व्युत्पत्तिशास्त्र : व्युप्तत्ती म्हणजे कशाचाही उलगडा (विशेषतः  उगम शोधून) करणे. भाषेच्या बाबतीत बाह्य शब्दरूप आणि अंतर्गत अर्थरूप यांच्या संबंधाचा उलगडा वाक्याच्या पातळीवर केला, तर त्याला ⇨ व्याकरण म्हणतात. ‘गाय मारतो’ आणि ‘गाईला मारतो’ यांचे व्याकरण वेगळे आहे पण पदाच्या पातळीवर केला, तर त्याला व्युप्तत्ती म्हणतात. ‘घंटा वाजणे’ मधल्या ‘वाजणे’ चा संबंध ‘वाद्य’, ‘बाजा’ यांच्याकडे पोहोचतो, ‘थंडी वाजणे’चा उलगडा करायचा, तर जुन्या मराठीतील ‘घाव’ किंवा ‘घाय’ वाजति यांसारख्या प्रयोगांकडे वळायला पाहिजे. सामान्यत: माणूस शब्दार्थसंबंध गृहीत धरून चालतो पण फावल्या वेळी त्याला मुलाचे नाव ‘अनिल’ याचा मूळ अर्थ वारा किंवा ‘विवाह’ म्हणजे (वरपक्षाने वधूला) उचलून घेऊन जाणे किंवा ‘डामरट’ म्हणजे इंग्रजीतील damned rat शिवी अशा व्युत्पत्ती कळल्या, तर गंमत वाटते. कधी यापुढे जाऊन ‘राजा’ म्हणजे सगळ्याहून वरचढ आणि हुकमत गाजवणारा (संस्कृत ‘राजते’) नव्हे. तर त्याचा ‘खरा’ अर्थ प्रजेवर जीव लावणारा (संस्कृत ‘रञ्जयति’) असे ठरवण्यात माणसाला मोठे समाधान वाटते.

मात्र व्युत्पत्तींचा शोध हा एका काळी होता, त्याप्रमाणे हौसेपोटी करायचा कृटिरोद्योग राहिलेला नसून शास्त्र बनला आहे. ‘व्युत्पत्तिशास्त्र भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाची एक शाखा आहे.’ [→ भाषाशास्त्र]. व्युत्पत्तीला भाषेतील विविध प्रकारची परिवर्तने (विशेषत: नियमित ध्वनिपरिवर्तन) आणि भाषा-भाषांची ऐतिहासिक तुलना यांचा संदर्भ कायम असतो. हा संदर्भ मनात वागवला म्हणजे काही गोष्टी लक्षात येऊ लागतात. उदा., मराठी सून &lt प्राकृत सुण्हा &lt संस्कृत स्नुषा ही व्युत्पीत्ती सुखाने बसते. ( &lt, &gt हे बाणाचे फाळ काळाची दिशा दाखवता.) मराठी बाप &lt प्राकृत बप्प ही व्यत्पत्ती इथेच थांबते ती संस्कृतपर्यंत पोहोचवता येत नाही. ध्वनिपरिवर्तनाची नियमितता लक्षात घेता काही व्युत्पत्ती परस्परसुसंगत ठरतील : म. उपज &lt प्रा. उपज्ज &lt सं. उत्पद्य वीज &lt विज्जु &lt विद्युत उपट &lt उप्पट &lt उत्पाट- मात्र काही तशा ठरणार नाहीत : सं. प्रभात &gt प्रा. पहाअ &gt गुजराती पोह, हिंदी पौ पण मराठी ‘पहाट’ मधल्या ‘ट’ चे काय, याचा उलगडा करावा लागेल. म. राजपुरुष (राजपदावरील पुरुष) हा सं. राजपुरुष (राजाच्या हाताखालील पुरुष) यावरून उसना घेतलेला नसून मराठीत नव्याने घडवल्याचे लक्षात येईल. ‘राजा’ची रञ्जयति ही व्युत्पत्ती वैचारिकदृष्ट्या कितीही आकर्षक वाटली, तरी राजते (हुकमत गाजवतो) या व्युत्पत्तीला भाषिक तुलनेचे पाठबळ आहे, हे कबूल करावे लागेल : उदा., लॅटिन rex (राजा), regere (नियमन करणे), rectus  (नियमित). शास्त्रपूर्व व्युत्पत्ती (उदा., ब्राह्मणग्रंथातील आणि यास्काच्या ⇨ निरुक्त ग्रंथातील) कितीही आकर्षक वाटल्या, तरी शास्त्राच्या कसोटीवर घासल्याखेरीज स्वीकारता येणार नाहीत.

