वैद्यक : माणसाला निरोगी वा रोगमुक्त करण्याशी निगडित असलेली ही विज्ञानाची शाखा आहे. माणसाचे आरोग्य टिकविणे, तसेच रोगाचा प्रतिबंध व उपशम करणे किंवा तो बरा करणे यांच्याशी निगडित असलेले वैद्यक हे शास्त्र तसेच एक कलाही आहे. वैद्यकाचे अनेक विभाग आहेत व जवळजवळ दरवर्षी त्याची एखादी नवीन शाखा पुढे येत असते. शस्त्रक्रिया तंत्र, बालरोगविज्ञान, मानसचिकित्सा, प्रसूतिविज्ञान इ. अनेक चिकित्सेय तज्ञतेची क्षेत्रे वैद्यकांत येतात. आंतरिक वैद्यक या विशिष्टीकृत शाखेचा संबंध शस्त्रक्रियेची आवश्यकता नसणाऱ्या शरीरांतर्गत रोगांशी येतो.

विशेषकरून वैद्यकीय निदान व संशोधन यांच्या संदर्भात चिकित्सेय तज्ञतेच्या क्षेत्रांशी मूलभूत वैद्यकीय शाखांचा संबंध येतो. शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान, औषधिक्रियाविज्ञान, जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र इ. अशा शाखांची उदाहरणे आहेत. विकृतिविज्ञान या वैद्यकाच्या शाखेत रोगाने अथवा असाधारण परिस्थितींमुळे शरीराच्या संरचनांमध्ये व कार्यांमध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास केला जातो. ही शाखा वैद्यकाच्या मूलभूत व निदानीय (उपरुग्ण) शाखांच्या संदर्भात मध्यस्थित अशी आहे.

तज्ञतेच्या सर्व क्षेत्रांमध्ये रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक वा समूह वैद्यक हे एक महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. या शाखेमुळे रोगप्रतिबंधक, सामूहिक उपचार आणि आरोग्यविषयक बाबींचे सांख्यिकीय मूल्यमापन या बाबींच्या संदर्भात समाज, राज्य, राष्ट्र किंवा अधिक मोठा भूप्रदेश यांत आवश्यक असा दुवा साधला जातो. या वैद्यक शाखेचा शारीरिक व मानसिक स्वास्थ्याशी निगडित असलेल्या सामाजिक – आर्थिक घटकांशीही संबंध येतो. सामाजिक वैद्यक हे शासनाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असते व त्याची वित्तव्यवस्थाही शासनच पाहते. ग्रेट ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिस व भारतातील प्राथमिक आरोग्यसेवा ही याची उदाहरणे आहेत.

इ. स. १९३० नंतर व्यक्तिगत व राष्ट्रीय मानसिक आरोग्याकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्यात येत आहे. त्यापूर्वी मानसिक आजार ही मानहानीकारक, गुप्त ठेवण्याची आणि तुरुंगासारख्या आदिम प्रकारच्या रुग्णालयातील बंधनातील देखभाल करण्याची बाब होती. आता मात्र मानसिक आरोग्य हे वैद्यकातील एक मोठे प्रातिनिधिक क्षेत्र बनले आहे.

वैमानिकीय वैद्यक व अवकाश वैद्यक यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्यात येत आहे. निदानीय व प्रायोगिक माहितीच्या तसेच इतर विज्ञाने व विज्ञानातील इतर शाखा यांच्याकडून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या संदर्भात या दोन शाखांमध्ये त्यांच्या क्षेत्रांशी निगडित असणाऱ्या खास समस्या विचारात घेतल्या जातात. पशुवैद्यक, न्यायवैद्यक, उष्ण कटिबंधी वैद्यक, सैनिकी वैद्यक इ. वैद्यकाच्या विभागांचे कार्य त्यांच्या नावांतूनच उघड होते.

निदान व चिकित्सा ह्या वैद्यकातील सर्वाधिक परिचित अशा बाबी आहेत. रुग्णाचा प्रकृतिविषयक इतिहास जाणून घेणे, उपरुग्ण तपासणी करणे आणि गरज वाटल्यास प्रयोगशाळेतील व खास प्रकारच्या चाचण्या व परीक्षणे करणे या गोष्टी निदानामध्ये येतात. रुग्णावर कोणत्या तरी स्वरूपाचे प्रतिबंधात्मक, तसेच रोगहारक व आरोग्यकारक उपचार चिकित्सेमध्ये केले जातात.

वैद्यक मुळात वैज्ञानिक माहिती व वैज्ञानिक पद्धती यांच्यावर आधारलेले असले, तरी वैद्य व रुग्ण यांच्यातील परस्परसंबंध हीही महत्त्वाची बाब असते. याबाबतीत वैद्यकविषयीची आवश्यक अशी वैज्ञानिक माहिती असण्याबरोबरच वैद्यापाशी `रुग्णाला निरोगी करण्याची’ कलाही असणे गरजेचे असते.

वैद्यक हा व्यापक विषय असून त्याच्या विविध शाखा, चिकित्सा पद्धती, रोग, तंत्रे, ग्रंथी, संकल्पना इत्यादींवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. या लेखाच्या शेवटी `पहा’ म्हटलेल्या नोंदींवरून वैद्यकाविषयीच्या इतर नोंदींची कल्पना येईल.

वैद्यकाचा प्रारंभ : मानवी उत्क्रांतीमध्ये वैद्यकाची गरज नक्की केव्हा भासू लागली, हे निश्चित ठरविणे कठीण आहे. दाने पायांवर उभा राहणारा आदिमानव आणि त्याच्या मेंदूमध्ये झालेल्या जाणिवेचा विकास यांचा ऐतिहासिक वेध घेण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून चालू आहेत. आदिमानवाशी जवळीक दाखविणाऱ्या विविध आदिवासी संस्कृतींच्या अभ्यासातून आरोग्यविषयक अतिप्राचीन विचारसरणीवर प्रकाश पडतो. दैनंदिन जीवनातील प्रत्येक हानिकारक घटनेला तिच्यापासून दूर जाऊन टाळण्याचा प्रयत्न करणे ही प्राणिसृष्टीमधील नैसर्गिक प्रवृत्ती असते. अशा प्रयत्नांसाठी⇨तंत्रिका तंत्रातील अनुकंपी विभाग विकसित झाला आहे. परंतु यापुढे जाऊन मानवाने अशा हानिकारक घटनांची कारणपरंपरा शोधण्याचा सतत प्रयत्न केला आहे. त्यातूनच स्वसंरक्षणाचे मार्ग शोधले आहेत.

मानवी बुद्धीच्या विकासाबरोबरच गेल्या सु. दोन लाख वर्षांमध्ये आरोग्य आणि आजार यांविषयीच्या जाणिवा मंद गतीने आकार घेत आल्या आहेत. निसर्गातील अनेक घडामोडींचा अर्थ लावताना ज्ञानेंद्रियांना अगम्य अशा शक्तींच्या अस्तित्वाबद्दल ज्या कल्पना आधारासाठी वापरण्यात आल्या, त्यांचाच आधार आरोग्यविषयक घटनांचे अर्थ लावताना घेणे मानवाला भाग पडले आहे. त्यातूनच आदिमानवाच्या धर्मविषयक कल्पना, जादुविद्येबद्दलचा विश्वास, जन्मृत्यूबद्दल अतृप्त असे कुतूहल आणि रोगस्वास्थ्याबद्दलचे आडाखे यांचे गुंतागुंतीचे संकल्पनाजाल विणले गेले. त्यामुळे जगातील जवळजवळ सर्वच अतिप्राचीन किंवा प्राचीनपूर्व मानवसमूहांमध्ये रोगांबद्दल साधारणपणे समांतर अशा मूलभूत कल्पना होत्या. कोणत्या तरी बाह्य शक्तीचा अथवा देवांचा कोप झाल्याने आजारपण येते व माणसाचे त्यापुढे काहीही चालत नाही, अशी धारणा वेगवेगळी रूपे घेऊन विविध आदिसंस्कृतींमध्ये प्रचलित होती.

प्राचीन पर्शियन (इराणी) संस्कृतीत अशी कल्पना आढळते की, जगाच्या सुरुवातीसच सर्वशक्तिमान अशा अहुर मज्द यांनी ९९,९९९ रोगांची निर्मिती करून ठेवली आहे व त्यात बदल होणे अशक्य आहे, यहुदी संस्कृतीत रोग ही माणसाच्या पापाबद्दल देवाने केलेली शिक्षा आहे, असे समजले जाई. दुष्ट शक्तीदेखील रोगाला कारणीभूत मानल्या जात आणि किरकोळ गुन्ह्यांबद्दल (उदा., दुसऱ्याची निंदा करणे) सुद्धा रोगग्रस्ततेची शिक्षा होऊ शकते, असा धाक जनतेत पसरविला जाई. ईजिप्तमध्ये राक्षस आणि दुष्ट शक्तींबरोबर मृतात्मे आणि अदृश्य असे जंतूही रोगकारक मानले गेले होते. वर्षातील काही ठराविक ऋतू आरोग्याला जास्त घातक असतात, असाही अनुभव होता. ॲसिरोबॅबिलोनियन संस्कृतीत देव, चेटूकविद्या व जादूविद्या यांचा संबंध रोगांशी जोडलेला आढळतो. अमेरिकन इंडियनांच्या परंपरेत इतर गोष्टींबरोबरच पूर्वजांकडे दुर्लक्ष करणे, निषिद्ध वर्तनाचे आचरण, मृत व्यक्तींच्या दुष्ट इच्छा, चंद्र व वारा यांचा प्रभाव, शत्रूंची कारस्थाने या घटकांचाही समावेश रोगांच्या कारणांमध्ये होतो. उत्तर यूरोपातील ट्यूटन टोळ्यांच्या समजुतीनुसार आल्प, एल्फ, गॉब्लिन असे अनेक कल्पनारम्य, अदृश्य अमानव दयाळूपणे माणसाला मदत करण्यात सदैव तयार असतात.

अज्ञात बाह्य शक्तींच्या रोगजनक भूमिकेबद्दलचा विश्वास वैदिक संस्कृतीमध्येही होता. भूतपिशाच्च्यांच्या अथवा राक्षसाच्या आक्रमणामुळे शरीर व मनाच्या अप्राकृत (अनैसर्गिक) अवस्था निर्माण होतात, असा समज वैदिक वाङ्‌मयातून पहायला मिळतो. आरोग्यरक्षणार्थ अनेक देवतांच्या प्रार्थनांबरोबरच भूतपिशाच्चादींपासून संरक्षणाचे मंत्रतंत्र, ताईत अथर्ववेदात वर्णन केलेले आहेत. वैदिकोत्तर काळात जसजसा आयुर्वेदिक वैद्यकांचा विकास होत गेला, तसतसे हे मंत्रतंत्रादी उपचार मागे पडून आरोग्यदायक हवा, अन्न, पाणी, दिनचर्या, औषधी व शल्यचिकित्सा यांचे महत्त्व भारतीय विज्ञानात आपला प्रभाव पाडू लागले.

बाह्य शक्तींना महत्त्व दिल्यामुळे त्यांच्या शमनार्थ वापरलेले उपाय आणि ते आचरणात आणण्यास मदत करणारे मांत्रिक यांचेही महत्त्व जगभर सारख्यात प्रमाणात प्रचलित होते. त्याचेच अवशेष अनेक देशांमध्ये ⇨शामानच्या (पुरोहित व वैद्य यांची कामे एकत्रितपणे करणाऱ्या व्यक्तींच्या) रूपात व भारतात भगत, देवऋषी अथवा तत्सदृश व्यावसायिकांच्या रूपात अजून आढळतात. अशिक्षित जनमानसावर त्यांचा पगडा निरनिराळ्या समजुती व प्रथांच्या (ताईत, बळी, अघोरी उपास किंवा आहार) अस्तित्वातून स्पष्टपणे दिसतो.

आधुनिक पाश्चात्त्य वैद्यक (ॲलोपॅथी) प्राचीन ईजिप्त व बॅबिलोनियन साम्राज्यांच्या काळापासून हळूहळू विकसित झाले आहे, असे मानण्यात येते. त्यापूर्वीच्या वैद्यकविषयक इतिहासात प्रामुख्याने वर दिलेल्या आदिवासी संस्कृतींमधील विचारांचा प्रभाव असावा.

