व्हॅटिकन : रोमन कॅथलिक पंथाचा सर्वोच्च धर्मप्रमुख पोप ह्याचे अधिकृत निवासस्थान. येशू ख्रिस्ताचा एक प्रमुख शिष्य ⇨ अपॉसल सेंट पीटर ह्याने जेथे हौतात्म्य स्वीकारले, त्या भूमीवर व्हॅटिकनची उभारणी करण्यात आली असून ते ⇨ व्हॅटिकन सिटीच्या केंद्रस्थानी आहे. ‘व्हॅटिकन फर्स्ट’ आणि ‘व्हॅटिकन सेकंड’ ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या रोमन कॅथलिक चर्चच्या दोन धर्मपरिषदा व्हॅटिकनमध्ये भरल्या होत्या. [→ रोमन कॅथलिक पंथ].
मुळात व्हॅटिकन हे नाव रोमजवळच्या एका टेकडीचे होते. टायबर नदीच्या उजव्या बाजूस असलेल्या ह्या टेकडीजवळच सेंट पीटरला हौतात्म्य प्राप्त झाले, असे म्हणतात. सेंट पीटरच्या थडग्यावर रोमन सम्राट कॉन्स्टंटीन द ग्रेट ह्याने बॅसिलिकाची उभारणी केली. बॅसिलिका आणि कॅथीड्रल हे दोन्ही चर्चचेच प्रकार असले, तरी बॅसिलिकाला पोपकडून काही विशेष अधिकार मिळालेले असतात. सेंट पीटर बॅसिलिकाला पावित्र्य प्रदान करण्याचा विधी इ. स. ३२६ मध्ये झाला. ह्या चर्चच्या एका बाजूस पोपचे निवासस्थान असल्याचा निर्देश इ. स. पाचव्या शतकात मिळतो. तथापि इ. स. १३७८ पासून पुढे व्हॅटिकन हे पोपचे स्थायी निवासस्थान बनले. पंधराव्या शतकापासून व्हॅटिकनमध्ये ‘व्हॅटिकन पॅलेस’ ह्या नावाने ओळखले जाणारे मोठे संकुल उभारण्यास प्रारंभ झाला. ह्या संकुलातील खोल्यांची संख्या एक हजाराच्या पेक्षा जास्त भरेल. त्यांपैकी बऱ्याचशा खोल्या ग्रंथालय आणि वस्तुसंग्रहालय म्हणून वापरल्या जातात. ह्या संकुलातील काही विशेष उल्लेखनीय दालने अशी : पेपल अपार्टमेंट्स, बोर्जा अपार्टमेंट्स, सिस्टाइन चॅपेल, रॅफेएल लॉगिआज, पायोक्लेमेंटाइन म्यूझीयम, चिआरामॉती म्यूझीयम, व्हॅटिकन ग्रंथालय आणि चित्रसज्जा. ह्या संकुलात मोठमोठ्या कलावंतांच्या कलाकृती पहावयास मिळातात. उदा., ‘सिस्टाइन चॅपेल’ मध्ये ⇨ मायकेल अँजेलोचे लास्ट जज्मेंट ह्या नावाने विख्यात असलेले चित्र आहे. ‘व्हॅटिकन ग्रंथालया’ त साठ हजारांहून अधिक हस्तलिखिते एक लाखावर उत्कीर्णने आणि नकाशे आणि सु. नऊ लाख ग्रंथ आहेत.
पोप दुसरा जूल्यस (१५०३-१३) ह्याने व्हॅटिकन म्यूझीयम सुरू केले. जगातल्या इतर कोणत्याही वस्तुसंग्रहालयापेक्षा येथील वस्तुसंग्रह मोठा आहे. ‘व्हॅटिकन अर्काइव्ह्ज’ ची स्थापना पोप पाचवा पॉल ह्याने १६१२ मध्ये केली. येथे चर्चच्या प्रशासनाशी संबंधित असलेले कायदे आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र ठेवलेले आहेत. पोप तेरावा लीओ ह्याने हे कागदपत्र जिज्ञासू अभ्यासकांना खुले केले. रोमन सम्राट कॉन्स्टंटीन द ग्रेट ह्याने बांधलेल्या सेंट पीटर बॅसिलिकाची कालौघात पडझड झाल्यानंतर इ. स. १५०६ पासून त्याचा जीर्णोध्दार करण्यात आला. त्यातूनच विद्यमान सेंट पीटर्स चर्च उभे राहिले. ह्या चर्चच्या उभारणीशी संबंधित असलेल्या महनीय व्यक्तींत ब्राबांते, ⇨ रॅफेएल, मायकेलअँजेलो आणि ⇨ जोव्हान्नी लोरेंत्सो बेर्नीनी ह्यांचा समावेश होतो. सेंट पीटर्स चर्च हे जगातले सर्वांत मोठे चर्च आहे. [→ सेंट पीटर्स चर्च].
व्हॅटिकन येथे रोमन कॅथलिक चर्चच्या दोन सर्वसाधारण धर्मपरिषदा (१८६९-७० व १९६२-६५) भरल्या. विवेकवाद, संशयवाद तसेच धर्मप्रवृत्तीच्या विरोधात जाणाऱ्या काही उदारमतवादी विचारसरणी ह्यांचा जोर वाढलेला असतानाच्या वातावरणात पहिली धर्मपरिषद भरली. परमेश्वरी साक्षात्कार, ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्व ह्यांसारख्या ख्रिस्ती धर्माच्या मूलतत्त्वांनाच विरोधी वातावरणामुळे धक्का पोहोचण्याची शक्यता विचारात घेऊन ह्या धर्मपरिषदेने त्याविरुद्ध आवाज उठविला. संपूर्ण चर्चचा आध्यात्मिक नेता आणि गुरू म्हणून पोप हा प्रमादरहितच असतो, असे प्रतिपादन ह्या धर्मपरिषदेत करण्यात आले. व्हॅटिकन येथील दुसरी धर्मपरिषद पोप तेविसावा जॉन ह्याने बोलावली होती आणि पोप सहावा पॉल ह्याच्या कारकिर्दीत ती चालू राहिली. ह्या धर्मपरिषदेत अधिकृतपणे भाग घेणाऱ्या २,५०० व्यक्तींमध्ये भारतातून आलेल्या व्यक्तींची संख्या ७८ होती आणि ह्या ७८ व्यक्तीपैकी ६ व्यक्ती महाराष्ट्रातून आलेल्या होत्या (मुंबईहून ३, पुण्याहून १, अमरावतीहून १ आणि नागपूरहून १). ख्रिस्ती धर्माची शिकवणूक आधुनिक मानवाशी संबद्ध करावी, ही भूमिका येथे मांडली गेली. चर्चच्या नूतनीकरणाचा हा विचार होता.
पहा : इटलीतील कला पोप पोपशासन रोम रोमन कॅथलिक पंथ व्हॅटिकन सिटी.
लेदर्ले, मॅथ्यू (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)