बूटेनांट, आडोल्फ फीड्रिख योहान : (२४ मार्च १९०३-), जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ. लिंग-हॉर्मोने [जनन ग्रंथीमध्ये निर्माण होणारे उत्तेजक स्त्राव ⟶ ] हॉर्मोने वेगळी करून त्यांचे तपशीलवार अध्ययन त्यांनी केले. लिंग-हॉर्मोनांविषयीच्या संशोधनाबद्दल त्यांना आणि पॉलिमिथिलीन व उच्चटर्पिनांसंबंधीच्यासंशोधनासाठी ⇨ लेओपोल्ट रुझीच्का यांना १९३९सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले तथापि नाझी सरकारने ते स्वीकारण्यास बूटेनांट यांना मनाई केली होती.

बूटेनांट यांचा जन्म ब्रेमर हेबेन-लेहे (जर्मनी) येथे व शिक्षण मारबुर्ख व गटिंगेन विद्यापीठांत झाले (१९२१-२७). ⇨ आडोल्फ व्हिन्डाउस यांच्या मार्गदर्शनाखाली रोटेनॉन या कीटकनाशकावर संशोधन करून त्यांनी पीएच.डी. पदवी मिळविली (१९२७). १९३० साली ते गटिंगेन विद्यापीठातील कार्बनी व जीवरासायनिक प्रयोगशाळेचे प्रमुख झाले. १९३३ साली ते कार्बनी रसायनशास्त्रीय इन्स्टिट्यूट (इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डॅनझिंग) येथे सहप्राध्यापक झाले. १९३५ साली ते रॉकफेलर प्रतिष्ठानाच्या निमंत्रणावरून अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडाला गेले होते. ही त्यांची भेट पुढील संशोधनाच्या दृष्टीने मोलाची ठरली. कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिटयूटचे व १४४९ नंतरच्या माक्स प्लांक इन्स्टिटयूट ऑफ बायोकेमिस्ट्रीचे ते संचालक होते(१९३६-६०). १९६० साली माक्स प्लांक सोसायटी फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणी १९७२ साली ते याच सोसायटीचे मानसेवी अध्यक्ष झाले. बर्लिन विद्यापीठात मानसेवी प्राध्यापक (१९३६-४५), तसेच ट्यूबिंगेन (१९४५-५६) व म्यूनिक (१९५६) विद्यपीठांत शरीर क्रियावैज्ञानिक रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

स्त्रीच्या गर्भाशयाच्या वाढीस व मासिक स्त्राव वेळच्या वेळी होण्यास कारणीभूत असणारे इस्ट्रोन (जुने नाव फॉलिक्युलीन) हे स्त्रीलिंग-हॉर्मोन बूटेनांट यांनी गर्भवती स्त्रियांच्या मूत्रापासून स्फटिक रूपात स्वतंत्रपणे मिळविले (१९२९). या स्त्री-लिंग-हॉर्मोनाप्रमाणेच पुरुषाच्या लैंगिक वाढीस कारणीभूत असणारे हॉर्मोन पुरुषांच्या मूत्रापासून मिळाले पाहिजे या कल्पनेने त्यांनी संशोधन केले व १७,००० लिटर मूत्रापासून १५ मिग्रॅ. एवढे ॲड्रोस्टेरॉन हे पुरुष-लिंग-हॉर्मोन मिळविले (१९३१). स्त्रियांच्या जनन चक्रात महत्वाचे कार्य करणारे प्रोजेस्टेरॉन वा प्रगर्भरक्षी हे हॉर्मोन त्यांनी १९३१साली वेगळे केले व १९३४साली ते शुद्ध रूपात मिळविले. त्यांनी या तिन्ही हॉर्मोनांच्या रासायनिक संरचनेचा अभ्यास केला. या तिन्हींचे एकमेकांशी असलेले जवळचे संबंध आणि स्टेरॉइडातील त्यांचे स्थान त्यांनी शोधून काढले [⟶ स्टेरॉल व स्टेरॉइडे] . बूटेनांट यांच्या व संशोधनामुळे औषधोपयोगी असे महत्वाचे पदार्थ बनविणे शक्य झाले. उदा., संधिवात अथवा सर्वसाधारण शक्तिक्षय यांसारख्या क्लेशकारक रोगांवर गुणकारी व हॉर्मोनासारखी संरचना असलेले कॉर्टिसोन हे औषध.

एकेकटे जीन (गुणसूत्रामधील म्हणजे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या घटकांमधील आनुवंशिक घटकांची एकके) हे विशिष्ट एंझाइमांच्या [जीवरासायनिक विक्रियांना मदत करणाऱ्या प्रथिनांच्या ⟶ एंझाइमे] जैव संश्लेषणास (जटिल-गुंतागुंतीची रचना असलेल्या-रेणूंच्या सजीवात होणाऱ्या निर्मितीला) कारणीभूत असतात, हे त्यांनी स्वतंत्रपणे दाखवून दिले. याकरिता त्यांनी कीटकाच्या डोळयातील रंगद्रव्याचे जैव संश्लेषण हे विशिष्ट जीनांमुळे कसे होते, ते शोधून काढले. १९५३ साली बूटेनांट व पीटर कार्लसन यांना कीटकातील पहिले स्फटिकरुप हॉर्मोन वेगळे करण्यात यश आले. हे हॉर्मोन कोलेस्टेरॉलाचे अनुजात (त्यापासून बनविलेल्या दुसऱ्या संयुगासारखे) असून ते वरील लिंग-हॉर्मोनांशी निगडित असल्याचेही दिसून आले. १९५९ साली बूटेनांट व ई. हेकर यांना बाँबिक्स मोरी या रेशमाच्या किड्याच्या मादीपासून बाँबिकॉल हे फेरोमोन [प्राण्याच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या व त्याच जातीच्या प्राण्यांच्या वर्तनावर-येथे लैंगिक प्रलोभक म्हणून परिणाम करणारे ⟶ फेरोमोने] वेगळे करण्यात यश मिळाले व तेव्हापासून फेरोमोनांच्या संशोधनास प्रारंभ झाला. बूटेनांट यांना व्हायरसांच्या व कर्करोगास कारणीभूत होणाऱ्या पदार्थांच्या संशोधनाविषयीही आस्था आहे.

जमदाडे, ज.वि, घाटे, रा.वि.