ईजिप्त व बॅबिलोनचे प्राचीन वैद्यक : इ. स. १८६१ व १८७५ मध्ये एडविन स्मिथ आणि गेऑर्ख एबर्स यांना महत्त्वाचे⇨पपायरस सापडले. इ. स. पू. २००० पासूनच माहिती असलेले हे कागदपत्र इ. स. पू. १६०० मध्ये लिहिले गेले असावेत. एबर्स पपायरसमध्ये सु. ५०० विविध पदार्थांपासून तयार केलेल्या ८७६ वैद्यकीय उपयोगांच्या सिद्धी आढळतात. मुख्यत: वनस्पतींचा भरणा त्यात असला, तरी प्राण्यांच्या विष्ठेसारखे किळसवाणे पदार्थही अनेक आहेत. पुरोहितांचे वर्चस्व असलेल्या तत्कालीन वैद्यकात जादू व वैद्यक यांचे मिश्रण झाले होते. स्मिथ पपायरसमध्ये मुख्यत: शल्य तंत्रांची माहिती आढळते. ती जास्त शास्त्रीय आहे. जखमांवरील उपचारांची यादी त्यात आहे, परंतु ते कसे करावेत हे दिलेले नाही. वृद्धांना नवतारुण्य प्राप्त करून देणाऱ्या यातुविद्येसारखी माहिती अपवादात्मक रीत्या आढळते.

रोगमुक्तीसाठी देवतांना आवाहन केले जाई. त्या प्रसन्न झाल्या, तरच उपचारांनी रोग बरा होतो असे मानले जाई. या कार्यासाठी हर्मीझ ऊर्फ थोथ ही वैद्यकीय ज्ञानाची दात्री प्रमुख देवता होती. तिच्यावरून वैद्यकीय ग्रंथांना हर्मिटिक असे म्हणत. शिवाय आयसिस ही यातुविद्येची देवता आणि होरस हा वन्यप्राण्यांपासून रक्षण करणारा तिचा पुत्र या दोघांनाही आवाहन करीत. इ. स. पू. ३००० च्या सुमारास जोसर राजांचे वजीर इम्होटेप ही वैद्यकीय क्षेत्रातील पहिली मानवी व्यक्ती दिसते. पहिल्या पिरॅमिडचे निर्माते, वास्तुशास्त्रज्ञ, ज्योतिषशास्त्रज्ञ, पुरोहित अशा अनेक गुणांनी युक्त हे विद्वान ईजिप्शियन नंतरच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात देव मानण्यात येऊ लागले. राजाच्या स्पर्शाने रोग बरे होऊ शकतात हा विश्वासही इम्होटेप यांच्या काळापासूनच आढळतो.

वैद्यकीय व्यवसायाला संघटित असे रूप प्राचीन ईजिप्तमध्ये येऊ लागले होते. बॅबिलोनचे राजे ⇨हामुराबी (इ. स. पू. १७९२–१७५०) यांनी तयार केलेली आचारसंहिता काही प्रमाणात आचरणात येत असे. तीनुसार यशस्वी उपचाराचा मोबदला व अयशस्वी ठरल्यास भरपाई किंवा शिक्षा असा नियम होता. भरपाईची रक्कम रोग्याच्या सामाजिक दर्जावर अवलंबून राही. निरनिराळ्या रोगांसाठी स्वतंत्र डॉक्टर उल्लेखिलेले दिसात. युद्धातील जखमांवर उपचार करणारे निष्णात शल्यचिकित्सक ईजिप्शियन साम्राज्यात होते. परिचारिका, मालिश करणारे, प्रसूतितज्ञ दाया इ. साहाय्यकही असत. हर्मेटिक ग्रंथांचे योग्य अनुपालन करूनही रोग बरा न झाल्यास वैद्यकीय व्यावसायिक निर्दोष समजला जाई. जनतेला आरोग्यासाठी अनेक नियम घालून दिले होते. त्यात स्वच्छता, सांडपाण्याची विल्हेवाट, अन्न व मांस तपासणी, प्रेते पुरण्याबद्दल सूचना, वामके, लंघन, बस्ती इत्यादींचा समावेश होता.

मेसोपोटेमियातही (इराक) हामुराबी संहितेचे पालन होई. बळी दिलेल्या प्राण्यांच्या अंतर्गत इंद्रियांचे निरीक्षण करून त्यावरून मानवी रोगांचे निदान, प्राक्‌कथन (भाकित) व उपचार ठरविले जात. वैद्यांचे (डॉक्टरांचे) तीन वर्ग होते. बारू हा फक्त भविष्यकथन करत असे. आशिपू दुष्ट शक्तींना पिटाळून लावण्यात समर्थ असे. हे दोघे राजाचे पगारदार नोकर असत. तिसरा आसू हा निष्णात भिषग्वर (औषधवैद्य) असे व मुख्यत: वनस्पतींचा वापर करी. त्याला रोग्याकडून पैसे, चांदी किंवा वस्तुरूप मोबदला घेण्यास परवानगी होती. गरिबांसाठी मंदिरात सरकारी डॉक्टर होते. राष्ट्रीय आरोग्य सेवेची ही एक प्रकारे सुरुवातच होती, असे म्हणता येईल.


प्राचीन ग्रीक वैद्यक : ईजिप्तमधून आलेले ज्ञान, इम्होटेप यांची प्रतिमा, चिनी वैद्यक आणि भारतीय विचार या साऱ्याचा प्रभाव ग्रीक वैद्यकावर सुरुवातीस पडलेला आढळतो. नंतर इ. स. पू. १२०० च्या सुमारास अस्क्लेपीअस हे ग्रीक वैद्य होऊन गेले. त्यांची प्रतिमा पुढे त्याच नावाच्या देवतेत रूपांतरित झाली. ग्रीकोत्तर काळातील रोमन लोकांनीही ॲस्क्लेपीअस या नावाने तिचा स्वीकार केला. रोगनिवारणाचे प्रतीक म्हणून सर्प व त्याची पूजा ही क्रीट बेटामधील मिनोअन संस्कृतीची देणगी ग्रीसने स्वीकारली. दुष्ट शक्ती याच रोगाचे कारण असतात व देवता रोगमुक्ती देतात, हा समज मेसोपोटेमियातून येऊन रूढ झाला.

आजारातून बरे होण्यासाठी रोग्याने दोन-तीन दिवस मंदिरात राहून रात्री स्वप्नात देवतांची प्रतीक्षा करावी आणि त्या स्वप्नांचा अर्थ लावून वैद्यांनी उपचार करावेत, अशी पद्धत होती. त्यासाठी इ. स. पू. ६०० पासून अनेक निसर्गरम्य स्थळी अशी मंदिरे बांधली गेली. तेथे स्नान, प्रक्षालन, शुद्धीकरण यांसारखे विधी केले जात. हीच पद्धत अवलंबून पुढे रोमन लोकांनी टायबर नदीतील बेटावर एक होडीच्या आकाराचे ॲस्क्लेपीअस यांचे मंदीर बांधले. कॉस आणि एपिडॉरस येथील प्रमुख मंदिरांत उपचारांमुळे रोगनिर्मूलनाच्या अनेक चमत्कृतिपूर्ण कथा शिलालेखात लिहिल्या आहेत. श्रद्धेवर आधारित अशी ही पद्धती हिपॉक्राटीझ यांच्या उदयानंतर हळूहळू मागे पडली.

याशिवाय काठीवर सर्पाचे चिन्ह लावलेले अस्क्लेपियाड वैद्य गावोगाव हिंडून रुग्णांशी व आसपास जमलेल्या प्रेक्षकांशी प्रदीर्घ चर्चा करीत व मग उपचार करीत. व्यायामावर भर देणारे कसरतपटू (जिम्नास्ट) आरोग्यविषयक सल्ला देत असत. एकंदरीत स्वच्छता, प्रकाश, व्यायाम, पाणी यांसारख्या घटकांवर आधुनिक वैद्यकाइतकाच भर दिला जाई.

इ. स. पू. सहाव्या शतकात पायथॅगोरस या तत्त्वज्ञांच्या शिकवणीमुळे निसर्गाकडे पाहण्याचा ग्रीकांचा दृष्टिकोण बदलू लागला. आध्यात्मिक व दैवी शक्तींचे महत्त्व कमी होऊ लागले. भौतिक अभ्यासाला चालना मिळाली. इ. स. पू. पाचव्या शतकात एंपेडोक्लीझ यांनी विश्वाच्या घटनेत चार महाभूते (अग्नी, पाणी, पृथ्वी व हवा) महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन केले. त्याच धर्तीवर शरीराच्या रचनेत चार द्रव किंवा रस भाग घेतात व त्यांच्या संतुलनाने आरोग्य टिकते, हा विचार रूढ होऊ लागला. रक्त, श्लेष्म, कृष्णपित्त व पीतपित्त हे चार द्रव/रस मूलभूत मानलेल्या या सिद्धांताचा पगडा पुढे सु. २,००० वर्षे पाश्चात्त्य वैद्यकावर भक्कम टिकून होता. त्यावर आधारित वमन, रेचन, रक्त काढणे यांसारखे उपचार प्रचारात आले.

इ. स. पू. पाचव्या शतकात आधुनिक वैद्यकाचे जनक समजले जाणारे ग्रीक वैद्य ⇨हिपॉक्राटीझ (इ. स. पू.४६०–३७७) होऊन गेले. रुग्णाचे सविस्तर निरीक्षण करून नोंद ठेवणे, परिसराचा अभ्यास, स्वत: निरोगी राहणे, समाजाशी मिळूनमिसळून वागणे, व्यावसायिक नीतिमत्तेचे पालन ही त्यांची वैशिष्ट्ये होती. मानवाची स्वत:ची निसर्गदत्त प्रकृती हीच रोगाच्या निवारणासाठी मुख्य शक्ती आहे, असे ते मानीत असत. आजार हे कोणत्याही दुष्ट शक्तींमुळे होत नाहीत, ते नैसर्गिक क्रियांमधील बदलांमधूनच उद्‌भवतात, या बदलांमागचे नियम शोधून काढणे मानवाला शक्य आहे, असा दृष्टिकोण हिपॉक्राटीझ कालीन विचारांच्या संकलन ग्रंथांमध्ये आढळतो. त्यांची सुभाषिते आणि वैद्यकीय व्यवसायाला नैतिक संहिता पुरवणारी त्यांची शपथ ही तत्कालीन ग्रीकांची महत्त्वाची देणगी मानली पाहिजे. प्राचीन ग्रीकांना शरीररचनेचे यथार्थ ज्ञान नव्हते, परंतु विज्ञानाभिमुखता व आरोग्याबद्दल सामान्यांमध्ये आस्था निर्माण करण्याची प्रवृत्ती यामुळे हा कालखंड महत्त्वाचा मानला जातो. इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून ग्रीक सुवर्णयुगाचा अस्त होऊन तेथील वैद्यकाचा केंद्रबिंद ॲलेक्झांड्रियाकडे गेला.

ॲलेक्झांड्रियामध्ये ⇨हिरॉफिलस यांनी काही काळ मानवी शरीराचा अभ्यास चालू ठेवला, परंतु तो लवकरच बंद पडून पुढे जवळजवळ सोळाव्या शतकापर्यंत हे क्षेत्र दुर्लक्षित राहिले. त्यामुळे तंत्रिका तंतू (मज्जातंतू), मेंदू, हृदय आणि रक्तवाहिन्या इत्यादींच्या अस्तित्वाबद्दल ढोबळ माहिती प्राप्त होऊनही त्यांच्या कार्याविषयी चुकीच्या संकल्पना टिकून राहिल्या.

