विद्युत् रसायनशास्त्र : विद्युत् प्रवाहाद्वारे होणाऱ्या रासायनिक विक्रिया, तसेच ज्या प्रक्रियांमध्ये  वीजनिर्मितीसाठी रासायनिक विक्रियांचा ऊर्जास्त्रोत म्हणून वापर होतो. अशा प्रक्रिया यांच्याशी निगडीत असलेल्या अभ्यासाला विद्युत् रसायनशास्त्र म्हणतात. अशा प्रकारे रसायनशास्त्राच्या या शाखेत विद्युत् व रासायनिक ऊर्जामधील परस्परंसंबंधाचा अभ्यास केला जातो. 

औद्योगिक दृष्टीने उपयुक्त असलेल्या विविध क्षेत्रांशी विद्युत् रसायनशास्त्राचा संबंध येतो. वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीनेही ही शाखा महत्त्वाची असून हिचा संबंध अनेक विशेष क्षेत्रांशी येतो. उदा., प्रकाशविद्युत् रसायनशास्त्रात विजनिर्मिती व रासायनिक बदल यांसाठी प्रकाश ही ऊर्जा वापरतात. जीवविद्युत् रसायशास्त्रात सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या विद्युत् रासायनिक प्रक्रियांचे अध्ययन करतात. ⇨विद्युत् गतिकी, ⇨ विद्युत् तर्ष, ⇨विद्युत् संचारण इ. विद्युतीय आविष्कार विद्युत् रसायनशास्त्राशी निगडीत आहेत. 

इंधन-विद्युत् घट, विद्युत् तापन, विद्युत् धातुविज्ञान, विद्युत् रासायनिक श्रेणी विलेपन इ. विद्युत् रसायनशास्त्राशी संबंधित असलेल्या विषयांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत.  

इतिहास : स्थिर विद्युत् आविष्कार माहीत होता, तरी धन व ऋण या दोन प्रकारचे स्थिर विद्युत् भार असतात. हे १७३४ साली प्रथम लक्षात आले. आलेरसांद्री व्होल्टा यांनी व्यवहारात वापरता येईल अशी विद्युत् घटमाला १८०० साली बनविली, तीमुळे अखंड विद्युत् प्रवाह प्रथमच उपलब्ध झाला.परिणामी रासायनिक द्रव्यांतून पुरेसा विद्युत् प्रवाह पाठविणे शक्य झाले. १८०० सालीच सर हंफ्री डेव्ही यांनी विद्युत् रासायनिक प्रयोग मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरूवात केली.त्यांनी पोटॅशियम धातू मिळविण्यासाठी विद्युत् प्रवाह वापरला (१८०७). नंतर याच रीतीने अनेक नवीन मूलद्रव्यांचा  शोध लागला व ती मिळवता आली. 

द्रव्यामधून पाठविलेली विजेची राशी व त्याच्यामुळे झालेल्या रासायनिक बदलांचे प्रमाण यांच्यामधील परिणात्मक (राश्यात्मक) संबंधाचा अभ्यास सर्वप्रथम मायकेल फॅराडे यांनी केला. १८३२ साली त्यांनी शोधलेला पहिला नियम हा सर्व प्रकारच्या विद्युत् विच्छेदन क्रियांचा आधार आहे. या नियमानुसार विद्युत् रासायनिक अपटनाचे (रेणूचे घटक भागांमध्ये तुकडे होण्याच्या क्रियेचे) प्रमाण हे विद्युत् प्रवाह व तो वाहत असण्याचा काळ यांच्या गुणाकाराच्या (म्हणजे विद्युत् अग्रांदरम्यान गेलेल्या एकूण ‘विद्युत् भारा’च्या) प्रमाणात असते. १९३३ साली त्यांनी दुसरा नियम शोधून काढला. त्यानुसार निरनिराळ्या विद्युत् घटांमध्ये एकाच मूल्याचा विद्युत् प्रवाहाने निक्षेपित होणाऱ्या (साचणाऱ्या) द्रव्यांची वजने ही त्या द्रव्यांच्या रासायनिक सममूल्य भारांच्या प्रमाणात असतात. इलेक्ट्रोलिसिस (विद्युत् विच्छेदन), इलेक्ट्रोलाइट (विद्युत् विच्छेद्य), ॲनोड (धनाग्र), कॅथोड (ऋणाग्र), ॲनायन ( धनायन), कॅटायन (ऋणायन) या पारिभाषिक संज्ञा फॅराडे यांनी प्रथम वापरल्या.

