समूहगान : (कोरस). संघटित गायक-समूहाने एकसुरात गावयाचा कंठसंगीताचा एक प्रकार. मुख्यत्वे संगीत व नाटक यांच्या प्रयोगीय कलांमध्ये समूहगानाचे विविध आविष्कार प्राचीन काळापासून दिसून येतात व ह्या कलांतूनच समूहगानाची विविध रूपे व प्रकार विकसित होत गेले आहेत. समूहगानासाठी ‘वृंद’, ‘वृंदगान’, ‘गायकवृंद’ व ‘कोरस’ अशा पर्यायी संज्ञा मराठीमध्ये वापरात आहेत. ‘कोरस’ शब्दाचे मूळ ‘choros’ (नृत्यभूमी या अर्थी) या ग्रीक संज्ञेत आढळते. समूहगान वा वृंदगान हे प्राचीन ग्रीक काळी नेहमीच नृत्याच्या साथीने केले जाई. त्यामुळे गायक-नर्तकांचा संघ व त्याने रंगमंचावर केलेले सादरीकरण, असा अर्थ कोरसला प्राप्त झाला. त्यांच्या गीतालाही ‘कोरस’ हीच संज्ञा होती. ग्रीकांच्या धार्मिक उत्सवाच्या प्रसंगी, विशेषत: सुगीच्या काळातील धर्मविधीप्रसंगी, कलाकार देवतास्तुतिपर गीते नृत्याच्या साथीने सादर करीत. हा कोरसचा उगम होय. हा गायकवृंद नाट्यप्रयोगात भाग घेत असे व विविध भूमिका व कार्ये पार पाडत असे. नाटकातल्या व्यक्तिरेखांचा त्यांच्या पार्श्वभूमीसह परिचय करून देणे, सूत्रधार म्हणून नाटकातील घटनाकमाची साखळी जोडणे नृत्यगायनाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, प्रसंगानुरूप प्रकट चिंतन तसेच पारंपरिक शहाणपणा व नीतिमूल्ये यांच्या अनुषंगाने नाटकातील घटनांचे अन्वयार्थ लावून त्यांवर भाष्य करणे, नाटककाराचा प्रवक्ता म्हणून प्रेक्षकांशी थेट संवाद साधणे, तसेच रंगभूमी व प्रेक्षक यांच्यातील दुवा बनून प्रेक्षकांच्या भावभावनांचे प्रकटीकरण व प्रेक्षकवर्गाच्या सामूहिक जाणिवांचे प्रतिनिधित्व करणे, अशी अनेकविध कार्ये गायकवृंद पार पाडत असे. नाटकातील प्रमुख व्यक्तिरेखांपेक्षा वेगळा पण महत्त्वाचा असा हा प्राचीन ग्रीक रंगभूमीचा अविभाज्य घटक होता. इ. स. पू. सु. ६०० ते ४०० या काळात ‘कोरस’ ह्या समूहगानरचनांनी वाङ्मयीन परिपूर्णत्वाच्या दृष्टीने कळस गाठला होता. अपोलो देवतेच्या गौरवार्थ गायिली जाणारी युद्घविजय-गीते (पीअन्स), डायोनायससच्या पूजाविधीमध्ये व मिरवणुकीमध्ये गायिली जाणारी स्तुतिगीते (डिथिरॅम्ब), प्रशिक्षित कुमारिकांच्या गटाने गायिलेली देवतास्तोत्रे, तसेच व्यायामी क्रीडास्पर्धांतील विजयी खेळाडूंच्या स्वागतार्थ व गौरवार्थ गायकवृंदाने गायिलेली ⇨ ओड (उद्देशिका) गीते (एपिनायसिऑन) असे अनेक समूहगानप्रकार त्या काळात लोकप्रिय होते. प्राचीन ग्रीक कवी ⇨ पिंडर याने रचलेली क्रीडाविजयपर गीते त्या काळी फार लोकप्रिय होती. त्याची ही काव्यरचना ‘पिंडरिक ओड’ म्हणून ओळखली जाते. ग्रीक लोक-जीवनातील विविध सार्वजनिक व खाजगी समारंभप्रसंगी ( उदा., जन्म, मृत्यू , विवाह, सुगीचे दिवस इ.) ही समूहगीते गायिली जात. सुरूवातीच्या वृंदगीतांमागील प्रेरणा धार्मिक होती पण पुढे त्यांतून लौकिक विषयांचे चित्रण केले जाऊ लागले.