ग्रीकांश आणि रोमन वैद्यक : ग्रीकांच्या सुवर्णयुगात समकालीन रोमन वैद्यक फार मागासलेले होते. यातुविद्या, बळी देणे, देवतांना आवाहन यांसारख्या प्रथा उत्तर इटलीमधील ⇨इट्रुस्कन संस्कृतीमधून रोममध्ये शिरल्या होत्या. इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून ग्रीक गुलाम रोममध्ये आणले जात. त्यांचे वैद्यकीय सामान्यज्ञान रोमन नागरिकांपेक्षा वरच्या दर्जाचे असे. म्हणून त्यांची प्रतिष्ठा हळूहळू वाढत गेली. शेवटी इ. स. पू. ४६ मध्ये जुलिअस सीझर यांनी त्यांना गुलामगिरीतून पूर्ण मुक्त करून रोमन नागरिकत्व दिले. ग्रीसमधून येणारे मान्यवर वैद्यही रोममध्ये व्यवसाय करू लागले होते. सुरुवातीस काही विरोध, नंतर स्वीकार, उत्साहाच्या भरात केलेल्या शस्त्रक्रियांमधून ओढवलेले रुग्णांचे मृत्यू, त्यातून उसळलेला ग्रीकद्वेष इ. अवस्थांनंतर ग्रीक वैद्यक रोममध्ये स्थिरावले. `बिथिनियाचे अस्क्लेपियाडीझ’ हे वैद्य इ. स. पू. ९१ मध्ये रोममध्ये आले आणि लवकरच ते सिसरो व मार्क अँटनी यांचे मित्र झाले. हिपॉक्राटीझ यांच्या नैसर्गिक व्याधी निवारणशक्तीवर त्यांचा विश्वास नव्हता. चार द्रवांच्या सिद्धांताला पर्याय म्हणून त्यांनी घन सूक्ष्म कणांचा सिद्धांत मांडला. या अणुसिद्धांतानुसार सूक्ष्म कणांच्या आकुंचन – प्रसरणावर रोगनिर्मिती अवलंबून असते. त्यांचे नियंत्रण करून शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्वरित पण सुरक्षित व सुखद असे उपाय योजावेत, असे त्यांचे मत होते. त्यासाठी शुद्ध हवा, मर्दन, पोटीस, योग्य आहार आणि बलवर्धक औषधे यांचा वापर ते करीत असत. मनोरुग्णांवर त्यांचे विशेष लक्ष असे. त्यांना अंधार कोठडीतून मुक्त करून शामक म्हणून मद्य पाजणे, व्यवसायोपचार, व्यायाम व शांतिदायक संगीत यांच्या मदतीने सुधारण्यावर त्यांचा भर होता.

⇨ गेलेन हे ॲलेक्झांड्रियात शिकलेले भिषग्वर इ. स. १६१ मध्ये रोमन साम्राज्यात दाखल झाले. आपल्या ठामपणे मते मांडण्याच्या पद्धतीमुळे ते थोडक्याच अवधीत यशस्वी झाले. हिपॉक्राटीझ यांच्या (चार द्रवांच्या) सिद्धांतावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी सु. ५०० ग्रंथ लिहिले. माकडांचे शवविच्छेदन करून प्रायोगिक शरीरक्रियाविज्ञानाचा आरंभही गेलेन यांनी केला. रोहिण्यांमध्ये हवा नसून रक्त असते व हृदयाच्या क्रियेमुळे ते भरती-ओहोटीसारखे मागेपुढे हालचाल करते, असा त्यांचा सिद्धांत होता. अनेक प्रकारची गुंतागुंतीची औषधी मिश्रणे वापरण्याच्या त्यांच्या पद्धतीवरून पुढे सर्वच वनस्पतिजन्य औषधी द्रव्यांना गेलेनिकल औषधे म्हणण्याचा प्रघात पडला. असेच एक गूढ मिश्रण थिरिॲक या नावाने त्यांनी सिद्ध केले होते. ते रोज नियमितपणे बादशहाला प्रतिविष (उतारा) म्हणून देण्यात येई. गेलेन यांच्या अनेक कल्पना चुकीच्या असल्या, तरी त्यांचा प्रभाव सोळाव्या शतकापर्यंत टिकून होता. वैद्यकीय प्रगतीच्या मार्गातील हा एक मोठा अडसर ठरला असे मानले जाते.

रोमन साम्राज्याच्या अखेरच्या काळात वैद्यकशास्त्राची वैज्ञानिक प्रगती खुंटली परंतु ऑस्ट्रोगॉथिक आणि व्हिसिगॉथिक आक्रमकांच्या वंशातील दोन राजांनी उच्च दर्जाच्या व्यावसायिक नीतिसंहिता मात्र निर्माण केल्या. त्यामुळे रुग्णांना तसेच वैद्यांना न्याय मिळून आरोग्य सेवेची प्रतिष्ठा वाढली.

ख्रिस्ती, ज्यू आणि अरबी वैद्यकांचा कालखंड : ख्रिस्ती धर्माच्या प्रचाराबरोबरच त्याचे रोगनिवारणाचे कार्य श्रद्धाधिष्ठित पद्धतीने सुरू होते. आजार व इतर दुर्दैवी घटनांनी माणसाचा आत्मा शुद्ध होतो, आजार हे पापांची शिक्षा म्हणून परमेश्वराने पाठविलेले अरिष्ट असते. त्यावर मानवी उपचारांनी फारसा परिणाम होत नाही, अशा ठाम विश्वासामुळे वैद्यकाच्या आधिभौतिक किंवा निसर्गाधिष्ठित पद्धतींकडे हा धर्म उदासीनतेने पाहत असे. त्याऐवजी विविध संतांच्या रोगहारक शक्तींच्या चमत्कारांवर भर दिला जाई. अकराव्या शतकात हिल्डीगार्ड यांनी मात्र असे प्रतिपादन केले की, रोगग्रस्त शरीर सैतानाच्या कारवायांना सहज बळी पडते. त्यानंतर ऐहिक, शारीरिक उपचारांचा हळूहळू स्वीकार होऊ लागला.

या काळात ॲस्क्लेपियाडीझ पंथी आणि हिपॉक्राटीझ पंथी अशा दोन्ही वैद्यकीय व्यावसायिकांशी ख्रिश्चन धर्मीय वैद्यकाला स्पर्धा करावी लागत होती. हळूहळू या दोहोंमधील काही भाग या धार्मिक वैद्यकाने आपणात समाविष्ट करून घेतले. उदा., मंदिरातील स्वप्नोपचार आणि गेलेन यांची औषधे हे दोन्ही मार्ग उपचारासाठी वापरले जाऊ लागले. रोमन काळात हिपॉक्राटीझ यांच्या आणि इतर अनेक ग्रीकांच्या ग्रंथांची लॅटिनमध्ये भाषांतरे झाली. एवढेच नव्हे, तर सातव्या – आठव्या शतकात मुस्लिम आक्रमणानंतर त्यांचे अरबी भाषेत रूपांतर होऊन पर्शियन वैद्यकावरही त्यांचा प्रभाव पडला. अबु-बकर मुहम्मद इब्न झकारिया अर (अल) राझी ऊर्फ ⇨रेझिस (८६५–९२५) यांनी बगदादमध्ये एक मोठे रुग्णालय बांधले व स्वत: सु. १,४०० पुस्तके लिहिली. अरबी वैद्यांचे राजे समजले जाणारे अबुल अली अल्‌-हुसेन इब्न अब्दल्ला इब्न सीना ऊर्फ ॲव्हिसेना (९८०–१०३७ → इब्न सीना) हे राजवैद्यही ग्रंथलेखनाबद्दल असेच प्रसिद्ध आहेत. या दोघांनीही अरबी वैद्यकाच्या विकासात मोठा हातभार लावला. अरबांचा औषधिसंग्रह, ताप व डोळ्यांच्या विकारांवरील संशोधन, रसायनातील ऊर्ध्वपातन व संप्लवन (घनरूपातून द्रवरूपात न जाता एकदम वायुरूपात जाण्याची क्रिया) यांसारख्या प्रक्रिया, अनेक पारिभाषिक शब्द (अल्कोहॉल, ड्रग, शुगर इत्यादींसारखे) इत्यादींमुळे या वैद्यकाचा प्रभाव पाश्चात्त्य विज्ञानावर बराच पडला आहे.

अकराव्या शतकात ग्रीक ग्रंथांची अरबी भाषांतरे इटलीतील सालेर्नो येथे आणण्यात आली. येथे सर्व संस्कृतींचा संगम होत असे. कॉन्स्टंटीन या धर्मगुरूंनी अरबी भाषांतरांवरून लॅटिन ग्रंथ तयार केले आणि सालेर्नो येथे पहिल्या वैद्यकीय विद्यालयाची स्थापना केली. त्याच्याच धर्तीवर नंतर यूरोपभर बोलोन्या, पॅड्युआ, मॉंट पील्यर, पॅरिस, ऑक्सफर्ड, केंब्रिज इ. विद्यापीठांमध्ये वैद्यकीय संस्था निर्माण झाल्या. ग्रीक संस्कृतीचा मध्ययुगीन यूरोपवर इष्ट असा परिणाम झालेला या काळात दिसतो परंतु वैद्यकीय ज्ञान मात्र गेलेनकालीन अवस्थेतच राहिले. कारण प्रयोग, शवविच्छेदन इत्यादींचे स्वातंत्र्य नव्हते.

ख्रिश्चन वैद्यकाच्या काळात ज्यू धर्मीयांना ईजिप्तकडून ज्ञानाचा वारसा मिळाला परंतु त्यांचे वैद्यक धर्मापासून पूर्णपणे स्वतंत्र राहिले. वैद्यांना पुरोहितांपेक्षा कनिष्ठ दर्जाचे लेखले जाई, पण कामाचा मोबदला मात्र योग्य प्रकारे मिळत असे. यातुविद्येचा वापर काही प्रमाणात होत असे, पण तो धर्माशी निगडित नव्हता. जुने ते सर्व टाकून देण्याची क्षमता या कालखंडात कुठेही आढळत नाही.


मध्ययुग व प्रबोधनयुग : (तेरावे ते सोळावे शतक). यूरोपातील बहुतेक सर्व वैद्यक व्यवहारांवर पोप व व्हॅटिकन यांचे प्रभुत्व प्रस्थापित झाल्यामुळे तेराव्या शतकाच्या सुरुवातीस वैद्यांच्या नैतिक वर्तनावर आणि उपचार पद्धतीवर जाचक निर्बंध आले. शवविच्छेदन आणि रुग्णाच्या अवयवाचे अवच्छेदन (कापून काढून टाकणे) यांवर सर्वत्र बंदी आली. तेराव्या शतकाच्या शेवटी गुन्हेगाराच्या शवांचे विच्छेदन वर्षातून फक्त दोनदा करण्याची अनुमती मिळाली. प्राण्यांच्या विच्छेदनावर आधारित एक ग्रंथ मोंदीनो देल यूत्‌ची यांनी लिहिला, पण त्यात गेलेन यांच्या चुकांची पुनरावृत्तीच होती. त्यांचे शिष्य गी. द. शोल याक यांनी मात्र चिरुर्जिआ मॅग्ना या शल्यचिकित्सेवरील आपल्या ग्रंथाने या शास्त्रात मोलाची भर टाकली व या व्यवसायाला प्रतिष्ठाही मिळवून दिली. त्यानंतर ⇨ अँड्रिअस व्हेसेलिअस, गाब्रिएल फॅलोपिअस आणि हायरॉनमस फाब्रिसिअस यांचे शरीररचनेवरील ग्रंथ शल्यचिकित्सेच्या दृष्टीने उपयोगी ठरले. आधुनिक शल्यचिकित्सेचे जनक समजले जाणारे ⇨ आंब्रवाझ पारे यांनी शस्त्रक्रियेसाठी अनेक नवीन उपकरणे तयार केली. तसेच रक्तस्राव थांबविण्यासाठी डाग देण्याऐवजी रक्तवाहिन्या धाग्याने बांधण्याची पद्धत रूढ केली.

औषध वैद्यकाच्या क्षेत्रात विविध रोगांची कारणे स्वतंत्रपणे जाणण्यासाठी कुष्ठरोग, प्लेग, देवी, क्षयरोग इत्यादींची स्वतंत्र वर्णनात्मक विश्लेषणे करण्यात येऊ लागली. जीरॉलामो फ्राकास्तॉरो यांनी संसर्गजन्य रोगांचे कारण सूक्ष्म कणांत असते व ते हवेतून किंवा स्पर्शाने पसरतात, असे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे रोगाची साथ आणि द्राक्षे किंवा सफरचंदे नासण्याची प्रक्रिया यांत काही तरी साम्य असावे, असा विचार मांडला.

