व्हर्‌माँट : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ईशान्येकडील न्यू इंग्लंड या विभागीय प्रदेशातील एक राज्य. विस्तार ४२० ४४’ ते ४५० १’ उ. अक्षांश व ७१० ३३’ ते ७३० २६’ प. रेखांश यांदरम्यान. क्षेत्रफळ २४,९०३ चौ. किमी. लोकसंख्या ५,९४,००० (१९९९ अंदाज). याच्या उत्तरेस कॅनडातील क्वीबेक प्रांत, पूर्वेस न्यू हँपशर, दक्षिणेस मॅसॅचूसेट्स तर पश्चिमेस न्यूयॉर्क ही राज्ये आहेत. राज्याची संपूर्ण पूर्व सरहद्द कनेक्टिकट नदीने सीमित केलेली असून वायव्येकडील सु. १६० किमी. लांबीची सरहद्द शांप्लँ सरोवरातून गेलेली आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या ‘ग्रीन मौंटन’ या पर्वतामुळे राज्याचे पूर्व-पश्चिम असे दोन भाग झाले आहेत. साम्यूएल द शांप्लँ याच्या नेतृत्वाखाली फ्रेंच समन्वेषक १६०९ मध्ये या प्रदेशात पोहोचले. त्यांनी व्हर्‌माँट ह्या नावाचा वापर केलेला असावा. माँटपील्यर (लोकसंख्या ८,२४७ – १९९०) ही देशातील राजधान्यांपैकी कमीत कमी लोकसंख्या असलेली व्हर्‌माँटची राजधानी होय.

भूवर्णन : पर्वतीय प्रदेश, नद्यांची खोरी व त्यांदरम्यानचे खंड यांचा सुरेख संयोग येथील प्राकृतिक रचनेत आढळतो. व्हर्‌माँटचा समुद्राशी प्रत्यक्ष संपर्क नसला, तरी राज्याला दक्षिणोत्तर असे दोन सुलभ जलमार्ग लाभले आहेत. राज्याच्या पश्चिमेस शांप्लँ सरोवर-हडसन नदी, तर पूर्वेस कनेक्टिकट नदी आहे. या खोऱ्याचा शेती व वाहतुकीला फायदा मिळाला आहे. या दोन द्रोणींच्या दरम्यान व्हर्‌माँटचे पर्वतीय प्रदेश आहेत. या राज्याचे पुढीलप्रमाणे प्रमुख पाच नैसर्गिक विभाग पडतात : (१) शांप्लँ व्हॅली, (२) टॅकॉनिक रांग, (३) ग्रीन मौंटन, (४) न्यू इंग्लंड अपलँड व (५) व्हाइट मौंटन.

व्हर्‌माँटच्या उत्तर-पश्चिम भागात शांप्लँ व्हॅली हा प्रदेश असून यातच शांप्लँ सरोवराचा समावेश होतो. उत्तरेस १३० किमी. अंतरावर असलेल्या सेंट लॉरेन्स नदीला हे सरोवर मिळालेले आहे. शांप्लँ व्हॅलीच्या दक्षिणेस, राज्याच्या पश्चिम सरहद्दीजवळ टॅकॉनिक डोंगररांग आहे. मॅसॅचूसेट्स राज्यातील याच नावाच्या रांगेचा हा विस्तारित भाग आहे. उत्तरेस कॅनडाच्या सरहद्दीपासून दक्षिणेस मॅसॅचूसेट्स राज्याच्या सरहद्दीपर्यंतचा या राज्याचा मध्यभाग ग्रीन मौंटन व न्यू इंग्लंड अपलँड या नैसर्गिक विभागांनी व्यापलेला आहे. ग्रीन मौंटन हा ऍपालॅचिअन पर्वतप्रणालीचाच भाग असून त्याने राज्याचा बहुतांश भाग व्यापलेला आहे. त्याची रुंदी ३२ ते ५८ किमी. आहे. वनूस्की व लमॉइल या नद्यांच्या खोल दऱ्यांचे भाग वगळता ही श्रेणी सलग आहे. हा प्रदेश हिरव्यागार वनश्रीने आच्छादलेला असून मॅन्सफील्ड (उंची १,३३९ मी.) हे राज्यातील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. ग्रीन मौंटनच्या पूर्वेस न्यू इंग्लंड अपलँड हा टेकड्यांचा प्रदेश आहे. पश्चिमेकडून त्याची उंची पूर्वेस कनेक्टिकट खोर्याजकडे कमीकमी होत जाते. व्हर्‌माँटच्या ईशान्य कोपर्याडत व्हाइट मौंटन प्रदेश असून न्यू हँपशरमधील याच नावाच्या पर्वताचा हा विस्तारित भाग आहे.