थिओडोर फोन ग्रोथस यांनी विद्युत् विच्छेद्य हे धन व ऋण कणांचे बनलेले असते, असे १८०६ साली सुचविले होते तर विद्युत् विच्छेद्यातील कणांवर धन व ऋण विद्युत् भार असतो. असे  फॅराडे यांनी गृहीत धरले होते. अशा विद्युत् भारित कणंना (अणू, रेणू अथवा अनुगट यांना) यांनी आयन (भटकणारे) हे नाव दिले (उदा., ऋणाग्राकडे जाणारा वा तेथे विक्रीया करणारा धन विद्युत् भारित कॅटायन व धनाग्राकडे जाणारा किंवा तेथे विक्रित्या करणारा ऋण विद्युत् भारित ॲनायन). विद्युत् धन व विद्युत् ऋण भागांच्या संयोगाने सर्व संयुगे बनतात. असा सिद्धांत यन्स याकॉप बर्झोलियस यांनी १८३५ च्या सुमारास मांडला. एखाद्या संयुगाचे अपघटन करण्यासाठी विजेचा प्रवाह वापरल्यास होणारी विक्रीया ही रासायनिक संयोगाच्या क्रियेच्या उलटी असते. रेणूचे धन व ऋण विद्युत् भारित भाग अशा प्रकारे जोडलेले असतात की, विशिष्ट परिस्थितीमध्ये ते अलग होऊ शकतात. व यामुळे अल्पकाळ टिकणारे आयन निर्माण होतात, असे रूडॉल्फ क्लॉसियस यांनी सुचविले होते(१८५७).

स्वांटे ऑगस्ट अऱ्हेनियस यांनी १८८३-८७ दरम्यान विद्रावात संयुगांच्या होणाऱ्या आयनीभवनाविषयीचा परिणात्मक सिद्धांत मांडला. त्यामुळे विद्युत् रासायनिक आविष्कारांतील घटनांचे स्पष्टीकरण देता आले. भौतिक रसायनशास्त्रातील हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत असून विद्युत् रसायनशास्त्राच्या प्रगतीमधील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

पेट्रस डेबाय व एर्न्स्ट हकल यांनी १९२३ च्या सुमारास एक सिद्धांत मांडला. त्यामुळे विद्युत् विच्छेद्यांच्या विद्रावाच्या गुणधर्माविषयीच्या परिमाणात्मक माहितीत भर पडली. विद्रवामधील विरूद्ध विद्युत् भरांच्या आयनांमधील आंतरक्रिया घडवून आणणाऱ्या आकर्षण प्रेरणेचे महत्त्वाचे परिणाम होतात आणि साध्या, सरळ सिद्धांताच्या आधारे या परिणामांविषयीचे  गणित करता येते, असे या दोघांनी दाखविले.

धातू, अर्धसंवाहक (ज्यांची विद्युत् संवाहकता धातू व विद्युत् निरोधक पदार्थ यांच्या दरम्यानची असते असे पदार्थ) आणि वायू यांच्यामधील विद्युत् संवहन हा भौतिकीचा एक भाग मानतात. विद्युत् रसानशास्त्रातील काही महत्त्वाच्या बाबींचे विवरण थोडक्यात पुढे दिले आहे.

गॅल्व्हानिक (चल विद्युत्) घट : सामान्यपणे यांना विद्युत् घटमाला असे म्हणतात. विद्युत् ऊर्जा निर्माण करण्याच्या दृष्टीने पुष्कळ रासायनिक विक्रियांची मांडणी करणे शक्य असते. यासाठी विक्रीयेचे भौतिकीय रीतीने दोन अर्ध्या विक्रियांमध्ये (अर्ध्या भागांमध्ये) अलगीकरण करतात. यांपैकी एक अर्धी–विक्रिया घटाचे ऋण टोक असलेल्या विद्युत् अग्राला इलेक्ट्रॉन पुरविते, तर दुसरी अर्धीविक्रिया घटाच्या धन टोकामधून इलेक्ट्रॉन काढून घेते. उदा., मोटारगाडीतील शिसे-विद्युत् घटमालेत  

