श्लाय्‌खर, आउगुस्ट : (१९ फेबुवारी १८२१ – ६ डिसेंबर १८६८). जर्मन भाषावैज्ञानिक. जन्म मायनिंजन (यूरिंजिया) येथे. त्याचे शिक्षण लाइपसिक व ट्यूबिंजन विदयापीठात झाले. पुढे बॉन विदयापीठात त्याने भाषाशास्त्रात प्रावीण्य मिळवून डॉक्टरेट पदवी संपादन केली (१८४६).१८५० ते१८५७ ह्या कालखंडात त्याने प्राग विदयापीठात ग्रीक व लॅटिन ह्या अभिजात भाषा-साहित्यांचे अध्यापन केले आणि नंतर तो येना विदयापीठात अध्यापन करू लागला (१८५७ – ६८). त्याच्या अध्यापनाचा केंद्रबिंदू (मुख्य विषय) इंडो-यूरोपीय भाषांचे तुलनात्मक व्याकरण हा होता. ते करीत असताना त्याचे स्लाव्हिक भाषांकडे लक्ष वळले.१८५२ मध्ये त्याने तेव्हाच्या प्रशियामधल्या लिथ्युएनियन भाषक ग्रामीण भागात क्षेत्रीय कार्य केले. केवळ जुन्या लेखांवर न विसंबता इंडो-यूरोपीय भाषांच्या अभ्यासाच्या कक्षा रूंदावण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. Handbuch der litauischen sprache (१८५६-५७) हा शब्दसंग्रहासहित वर्णन-विश्लेषणपर गंथ ह्या अभ्यासातून निर्माण झाला.

येना विदयापीठात त्याची नेमणूक झाल्यावर (१८५७) त्याचे अनेक गंथ प्रकाशित झाले. त्यांत विशेष नाणावलेला गंथ म्हणजे Compendium der vergliechen den Grammatik der indogermanischen Sprachen (१८६१) हा होय. त्याचे इंग्रजी भाषांतर नंतर ए काँपेंडिअम ऑफ द कंपॅरेटिव्ह ग्रामर ऑफ द इंडो-यूरोपियन, संस्कृत, ग्रीक अँड लॅटिन लँग्वेजिस (१८७४-७७) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. या नंतरच्या संस्करणात आद्य इंडो-यूरोपीय भाषांची पुनर्रचना करण्याचा लक्षणीय प्रयत्न दिसून येतो. सजात भाषांत इतिहासाची वंशवृक्षात्मक मांडणी आणि उपपत्ती देणारा त्याचा प्रयत्न मान्यता पावला. भाषा म्हणजे जणू एक जीवमान संस्था आहे तिचा उद्‌गम, विकास, परिपक्वता आणि ऱ्हास कमाने होत जातो. जीवशास्त्रीय वर्गीकरणाच्या धर्तीवर भाषांचे ऐतिहासिक वर्गीकरण शाखा-उपशाखांमधून करता येते, असे त्याचे प्रतिपादन होते. ऐतिहासिक भाषाविज्ञानाला त्याने एक रेखीव स्वरूप दिले. ते आज जसेच्या तसे स्वीकारार्ह राहिलेले नसले, तरी त्याने टाकलेली भर मोलाची आणि दीर्घजीवी ठरली, यात शंका नाही.

त्याच्या काळापर्यंत तौलनिक भाषाभ्यासाच्या झालेल्या कामाचे परिशीलन करून त्याने त्याचे संश्लेषण केले आणि भावी काळातील संशोधनाला पद्धतशीरपणाची दिशाही दाखविली. विदयार्थिदशेपासून त्याच्या विचारपद्धतीवर जर्मन तत्त्वज्ञ हेगेल ह्याच्या विचारांची छाया पडली होती. नंतर डार्विनच्या उत्क्रांतिवादाचाही त्याच्यावर प्रभाव होता. दोहोंच्या सिद्धान्तांचा एकत्र उपयोग करून भाषाविज्ञानाला एक तार्किक चौकट देण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याचे बहुतेक स्फुटलेख आणि परीक्षणे त्याने जर्मन भाषाभ्यासक आडालबेर्ट कून (१८१२-८१) याच्या समवेत स्थापन केलेल्या Beitrage zur vergleichenden Sprachforschung या नियतकालिकात प्रकाशित झाले.

येना येथे त्याचे अकाली निधन झाले.

संदर्भ : Bynon, Theodora, August Scheleicher : Indo-Europeanist and General Linguist,1986.

केळकर, अशोक रा.