राज्याच्या मध्यभागी असलेला ग्रीन मौंटन हा प्रमुख जलविभाजक असल्यामुळे व्हर्‌माँटमधील बहुतांश नद्या या पर्वताच्या पूर्व उतारावरून कनेक्टिकट नदीकडे किंवा पश्चिम उतारावरून शांप्लँ सरोवराकडे वाहत जातात. लमॉइल, वनूस्की व मसिर्स्क्वाई या नद्या मात्र शांप्लँ सरोवराला मिळण्यापूर्वी विस्तृत प्रदेशातून पूर्व –पश्चिम दिशेत वाहत जातात. पूर्वेकडे कनेक्टिकट नदीला, वायव्येस सेंट लॉरेन्स नदीला आणि नैर्ऋत्येस हडसन नदीला मिळणाऱ्याअशा तीन नदीप्रणाल्या राज्यात आहेत. पूर्व सरहद्दीवरून वाहणारी कनेक्टिकटची मुख्य उपनदी आहे. ऑटर क्रीक ही पश्चिम भागातील दक्षिणोत्तर वाहणारी व शांप्लँ सरोवराला मिळणारी प्रमुख नदी आहे. उत्तरेकडील मेम्फ्रिमेगॉग, सीमोर, विलबी, ऍव्हरील व कॅस्पियन, पश्चिम मध्य भागातील बॉमझीन, डनमोर व सेंट कॅथरिन, पूर्व – मध्य सरहद्दीवरील मूरे व फेअरली ही राज्यातील हिमज सरोवरे आहेत. बॉमझीन हे पूर्णपणे राज्यात असणारे प्रमुख सरोवर आहे. माँटपील्यर, वॉटरबरी, ऍरोहेड व थेटफर्ड हे पूरनियंत्रणासाठी, तर व्हायटिंगहॅम, चितन्दन, मिल्टन व हाइड पार्क हे वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे जलाशय आहेत.

राज्याची फक्त १५ टक्के भूमी सखल व सुपीक आहे. वाळू, लोभ व हिमानी निक्षेपयुक्त निचरा होणारी मृदा राज्यात आढळते. येथील जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे गवत दुग्धव्यवसायास पोषक ठरले आहे.

पश्चिम व्हर्‌माँटमध्ये संगमरवर, बॅरीच्या सभोवती व ईशान्य भागात ग्रॅनाइट, फेअर हेवन व पोल्टनीजवळ चांगल्या प्रतीचा पाटीचा दगड तसेच ग्रीन मौंटनमध्ये ऍस्बेस्टस व अभ्रकाचे साठे आहेत. चुनखडक, तांबे, युरेनिअम ही येथील इतर खनिजे होत.

हवामान : विषुववृत्त व उत्तर ध्रुव यांच्या बरोबर मध्यावर हे राज्य असल्याने येथील हवामान पूर्णपणे समशीतोष्ण कटिबंधीय आहे. तापमानात बरीच विविधता असली, तरी सर्वसाधारणपणे हवामान थंड आहे. उन्हाळे अल्पकाळ, तर हिवाळे दीर्घकाळ असतात. सर्वसाधारणपणे कमाल तापमान ३५ अंश से. (क्वचित ४१ अंश से.) आणि किमान तापमान – ३४ अंश से. (क्वचित –४५ अंश से.) असते. बर्लिंग्टन येथील जानेवारीचे तापमान –८·३ अंश से., तर जुलैचे तापमान २१·२ अंश से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान सखल भागात ८१ सेंमी., तर पर्वतीय प्रदेशात १३० सेंमी. पर्यंत आढळते. हिमवृष्टी खोऱ्यांच्या प्रदेशात १८० ते २०० सेंमी., तर पर्वतीय प्रदेशात सु. २८० सेंमी. होते.

