक विक्रियेचा समतोल स्थिरांक व तापमान यांच्यातील संबंधाचे अनुमान केले. त्यांनी रासायनिक विक्रियेच्या परिणामामुळे घडून येणारे जास्तीत जास्त कार्य म्हणजेच रासायनिक आसक्ती (मुक्त उर्जा) या आधुनिक संकल्पनेची ओळख करून दिली आणि तिचे भौतिकीय मापनांनी [तर्षण दाब (विरघळलेल्या पदार्थाच्या रेणूंच्या गतीमुळे निर्माण होणारा दाब), वायुदाब व विद्युत मंडलात विद्युत प्रवाह वाहून नेण्यास कारणीभूत असणारी प्रेरणा) यांचे मापन करून] गणन करता येऊ शकते, असे दाखविले. हिचा वापर रासायनिक विक्रियेच्या दिशेचे भाकीत करण्यासाठी होऊ शकतो. [→ रासायनिक विक्रिया].
व्हांट-हॉफ यांनी १८८६ मध्ये, विरघळणाऱ्या पदार्थाचे प्रमाण कमी असणाऱ्या विरल विद्रावासंबंधी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित केले. त्यांनी विरल विद्राव आणि वायू यांच्या गुणधर्मातील साम्य दाखविले, कारण विरल विद्रावातील द्रव्ये परिपूर्ण वायूंचेच स्थितीदर्शक नियम (PV = RT या प्रकारच्या समीकरणांनी दर्शविले जाणारे नियम) पाळतात. नंतर नऊ वर्षे (१८९५ पर्यंत) त्यांनी ⇨ स्वांटे ऑगस्ट अऱ्हेनियस यांच्या विद्युत विश्लेष्यी विगमन सिद्धांतावर (जो पदार्थ योग्य अशा द्रवात विरघळविल्यास त्यातून विद्युत भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयन यांच्या प्रत्यक्ष गमनाद्वारे विद्युत प्रवाह वाहू शकतो अशा पदार्थातील विद्युत संवाहकतेविषयीच्या सिद्धांतावर) काम केले व त्याचा विकास केला.
व्हांट-हॉफ यांनी १८८६ साली श्टासफुर्ट (जर्मनी) येथील लवण साठ्यांसंबंधी केलेल्या सुरुवातीच्या अन्वेषणामुळे जर्मनीतील रासायनिक उद्योगाला मोठी मदत झाली. बर्लिन येथे ते मरण पावले.
सूर्यवंशी, वि. ल.