Pb  So 4 2-⟶PbSo 4 2 e-…   … (१)  

या अर्ध्या-विक्रियेने ऋण टोकाला इलेक्ट्रॉन पुरविले जातात. यामुळे धातूरूप शिशाचे ऑक्सिडीभवन (इलेक्ट्रॉन बाहेर टाकले जाण्याची क्रिया) होऊन लेड सल्फेट बनते. धन टोकाशी  

2e PbO2 4H  So4 2- ⟶ PbSo4 2H2 O … (2)

ही विक्रिया हौते व लेड डाय-ऑक्साइडाचे क्षपण (इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्रिया) होऊन लेड सल्फेट तयार होते.  


विद्युत् घटाबाहेरच्या मंडलात ऋण टोकाकडून धन टोकाकडे इलेक्ट्रॉन आणि इष्ट विद्युत् मिळतो. याच्या उलट दिशेने विद्युत् प्रवाह पाठवून या घटमोलेचे विद्युत् भारण करतात. यावेळी वरील दोन अर्ध्या–विक्रिया उलट दिशेत होऊन शिसे व लेड डाय-ऑक्साइड यांच्या रूपात विद्युत् ऊर्जा साठविली जाते. अशा घटमालेला द्वितीयक अथवा संचायक विद्युत् घटमाला म्हणतात. लक्लांशे विद्युत् घट व शुष्क विद्युत् घट हे प्राथमिक विद्युत् घट असून त्यांचे पुन्हा विद्युत् भारण करता येत नाही. लक्लांशे घटात जस्ताचे ऑक्सीडीभवन व कार्बन विद्युत् अग्रापाशी मॅँगॅनीज डाय-ऑक्साइडाचे क्षपण होऊन विद्युत् ऊर्जा निर्माण होते. झिंक क्लोराइड, अमोनियम क्लोराईड व कार्बनाची पूड यांचे ओलसर मिश्रण हे या विद्युत् घटातील विद्युत् विच्छेद्य असते. [⟶विद्युत् घट].

इंधन-विद्युत् घटात अखंडपणे वीजनिर्मीती होईल अशी व्यवस्था केलेली असते. भिन्न विद्युत् अग्रांपाशी ऑक्सडीकारण व क्षपणकारक यांचा वापर होऊन अशी अंखड वीजनिर्मीती होते. क्षारीय (अल्कधर्मी) विद्युत् विच्छेद्य असलेला हायड्रोजन–ऑक्सिजन (किंवा हवा) घट हा सर्वांत सामान्य असलेला इंधन-विद्युत् घट आहे. हायड्रोकार्बन-ऑक्सिजन, कार्बन मोनॉक्साइड–ऑक्सीजन, लिथियमक्लोरीन, सोडियम-गंधक इ. अनेक इंधन-विद्युत् घट सुचविले आहेत.[⟶इंधन –विद्युत् घट].

विद्युत् निक्षेपण : विद्युत् प्रवाहाच्या घडवून आणण्यात येणारी ही सर्वांत महत्त्वाची रासायनिक विक्रिया आहे. या विक्रियेत विद्रावातील धातूच्या आयनापासून ऋणाग्रापाशी धातूचे निक्षेपण होते. या पद्धतीने चांदी, कॅडमियम, निकेल, क्रोमियम इ. पुष्कळ धातूंचा मुलमा देता येतो. वस्तूचा पृष्टभाग शोभिवंत करण्यासाठी किंवा त्याचे संरक्षण करण्यासाठी असा मुलमा देतात. धातूंच्या वितळलेल्या लवणांमधून ॲल्युमिनियम, सोडियम, मॅग्नेशियम यांसारख्या क्रियाशील धातूंचे, तसेच धातूंच्या संयुगांच्या पाण्यातील विद्रावांमधून तांबे, मँगॅनिज, अँटिमनी यांसारख्या धातूंचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन करण्यासाठी विद्युत् रासायनिक निष्कर्षण वापरतात. चांदी, तांबे, शिसे. इ. धातूच्या शुद्धीकरणासाठी विद्युत् परिष्करण ही प्रक्रिया वापरतात. या प्रक्रियेत अशुद्ध धातू. धनाग्र म्हणून वापरतात. आणि शुद्ध धातु ऋणाग्रावर साचते.[⟶ विद्युत् धातुविज्ञान विद्युत् विलेपन].