या काळातील सर्वांत खळबळजनक मते ⇨फिलिपस ऑरीओलस पॅरासेल्सस ऊर्फ टेओफ्रास्टुस बोम्बास्टुन फोन होयेनहाइम (१४९३ – १५४१) यांनी मांडली. स्विस विद्यापीठातील या प्राध्यापकांनी गेलेन यांच्या पारंपरिक द्रव सिद्धांतास व चिकित्सा पद्धतीस प्रखर विरोध केला. त्यांच्या मते गंधक, पारा व क्षार हेच शरीराचे मुख्य घटक असतात, त्यामुळे वनस्पतिशास्त्रापेक्षा धातुविज्ञानच उपचारात जास्त महत्त्वाचे आहे. रासायनिक द्रव्यांचा लघवीच्या परीक्षणात उपयोग करणारे आणि रासायनी चिकित्सेस महत्त्व देणारे ते पहिलेच वैद्य होत. हिपॉक्राटीझ यांच्या शिकवणीतील निसर्गाच्या रोगनिर्मूलक शक्तीवर त्यांचा विश्वास होता. तरीही बाह्य शक्तींची मदत घेण्यासही ते मागेपुढे पहात नसत. समसमा पद्धतीचे तत्त्व स्वीकारून ज्या प्रकारचे रोगाचे कारण त्याच प्रकारचा उपचार हा सिद्धांतही ते अवलंबीत असत परंतु श्वसनाच्या रोगांसाठी कोल्ह्याचे फुफ्फुस, ज्या शस्त्राने जखम झाली त्यालाच मलम लावणे यांसारख्या हास्यास्पद उपायांमुळे त्यांचे सिद्धांत विवाद्य ठरले.

मध्ययुगात यूरोपात अनेक विद्यापीठांची वाढ झाली. विविध क्षेत्रांत नवे शोध लागत होत व एकंदरीत विज्ञान जिज्ञासेचे वातावरण तयार होत होते. त्याचा फायदा शारीर आणि शरीरक्रियाविज्ञान यांचा पाया घालण्याच्या दृष्टीने वैद्यकाला मिळाला. जर्मनीच्या दुसऱ्या फ्रेडरिक बादशहांनी सालेर्नो विद्यापीठाची मान्यता असल्याशिवाय कुणालाही वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही, असे फर्मान १२२१ मध्येच काढले होते. त्यामुळे वैद्यकाच्या पद्धतशीर शिक्षणाची वाढ होऊ लागली. इंग्लंडमध्येही शाही सनद मिळविलेली वैद्यकीय मंडळे (कंपन्या) स्थापन झाली. त्यांचेच रूपांतर पुढे रॉयल कॉलेजमध्ये झाले.

सतरावे आणि अठरावे शतक : फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ रने देकार्त यांनी मानवी शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यापासून मन किंवा आत्मा भिन्न असतो, असा विचार मांडला. तसेच आयझॅक न्यूटन, फ्रान्सिस बेकन यांसारख्या विचारवंतांच्या कार्यामुळे विज्ञानाची सर्व आघाड्यांवर प्रगती होऊ लागली. त्यामुळे वस्तुमात्रांची भौतिक घटना आणि त्यांच्या कार्याचे नियंत्रण यांसंबंधीचे प्राचीन ग्रीक विचार मागे पडले. याचाच परिणाम होऊन मानवी देह आणि त्याचे रोग यांसंबधी अनेक क्षेत्रांत नवनवीन शोध लागले. भेषजभौतिकी व भेषजरसायन अशा दोन शाखा निर्माण होऊन त्यांनी शरीरातील प्रत्येक घडामोडीचा अर्थ भौतिकीय किंवा रासायनिक क्रियांच्या आधारे लावण्याचे प्रयत्न सुरू केले. गूढ किमया, राजाचा हस्तस्पर्श, मेस्मेरिझम (मोहिनीविद्या), मस्तकसामुद्रिक यांसारख्या विवाद्य श्रद्धांचा पगडा मधूनमधून आपले अस्तित्व दाखवीत होता परंतु एकंदरीत पाहता वैज्ञानिक अन्वेषण, मापन आणि स्वत: केलेल्या प्रयोगांवर ग्रंथप्रामाण्यापेक्षा जास्त अवलंबून राहणे या प्रवृत्तीच प्रबळ होत गेल्या.

या दोनशे वर्षांतील महत्त्वाच्या शोधांमध्ये नीलांमधील झडपांचे वर्णन करणाऱ्या फाब्रिसिअस यांचे विद्यार्थी ⇨विल्यम हार्वी यांनी १६२८ मध्ये मांडलेला रक्ताभिसरणाचा सिद्धांत सर्वश्रेष्ठ मानला जातो. रोहिणी व नीला यांच्यातील दुवा त्यांना सापडला नव्हता. तो थोड्याच वर्षांनी बोलोन्या येथील ⇨मार्चेल्लो मालपीगी यांनी केशवाहिन्यांच्या रूपाने दाखवून दिला. ⇨रॉबर्ट बॉइल आणि रिचर्ड लोअर यांच्या संशोधनातून प्राण्यांच्या जीवनातील हवेचे महत्त्व प्रस्थापित झाले आणि त्यामुळे रक्ताभिसरणाचा उद्देश स्पष्ट झाला. पुढे⇨आंत्वान लॉरां लव्हॉयझर यांनी ऑक्सिजन या हवेतील घटकाचे श्वसनक्रियेतील महत्त्व दाखवून दिले.

शरीररचनेतील अनेक महत्त्वाच्या अंगांवर प्रकाश टाकण्याचे काम टॉमस विलिस यांनी केले. मेंदू व तंत्रिका (मज्जा), रक्तवाहिन्या, मधुमेहींच्या मूत्रामध्ये होणारे रासायनिक बदल यांबद्दल त्यांनी संशोधन केले. डच सूक्ष्मदर्शनतज्ञ ⇨आंतॉन व्हान लेव्हेनहूक व इंग्लंडमधील ⇨रॉबर्ट हुक यांनी सूक्ष्मजीवांचा व ऊतकांचा (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांचा म्हणजे पेशीसमूहांचा) अभ्यास केला. स्कॉटलंडमध्ये या काळात स्थापन झालेल्या एडिंबरो विद्यापीठातील मनरो घराणे आणि हंटरद्वयांनी [→ हंटर, जॉन हंटर, विल्यम] शारीर, विकृतिविज्ञान व शल्यचिकित्सेच्या विकासास संस्मरणीय हातभार लावला.

रोग्यावर उपचार करण्यापूर्वी त्याचे व्यवस्थित निरीक्षण करणे आणि सविस्तर शारीरिक तपासणी करणे यांवर ⇨ टॉमस सिडनहॅम यांनी भर दिला. हिवतापासाठी सिंकोनाच्या सालीचा उपयोगही त्यांनी रूढ केला. याच काळात ताजी फळे आणि लिंबासारख्या फळांचा रस देऊन खलाशांचे स्कर्व्ही रोगापासून संरक्षण करता येते, हे सिद्ध झाले. त्यामुळे अन्नघटक व आरोग्य यांचा परस्परसंबंध शोधण्यासाठी संशोधनाला गती मिळाली. हृदयाच्या रोगांसाठी हिजिटॅलिसच्या पानांचा वापरही याच सुमारास सुरू झाला. ⇨रने ते ऑफील यासॅंत लेनेक यांनी शोधून काढलेला स्टेथॉस्कोप, बोटांनी ठोकून छाती किंवा पोट तपासण्याचे ऑवेन ब्रुगर यांनी सुरू केलेले तंत्र (समाघात तंत्र), प्रसूतिक्रियेस मदत करण्यासाठी पीटर चेंबरलिन यांनी तयार केलेला चिमटा, ⇨ एडवर्ड जेन्नर यांची लसीकरणाची पद्धत यांसारख्या अनेक तंत्रांनी वैद्यकीय व्यवसायाच्या यशस्वितेत भर टाकली. मृत्यूनंतरच्या तपासणीमध्ये इंद्रियांत आढळणारे बदल व त्यांचा रोग्याच्या जिवंतपणीच्या लक्षणांशी जोडता येणारा संबंध यांचा लक्षणीय अभ्यास ⇨जोव्हान्नी बात्तीस्ता मोर्गान्ये यांनी सु. ७०० शवांच्या विच्छेदनानंतर प्रसिद्ध केला.

सार्वजनिक आरोग्य, लोकसंख्येची आकडेवारी, गरीबांसाठी मोफत रुग्णालयांची स्थापना, सैनिकी रुग्णालये, मनोरुग्णांसाठी चिकित्सालये इ. अनेक मार्गांनी यूरोपमध्ये वैद्यकाचा प्रसार होत गेला. तरीही वैद्यकीय व्यावसायिकांच्या महाग शुल्कामुळे गरीब जनतेला वैदू, भटके औषधविक्रेते, झाडपाल्याची औषधे देणारे यांच्यावर अवलंबून राहावे लागे. खुद्द वैद्यकीय व्यावसायिकही जळवा लावणे, शिरेतून रक्त काढणे, डाग देणे, जालीम रेचके व वामके वापरणे यांसारखे अघोरी उपाय वापरीत असतच. शल्यचिकित्सक, औषधवैद्यकाचा वापर करणारे भिषग आणि औषधनिर्माते यांच्यातही आपापसांत स्पर्धा असे. पुढे ती कमी होत गेली. प्रसूतिकर्मही पारंपरिक अशिक्षित दायांकडून आधुनिक वैद्यकाकडे येऊ लागले व पुरुष डॉक्टरांना बाळंतपणे करण्याची परवानगी मिळाली. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या वैज्ञानिक वर्गीकरणाच्या धर्तीवर रोगांचे दहा मुख्य वर्गांमध्ये वर्गीकरण करण्याचे अयशस्वी प्रयत्नही या काळात झालेले आढळतात.

एकोणिसावे व विसावे शतक आणि आजचे वैद्यक : एकोणिसाव्या शतकात शरीराच्या विच्छेदनामुळे मिळणारे स्थूलरचनेचे ज्ञान जवळजवळ पूर्णपणे प्राप्त झाले. हेनरी ग्रे या लेखकांच्या ग्रेज ॲनॅटॉमी या नावाने परिचित असलेल्या वर्णनात्मक ग्रंथाच्या रूपाने ते संकलित झाले. सूक्ष्मरचनेच्या बाबतीतही चार्ल्‌स बेल यांनी केलेले तंत्रिका तंत्रांचे वर्णन व फ्रिड्रिख गुस्टाफ याकोप हेन्ले यांचा मूत्रपिंडाच्या सूक्ष्मनलिकांचा अभ्यास यांसारखे अनेक प्रगतीचे टप्पे गाठले गेले.

शरीरक्रियाविज्ञानाच्या सम्यक्‌ ज्ञानाची जुळणीही योहानेस पेटर म्यूलर या जर्मन शिक्षकांच्या ग्रंथाने होऊ लागली. त्यांचे शिष्य हेर्मान फोन हेल्महोल्ट्‌स यांनी नेत्रपरीक्षक हे उपकरण तयार करून डोळ्यांच्या आणि कानांच्या गुंतागुंतीच्या राचनेवर प्रकाश टाकला. फ्रान्समध्ये क्लोद बेर्नार यांनी प्रायोगिक वैद्यकावर भर देऊन यकृतामधील ग्लायकोजेन, शरीरांतर्गत रासायनिक परिसराचे संतुलन आणि रक्तवाहिन्यांचे तंत्रिका तंत्राकडून नियंत्रण यांबद्दल व्यापक संकल्पना मांडल्या.