ग्रीक समूहगानरचनांच्या ह्या सादरीकरणातून ग्रीक नाटयाच्या विकासास चालना मिळाली. अथेन्समध्ये इ. स. पू. ५३० च्या सुमारास थेस्पिस (इ. स. पू. सहाव्या शतकाच्या मध्यकाळ) या कवी व नटाने प्रथमतः रंगमंचावर पुढे येऊन कोरसचे सादरीकरण केले, असे मानले जाते. ग्रीक शोकात्मिका व सुखात्मिका यांच्या परिपूर्ण विकसित रूपात गायकवृंद हा नाटयरचनेचा प्रमुख आधारस्तंभ बनला. प्रत्येक नाटकात नाट्यदृश्यांच्या वा घटनांच्या दरम्यान अधूनमधून किमान सहा तरी वृंद-उद्देशिका (कोरल ओड) समूहगानरूपात सादर केल्या जात. नटासमवेत दोन गायकवृंदांनी आळीपाळीने समूहगीते सादर करण्याचा प्रकारही (अँटिफॉन) केला जात असे. कित्येकदा गायकवृंदाला प्रतीकात्मक वेशभूषा दिली जाई. ग्रीक सुखात्मिकेतील वृंद हा प्राण्यांचे व पक्ष्यांचे मुखवटे घालून रंगमंचावर वावरत असे. पुढे ग्रीक रंगभूमीवर नटांचे महत्त्व जसे वाढत गेले, तसे गायकवृंदाची संख्या व महत्त्व कमी होत गेले. एलिझाबेथकालीन रंगभूमीवर गायकवृंदाच्या भूमिकेत परिवर्तने होत गेली. शेक्सपिअरने आपल्या काही नाटकांतून कोरस हे पात्र विशिष्ट प्रयोजनपरत्वे योजिले. एकोणिसाव्या शतकात स्विनबर्न (१८३७-१९०९) या इंग्रज कवी व नाटककाराने ग्रीक वृंदाच्या पुनरूज्जीवनाचे प्रयत्न केले. विसाव्या शतकात टी. एस्. एलियट (मर्डर इन द कॅथीड्नल, १९३५) बेर्टोल्ट बेक्ट ( कॉकेशिअन चॉक सर्कल१९४७), यूजीन ओनील (मोर्निंग बिकम्स इलेक्ट्ना, १९३१) प्रभृती आधुनिक नाटककारांनी विशिष्ट उद्दिष्टांनी गायकवृंदाचा वापर रंग-भूमीवर केला. मराठी नाटकांच्या संदर्भात विजय तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल मधील रंगमंचावर गायन-नर्तन करणारा बाह्मणवृंद हे कोरसचे उत्तम उदाहरण होय.

