व्हॅलादोलिड : स्पेनमधील याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या ३,१९,९४६ (१९९८). उत्तरमध्य स्पेनमध्ये, माद्रिदच्या उत्तर-वायव्येस २०० किमी. अंतरावर पिस्वेर्ग नदीच्या डाव्या तीरावर हे शहर वसलेले आहे. जवळच पिस्वेर्ग व डोरू (द्वेरू) या नद्यांचा संगम होतो.
प्राचीन काळातील हे एक रोमन नगर. इ.स. दहाव्या शतकात मूर लोकांकडून ख्रिश्चनांनी ते ताब्यात घेतले. कस्टीलियन राजघराण्यचे हे आवडते निवासस्थान होते. ॲरागॉनचे फर्दिनंद आणि कॅस्टीलची इझाबेला हे १४६९ मध्ये येथे विवाहबद्ध झाले. इटालियन समन्वेषक क्रिस्तोफर कोलंबसचे निधन येथेच झाले. (१५०६). सम्राट पाचवा चार्ल्स याचे वास्तव्य येथे असे. दुसऱ्या फिलीपचे हे जन्मस्थळ आहे. १६०० ते १६०६ या काळात हे कॅस्टीलियन राज्याचे, तसेच त्यानंतर स्पॅनिशांचे मुख्य ठाणे होते. १६०६ मध्ये राजधानी माद्रिदला हलविण्यात आली. तेव्हापासून व्हलादोलिड शहराचे महत्त्व कमी झाले. द्वीपकल्पीय युद्धात (१८०८-१४) शहरातील बऱ्याच इमारतींची नासधूस झाली. आज व्हॅलादोलिड हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र, तसेच आर्चबिशपच्या अधिकारातील एक प्रांत आहे.
अलीकडच्या काळात शहराचे वेगाने औद्योगिकरण झालेले दिसते. अन्नप्रक्रिया, अभियांत्रिकी उद्योग, यंत्रे, लोहमार्ग साहित्य, स्वयंचलित यंत्रे, वस्त्रोद्योग, रसायने, खते, मातीची भांडी, कागद, चामडे व सोन्या-चांदीच्या वस्तू, ब्राँझ व लोखंडी साहित्य तयार करणे. ॲल्युमिनियम उद्योग इ. व्यवसाय शहरात चालतात. येथील धान्यव्यापार मोठा आहे.
प्लाझा मेयर हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. कॅली दे सँटिआगो हा शहरातील गजबजलेला रस्ता. प्लाझाच्या पूर्वेस कॅथीड्रल, विद्यापीठ व सांताक्रूझ महाविद्यालय या प्रमुख वास्तू आहेत. कॅथीड्रलचे काम १५८० च्या दशकात सुरू झाले. त्याचा एकच मनोरा पूर्णत्वास गेला. विद्यापीठाच्या (स्था. १३४६) वास्तूचा वैशिष्ट्यपूर्ण दर्शनी भाग अठराव्या शतकातील आहे. सांताक्रूझ महाविद्यालयाची वास्तू पंधराव्या शतकातील प्लॅटरेस्क स्पॅनिश शैलीत बांधली आहे. सध्या त्यात संग्रहालय आहे. सॅन पाब्लो चर्च व सँता मारिया चर्च (बारावे-तेरावे शतक), सॅन ग्रेगोरिओ महाविद्यालय (पंधरावे शतक) व सोळाव्या शतकातील शाही राजप्रासाद या शहरातील इतर सुंदर वास्तू आहेत. स्पॅनिश कलेचा वारसा दाखविणाऱ्या रंगीबेरंगी लाकडी शिल्पकलेचे काही नमुने सॅन ग्रेगोरिओ महाविद्यालयात जतन करून ठेवलेले आहेत. येथे असलेल्या विद्यापीठाच्या समृद्ध ग्रंथालयात दुर्मिळ हस्तलिखिते जतन केलेली आहेत. कोलंबसचे निवासस्थान, थेरबांतेस याने त्याच्या जगप्रसिद्ध साहित्यकृतीच्या काही भागाचे लेखन जेथे केले, ते त्याचे निवासस्थान इत्यादी वास्तू जतन करण्यात आलेल्या आहेत.
चौधरी, वसंत