विद्युत् विच्छेदन प्रक्रिया : ही एक विद्युत् रासायनिक प्रक्रियाआहे. विद्युत् विच्छेद हे विद्युत् संवाहक असते. विद्युत् विच्छेद्य असलेल्या पात्रात दोन विद्युत् अग्रे त्यांच्यातून विद्युत् प्रवाह पाठविल्यास विद्युत् विच्छेद्याचे त्याच्या घटकांत तुकडे होतात. अशा रीतीने विद्युत् ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होऊन ती ऊर्जा या घटकांत साठविली जाते. विद्युत् विच्छेदनाचा उपयोग उद्योगधंद्यांत व वैज्ञानिक अध्ययनात होतो. उदा., मिठवणीचे विद्युत् विच्छेदन केल्यास धनाग्रापाशी क्लोरीन, तर ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू आणि विद्युत् विच्छेद्यात सोडियम हायड्रॉक्साइड म्हणजे दाहक (कॉस्टिक) सोडा ही द्रव्ये निर्माण होतात. यामुळे ही एक महत्त्वाची औद्योगिक प्रक्रिया आहे. विद्युत् विच्छेदनाने पुष्कळ कार्बनी संयुगे व धातू यांचे उत्पादन करतात, तसेच पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू तयार करण्यासाठी विद्युत् विच्छेदन वापरतात. विद्युत् विलेपन, विद्युत् परिष्करण दृष्टींनीही विद्युत् विच्छेदन प्रक्रिया महत्त्वाची आहे.

रासायनिक विश्लेषणात विद्युत् विच्चेदनाचा व्यापक प्रमाणावर उपयोग होतो. ज्याचे वजन करावयाचे आहे ते द्रव्य विद्युत् विच्छेदनाने सहजपणे वजन करता येण्यासारख्या रूपात विद्युत् अग्रावर निक्षेपित करतात. उदा., धातु शुद्ध रूपात ऋणाग्रावर निक्षेपित करतात अथवा ऋणाग्राच्या रूपात असलेल्या पाऱ्याबरोबर त्या धातूची मिश्रधातू (पादरमेल) तयार करतात. शिसे व मँगॅनिज या धातूत्यांच्या पेरॉक्साइडांच्या रूपात धनाग्रांवर निक्षेपित करतात, तसेच चांदी हे धनाग्र वापरून चांदीचे क्लोराइड, ब्रोमाइड अथवा आयोडाइड मिळवून क्लोरिनाचे ब्रोमिनाचे किंवा आयोडिनचे  मापन करतात. [⟶ विद्युत् विच्छेदन].

विद्युत् तापनशास्त्र : अगदी काटेकोरपणे पाहिल्यास याला विद्युत् रसायनशास्त्रातील शाखा म्हणता योणार नाही. मात्र सर्वसाधारण रूढ अर्ताने हि विद्युत् रसायनशास्त्राचा एक भाग मानतात. सामान्यपणे विजेच्या प्रज्योत किंवा रोधक भट्ट्यांमधील उच्च तापमान निर्माण करणाऱ्या प्रक्रिया यात येतात.  या भट्ट्यांचे अभिकल्प (आराखाडे) वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या भट्यांत विद्युत् तापीय विक्रीयांद्वारे उष्णता निर्माण होते. ही उष्णता रासायनिक विक्रिया घडवून आणण्यासाठी वापरतात. या रीतीने कार्बोरंडम, कॅल्शियम कार्बाइड, कार्बन डाय-सल्फाइड, अँथ्रॅसाइटापासून ग्रॅफाइट, बिडापासून पोलाद निर्माण करतात. बहुतेक फॉस्फरस विद्युत् प्रज्योत भट्टीत निर्माण होते. [⟶ विद्युत् तापन, विद्युत् भट्टी].