पाश्र्चात्त्य संगीतात ‘कोरस’ ही संज्ञा सामान्यत: संगीतसभांमध्ये (कॉन्सर्ट) गायन सादर करणाऱ्या मोठया गायकसमूहाला उद्देशून वापरली जाते. धार्मिक संगीत गाणाऱ्या गायकसमूहाला ‘क्वायर’ म्हटले जाते. ‘म्यूझिकल’ तसेच ‘बॅले’ या प्रकारांतील नृत्यगायन करणारा कलाकार-समूह हादेखील ‘कोरस’ म्हणून ओळखला जातो. पुढे कोरसचा अर्थ-विस्तार होत जाऊन गायकसमूहाने गायिलेले गाण्याचे धृपद वा कडवी, असाही अर्थ त्याला प्राप्त झाला. वृंदगान व वृंदवादन या दोहोंचा अंतर्भाव असलेल्या वृंदसंगीताचे (कोरल म्यूझीक) मूळ प्राचीन धार्मिक संगीतात व लोकसंगीतात शोधता येते. त्यात एकगायकी (सोलो) व समूहगायकी (ग्रूप सिंगिंग) यांचे मिश्रण असे. वृंदसंगीताचा वापर पाश्चात्त्य ऑपेरा, ⇨ ऑ रेटोरिओ, ⇨ कँताता, ⇨ चर्च-संगीत इ. प्रकारांत विशेषत्वाने केला जात असे. पंधराव्या शतकापासून वृंदसंगीतरचनांचे स्वरलेखन केले जाऊ लागले. तेव्हापासून पाश्चात्त्य संगीतात त्याची प्रदीर्घ परंपरा चालत आली असून, यूरोपमधील जवळजवळ सर्व देशांच्या समृद्ध सांगीतिक परंपरांचे वृंदसंगीत हे अविभाज्य अंग बनले आहे. एकोणिसाव्या शतकापर्यंत प्रामुख्याने धार्मिक, विशेषत: चर्च-संगीतात वृंदसंगीतरचनांचा वापर विपुल प्रमाणात केला जात होता. नंतरच्या काळात लौकिक संगीतातही त्यांचा वापर सढळ प्रमाणात होऊ लागला. समूहगान हा एक संगीतप्रकार म्हणून ऑपेराचा अविभाज्य घटक बनला. एकोणिसाव्या शतकापासून सिम्फनीसारख्या संगीतरचनांमध्येही त्याचा वापर एक अंगभूत घटक म्हणून केला जाऊ लागला. अमेरिकेत एकोणिसाव्या शतकात विल्यम विलिंग्ज व थीओडोर टॉमस या दोन संगीतकारांनी प्रामुख्याने वृंदगायनाचा (कोरल सिंगिंग) विकास घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजाविली. ⇨ बाख, ⇨ हँडल, ⇨ हायडन, ⇨ मोट्सार्ट, ⇨ बेथोव्हन, ⇨ शूबर्ट, आर्नल्ड शनबेर्ख, ⇨ बेलॉबॉर्टोक इ. पश्र्चिमी संगीतातील विख्यात संगीतकारांच्या वृंदसंगीतरचना विशेषत्वाने प्रसिद्घ आहेत. १९४० नंतरच्या काळात रंगमंचावर गायकवादक-वृंदाने सादर केलेल्या समूहगानरचनांना अमाप लोकप्रियता लाभली.

इनामदार, श्री. दे.


 भारतीय संगीतात प्राचीन काळी प्रचलित असलेल्या सामवेद गायनात समूहगानाची आदय बीजे आढळतात. या गानप्रकाराचा प्रसार मात्र त्या काळी फक्त सामवेद गायनापुरताच मर्यादित होता. नंतरच्या काळात संतांच्या काव्यरचना समूहाने गायिल्या जात त्या समूहगानाचा एक निखळ आनंददायी आविष्कार म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र रूजल्या. ⇨ भजन हा बहुजन समाजात रूजलेला वृंदगान-प्रकार महाराष्ट्रात तसेच भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये सर्वत्र लोकप्रिय आहे.श्रीमद्भागवतेच्या (सु. इ. स. ३००) दशमस्कंधात भजनाचा निर्देश आढळतो. तेव्हापासून भजनाची परंपरा चालत आली आहे. वारकरी संप्रदायात टाळ, वीणा, मृदंग वा पखावज या वादयांच्या साथीने पारंपरिक भजने समूहगान-पद्धतीने गायिली जातात. महाराष्ट्रातील खेडोपाडी भजन हा वृंदगानप्रकार ग्रामीण, बहुजन समाजाने वर्षानुवर्षे, पिढयानपिढया मोठया प्रेमाने व निष्ठापूर्वक जोपासला आहे. नागर समाजातही हा प्रकार लोकप्रिय असून मुंबईमध्ये भजनाच्या स्पर्धा प्रतिवर्षी घेतल्या जातात. सुगम संगीताच्या अथवा लोकगीतांच्या अंगाने भजन गायिल्यास एकतारी, झांजा, चिपळ्या ही वादये साथीला घेतली जातात.