वनस्पती व प्राणी : व्हर्‌माँटचे तीन चतुर्थांश क्षेत्र पानझडी व सूचिपर्णी अरण्यांखाली आहे. थंड हवामानात आढळणारे वृक्षप्रकार येथे आढळतात. अनेक हिमानी सरोवरांच्या काठी दलदली किंवा कुरणे आहेत. शांप्लँ सरोवराच्या काठावरील खडकाळ, उंच भूशिरांवर व टेकड्यांवर ट्रिलीअम, व्हायालेट, ऍस्टर व गोल्डनरॉड ही फुलझाडे आढळतात. रेड क्लोव्हर हे राज्याचे मुख्य फूल असून त्याची लागवड विस्तृत प्रदेशात केली जाते. कुरणांच्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे नेचे, लव्हाळी व गवताचे प्रकार आढळतात. गवत उत्पादनाला आर्थिकदृष्ट्या महत्त्व आहे. टेकड्या व पर्वतीय प्रदेशांत अनेक प्रकारचे सूचिपर्णी तसेच रुंदपर्णी वृक्ष व झुडुपे आढळतात. मॅपल, एल्म, बर्च, ओक, ऍश, चेरी, बटरनट व बीच हे येथील प्रमुख पानझडी वृक्ष आहेत. कठीण लाकडाच्या वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. उंच पर्वतीय प्रदेशात व थंड, आर्द्र दऱ्या मध्ये अल्पाइन वने आढळतात. स्प्रूस, पाइन, फर, हेमलॉक व सीडार हे येथील मृदू लाकडाचे प्रमुख वृक्ष आहेत.

वसाहतपूर्वकाळात येथील प्राणिजीवन समृद्ध होते. त्यामुळे वसाहतकाळात हा भाग शिकाऱ्यांचे नंदनवन बनला. हरीण हा येथील प्रमुख प्राणी आहे. ग्रीन मौंटन व ईशान्येकडील भागांत अस्वल व बॉबकॅट हे प्राणी आढळतात. चिचुंद्री, मिंक, रॅकून, कोल्हा, स्कंक व बीव्हर हे येथील फर असलेले प्राणी आहेत. नद्या व सरोवरांत सॅमन, ट्राउट, बॅस, पिकॅरेल इ. जातीचे मासे सापडतात. शांप्लँ सरोवरतून स्मेल्ट मासे पकडले जातात. येथील पक्षिजीवनही समृद्ध आहे. सारिका, चिमणी, कावळा, ब्लूजे, कबुतर, बदक इ. पक्षी राज्यात आढळतात.

इतिहास : वसाहतपूर्वकाळात व्हर्‌माँट हे प्रामुख्याने अमेरिकन इंडियानांचे शिकारक्षेत्र होते. न्यू फ्रान्सचा गव्हर्नर साम्यूएल द शांप्लँ हा ४ जुलै १६०९ रोजी शांप्लँ सरोवराकाठी आला. त्याचेच नाव सरोवराला देण्यात आले. शांप्लँच्या तुकडीने येथील इरोक्वाइस इंडियनांचा पाडाव केला. पुढे दीडशे वर्षे सरोवराच्या पूव-दक्षिण प्रदेशावर फ्रेंचांची सत्ता होती. इंग्रजांनी १६९० मध्ये राज्याच्या आग्नेय कोपर्यारतील ब्रॅटलबरजवळ वसती केली.


