व्यंकटमखी : (सतरावे शतक). दाक्षिणात्य संगीतकार व संगीतशास्त्री. पर्यायी नावे व्यंकटेश्वर व व्यंकटेध्वरी. दाक्षिणात्य संगीततज्ञ ⇨ गोविंद दीक्षितर (१५५४–१६२६) याचा पुत्र. त्याच्या मातेचे नाव नागमांबा. त्याचे संगीतशिक्षण त्याचा ज्येष्ठ बंधू यज्ञनारायण दीक्षितर व गुरू तानप्पाचार्य यांच्याकडे झाले. व्यंकटमखी हा आत्मविद्या व नादविद्या यांचा गाढा अभ्यासक होता. तंजावरच्या विजयराघव राजाचा (कार. १६६०–७३) आश्रय व्यंकटमखीस लाभला व त्याच्याच प्रेरणेने व्यंकटमखीने ‘चतुर्दण्डिप्रकाशिका’ हा आपला प्रमुख व महत्त्वपूर्ण ग्रंथ रचला. रागलक्षण, रागलक्षणगीत व कुमारिल भट्टाच्या वार्तिकाभरण यावरील टीका असे व्यंकटमखीने लिहिलेले इतर ग्रंथ होत. चतुर्दण्डिप्रकाशिका ह्या मुख्य संगीतशास्त्रीय ग्रंथाचे लिखाण १६२०–६०च्या दरम्यान केव्हातरी राजाज्ञेनुसार झाले, असे एक मत आहे. हा ग्रंथ लिहिला गेल्यानंतर जवळजवळ ३०० वर्षांनी प्रथम छापला गेला. पडदेवाच्या अठरा वीणांच्या वर्णनाने ग्रंथाची सुरुवात करून ग्रंथकार भारतीय संगीतविस्ताराच्या चार मुख्य आधारांचे विवेचन करतो. हे आधार म्हणजे आलाप, ठाय, गीत व प्रबंध हे होत. या सर्वांतून मिळून जे संगीत अभिव्यक्त होते, ते रागसंगीत. त्यामुळे रागांची व्यवस्था लावणे ग्रंथकाराला गरजेचे वाटले. या संदर्भात त्याने ७२ मेलकर्ता रागांची पद्धती मांडली. मात्र ७२ संभवनीय मेलांपैकी फक्त १९ मेलांची त्याने चर्चा केली आहे. त्याचा पूर्ण ग्रंथ उपलब्ध नाही, याची खंत वाटावी. कारण हा संगीतशास्त्री भारतीय संगीत बदलते आहे, त्याची पुनर्रचना कसोशीने केली पाहिजे असे जाणवून नेटाने प्रयत्न करणारा होता. आज लोकप्रिय असलेले कल्याण व तोडी हे राग तुरुष्क (तुर्कस्तानी) म्हणून किंचित अधिक्षेपाने त्यांना बाजूला सारण्याची त्याची कृती बोधक वाटते. पं. ⇨ विष्णु नारायण भातखंडेंसारख्या शास्त्रकाराला मेल पद्धतीचे अपार महत्त्व वाटले. त्यांनी हिंदुस्थानी रागांचे १० थाटांत जे वर्गीकरण केले, त्यामागे व्यंकटमखीची प्रेरणा निश्चित आहे. व्यंकटमखीने अनेक गीते व प्रबंध रचले. त्याची ‘गंधर्वजनता खर्व दुर्वार गर्वभंजनु रे’ ही पहिलीवहिली रचना अद्यापही प्रचलित आहे. सतराव्या शतकाच्या अखेरीस तंजावर येथे त्याचे निधन झाले.