म्यूलर यांचे दुसरे विद्यार्थी रूडोल्फ लूटव्हिख कार्ल फिरखो यांनी विकृतिप्रक्रियेमध्ये असलेली कोशिकांची महत्त्वाची भूमिका स्पष्ट करून कोशिकीय विकृतिविज्ञानाचा पाया घातला. त्यामुळे पाश्चात्त्य वैद्यकातून (हिपॉक्राटीझ काळापासून चालत आलेल्या) द्रव सिद्धांताचे पूर्णपणे उच्चाटन झाले. रक्तातील श्वेत कोशिकांचे जंतुभक्षक कार्य दाखवून ⇨इल्या इल्यीच म्येच्‌न्यिकॉव्ह यांनी त्यांचे रोगप्रतिकारशक्तीमधील महत्त्व प्रस्थापित केले. सूक्ष्मजंतूंच्या संसर्गजनकतेची पुसटशी कल्पना सोळाव्या शतकापासून अस्तित्वात होती, परंतु तिला स्पष्ट असे स्वरूप इटलीतील ॲगोस्टिनो बॅसी, फ्रान्समध्ये ⇨लूई पाश्चर व जर्मनीमध्ये ⇨रॉबर्ट कॉख यांच्या कार्यामुळे मिळाले. सूक्ष्मजीवविज्ञानाचा पाया घालणाऱ्या या तिघांनी अनुक्रमे रेशमाच्या किडयांवर रोग पाडणारी कवके (हरितद्रव्यविरहित बुरशीसारख्या सूक्ष्म वनस्पती), दुग्ध व मध व्यवसायांतील किण्वनक्रिया (आंबविण्याची क्रिया) घडविणारे सूक्ष्मजंतू आणि क्षयरोगाचे दंडाणू यांचे निर्विवाद अस्तित्व दाखवून दिले. त्यानंतर व्हायरस (विषाणू) व्यतिरिक्त अनेक सूक्ष्मजंतूंची वाढ संवर्धनांच्या [→ ऊतकसंवर्धन] रूपात शक्य झाली व त्यांचे गुणधर्म विस्ताराने वर्णन करण्यात आले, तसेच पाश्चर यांच्या प्रयत्नांमुळे श्वानदंशासह [→ अलर्क रोग] अनेक रोगांच्या प्रतिबंधक लशी तयार होऊ लागल्या. शरीरात निर्माण होणाऱ्या ⇨ प्रतिपिंडांच्या संहतीच्या (प्रमाणाच्या) आधारे रोगनिदानाची शक्यता प्राप्त झाली. विषमज्वराची विडाल परीक्षा (झॉर्झ फेरनां ईझीडॉर विडाल या फ्रेंच वैद्यांच्या नावावरून पडलेले नाव) अस्तित्वात येऊन [→ आंत्रज्वर] तशाच प्रकारच्या चाचण्या नंतर उपदंश, क्षयरोग इ. रोगांसाठी विकसित झाल्या.


पाश्चर यांच्या सूक्ष्मजंतुविषयक संशोधनातून धडा घेऊन इंग्लंडमध्ये ⇨जोसेफ लिस्टर या शल्यचिकित्सकांनी कार्‌बॉलिक अम्ल या जंतुनाशकाचा उपयोग त्याच्या विद्रावाचा फवारा मारून सुरू केला. शस्त्रक्रियेचे क्षेत्र या फवाऱ्याने निर्जंतुक राखण्यासाठी एक खास यंत्रही त्यांनी बनविले होते. प्रसूतिकर्मापूर्वी दायांनी व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपले हात जंतुनाशक द्रवाने धुण्याची पद्धतही यूरोप व अमेरिकेत रूढ होऊ लागली. त्यामुळे सूतिकाज्वराचे (बाळंतज्वराचे) प्रमाण एकदम कमी झाले.

  औषध वैद्यकाच्या क्षेत्रात संसर्गजन्य रोगांशिवाय इतर विकारांच्या अभ्यासातून देखील महत्त्वाचे ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे जरी ताबडतोब उपाय सापडले नाहीत, तरी रुग्णांची देखभाल, रोगाच्या प्रगतीबद्दल अंदाज वर्तविणाऱ्या रासायनिक तपासण्या आणि विकृतिजन्य गुंतागुंती टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यांबद्दल योग्य दिशेने वाटचाल सुरू झाली. एकोणिसाव्या शतकातील महत्त्वाच्या संशोधकांमध्ये ⇨रिचर्ड ब्राइट (मूत्रपिंडदाह), ⇨ टॉमस ॲडिसन (अधिवृक्कन्यूनता), रॉबर्ट ग्रेव्ह (अवटु- आधिक्य), जेम्स पार्किनसन (कंपवात), ⇨सर पॅट्रिक मॅन्सन (हत्तीरोग), ⇨सर रॉनाल्ड रॉस (हिवताप), जॉन एच्‌. जॅक्सन (अपस्मार) आणि ⇨वॉल्टर रीड (पिवळा ताप) यांचा उल्लेख केला पाहिजे. मनोविकारांच्या चिकित्सेसाठी पायाभूत ठरलेले ⇨सिग्मंड फ्रॉइड यांचे मनोविज्ञानही याच काळात मांडण्यात आले.

विसाव्या शतकात वैज्ञानिक संशोधनाची विविध क्षेत्रे आणि जीववैद्यकीय तंत्रविद्या यांमुळे वैद्यकाचे स्वरूप संपूर्णपणे बदलण्यास सुरुवात झाली. रोगप्रतिबंधावर भर, अन्न व पाणी यांची औषधाइतकीच महत्त्वाची जाणीव, आंतरराष्ट्रीय सहकार्याने आरोग्यविषयक जागृतीचा जगभर प्रसार आणि वाढत्या संपर्कमाध्यमांमुळे वैद्यकीय ज्ञानाची जलद परिणामकता ही या शतकातील ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील.

जर्मनमध्ये विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात ⇨पॉल अर्लिक यांनी संसर्गजन्य रोगांच्या रासायनी चिकित्सेचा पाया घातला. अनेक रासायनिक द्रव्यांच्या रेणूंना विशिष्ट कोशिका आणि ऊतकांबद्दल आसक्ती असते, या निरीक्षणावर आधारलेल्या आपल्या प्रयत्नांनी त्यांनी आर्सेनिकयुक्त द्रव्यांचा हानिकारक परिणाम उपदंशाच्या सूक्ष्मजंतूंवर विवेचक (निवडक) रीत्या केंद्रित करण्यात यश मिळविले. १९१० मध्ये त्यासाठी वापरलेले साल्व्हरसान हे पहिले रासायनी चिकित्सेय औषध होते. त्यानंतर विषाक्तता (विषारीपणा) कमी करणे व परिणामकारकता वाढणे अशा दुहेरी प्रयत्नांमधून धात्वाभांची अनेक संयुगे आणि धातुयुक्त कार्बनी रसायने विकसित झशली. आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ, पारा, चांदी, सोने इत्यादींचा यशस्वी वापर विविध संसर्गजन्य रोगांमध्ये करण्यात आला. त्यामुळे केवळ लशींच्या आणि नैसर्गिक प्रतिकारक्षमतेच्या बळावरील मर्यादित संरक्षणास बाहेरून मानवनिर्मित शस्त्रांची जोड मिळाली. [→ रासायनी चिकित्सा].

पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात वस्त्रोद्योगांसाठी उपयुक्त अशा अनेक रंजकद्रव्यांचा शोध यूरोपमध्ये चालू होता. त्यांतीलच एक प्रॉन्टोसील हे सल्फानामाइड वर्गातील रसायन स्ट्रेप्टोकॉकस जंतूंची वाढ रोखू शकते, असे आढळले. ⇨गेरहार्ट डोमाक या सूक्ष्मजीववैज्ञानिकांनी असे दाखवून दिले की, प्रॉन्टोसीलपासून सल्फानिलामाइड हे द्रव्य शरीरात निर्माण होऊन तेच हा परिणाम घडविते. त्यानंतर १९३२ नंतरच्या काळात सल्फानिलामाइडाशी संबद्ध अशी शेकडो संश्लेषणजन्य (कृत्रिम) `सल्फा’ औषधे निर्माण झाली. रासायनी चिकित्सेत त्यांतील अनेक प्रस्थापित झाली. सूक्ष्मजंतुरोधक परिणामात प्रभावशाली, तोंडाने घेण्यास सोपी व मर्यादित विषाक्तता दाखविणारी ही द्रव्ये वापरल्यामुळे गोलाणुसंसर्गाच्या रोगांमध्ये मृत्यूचे प्रमाण झपाट्याने घटले. [→ सल्फा औषधे].

इ. स. १९४० च्या सुमारास ⇨सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या सु. बारा वर्षांच्या संशोधनाचे फळ पेनिसिलिनाच्या रूपाने मिळाले. ऑक्सफर्ड विद्यापीठातील ⇨सर हॉवर्ड वॉल्टर फ्लोरी व ⇨सर एर्न्स्ट बोरिस चेन यांच्या सहकार्याने हे पहिले प्रतिजैवी (अँटिबायॉटिक) औषधशुद्ध स्वरूपात अलग करून रुग्णांमध्ये ते उपयुक्त व विषाक्ततारहित आहे हे दाखविले गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीच्या काळात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे शक्य झाले. त्याच सुमारास ⇨सेल्मन आब्राहम वेक्समन यांनी क्षयरोगावर प्रभावी असे दुसरे प्रतिजैव औषध स्ट्रेप्टोमायसीन शोधून काढले. नंतरच्या दहा-पंधरा वर्षांत प्रतिजैव पदार्थांच्या संख्येत व प्रभाव पल्ल्यात सुधारणा होऊन क्लोरॅंफिनिकॉल, टेट्रासायक्लीन वर्ग, एरिथ्रोमायसीन, नवीन पेनिसिलीन वर्ग इ. अनेक प्रकारचे प्रतिजैव पदार्थ उपयुक्त ठरले. जुन्या प्रतिजैव पदार्थांना प्रतिरोध करण्याची शक्ती सूक्ष्मजंतूंमध्ये निर्माण होऊ लागल्यावर त्यांच्यासाठी नवीन प्रतिजैव पदार्थ तयार करण्याचा क्रम तेव्हापासून सुरू आहे. त्यांच्यापैकी अनेकांना विषाक्ततेमुळे आणि पेनिसिलिनाला ॲलर्जीजन्य प्रतिक्रियांमुळे मर्यादा पडतात. म्हणून संश्लेषणजन्य जंतुविरोधी द्रव्यांचाही शोध चालू असतो. व्हायरस वर्गातील अनेक रोगकारकांचा नाश करण्यासाठी प्रभावी प्रतिजैव पदार्थ मात्र अजून उपलब्ध नाहीत. [→ प्रतिजैव पदार्थ].

रासायनी चिकित्सेचे महत्त्व केवळ सूक्ष्मजंतू आणि व्हायरस यांच्या संसर्गापुरते मर्यादित न राहता तिची व्याप्ती इतर जीवांवर जगणाऱ्या परोपजीवी प्राण्यांच्या पर्याक्रमणातही यशस्वी रीत्या पोहोचू लागली आहे. १९५० सालानंतर ज्यांच्याविरुद्ध नवीन औषधे सापडली त्या पर्याक्रमणात व संसर्गात अमीबीय आमांश, हिवताप, लिश्मानियाजन्य काळा आजार, आफ्रिकन निद्रारोग, कवकीय विकार, आतड्यातील अनेक प्रकारचे जंत (कृमी), हत्तीरोग, नारू, पर्णाभकृमी, खरूज आणि उवा यांचा समावेश होतो.

घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षय, बालपक्षाघात, गोवर, पटकी, विषमज्वर, पिवळा ताप यांच्या प्रतिबंधक लशींमुळे या सर्व रोगांच्या प्रसारास आळा बसला असून देवी रोगाचे जगातून १९७७ मध्ये उच्चाटन झाले आहे [→ लस व अंत:क्रामण]. या कामात रासायनी चिकित्सा व लसीकरणाबरोबरच अनेक इतर उपायांचा वाटा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणजे डास व माश्यांसारख्या रोगवाहक कीटकांचे नियंत्रण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, सार्वजनिक स्वच्छतेची वाढती जाणीव आणि पोषणाबद्दलचे प्रगत ज्ञान सामान्य जनतेला देणे प्रथिने, स्निग्ध पदार्थ व कार्बोहायड्रेट यांचे आहारातील इष्ट प्रमाण, ऊष्मांक (कॅलरी) मूल्यांची त्यामधील वाटणी, जीवनसत्त्वे, खनिजे, सूक्ष्मपोषके आणि तंतू म्हणजे अपिष्ठमय बहुशर्करावारिके (पॉलिसॅकॅराइडे) यांचे महत्त्व बव्हंशी विसाव्या शतकातच मानवला कळू लागले आहे. त्यामुळे विकसनशील देशांच्या कुपोषणाच्या समस्या आणि विकसित देशांतील हृद्‌रोग व रक्तदाबासारखे अतिपुष्टितेशी संबद्ध विकार यांच्याशी सामना करणे आता शक्य होत आहे. [→ पोषण].