विद्युत् वैश्लेषिक रसायनशास्त्र: रासायनिक विश्लेषणाच्या प्रक्रियांमध्ये रासायनिक प्रकारची पुष्कळ मापने वापरता येतात. ज्या विद्युत् अग्राच्या वर्चसांची मापने रासायनिक विश्लेषणात वापरतात, अशी काही विद्युत् अग्रे पुढील होत : ⇨पीएच मूल्य मोजण्यासाठी काचेचे विद्युत् अग्र विशिष्ट आयनासाठी आयन-विवेचक विद्युत् अग्रे (उदा., सोडियम वा पोटॅशियम आयनांसाठी खास संघटनाच्या काचेचे विद्युत् अग्र कॅल्शियम आयनांसाठी द्रव पटलाचे विद्युत् अग्र आणि फ्ल्युओराइड आयनांसाठी इष्ट अशुद्धी समाविष्ट केलेल्या लँथॅनम फ्ल्युओराइडाच्या सुट्या स्फटिकांचे विद्युत् अग्र). [⟶ वैश्लेषिक रसायनशास्त्र].  


गंजणे : विद्युत् रसायनशास्त्राच्या अभ्यासामुळे गंजण्याच्या क्रियेवर (संक्षारणावर) चांगलाच प्रकाश पडला आहे. धातू व पर्यावरण यांच्यामधील किंवा धातूत असलेल्या विविध कणांमधील परस्परक्रियांना संक्षारण म्हणतात. संक्षारण ही सामान्यपणे विद्युत् रासायनिक विक्रिया असून हिच्यात ऑक्सिडीभवन व क्षपण या क्रियांचा संबंध  येतो.

धातूत असणाऱ्या अशुद्धीमुळे एक प्रकारचे संक्षारण होते. या अशुद्धी विद्युत् कार्य करतात व त्यामुळे विद्युत् घटासारखी स्थानिक क्रिया सुरू होऊन संक्षारण होते. उदा., जस्ताच्या पत्र्यात तांबे किंवा कार्बन यांचे कण ह्या अशुद्धी असतात. अशा पत्र्यावर विद्युत् विच्छेद्यासारखे कार्य करू शकणारा विद्राव पसरला, तर पत्र्यातील अशुद्धीचा प्रत्येक कण हा ऋणात जस्त हे धनाग्र होते. परिणामी विद्युत् घटाप्रमाणे स्थानिक क्रिया सुरू होऊन गंजण्याची क्रिया होते. यामुळे पत्र्यावर खळगे पडतात वा सर्वत्र एकसारखे संक्षारण होते.

अगदी शुद्ध धातूच्या पृष्ठभागावर हवेतील ऑक्सीजन रेणू विषम प्रमाणास शोषले गेले, तरी संक्षारण होते. धातूच्या अशा पृष्ठभागावर बाष्पाचा अम्लीय थर असल्यास ऑक्सिजनाच्या रेणूंत ईलेक्ट्रॉन समाविष्ट होऊन आयन बनतात. मग धातु-हवा विद्युत् घटाप्रमाणे क्रिया होऊन संक्षारण होते.

तांबे व लोखंड यासारख्या असमान धातूंच्या जोडाच्या ठिकाणी अथवा अशा धातू एकमेंकींशी विद्युतीय रीतीने जोडलेल्या असतात. तेथे विद्युत् रासायनिक युग्म तयार गंजण्याची क्रिया सुरू होते. पाण्याच्या नळांमार्फत ⇨भूयोजन केलेल्या ठिकाणी  असा  जोड असतो. या ठिकाणी नळ विद्युत् अग्राप्रमाणे कार्य करतात. त्यांच्यातील रेणूतून हळूहळू इलेक्ट्रिक निघून जाऊन ते आयन होतात म्हणून या सांध्याच्या जागी संक्षारण होते.

धातूमधील काही अशुद्धींमुळे विद्युत् रासायनिक क्रियेद्वारे गंजण्याची गती वाढते, उलट काही लेशमात्र अशुद्धींमुळे ही गती कमी होते. अशा प्रकारे मिश्र धातू बनवून गंजण्याचे प्रमाण कमी होते.

‘ऋणाग्री संरक्षणा’नेही गंजण्याचे प्रमाण कमी करता येते. याकरिता बलिदान करणारे धनाग्र वापरतात. जिचे संरक्षण करावयाचे असते ती धातू या धनाग्राला विद्युतीय जोडतात. संक्षारण होताना हे धनाग्र वापरले जाऊन नष्ट होते. अशा रीतीने धातूचे संरक्षण होते. वायूच्या किंवा पाण्याच्या भूमिगत नळांच्या संरक्षणासाठी हे तंत्र वापरतात. [⟶गंजणे].

