व्हाइल रोग : (लेप्टोस्पायरोसिस). आडोल्फ व्हाइल या जर्मन चिकित्सकांनी या प्राणिसंसर्गजन्य रोगाचे सविस्तर वर्णन प्रथम १८८६ साली प्रसिद्ध केले, म्हणून रोगाला हे नाव पडले. उंदरामध्ये व घुशींमध्ये परोपजीवी असलेल्या लेप्टोस्पायरा इक्टेरोहीमोऱ्हेजी या सर्पिल जंतूंमुळे या रोगाचे मानवात संक्रमण होते. ट्रेपोनेमाटेसिया कुलातील हे जंतू उपदंशाच्या (गरमीच्या) जंतूंसारखेच वलायाकृती किंवा सर्पिल, परंतु आकारमानाने थोडे लहान असतात. मैलानाल्यात किंवा इतरत्र सांडपाण्यात राहणाऱ्या घुशींच्या शरीरात असलेले हे जंतू त्यांच्या मूत्रावाटे बाहेर पडतात व त्यामुळे पाणी दूषित होते. या पाण्याच्या संपर्कामुळे अन्न-पाण्यावाटे किंवा पायाच्या त्वचेमधून माणसाला संसर्ग होऊ शकतो.

सुमारे एक आठवड्याच्या परिपाक (जंतुसंसर्गापासून ते रोगाची लक्षणे दिसण्यास लागणाऱ्या) कालानंतर अस्वस्थता, ताप, डोकेदुखी, उलट्या यांसारखी लक्षणे दिसू लागतात. त्यानंतर हळूहळू सौम्य कावीळ व त्वचेमधील रक्तस्राव ही मुख्य चिन्हे स्पष्ट होतात. त्वचेप्रमाणेच हिरड्या, नाक, जठर, फुप्फुस अशा विविध ठिकाणी रक्तस्राव होऊ शकतो. म्हणून या रोगाला रक्तस्रावी कावीळ किंवा रक्तस्रावी कावीळजनक तरल सर्पिल जंतुमयता असेही म्हणतात. सर्वसाधारणपणे याला लेप्टोस्पायरोसिस असे म्हटले जाते. रक्तामध्ये हे जंतू आढळत असल्याने रोगनिदानास मदत होते. एक-दोन आठवड्यांनी सर्व लक्षणे पूर्णपणे मावळून रोग्याला दोन-तीन दिवस बरे वाटते. त्यानंतर आयजीएम (IgM इम्युनोग्लोब्युलीन एम) ⇨ प्रतिपिंड रक्तात व मस्तिष्क–मेरुद्रवात [मस्तिष्क विवरात, तसेच जालतानिका व मृदुतानिका यांच्यामधील मोकळ्या जागांत भरलेल्या नितळ द्रवात → मेंदू मेरूरज्जू] येऊ लागतात. परिमस्तिष्कदाहासारखी (मेंदू व मेरुरज्जू यांच्या भोवतीच्या आवरणांच्या दाहासारखी) लक्षणे काही काळ आढळून नंतर रुग्ण बरा होतो. या अवस्थेपूर्वी उपचार न केल्यास १० ते १५ प्रतिशत रुग्णांमध्ये तांबड्या कोशिकांचे विघटन होऊन कावीळ, रक्तमूत्रता (मूत्रात रक्त वा रक्तपेशी असणे), वृक्काचे (मूत्रपिंडाचे) कार्य मंदावणे किंवा वृक्कनिष्फलता यांसारखा गंभीर उपद्रव निर्माण होऊन मृत्यू ओढवू शकतो.

पेनिसिलिनच्या शोधानंतर या रोगाची मारकता खूपच आटोक्यात आली आहे. लक्षणे दिसू लागताच या प्रतिजैव (अँटिबायॉटिक्स) औषधाची मोठी मात्रा (सु. २ ते २·५ ग्रॅम किंवा ४० लक्ष युनिट प्रतिदिनी) एक आठवडा देऊन रोगाचे संपूर्ण निरसन करता येते. एरिथ्रोमायसीन, टेट्रासायक्लीन यांसारखी इतर प्रतिजैव औषधेही उपयुक्त ठरतात.

व्हाइल रोग सफाई कामगार, खाणकामगार यांसारख्या घुशींशी संपर्क येणाऱ्या कर्मचाऱ्यां मध्ये मुख्यत्वे आढळतो. याच प्रकारचा पण सौम्य असा आजार कुत्री, डुकरे, गुरे यांच्यातील परोपजीवी सर्पिल जंतूंमुळेदेखील होऊ शकतो. त्यामुळे पशुवैद्यकीय कर्मचारी, ऊसकामगार, शेतमजूर, मासे व मांस विक्रेते यांनाही व्यवसायाच्या निमित्ताने हा धोका संभावतो. संरक्षक पादत्राणे आणि हातमोज्यांचा वापर, खाण्यापिण्याच्या बाबतीत आवश्यक ती स्वच्छता आणि घुशींचा नाश करणे यांसारख्या प्रतिबंधक उपायांनी रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो.

पहा : संसर्गजन्य रोग.

श्रोत्री, दि. शं.