अंत:स्रावी ग्रंथींमधून नलिकांच्या मदतीशिवाय थेट रक्तात सोडल्या जाणाऱ्या द्रव्यांना `हॉर्मोन’ ही संज्ञा १९०५ मध्ये देण्यात आली. त्यापूर्वीच १९०१ मध्ये ॲड्रेनॅलीन हे अधिवृक्क हॉर्मोन शुद्ध स्वरूपात अलग करण्याचे काम अमेरिकेत यशस्वी झाले होते. या घटनांनंतर १९२१ मध्ये इन्शुलीन आणि १९३५ मध्ये कॉर्टिसोन यांच्या शोधांमुळे मधुमेह व सांधेदुखी (संधिवात) या दुखण्यांच्या रोग्यांना वरदान मिळाले. प्रजोत्पादनाशी संबंधित असलेल्या ⇨पोषग्रंथी, अंडकोश आणि ⇨वृषण यांमधून अनेक द्रव्यांची एक साखळीच शोधून काढण्यात आली. त्यांचे परस्परसंबंध स्पष्ट झाल्यावर आणि संश्लेषणजन्य हॉर्मोनांच्या निर्मितीमुळे वंध्यत्व, स्त्रीरोग, संततिनियमन आणि शरीराची अपचयी वाढ यांसाठी इष्ट अशा औषधांमध्ये लक्षणीय भर पडली. आयोडिनाचे अवटू हॉर्मोनांच्या निर्मितीमधील महत्त्व कळल्यावर डोंगराळ प्रदेशात आयोडीनयुक्त अन्न (मीठ, तेल) पुरवून ⇨गलगंडाला प्रतिबंध करता आला. याखेरीज स्थानिक स्वरूपाच्या हॉर्मोनांसारखे नियंत्रक कार्य करणारे अनेक पदार्थ व त्यांची रोधी द्रव्ये शोधली गेली. उदा., हिस्टामीन, सिरोटोनीन, अँजिओटेन्सिन, प्रोस्टाग्लॅंडीन वर्ग, सायटोकाइन वर्ग, एंडोथेलीन इत्यादी. [→ हॉर्मोने].

रोगनिदानाच्या क्षेत्रात विद्युत्‌ मस्तिष्कालेखन व हृद्‌लेखन या तंत्रांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच मोठी भर घातली. त्याचबरोबर क्ष-किरण तंत्रातही अनेक सुधारणा होऊन हृदालेख व क्ष-किरणही सुटसुटीत स्वरूपात सर्व जनतेला उपलब्ध झाली. वरचेवर क्ष-किरणांशी संबंध आल्यास ऊतकांवर विशेषत: भ्रूणासारख्या त्वरेने वाढणाऱ्या ऊतकसमूहांवर घातक परिणाम होतो. तो टाळण्यासाठी स्वनातीत (ध्वनिवेगापेक्षा अधिक वेगाने जाणारे) तरंग व अणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदन (न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स एनएमआर) यांचा उपयोग होऊ लागला. संगणकाची जोड क्ष-किरण चिकित्सेला मिळाल्यावर अधिक अचूक असे क्रमवीक्षण, सीएटी (कॉंप्युटराइज्ड ॲक्सियल टोमोग्राफी) या तंत्राने शक्य झाले. याशिवाय अणुभौतिकीय प्रगतीमधून प्राप्त झालेले गॅमा किरण, पॉझिट्रॉन यांसारख्या विकिरणांचाही उपयोग निदानासाठी करून घेण्याकडे वैद्यकाचा कल वाढत आहे. शरीराच्या अंतर्भागातील ऊतक प्रत्यक्ष डोळ्यांनी किंवा दूरचित्राच्या पडद्यावर पाहण्यासाठी अंतर्दर्शकांचा उपयोगही १९८० नंतर विकसित झाला आहे. सुरुवातीस सरळ जाड नळीच्या आकाराचे असलेले हे अंतर्दर्शक आता तंतू प्रकाशकी तंत्राच्या आगमनानंतर लवचिक व अरुंद नलिकांच्या रूपात तयार होऊ लागले आहेत. त्यांच्याबरोबर छायाचित्रण, ऊतक परीक्षेसाठी नमुना काढण्याची साधने आणि आवश्यकतेनुसार सूक्ष्म अशा शस्त्रक्रिया करण्याची उपकरणेही प्रचारात येत आहेत. [→ वैद्यकीय प्रतिमादर्शन].

रोगांच्या उद्‌भवाबद्दल कफवातादि सिद्धांत मागे पडले परंतु त्यांची जागा रोगप्रवण प्रकृतींच्या वर्णनाने घेतली. आनुवंशिकतेच्या आधारे एखाद्या व्यक्तीची वंशप्रकृती ठरवून तिची रोगप्रवृत्ती ठरविता येणे शक्य आहे, असा विचार सुरुवातीस मांडण्यात आला. पुढे मानवी गुणसूत्रांचे (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांचे → गुणसूत्र) विश्लेषण जसजसे बारकाईने होऊ लागले तसतसा या सिद्धांताला आधार मिळू लागला. आनुवंशिक रोगांमध्ये नक्की कोणत्या एंझाइमाचा (उत्तेजक स्रावाचा) अभाव आहे व तो नियंत्रित करणारे ⇨जीन (जनुके) कोणत्या गुणसूत्राच्या विशिष्ट कोणत्या स्थानी आहे ते शोधणे आता शक्य झाले आहे. मानवी आनुवंशिकतेचा संपूर्ण आराखडा (जीनोम) तयार करण्याचे काम विसाव्या शतकाच्या अखेरीस पूर्ण झाले आहे. याच्या पुढील पाऊल म्हणजे बाह्यहस्तक्षेपाने आनुवंशिकतेतील दोष दूर करणे हे होय. जननिक अभियांत्रिकीचे हे तंत्र अजून बाल्यावस्थेत आहे. त्यापासून पुढे काही काळाने रोगनियंत्रणाच्या कार्यात मोठा लाभ होईल. [→ आनुवंशिकी रेणवीय जीवविज्ञान].

शल्यचिकित्सेच्या क्षेत्रातील काही मुख्य समस्या – उदा., जंतुसंसर्ग, वेदना, रक्तस्रावामुळे होणारे निर्जलीकरण आणि शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील आंतरिक बदलांचे यथायोग्य दर्शन -विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दूर होऊ लागल्या. त्यामुळे शस्त्रक्रियांची व्याप्ती व यशस्विता वाढू लागली. निर्जंतुकीकरणासाठी वाफेचा वापर, शस्त्रक्रियेपूर्वी ब्रशाने घासून हात स्वच्छ धुणे, रबरी मोजे आणि नाकातोंडावर जाळीदार कापडी आच्छादन या उपायांचा १८९० च्या सुमारास प्रारंभ झाला होता. त्यांच्या जोडीला कार्‌बॉलिक अम्लाबरोबरच इतर अनेक जंतुनाशकांची भर पडत गेली. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या जखमा स्वच्छ राहून लवकर बऱ्या होऊ लागल्या.

ईथर व नायट्रस ऑक्साइड यांच्या मिश्रणाने भूल देण्याची शुद्धिहरणाची पद्धत हृदय व श्वसनाच्या दृष्टीने बरीच सुरक्षित ठरल्यामुळे अनेक दीर्घकालिक शस्त्रक्रिया प्रत्यक्षात उतरू लागल्या. शुद्धिहरणातील तज्ञांच्या मदतीमुळे नवीन शस्त्रक्रिया शोधून काढणे शल्यचिकित्सकांना शक्य झाले. उदा., हृदयाच्या आवरणाचे छेदन, महारोहिणेची झडप व द्विदल झडप यांच्या संकोचाचे छेदन व दुरुस्ती, मेंदूतील अर्बुदे व गळवे यांचे उच्छेदन ( शस्त्रक्रियेने काढून टाकणे), जठराचे व्रण व कर्क यांचेसाठी जठराचे अंशत: उच्छेदन करून जठर व आंत्र यांमध्ये कृत्रिम मार्ग तयार करणे, आंत्रपुच्छाचे उच्छेदन, मोठे आतड आणि मलाशयाच्या कर्काचे उच्छेदन इ. शस्त्रक्रिया हे एखाद्या व्यक्तीच्या हस्तकौशल्यावर आधारित असे नाट्यपूर्ण तंत्र असते, ही समजूत दूर होऊन त्याऐवजी अनेक व्यावसायिकांच्या (परिचारिका, शुद्धिहरण तज्ञ, शल्यविशारद आणि औषधवैद्यकतज्ञ यांच्या) सहकार्याने आणि शांतपणे करावयाचे एक शास्त्रशुद्ध शल्यतंत्र अशी प्रतिमा आकार घेऊ लागली. त्या दृष्टीने रुग्णालयांच्या इमारतींचे व कार्यविधींचे नियोजन बदलत गेले.


साध्या क्ष -किरण चित्रणाबरोबर बाहेरून क्ष-किरण अपार्य पदार्थ (उदा., बेरियम सल्फेट किंवा आयोडीनयुक्त द्रव्ये) विशिष्ट मार्गांमध्ये सोडण्याच्या तंत्रामुळे श्वसनीलेखन, मूत्रमार्गालेखन, मूत्रद्रोणदर्शन, रक्तवाहिनीचित्रण, मेरुरज्जुचित्रण, पचनमार्गचित्रण यांसारख्या निदान पद्धती प्रचलित झाल्या. त्यांच्या मदतीमुळे शस्त्रक्रियांची आवश्यकता, शक्यता आणि संभाव्य यशस्विता यांबद्दल निश्चित विधाने करणे शक्य झाले. याच सुरुवातीच्या काळात नेत्रचिकित्सा, अस्थिव्यंगचिकित्सा [→ विकलांग चिकित्सा], प्रसूतिविज्ञान व स्त्रीरोगचिकित्सा या शल्यचिकित्सेच्या शाखा स्वतंत्रपणे अस्तित्वात आल्या.

  दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रक्तदान सेवा, जखमी व्यक्तींना तात्कालिक उपचारासाठी हलविण्याच्या सेवा, सल्फा-पेनिसिलिनाच्या संरक्षण छत्राखाली शस्त्रक्रिया करण्याची पद्धत यांसारख्या मार्गांनी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये बरीच प्रगती झाली. या युद्धानंतर विविध प्लॅस्टिक पदार्थ आणि मिश्रधातू यांच्या साहाय्याने कृत्रिम सांधे, अस्थिशीर्षे, हृदयाच्या झडपा यांसारख्या उपांगांची निर्मिती होऊ लागली. चष्म्याऐवजी वापरण्याची नेत्रसंपर्क भिंगे, मोतीबिंदू काढल्यावर आरोपण करता येणारी भिंगे, रक्तवाहिन्या तयार करण्यासाठी संश्लेषणजन्य पदार्थ यांसारखी अनेक मानवनिर्मित साधने आता उपयोगी ठरत आहेत. शस्त्रक्रियेसाठी वापरण्याच्या सूक्ष्मदर्शकामुळे तंत्रिका व रक्तवाहिन्यांवरील नाजुक शस्त्रक्रिया १९५० पासून शक्य होऊ लागल्या. तसेच कानाचा पडदा, मध्यकर्ण व अंतर्कर्ण यांमधील दोषांवर शस्त्रक्रिया करून तंत्रिकाजन्य दोष नसलेल्या अनेक बधिरांची ऐकण्याची शक्ती सुधारणेही सुलभ झाले. शस्त्रक्रियेचे क्षेत्र ६ ते ४० पट मोठे दिसण्याची सोय सूक्ष्मदर्शकात असते. मानवी हस्तकौशल्याच्या मर्यादेमुळे याहून जास्त वर्धनक्षमता उपयुक्त ठरत नाही.

इ. स. १९५२ मध्ये हृदयावरील शल्यकर्मासाठी शरीराचे तापमान कमी करण्याची अवतापन (शीतन) पद्धती वापरात आली. हृदय व फुफ्फुसे यांचे कार्य तात्पुरते सांभाळणारे यंत्र वापरून काही काळ हृदयाला संपूर्णपणे विश्रांती दिल्याने त्याच्या अंतर्भागावर विस्तृत प्रमाणात शस्त्रक्रिया करता येऊ लागल्या. हेच अवतापन करण्यासाठी नंतर शरीरबाह्य शीतनाचे तंत्र (शरीर थंड न करता आधीच थंड केलेले रक्त व लवणद्रव शरीरात सोडणे) विकसित झाले. परिणामी, या क्षेत्रातील परमोच्च असे यश ख्रिश्चन बर्नार्ड यांनी संपूर्ण हृदयाचे आरोपण करून १९६७ मध्ये प्राप्त केले. आरोपणाच्या क्षेत्रात प्रतिक्रियादमन (बाह्य गोष्ट सामावून घेण्यास शरीराकडून होणारा स्वाभाविक विरोध दाबून टाकण्याची क्रिया) घडवून आणणारी कॉर्टिकोस्टेरॉइड व अन्य औषधे यांचे साह्य महत्त्वाचे ठरले. वृक्क (मूत्रपिंड) आरोपण आणि ते शक्य होईपर्यंत (योग्य असा मूत्रपिंडदाता मिळेपर्यंत) कृत्रिम मूत्रपिंडाचे काम करणारे ⇨अपोहन (डायालेसिस) तंत्र यांमुळे मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झालेल्या व्यक्तीही आता अनेक वर्षे सुस्थित जीवन जगू शकतात. यकृत आणि फुफ्फुस आरोपणाच्या शस्त्रक्रियाही आता शक्य झालेल्या आहेत.