संकीर्ण अविष्कार : पाण्याचे निर्लवणीकरण व विद्युत् अपोहन (मिश्रणातील घटक अलग करण्याची क्रिया ⟶ अपोहन) या क्रियांच्या बाबतीत नैसर्गिक किंवा कृत्रिम अर्धपारगम्य पटलांमधून (विशिष्ट रेणू आरपार जाऊ शकणाऱ्या पडद्यांमधून) आयन विद्युत् रासायनिक दृष्ट्या आरपार जाण्याची क्रिया ही महत्त्वाची असते. मेंदूच्या विविध भागांदरम्यान  विद्युत् दाबात लायबद्ध चढ-उतार होत असतात यामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत् प्रवाहाच्या ओघाला ‘मस्तिष्क तरंग’ म्हणतात. तंत्रिका तंतूच्या (मज्जातंतूच्या) शरीर-रासायनिक बदलाला ‘तंत्रिका आवेग’ म्हणतात. तंत्रिका आवेगांचे प्रेषण व मस्तिष्क तरंगांसारख्या विद्युत् तरंगाची निर्मिती यांच्या मुळाशी विद्युत् रासायनिक विक्रिया असतात [⟶ तंत्रिका तंत्र विद्युत् मस्तिष्कालेखन]. रासायनिक दृष्टीने विक्रियाशील असलेल्या धातूंच्या पृष्टभागाची विक्रियाशीलता कमी करण्याच्या क्रियेला  

‘धातूंचे निष्कियीकरण’ म्हणतात. हा आविष्कारही विद्युत् रासायनिक स्वरूपांचा आहे.

उपयोग : उद्योगधंद्यांत विद्युत् रसायनशास्त्राचा निरनिराळ्या प्रकारांनी उपयोग होतो आणि हे उपयोग अतिशय महत्त्वाचे आहेत. ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, टिटॅनियम, तांबे, क्रोमियम, युरोनियम इ. अनेक धांतूचे उत्पादन व परिष्करण करण्यासाठी विद्युत् रासायनिक प्रक्रिया वापरतात. तसेच खते, रंजकद्रव्ये, औषधिद्रव्ये प्लॅस्टिके इ. रासायनिक द्रव्ये तयार करण्यासाठी विद्युत् रासायनिक विक्रियांचा उपयोग करतात. शिवाय विविध रासायनिक पदार्थाचे अलगीकरण, परिष्करण व संस्करण करण्यासाठीही विद्युत् रासायनिक प्रक्रिया वापरतात. विजेची बंदिस्त रूपातील साठवण करणाऱ्या विद्युत् घटमाला, तसेच इंधन-विद्युत् घट यांतही रसायनिकशास्त्राचा उपयोग होतो. विद्युत् घटमालांचा लष्करी व व्यापारी वापर वाढण्याची शक्यता असल्याने त्यांच्या संसोधनाकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. धातूचा मुलमा देण्यासाठी विद्युत् रसायनशास्त्राचा उपयोग होतो.

विद्राव व इतर रासायनिक प्रणालींचे विश्लेषण करताना परिमाणात्मक विद्युत् रासायनिक पद्धतींचे पुष्कळ उपयोग होतात. उदा., अतिशय कमी प्रमाणात असलेल्या आयनाचे विद्रावातील प्रमाण, तसेच विद्रावात विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण म्हणजे विद्रावाची संहती ठरविणे, ⇨अनुमापनात ⇨दर्शकाऐवजी विद्युत् प्रवाहमापक वापरणे वगैरे. सर्वसाधारण प्रकारच्या रासायनिक विश्लेषणाठीही विद्युत् रसायनशास्त्राचा उपयोग होतो. याकरिता प्लॅटिनमाच्या विद्युत् अग्रावर इष्ट धातू निक्षेपित करून मग तिचे वजन करतात. 

पहा : विद्युत् घट विद्युत् धातुविज्ञान विद्युत् विच्छेदन विद्युत् विलेपन. 

संदर्भ : 1. Bockris, J. O. Electrochemistry, New York, 1976.

           2. Crow D. R. Principles and Application of  Electrochemistry London,  1974.

           3. Hampel, C. A. Ed. Encyclopedia of Electrochemistry, New York.1964.

          4. Rand, D. and others Eds., Progress In  Electrochemistry, New York. 1982.

मोहिले, भा, वां. ठाकूर. अ.ना.