 फ्रेंच-इंडियन युद्धाच्या काळात (१७५४-६३) जनरल जेफ्री ऍम्हर्स्ट याच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी न्यू हँपशरमधील चार्ल्सटाउनपासून शांप्लँ सरोवराच्या किनाऱ्यां पर्यंत संपूर्ण व्हर्‌माँट पार करणारा रस्ता बांधला. फ्रेंचांना कॅनडाकडे हुसकावून लावण्यासाठी झालेल्या युद्धात (१७५९) या रस्त्याचा फायदा इंग्रजांना मिळाला. १७६० मध्ये माँट्रिऑल इंग्रजांच्या स्वाधीन करण्यात आले. इंग्लंडमध्ये १७६४ साली झालेल्या एका परिषदेत तिसऱ्या जॉर्ज राजाने न्यूयॉर्कची पूर्व सरहद्द कनेक्टिकट नदीपर्यंत निश्चित केली. परंतु व्हर्‌माँटमधील वसाहतकारांना न्यूयॉर्कची शासनव्यवस्था मान्य नव्हती. त्यामुळे १७७१ मध्ये व्हर्‌माँट सैनिकांनी ईथन ऍलन याच्या नेतृत्वाखाली ‘ग्रीन मौंटन बॉइज’ नावाची एक स्वयंसेवी लष्करी संघटना स्थापन करून राजाच्या निर्णयाला आव्हान दिले. न्यूयॉर्कनेही न्यू हँपशरच्या व्हर्‌माँटवरील हक्काला मान्यता दिली नाही. १७७५ मध्ये या दोन राज्यांमधील वाद विकोपाला जाऊन वेस्टमिन्स्टर येथे युद्धाचा भडका उडाला. युद्धाच्या सुरुवातीच्या काळातच ग्रीन मौंटन बॉइजनी शांप्लँ सरोवराकाठचा टाइकॉंदरोगा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यातून घेतला. १५ जानेवारी १७७७ रोजी व्हर्‌माँट हे नाव स्वीकारण्यात आले. जुलै १७७७ मध्ये राज्याने आपले स्वतंत्र संविधान अंमलात आणले. १४ वर्षे व्हर्‌माँटचे स्वतंत्र प्रशासन राहिले. १७९० मध्ये न्यूयॉर्कबरोबरील सरहद्दीविषयक वाद मिटविण्यात आला. जानेवारी १७९१ मध्ये व्हर्‌माँटने संयुक्त संस्थानांचे संविधान स्वीकारले आणि ४ मार्च १७९१ रोजी हे घटक राज्य बनले. मूळ तेरा राज्यांनंतरचे व्हर्‌माँट हे पहिले घटक राज्य होय. १८०५ मध्ये माँटपील्यरची राजधानी म्हणून निवड झाली. अमेरिकेच्या यादवी युद्धकाळात (१८६१-६५) राज्याच्या विकासाची गती कमी झाली. युद्धोत्तर काळात येथील लोकसंख्येत बरीच स्थित्यंतसे घडून आली. ग्रामीण भागातून नागरी भागांकडे तसेच राज्याच्या बाहेरही लोकांचे स्थलांतर होऊ लागले.

स्पॅनिश-अमेरिकन युद्धात (१८९८) व्हर्‌माँटचे दोन सुपुत्र ऍड्मिरल जॉर्ज ड्यूर्ड व कॅप्टन चालर्स ई. क्लार्क विशेष प्रसिद्धीस आले. संयुक्त संस्थानांचे राष्ट्राध्यक्ष झालेले चेस्टर आर्थर (१८८१) व कॅल्व्हिन कूलीज (१९२३) हे व्हर्‌माँटचेच होते.

व्हर्‌माँटचे १९२७ च्या महापुरामुळे तसेच १९३८ मधील हरिकेन वादळामुळे मोठे नुकसान झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर औद्योगिक वाढ, हिवाळी क्रीडाव्यवसाय, पर्यटन, व्यापार यांचा विकास होत गेला. दरवर्षी सु. १५,००,००० लोक राज्यात सहलीसाठी येतात.