पारंपरिक चाकू व कात्री आणि नंतर आलेली दहनशलाका यांच्या जोडीला लेसर किरण आणि अतिशीतन (-१२५° सें. पर्यंत गोठवण्यासाठी द्रव नायट्रोजनाचा उपयोग) ही आयुधे आता छेदन वा ऊतकनाशनाचे काम जास्त अचूकपणे करू शकतात. त्याचप्रमाणे त्रिमितीय अनुचालनाचे (शरीरांतर्गत विशिष्ट भागापर्यंत पोहोचण्यासाठी नाजुक उपकरणाच्या अग्राला तीन पातळ्यांत दिग्दर्शन करणारे) तंत्र वापरून या आयुधांच्या साहाय्याने व क्ष-किरण चित्रणाच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही खोलवरच्या भागापर्यंत पोहोचणे (उदा., पोषग्रंथी, मेंदू) आता शल्यचिकित्सकाला शक्य झाले आहे. [→ अंतस्त्य-प्रतिरोपण वैद्यकीय उपकरणे शस्त्रक्रिया तंत्र].

आधुनिक वैद्यकीय व्यवहार

वैद्यकीय शिक्षण : आधुनिक वैद्यकाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी विद्यापीठाची या शास्त्रातील पदवी त्या व्यक्तीने प्राप्त केलेली असावी असा दंडक आता बहुतेक देशांमध्ये रूढ झाला आहे. ब्रिटिश परंपरेतील भारतासारख्या देशात ही पदवी एम्‌.बी.बी.एस्‌. म्हणजेच औषधवैद्यक आणि शल्यचिकित्सा यांचा दुहेरी स्नातक अशी असते. अमेरिकेत व यूरोपीय देशांत ती एम्‌.डी. म्हणजेच वैद्यकातील उच्चविद्याविभूषित अशी असते. व्यवसायासाठी किमान किंवा पायाभूत अशा या पदव्यांसाठी शिक्षण देणारी महाविद्यालये किंवा प्रशाला सरकार, महापालिका, विद्यापीठे किंवा खाजगी रुग्णालयांच्या विश्वस्त संस्थांकडून चालविल्या जातात. [→ वैद्यकीय शिक्षण].

वैद्यकीय सेवेची क्षेत्रे : पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला व्यावसायिक जगात प्रवेश करताना आता अनेक पर्यायी क्षेत्रे उपलब्ध आहेत. ती थोडक्यात पुढीलप्रमाणे विभागता येतील.

सामान्य (किंवा सर्वोपचार) व्यावसायिक : रुग्णांचा प्रथम संपर्क येणारा वैद्यकीय सल्लागार व उपचारकर्ता म्हणून खाजगी क्षेत्रात सामान्य डॉक्टर किंवा कुटुंबाचा डॉक्टर (कुटुंबवैद्य) ही व्यक्ती अनेक दशके महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीशी परिचय, मित्रत्वाचे नाते आणि सर्व प्रकारच्या रोगांची प्राथमिक ओळख यांच्या मदतीने कुटुंबवैद्य हे व्यावसायिक नाते टिकून राहत असे. परंतु बदलत्या गतिमान जीवनपद्धतीमुळे आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या वाढत्या आकर्षणामुळे या संस्थेचा लोप सर्व देशांमध्ये होऊ लागला आहे. वाढत्या विशेषीकरणामुळे वैद्यकीय पदवीधरांचे रूपांतर एकमार्गी व्यावसायिकात होताना आढळते. याची जाणीव पाश्चात्त्य देशांत १९२० नंतर हळूहळू होऊ लागली. आरोग्याची तुकड्यातुकड्यांनी होणारी देखभाल थांबवून व्यक्तिनिष्ठ अशी काळजी घेणारा कुटुंबवैद्य पुन्हा तयार व्हावा या उद्देशाने अमेरिकेत हालचाल सुरू झाली. सामान्य व्यावसायिकांच्या संस्थेने १९७१ मध्ये आपले नामकरण कुटुंबवैद्यांची अकादमी असे केले. कुटुंब हा केंद्रबिंदू मानून आरोग्याच्या व्यक्तिगत, सामाजिक व सांस्कृतिक अंगाची पुन्हा ओळख करून घेणारी व प्रतिबंधक, गुणवत्ता वाढविणारी आणि उपचारात्मक पद्धतीने आरोग्याची देखभाल करणारी (प्राथमिक पातळीवर) एक महत्त्वाची वैद्यक शाखा म्हणून शिक्षणक्षेत्रात कुटुंबवैद्यकाला मान्यता मिळाली. इंग्लंडमध्येही १९४८ पासून राष्ट्रीय आरोग्य योजनेमुळे खाजगी डॉक्टरांचा लाभ विरळ वस्तीच्या आणि ग्रामीण भागात हळूहळू मिळू लागला. आठवड्यातून एकदोन दिवस बदली डॉक्टर नेमण्याची पद्धत आणि वाहतुकीच्या सुधारणांमुळे (डॉक्टरने रुग्णाच्या घरी वारंवार जाण्याची आवश्यकता कमी झाल्यामुळे) कुटुंबवैद्य किंवा सामान्य व्यावसायिक या पेशाकडे तरुण डॉक्टर पुन्हा वळत आहेत. भारतात नागरी वैद्यकात कुटुंबव्यवसाय बराच कमी होऊन त्याची जागा सार्वजनिक दवाखाने, कामगार विमा योजना यांनी घेतली आहे.

तज्ञ उपचार : कौटुंबिक व्यावसायिकाच्या निदानकौशल्याला आणि उपचारक्षमतेला अनुभव, सुविधा आणि वेळ यांच्या मर्यादा पडतात. त्यामुळे रुग्णाला तज्ञ (विशेषज्ञ) चिकित्सकाकडे पाठवावे लागते. यालाच संमंत्रणा (सल्लासेवा) किंवा तज्ञनिर्धारण (अभिप्राय सेवा) असे म्हणतात. १९५० नंतर अशा तज्ञांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. नागरी रुग्णांमध्ये कुटुंबवैद्याकडे न जाता थेट तज्ञाकडे जाण्याचा कल जास्त दिसून येतो. पदव्युत्तर शिक्षणातील चिकित्सेय तज्ञतेची क्षेत्रेही वाढत आहेत. निवासी वैद्यकीय प्रशिक्षणाची सोय असल्यामुळे ज्यांना शैक्षणिक मान्यता प्राप्त झाली आहे अशी २५ ते ३० क्षेत्रे आहेत. ही क्षेत्रे पुढे दिली आहेत. तज्ञाने उपचारांची आखणी करून दिल्यावर किंवा शस्त्रक्रियेची आणि अन्य रुग्णालयीन (वास्तव्याची जरूर असलेले) उपचार पार पाडल्यानंतर पुढील नियमित देखभाल आणि प्रगतीचे निरीक्षण रुग्णाच्या कुटुंबवैद्याकडून केले जाते. तज्ञसेवेचा लाभ घेणे अनेकदा खर्चिक असते. त्यामुळे वैद्यकीय विमा किंवा वैद्यकीय खर्चाची नोकरदाराच्या मालकाकडून प्रतिपूर्ती यामधून व्यवस्था करणे अपरिहार्य ठरते.

चिकित्सेय तज्ञता क्षेत्रांची यादी : (१) औषधवैद्यकीय विशेषीकरणे : साधारण औषदवैद्यक, हृदय चिकित्सा, उरोविकार चिकित्सा, जठरांत्र चिकित्सा, मूत्रपिंड चिकित्सा, नवजात चिकित्सा, बालरोग चिकित्सा, वार्धक्य चिकित्सा, अंत:स्राव चिकित्सा, मानस चिकित्सा, त्वचाविकार चिकित्सा, लिंगविकार चिकित्सा, कुटुंबवैद्यक, उष्ण कटिबंधीय वैद्यक, ॲलर्जी व रोगप्रतिकारक्षमता चिकित्सा, क्रांतिक (अतिदक्ष) चिकित्सा, भौतिकी चिकित्सा व पुनर्वसन, संधिवात चिकित्सा. (२) शल्यचिकित्सेय विशेषीकरणे : साधारण शल्यचिकित्सा, उरोहृद्‌ शल्यचिकित्सा, जठरांत्र शल्यचिकित्सा, मूत्रमार्ग शल्यचिकित्सा, बाल शल्यचिकित्सा, तंत्रिका शल्यचिकित्सा, सुघटन शल्यचिकित्सा, विकलांग चिकित्सा, नेत्रचिकित्सा, स्त्रीरोग आणि प्रसूतिविज्ञान, कर्णनासिकाकंठ चिकित्सा, अर्बुद चिकित्सा, वाहिनी शल्यचिकित्सा, बृहदांत्र – गुदांत्र शल्यचिकित्सा.

रोगनिदानास साहाय्यभूत तज्ञ चाचण्या : विकृतिविज्ञान आणि संबंधित वैद्यकीय उपशाखा (सूक्ष्मजीवविज्ञान,विषाणुविज्ञान, चिकित्सेय रसायनशास्त्र, कोशिकाविज्ञान, प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) विज्ञान) यांमध्ये होणाऱ्या ज्ञानसंचयामुळे व तांत्रिक प्रगतीमुळे रोगनिदानास साहाय्यभूत अशा तज्ञता क्षेत्रांची वाढ झालेली आहे. अठराव्या शतकापर्यंत केवळ रुग्णाच्या किंवा आप्तांच्या तोंडून ऐकलेल्या लक्षणांवरून निदान होई. नंतर त्यात शारीरिक परीक्षेची भर पडून वैद्याच्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग होऊन (दर्शन, स्पर्शन, श्रवण, ताडन या पद्धतींनी) जास्त उपयुक्त माहिती मिळू लागली. विसाव्या शतकात बाह्य उपकरणांच्या उपयोगाने (उदा., तापमापक, रक्तदाबमापक, विद्युत्‌लेखन, क्ष-किरण चित्रण) परीक्षणातील व्यक्तिनिष्ठता कमी होऊन जास्त वस्तुनिष्ठ माहिती येऊ लागली. तिचा उपयोग करून चिकित्सकांच्या निदानातील मतभिन्नता कमी करणे शक्य झाले. प्रगतिनिर्धारणासाठी कायम स्वरूपाची नोंद किंवा आलेखनेही सांभाळून ठेवता येऊ लागली. सध्या पुढील प्रकारच्या चाचण्या रोगनिदानासाठी उपलब्ध आहेत.

(१) रक्त, मूत्र, मस्तिष्क मेरुद्रव यांसारख्या जैवद्रवांचे रासायनिक परीक्षण करून त्यांमधील हीमोग्लोबिन, प्रथिने, साखर, कोलेस्टेरॉल, हॉर्मोने इ. घटकांचे मापन करणे (२) जैवद्रवांमधील कोशिकांचे गणन, उदा., रक्तकोशिका, श्वेतकोशिका, अर्बुदजन्य कोशिका इत्यादींचे गणन (३) उत्सर्गद्रव्यांचे सूक्ष्मजीववैज्ञानिक परीक्षण, रोगजंतूंचे अभिज्ञान व गणन, विष्ठेतील परोपजीवी, त्यांची अंडी इत्यादींचे अभिज्ञान करणे (ओळख पटविणे) (४) सूक्ष्मजीवांचे संवर्धन करून अभिनिर्धारण आणि प्रतिजैव औषधांच्या परिणामकतेचे मापन किंवा अंदाज करणे (५) जैवद्रवातील प्रतिरक्षावैज्ञानिक बदलांचे मापन उदा., प्रतिपिंड परीक्षण करणे (६) ऊतक परीक्षण किंवा कोशिका वैज्ञानिक परीक्षणाने संसर्गजन्य बदलांचे किंवा कर्करोगाचे अभिज्ञान करणे (७) क्ष-किरण, संगणकीकृत क्रमवीक्षण किंवा छेदचित्रण, स्वनातीत चित्रण, अणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदन यांसारख्या प्रतिमादर्शनाच्या तंत्रांच्या मदतीने शरीरांतर्गत संरचनात्मक बदलांचे दर्शन होणे [→ वैद्यकीय प्रतिमादर्शन] (८) विद्युत्‌ आलेखनाने हृदय, स्नायू, तंत्रिका यांसारख्या उत्तेजनक्षम ऊतकांमधील कार्यात्मक बदलांचे अभिज्ञान करणे (९) अंतर्दर्शकांच्या साहाय्याने जठर, आंत्र, मूत्रमार्ग, गर्भाशय, श्वसनी यांसारख्या इंद्रियांमधील बदलांचे दर्शन होणे आणि (१०) किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) पदार्थांच्या सूक्ष्ममात्रांच्या मदतीने विशिष्ट इंद्रियांच्या (उदा., अवटू ग्रंथी, मूत्रपिंड वगैरे) कार्यक्षमतेचे मापन करणे. [→ चिकित्साशास्त्र रोगनिदान].