मात्र सामान्य लोकांनी बसवून टाकलेल्या लोक-व्यत्पत्ती (फोक एटिमॉलजी) कधीकधी भाषेवर ठसा उमटवतात, हेही खरे. मूळचा शब्द असुर, पण त्याची फोड ‘सुर नव्हे तो’ अशी मानल्यामुळे भाषेत नव्या ‘सुर’ शब्दाची भर पडली. नातू : पणतू (प्रणप्तृ) : आजा : क्ष हे त्रैराशिक मराठी भाषकांनी क्ष म्हणजे ‘पणजा’ असे सोडवले, की ज्या शब्दाला पूर्वेतिहास नाही. रञ्जयति इति राजा या लोक-व्युत्पत्तीमुळे ‘राजन्’ ची दोन अर्थरूपे ‘प्रजेचे पालन करणारा’ (रामायण, महाभारत) आणि ‘भूमी जिंकून ताब्यात ठेवणारा’ (कौटिल्य) यांपैकी पहिल्याला बळ मिळाले असणार.

शब्दरूपाची शब्दरूपाशी आणि त्यांच्याशी संबंधित अर्थरूपांची एकमेकांशी तुलना करीत एका बाजूला व्युत्पत्तिसंबंध आणि दुसऱ्या बाजूला ध्वनिपरिवर्तन व अर्थपरिवर्तन यांचे स्वरूप हाती येतात. त्यांपैकी व्युत्पत्तिसंबंध विविध प्रकारचे असू शकतात. उदा., (१) एका भाषेच्या कक्षेतील साधित-साधक-कनवाळू : कणव + आळू : दयाबुद्धी असणारा राजपुरुष-राजा + पुरुष : राजपदावरील पुरुष. (२) एका भाषेच्या किंवा भाषाकुलाच्या इतिहासातील जात-जनक : करून &lt जुने मराठी करौनि कपाट (फडताळ) &lt कपाट (दार) सून &lt सुण्हा &lt स्नुषा. (३) त्याचप्रमाणे सहजात-सहजात : वाज (णे) | बाजा बांधणे हिंदी बाँधना | फार्सी बंदान | पुराण इंग्लिश bindan. (४) एका भाषाक्षेत्राच्या इतिहासातील आदत्त-प्रदत्त (उसनवारी) : जुने मराठी करौनि, करोनि, करौनिया, करोनिया (बोलीबोलींच्या मधली उसनवारी) : मराठी स्नुषा &lt सं. स्नुषा प्राकृतचा टप्पा नाही) मेज &lt फार्सी मेज &lt पोर्तुगीज mesa. (५) त्याचप्रमाणे सहआदत्त-सहआदत्त : मराठी कागद | तेलुगू कागत्तु (प्रदायक भाषा अरबी, फार्सीचा टप्पा नाही). (६) प्रभावित-प्रभावी : लोकमान्य &lt सं. राजमान्य (शब्ददृष्ट्या, अर्थदृष्ट्या प्रभाव), सहान &lt लहान (शब्ददृष्ट्या प्रभाव), दुचाकी &lt bicycle (अर्थदृष्ट्या प्रभाव), पणजा &lt पणतू, आजा (शब्ददृष्ट्या, अर्थदृष्ट्या प्रभाव).

व्युत्पत्तिकोशात असे विविध व्युत्पत्तिसंबंध शब्दागणीक नोंदलेले असतात. वर्णनात्मक व्युत्पत्तिकोशात एका भाषेच्या इतिहासातील साधित-साधक इ. तर ऐतिहासिक व्युत्पत्तिकोशात एका भाषेच्या इतिहासातील अधिक तपशील, तसेच प्रभावाची नोंद (उदा., टर्नर यांचा नेपाळी कोश, मायरहोफर यांचा संस्कृत कोश) त्याचप्रमाणे तौलनिक व्यत्पत्तिकोशात एका भाषाकुलाच्या इतिहासातील सहजात, सहआदत्त इ. (उदा., टर्नर यांचा इंडो-आर्यन कोश, व्हाल्डे व पोकोर्नी यांचा इंडो-युरोपिअन कोश, बरो व एमनो यांचा द्राविड कोश).

संदर्भ : 1. Ross, Alan S. C. Etymology, London, 1958.

            २. कुलकर्णी, कृ. पां. मराठी व्युत्पत्तिकोश, पुणे, १९९३.

केळकर, अशोक रा.