आर्थिक स्थिती : शेती आणि दुग्धव्यवसाय हे राज्यातील प्रमुख व्यवसाय. राज्यात एकूण कृषिक्षेत्र ५,९४,८८८ हे. होते (१९९३). कनेक्टिकट खोरे, शांप्लँ सरोवर खोरे व त्यातील बेटे येथे तुलनेने सुपीक मृदा आढळते. गवत, मूरघास, बटाटे व सफरचंदे ही शेतीतील प्रमुख उत्पादने आहेत. दरडोई दुभत्या गाईंच्या संख्येबाबत विस्कॉन्सिननंतर व्हर्‌माँटचा दुसरा क्रमांक लागतो. १९९३ मध्ये पशुधन व त्यांच्या उत्पादनांपासून ३७९ द. ल. तर पिकांपासून ३५ द. ल. डॉलरचे उत्पन्न मिळाले. १९८९ मध्ये २३,३७,००० पौंड दुधाचे उत्पादन झाले. येथील चीजउत्पादनही महत्त्वाचे आहे. १९९२ मध्ये राज्यात ३,१०,५१८ गुरे व वासरे १७,१४५ मेंढ्या व कोकरे ३,७३८ डुकरे होती. कोंबड्यांची संख्या ७१,००० होती (१९९३).

देशातील ७६ टक्के क्षेत्रात अरण्ये आहेत. १० टक्के अरण्ये सार्वजनिक मालकीची आहेत. राष्ट्रीय अरण्यांखालील क्षेत्र सु. १,४३,८८० हे. होते (१९८६). राज्याच्या अखत्यारीतील अरण्ये, उद्याने, मासेमारी व शिकार यांचे एकूण क्षेत्र १,०१,१७२ हे. आहे. नगरपालिकांच्या ताब्यातील क्षेत्र १५,५८० हे. आहे. राज्यात अरण्यांवर आधारित लाकूडतोड, लाकूड चिरकाम, प्लायवुडनिर्मिती यांसारखे व्यवसाय चालतात. येथील मॅपल शर्करा व सिरप निर्मिती महत्त्वाची आहे.

राज्यात पूर्वी भरभराटीस असलेले वस्त्रोद्योग बंद झालेले आहेत. खाणकामाची यंत्रे, पाणी खेचण्याचे पंप, शिवणयंत्रे, प्लॅस्टिक उत्पादने, विमानांचे सुटे भाग, लाटण व चिरणी यंत्रे, काचनिर्मिती, यंत्रे व यांत्रिक हत्यारे, लोहभट्ट्या, ओतशाळा, मोजपट्ट्या व मापनांचे इतर साहित्य, विद्युत् साहित्य, संगणक व तत्संबंधित उत्पादने, रेल्वे कार्यशाळा व तत्संबंधित उद्योग, दगडी व संगमरवरी उत्पादने, अन्नप्रक्रिया, बोटी बांधणी, सुकी गोदी निर्मिती, छपाई इ. उद्योगधंदे राज्यात चालतात. येथील मासे पकडण्याच्या काठ्या प्रसिद्ध आहेत. राज्याचे १९९४ मध्ये दरडोई उत्पन्न २०,२२४ डॉलर होते. दगड, वाळू, रेती, संगजिरे, संगमरवर, ग्रॅनाइट, ऍस्बेस्टस व पाटीचा दगड ही राज्यातील खनिज उत्पादने महत्त्वाची आहेत.

पर्यटन हा येथील मोठा व्यवसाय आहे. अरण्ये, निसर्गसुंदर पर्वतीय प्रदेश, प्रवाह व सरोवरे ही पर्यटकांची उन्हाळ्यातील तर बर्फावरील खेळाची ठिकाणे ही हिवाळ्यातील प्रमुख आकर्षणे आहेत. १,०८,००० हेक्टर क्षेत्रातील ‘ग्रीन मौंटन नॅशनल फॉरेस्ट’ हा प्रदेश मनोरंजनाच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध आहे. राज्यात सु. ३० राज्यवने व ८० विहारोद्याने आहेत. त्यांपैकी मौंट मॅन्सफील्ड, ग्रॉटन व कॅल्व्हिन कूलीज ही वने, तर कॅमल्स हम्प व बोमोसीन ही विहारोद्याने प्रसिद्ध आहेत. शांप्लँ सरोवर व त्यातील बेटांवरचे सृष्टिसौंदर्य उन्हाळ्यात अधिक मनोहारी असते. स्टो, डोव्हर, शेरबर्न व मॅड नदीखोरे ही हिवाळ्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असून तेथे स्कीईंग खेळाच्या सुविधाही आहेत. वेगवेगळी ऐतिहासिक स्थळे, शिकारीची व मासेमारीची क्षेत्रे आणि साजरे केले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे वार्षिक उत्सव यांमुळे पर्यटकांची बरीच गर्दी असते. राज्यात सु. सत्तर ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्यात आलेले आहे. त्यांत प्रामुख्याने बेनिंग्टन युद्धाचे स्मारक, ओल्ड कॉन्स्टिट्यूशन हाउस (विंडसर), प्लीमथ येथील कॅल्व्हिन कूलीज यांचे निवासस्थान आणि माँटपील्यर येथील स्टेट हाउस यांचा समावेश होतो.

