लिप्सकोंब, विल्यम नन : (९ डिसेंबर १९१९- ). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९७६ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते. बोरेन ( बोरॉन व हायड्रोजन यांची संयुगे) या संयुगांच्या रासायनिक संरचनेचा व त्यांमधील दोन अणू एकमेकांना जोडणाऱ्या बंधक यंत्रणेचा शोध लावल्याबद्दल त्यांना वरील पोरितोषिक मिळाले.

लिप्सकोंब यांचा जन्म क्लिरव्हलँड, ओहायओ येथे झाला. त्यांनी १९४१ साली केंटकी विद्यापीठातून बी.एस्. व १९४६ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पीएच्.डी. या पदव्या संपादन केल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी अमेरिकेच्या सायंटिफिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या कार्यालयात विश्लेषक म्हणून काम केले. १९५४-५५ मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात गुगेनहाइम फेलो म्हणून अध्ययन केले. ते मिनेसोटा विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक (१९४६-५०), सहप्राध्यापक (१९५०-५४), कार्यकारी प्रमुख (१९५२-५४), प्राध्यापक आणि प्रमुख (१९५४-५९) होते. ते हार्व्हर्ड विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक (१९५९- ) आणि गिब्ज प्रयोगशाळेत रसायनशास्त्राचे ॲबट व जेम्स लॉरेन्स प्राध्यापक (१९७१- ) आहेत. १९६२-६५ मध्ये ते हार्व्हर्ड विद्यापीठात रसायनशास्त्र विभागाचे अध्यक्ष होते.

लिप्सकोंब यांनी बोरॉन आणि हायड्रोजन यांची संयुगे असलेल्या बोरेनांवर संशोधन करून रेणुमधील अणू एकमेकांशी कशा प्रकारे बंधित (जोडलेले) असतात यासंबधी मूलभूत शोध लावला. फार पूर्वीपासून रसायनशास्त्रात कार्बन आणि हायड्रोजन यांची संयुगे असलेल्या हायड्रोकार्बनांमध्ये बंधाची एकच संकल्पना सुचविलेली होती. त्या संकल्पनेप्रमाणे प्रत्येक अणूंची जोडी इलेक्ट्रॉनांच्या जोडीने बंधित असते. या संकल्पनेद्वारे बोरेन संयुगांची स्थिरता स्पष्ट करणे शक्य नव्हते कारण त्यांमध्ये आवश्यक इलेक्ट्रॉनांची कमतरता असते. लिप्सकोंब यांनी अशा रेणूंच्या संरचनेसंबंधी केलेल्या सैध्दांतिक विश्लेषणाने त्यांमध्ये ‘त्रिकेंद्री बंध’ आढळून येतात, हे सिद्ध झाले. तसेच अशा संयुगांमध्ये बहुकेंद्री बंध असू शकतील, असे त्यांनी प्रतिपादिले. त्यांनी इलेक्ट्रॉनांची जोडी तीन अणूंमध्ये कशा प्रकारे भाग घेते हे दाखवून दिले.

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे अध्ययन करीत असताना लिप्सकोंब यांना बोरेन रसायनशास्त्रासंबंधी आवड निर्माण झाली. मिनेसोटा विद्यापीठात असताना त्यांनी रेणवीय संरचनांचे स्पष्टीकरण देण्याकरिता क्ष-किरण विवर्तन तंत्राचा वापर केला. बोरेनांच्या अस्थिर व उडून जाण्याच्या गुणधर्मामुळे त्यांची निर्वातात हाताळणी करणे व नीच तापमान निर्माण करणे आवश्यक झाले. सुरुवातीला त्यांना त्रिमितीय भूमितीय संरचनेचा गोंधळ निर्माण होतो हे आढळून आले व रूढ सिध्दांत बोरेन संयुगांना लागू पडत नसल्याचे माहीत झाले. त्यांनी पिंजरा सदृश रेणूंची संरचना असलेल्या रसायनशास्त्राचा विकास करण्यावर भर दिला. लिप्सकोंब यांच्या सिध्दांताच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी दोन बोरॉन अणू एका हायड्रोजन अणूशी इलेक्ट्रॉनांच्या एका जोडीने जोडले जाऊ शकतात, अशी कल्पना होती. ही संकल्पना बोरेनांमधील बंधांच्या सिध्दांताच्या विकासाला उपयुक्त ठरली. त्यामुळे माहीत असलेल्या संरचनांचे केवळ स्पष्टीकरण मिळत नसून नवीन संयुगांची भाकिते करणेसुद्धा शक्य झाले. व्यावहारिक उपयुक्ततेच्या दृष्टीने लिप्सकोंब यांचे कार्य अतिउष्मादायी आणि रासायनिक स्थैर्य असलेल्या संयुगांच्या विविध द्रव्यांचे संश्लेषण करण्यास मार्गदर्शक ठरले. तसेच मेंदूच्या कर्करोगावरील प्रारण चिकित्सेकरिता प्रायोगिक स्तरावर उपयोगी असलेली संयुगे तयार करण्यास उपयुक्त ठरले.

लिप्सकोंब यांची १९६० साली अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस आणि १९६१ साली नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थांवर निवड झाली. ते अनेक देशी व परदेशी संस्थांचे सदस्य आहेत. १९५५ साली ते अमेरिकन क्रिस्टलोग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांना लाँग आयलंड विद्यापीठ (१९७७), रटगर्स विद्यापीठ (१९७९), गस्टाव्हस ॲडॉल्फस कॉलेज (१९८०) व मॅरीएट कॉलेज या शिक्षण संस्थानी सन्माननीय डी. एस्सी पदवी दिली. त्यांना रसायनशास्त्रातील हॅरिसन हौ पुरस्कार (१९५८), अकार्बनी रसायनशास्त्रातील प्रगती केलेल्या विशेष सेवाकार्याबद्दल अमेरिकन केमिकल सोसायटीचा पुरस्कार (१९६८), हार्व्हर्ड विद्यापीठाचे लिड्ली पारितोषिक (१९७१), भौतिकीय रसायनशास्त्रातील पीटर डेबाय पुरस्कार (१९७३), कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विशेष ॲल्यूम्नी पुरस्कार (१९७७), अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ पुरस्कार (ॲलेक्झांडर फोन हंबोल्ट-स्टिफटंग, १९७९) इ. सन्मान मिळाले.

लिप्सकोंब यांनी बोरॉन हायड्राइड्स (१९६३) आणि न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्टडीज ऑफ बोरॉन अँड रिलेटेड कंपाउंड्स (जी. आर्. ईटन यांच्याबरोबर, १९६९) हे ग्रंथ लिहिले. तसेच त्यांनी एंझाइमांच्या संरचना व कार्य यांवर आणि अकार्बनी रसायनशास्त्र  व सैद्धांतिक रसायनशास्त्र यांतील नैसर्गिक उत्पादित वस्तूंवर अनेक शोध निबंध लिहिले आहेत.

सूर्यवंशी, वि. ल.