भारतात आकाशवाणी व दूरदर्शन ह्या माध्यमांनी समूहगानाच्या लोकप्रियतेला व प्रसाराला मोठी चालना दिली. १९५० नंतर आकाशवाणीवर समूहगान विशेषत्वाने ऐकविले जाऊ लागले. हा प्रकार जनमानसात रूजविण्याचे श्रेय आकाशवाणीला दयावे लागेल. विष्णुपंत शिराली, पं. ⇨ रवि शंकर, पं. ⇨ पन्नालाल घोष, पं. जियालाल बसंत, पं. विनयचंद्र मौदगल्य, ⇨ मास्तर कृष्णराव, सलील चौधरी, कनू घोष यांसारख्या भारतीय संगीतक्षेत्रातील दिग्गज मंडळींनी आकाशवाणी माध्यमाव्दारे समूहगानाचे विविध प्रकार व आविष्कार जनमानसात लोकप्रिय केले. १९६२, १९६५ व १९७२ या वर्षांत भारतात जी युद्धे झाली, त्या युद्धकाळात देशप्रेमाची महती गाणारी स्फूर्तिगीते व समरगीते विपुल प्रमाणात लिहिली गेली व त्या गीतांना सुरेल चाली लावून ती जोशपूर्ण रीत्या समूहस्वरात गायिली गेली. समूहगानाचे हे आगळेवेगळे रूप लोकप्रिय करण्यात महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतकार ⇨ वसंत देसाई यांचा फार मोठा वाटा आहे. ते समरगीतांचे जनक मानले जातात. सु. चाळीस हजार विदयार्थी शिवाजी पार्कवर समूहस्वरात समरगीते गात असल्याचे उदाहरण केवळ अभूतपूर्व मानावे लागेल. वसंत देसाई यांच्या ह्या समूहगानाच्या वैशिष्टयपूर्ण प्रयोगाला देशातील विविध शहरांतून चांगला प्रतिसाद मिळाला व समूहगायनाचे असे भव्य प्रयोग ठिकठिकाणी होऊ लागले.

भारतीय स्त्रियांनीही विविध सण-उत्सवादी सांस्कृतिक प्रसंगी एकत्र येऊन आनंद व्यक्त करण्यासाठी समूहगान हाच आविष्कार-प्रकार निवडल्याचे दिसून येते (उदा., मंगळागौरीची, भोंडल्याची गाणी). प्रजासत्ताक दिनी विविध प्रदेशांतील स्त्रियांची सामूहिक लोकगीते व लोकनृत्ये सादर केली जातात व ते प्रजासत्ताक दिनाचे अनन्यसाधारण वैशिष्टय मानले जाते.

समूह-वादयवादनाचे वा वृंदवादनाचे प्रयोग आकाशवाणीने वेळोवेळी सादर केले आहेत. वीसहून अधिक सतारवादकांनी एकत्रित वादनातून सादर केलेल्या संगीतरचना, हे या प्रकाराचे एक वैशिष्टयपूर्ण उदाहरण होय. उस्ताद ⇨ अल्लउद्दिनखाँ यांनी १९२४ मध्ये स्थानिक गावकऱ्यांची ‘माइहर’ बँडपथके -स्थापन केली होती व ती एकत्रित वादनातून संगीतरचना ऐकवीत असत. हा समूहवादनाचा वैशिष्टयपूर्ण प्रकार म्हणावा लागेल. [ →वादयवृंद].

मारूलकर,दत्ता