वसाहतीच्या सुरुवातीच्या काळात राज्याच्या सरहद्दीवरील जलमार्ग हेच वाहतुकीचे प्रमुख मार्ग होते. यांपैकी पश्चिमेकडील शांप्लँ मार्ग उत्तरेस कॅनडाकडे जातो, तर पूर्वेकडील कनेक्टिकट मार्ग दक्षिण न्यू इंग्लंडकडे जातो. राज्यात सु. १६,७४५ किमी. लांबीचे रस्ते (१९९५), ४,४६,८१९ नोंदणीकृत वाहने (१९९१) आणि १,२७६ किमी. लांबीचे लोहमार्ग होते (१९८८). १८ विमानतळ असून त्यांपैकी ११ राज्याचे, १ नगरपालिकेचा व ६ खाजगी होते (१९९०). काही विमानतळ फक्त उन्हाळ्यातच वापरता येतात.

लोक व समाजजीवन : येथील मूळच्या अल्गँक्वियन व इरोक्वाइस या इंडियन जमाती नष्ट झालेल्या आहेत. या प्रदेशात सुरुवातीचे बहुतांश गोरे वसाहतकार कनेक्टिकट, मॅसॅचूसेट्स, न्यू हँपशर, न्यू इंग्लंड व न्यूयॉर्क वसाहतींमधून आलेले होते. त्यांपैकी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात आलेले आयरिश व प्रामुख्याने या शतकाच्या उत्तरार्धात आलेले फ्रेंच कॅनडियन हे सर्वांत मोठे गट होते. फ्रेंच कॅनडियन व बिगर फ्रेंच लोक प्रामुख्याने कॅनडाच्या क्वीबेक प्रांतातून येथे आले. फ्रेंच कॅनडियन लोकांचा ओघ अजूनही चालू आहे. व्हर्‌माँटमध्ये लोहमार्गाची उभारणी करण्यासाठी (१८४८) कामगार म्हणून आयरिश लोकांना येथे आणण्यात आले. ग्रॅनाइट व संगमरवर उद्योगांसाठी स्कॉटिश, स्पॅनिश व इटालियन कारागिरांना येथे आणण्यात आले. येथील वेल्श लोक पाटी-निर्मिती उद्योगात गुंतले होते. पोलिश लोकही येथे स्थायिक झाले. अमेरिकन संघराज्यात सामील झाल्यानंतरच्या दोन दशकांत राज्याची लोकसंख्या वेगाने वाढली परंतु बाहेर झालेल्या स्थलांतरामुळे वाढीचा वेग कमी झाला. राज्याच्या उत्तर भागात व शांप्लँ खोर्याथत लोकसंख्या वाढ अधिक आहे. १९९३ मधील दर हजारी जन्मदर १२·९ मृत्युदर ८·६, बालमृत्युमान ६·७ होते. राज्यातील दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. रोमन कॅथलिक लोक सर्वाधिक म्हणजे एकूण लोकसंख्येच्या एक तृतीशांश आहेत. यांशिवाय प्रॉटेस्टंट पंथीय तसेच इतरही ख्रिस्ती पंथाचे लोक आहेतच. गोरेतरांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे. इतर न्यू इंग्लंड राज्यांप्रमाणेच व्हर्‌माँटमधील लोकांनाही ‘यांकी’ असे संबोधले जाते. राज्यातील सु. १० टक्के लोक पहिली भाषा म्हणून फ्रेंच भाषा बोलतात.

व्हर्‌माँटमध्ये ७ ते १६ वयोगटातील सर्वांना शिक्षण सक्तीचे आहे. व्हर्‌माँट विद्यापीठ, बर्लिंग्टन (१७९१) नॉर्विच विद्यापीठ, नॉर्थफील्ड (१८३४) मिडल्बरी कॉलेज, मिडल्बरी (१८००) ब्रेड लोएफ कॉलेज, बेनिंग्टन कॉलेज (१९२५) मार्लबरो कॉलेज (१९४६) या येथील प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत. नॉर्विच विद्यापीठ हे देशातील सर्वांत जुने खाजगी सैनिकी महाविद्यालय आहे.

राज्यातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय १७९१ मध्ये ब्रुकफील्ड येथे स्थापन झाले. बेनिंग्टन ऐतिहासिक संग्रहालय व कलावीथी, डब्लू. वुड कलावीथी (माँटपील्यर), रॉबर्ट हल फ्लेमिंग संग्रहालय (व्हर्‌माँट विद्यापीठ), मॉरिसटाउन ऐतिहासिक संग्रहालय (मॉरिसव्हील) इ. संग्रहालये, कलावीथी, ऐतिहासिक संग्रहालय (मॉरिसव्हील) इ. संग्रहालये, कलावीथी, ऐतिहासिक वा सांस्कृतिक संस्था राज्यात आहेत. राज्यपुरस्कृत सिंफनी वाद्यवृंद येथे आहे.

राज्यात अठरा सार्वजनिक रुग्णालये व त्यांत २,३८३ खाटा होत्या (१९९०). वृद्ध, अंध व दुर्बल व्यक्ती, निराधार मुले यांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात येते.

दी व्हर्‌माँट गॅझेट किंवा ग्रीन मौंटन पोस्ट-बॉय हे राज्यातील पहिले वृत्तपत्र वेस्टमिन्स्टर येथे १७८१ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर विंडसर व्हर्‌माँट जर्नल (१७८३), रूटलँड हेरल्ड (१७९४) ही वृत्तपत्रे सुरू झाली. बर्लिंग्टन फ्री प्रेस हे सर्वांत मोठे वृत्तपत्र आहे. राज्यातील पहिले नभोवणी केंद्र १९३० मध्ये, दूरचित्रवाणी केंद्र १९५४ साली बर्लिंग्टन येथे व शैक्षणिक दूरचित्रवाणी केंद्र १९६८ मध्ये स्थापन झाले.

महत्त्वाची स्थळे : राज्यातील प्रमुख नऊ शहरांपैकी शांप्लँ सरोवराकाठी वसलेले बर्लिंग्टन (लोकसंख्या ३९,१२७-१९९०) हे सर्वांत मोठे औद्योगिक शहर आहे. रूटलँड (१८,२३०-१९९०) हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर संगमरवर उद्योग, यंत्रे, विमानाचे सुटे भाग, मोजपट्ट्या व विद्युत-साहित्य निर्मितीसाठी तसेच व्यापारी व वाहतूक केंद्र म्हणून महत्त्वाचे आहे. वनूस्की नदीतीरावर वनस्कू शहर असून तेथे लहानलहान निर्मितीउद्योग चालतात. माँटपील्यर हे राजधानीचे ठिकाण राज्याच्या साधारण भौगोलिक मध्यावर वसलेले होत. हे ग्रॅनाइट उद्योगासाठी विशेष प्रसिद्ध असलेले शहर आहे. बर्लिंग्टनच्या पूर्वेस ८ किमी. अंतरावर एसेक्स (१६,४९८-१९९०) हे औद्योगिक शहर आहे. ब्रॅटलबर (११,८८६-१९८०) व बेनिंग्टन (१६,४५१-१९९०) ही राज्याची दक्षिण भागातील प्रमुख शहरे आहेत.

चौधरी, वसंत