सार्वजनिक वैद्यकीय सेवा : खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय सेवेचा खर्च सर्वच नागरिकांना परवडत नाही. तसेच या सेवा नागरी लोकवस्तीत केंद्रित होत असतात, असेही सर्वत्र आढळते. यावर उपाय म्हणून सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था, सेवाभावी संघटना आणि दानशूर व्यक्ती यांच्याकडून स्वस्त दरात किंवा मोफत रुग्णालये व दवाखाने चालविले जातात. खाजगी व्यावसायिक आपल्या अंशकालीन सेवा अल्प मोबदल्यात या संस्थांना देतात. काही खाजगी रुग्णालये आपल्या क्षमतेपैकी काही टक्के रुग्णशय्या धर्मादाय म्हणून अल्प दरात देण्यासां राखून ठेवतात. तरीही हा प्रश्न सुटत नाही, हे लक्षात घेऊन जगातील सर्व देशांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने वैद्यकीय सेवांचे पुनर्घटन होत आहे. 1१९७८ च्या आल्माआता येथील जाहीरनाम्याप्रमाणे यात प्राथमिक आरोग्य देखभाल सेवा ही पायाभूत धरून सर्व रचना केली जात आहे. रोग झाल्यास उपचार करणारी वैद्यकीय सेवा एवढेच मर्यादित उद्दिष्ट न ठेवता या देखभालीत आरोग्यविषयक शिक्षण देऊन प्रचलित रोगांचा प्रतिबंध, पोषणविषयक जागृती, सुरक्षित पाणीपुरवठा व स्वच्छता यांसाठी मदत, माता-बालसंगोपन, कुटुंबनियोजन, लसीकरण, प्रदेशविशिष्ट रोगांचे नियंत्रण यांवर भर दिला आहे. अशी सर्वंकष देखभाल भारतात प्राथमिक आरोग्य केंद्राकडून केली जाते. काही प्रमाणावर या केंद्रांची सुरुवात १९४६ नंतर भोर समितीच्या शिफारशीनुसार आधीच झाली होती. तेव्हा देखील प्रतिबंधक वैद्यकाशी उपचार वैद्यकाची सांगड घालून जनतेशी भौगोलिक समीपता, त्यांचे सहकार्य, आर्थिक व शारीरिक दुर्बलांकडे विशेष लक्ष या गोष्टींवर भर देण्यात आला होता.

या सर्वंकष आणि प्राथमिक आरोग्य देखभालीत नेहमीचे किरकोळ आजार व दुखापती यांवरील उपचारांचे स्वरूप कुटुंबवैद्याकडून मिळणाऱ्या सेवेप्रमाणेच असते. मात्र अशा प्राथमिक पातळीवरील उपचारांच्या मदतीस एक त्रिस्तरीय अशी यंत्रणा सिद्ध असते. प्राथमिक केंद्रे व त्यांची उपकेंद्रे खेड्यांशी व लहान गावांशी संपर्क साधून पहिला स्तर म्हणून प्रथमसंपर्क सेवा देतात. तज्ञांच्या मदतीसाठी ही केंद्रे जिल्हा पातळीवरील द्वितीय स्तराशी जोडलेली असतात. यात ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये व काही समाज आरोग्य केंद्रांचा (प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सुविकसित रूप) समावेश होतो. तेथील तज्ञांची मदत हा तज्ञनिर्धारण सेवेचा पहिला टप्पा म्हणता येईल. तज्ञांच्या (ठराविक दिवशी) प्राथमिक केंद्रांना भेटी आणि जरूर तेव्हा रुग्णांना उपचार स्थळी हलविणे असे दुहेरी स्वरूप या टप्प्यात आढळते. तृतीय पातळीवर जास्त व्यापक व खर्चिक उपचारांसाठी किंवा अधिविशेषज्ञांच्या मदतीची जरूर भासते, तेव्हा पुढचा टप्पा उपलब्ध असतो. यात वैद्यकीय महाविद्यालये, प्रादेशिक रुग्णालये किंवा राज्य पातळीवरील संस्थांचा समावेश होतो. रुग्णसेवेबरोबरच या संस्था प्रशिक्षणाचे कामही करतात. विशिष्ट रुग्णगटांसाठी (उदा., मनोरुग्ण, कर्करोग, विकलांग, हृदय किंवा उरोशल्य चिकित्सेची जरूर असणारे रुग्ण इ.) स्वतंत्र वैद्यकीय पथके असल्यामुळे तेथे उपचार लवकर आणि कमी खर्चात होऊ शकतात.

सार्वजनिक आरोग्य सेवा, प्रतिबंधक वैद्यक व सामाजिक वैद्यक : आरोग्य-संवर्धन, रोगप्रतिबंध आणि उपचार या कार्यात संपूर्ण समाजाने सहभागी होऊन क्रियाशील राहणे आवश्यक आहे, ही गोष्ट एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून हळूहळू सर्वमान्य होऊ लागली. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीच्या इष्ट अशा आर्थिक परिणामांबरोबरच तिचे पर्यावरणावरील अनिष्ट परिणाम दिसून येत होते. शहरांतील दाटीवाटीची वस्ती, बकाल झोपडपट्ट्या, सर्वत्र आढळणारी घाण, अन्न व पाण्याच्या स्वच्छतेचा अभाव यांचा पटकी व प्लेगसारख्या रोगांच्या साथीशी संबंध जोडण्यात येऊ लागला. वाढती लोकसंख्या व तिचा उपलब्ध सुविधांवर पडणारा ताण [मॅल्थस यांचे संशोधन → मॅल्थस, टॉमस रॉबर्ट], व्यवसायजन्य रोग, तुरुंगात व लष्करी छावण्यांत आढळणारे प्रलापक सन्निपात ज्वरासारखे (टायफस ज्वरासारखे) विकार या सर्वांचा अभ्यास करता इंग्लंड व अमेरिकेत असा विचार बळावू लागला की, सार्वजनिक स्वच्छता आणि राहणीची परिस्थिती सुधारण्यासाठी देशाने पैसा खर्च करणे हे रोगांच्या आक्रमणांना तोंड देण्यापेक्षा कमी त्रासाचे व अधिक फायद्याचे असते. त्यासाठी अनेक देशांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवांची पूर्वतयारी सुरू झाली. नगरपालिका व सरकारांना वैज्ञानिक माहितीवर आधारित असे मार्गदर्शन करणारी मंडळे स्थापन झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी राज्यांनी आपल्या सरकारी आरोग्य सेवा निर्माण केल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषत: पर्यटनाने होणारा संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी समित्या तयार होऊ लागल्या. त्यांतूनच पुढे पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्सचा आरोग्य विभाग निर्माण झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यूएचओ) ही संस्था स्थापन झाली. तिच्या सल्ल्याप्रमाणे सर्व सभासद देश आपली सार्वजनिक आरोग्यविषयक धोरणे आखतात व यथाशक्ती राबवितात.

सार्वजनिक आरोग्य सेवेचे क्षेत्र व्यापक असल्यामुळे अनेक इतर क्षेत्रांमधील तज्ञ व्यक्तींचा सहभाग त्यात आवश्यक ठरतो. वास्तुविशारद, गृहरचनाकार, जलअभियंते, उद्योगनियोजक, शेतीतज्ञ यांच्या मदतीने आरोग्यविघातक गोष्टी टाळता येतात. तसेच नगररचना, पाणीपुरवठा, अन्नजतन, औद्योगिक व कृषिजन्य अवशेषांची विल्हेवाट, मलनिस्सारण यांसारख्या क्रियांमधील आरोग्यसंबद्ध घटकांची वरचेवर पाहणी करून त्यांत योग्य ते बदल सुचविता येतात. साथीच्या रोगांचे सर्वेक्षण, लसीकरण, जन्ममृत्यूची आकडेवारी, रोगप्रादुर्भावाच्या कारणांची छाननी हे कार्यही सतत चालू असते. वर वर्णन केलेल्या त्रिस्तरीय वैद्यकीय सेवेच्या आरोग्य केंद्रांकरवी या कामाचा बराचसा भाग उरकला जातो. त्याकरिता खेड्यांमध्ये ग्रामीण आरोग्य मार्गदर्शक, स्थानिक सुईणी (दाया) व अंगणवाडी कार्यकर्ते यांसारख्या व्यक्ती अंशकालिक काम करतात. उपकेंद्रातील बहुद्देशीय स्वास्थ्यसेवक व सेविका चार-पाच खेड्यांसाठी कुटुंबकल्याणाच्या व इतर कामांत मार्गदर्शन करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्फे सु. एक लाख ग्रामीण लोकवस्तीतील उपकेंद्रे व खेडी यांच्या कार्यास मार्गदर्शन व पूरककार्य स्वास्थ्य साहाय्यकांच्या मदतीने केले जाते. नागरी लोकवस्तीतील सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी नगरपालिका व महानगरपालिकांकडे असते. या संस्थांचे आरोग्याधिकारी व अभियंते हे कार्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, दवाखान्यांचे वैद्यकीय अधिकारी, स्वास्थ्य परिचारिका इत्यादींच्या मदतीने पार पाडतात.

राष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशात काही समान कार्यक्रम (उदा., लसीकरण, आकडेवारी, पाणीपुरवठा, मलनिस्सारण इ.) नेहमीच्या कायमस्वरूपी यंत्रणेतर्फे केंद्रीय आणि राज्य शासनांनी चालू ठेवलेली असतात. यांशिवाय देशाच्या विशिष्ट समस्यांना तोंड देण्यासाठी काही खास प्रकल्प हाती घेतलेले असतात. पाश्चात्त्य देशांमध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रश्न आता तितकासा तीव्र नसल्यामुळे अशा प्रकल्पांमध्ये त्यांचा समावेश न होता प्राधान्याने एड्‌स, कर्करोग, हृदयविकार, मधुमेह, मनोविकार, वार्धक्याचे प्रश्न, पर्यावरण प्रदूषण यांकडे लक्ष दिले जाते. भारतात पुढील राष्ट्रीय कार्यक्रमांवर भरदिला जातो व त्यांसाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा व आर्थिक तरतूद असते. शिवाय जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, जागतिक बॅंक, यूएस एड यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था त्यासाठी आर्थिक मदत, तांत्रिक सल्ला, साधनसामग्री, प्रशिक्षण इ. देत असतात.

(१) हिवताप निर्मूलन कार्यक्रम (१९५८), (२) हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम (१९५५), (३) क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (१९६२), (४) कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम (१९८३), (५) अतिसारी विकास नियंत्रण कार्यक्रम (सहावी पंचवार्षिक योजना), (६) लैंगिक संसर्गजन्य विकास नियंत्रण कार्यक्रम (१९५७), (७) अंधत्व नियंत्रण कार्यक्रम (१९७६), (८) आयोडीन अभावजन्य विकार कार्यक्रम (१९८७), (९) विस्तारित लसीकरण कार्यक्रम (१९७८), (१०) कुटुंबकल्याण कार्यक्रम (१९७७), (११) पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रम (१९५४) आणि गतिशील ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम (१९७२), (१२) नारू निर्मूलन कार्यक्रम (१९८३), (१३) किमान गरजा कार्यक्रमातील आयोग्यविषयक उद्दिष्ट्ये (१९७४), (१४) मधुमेह नियंत्रण कार्यक्रम (सातवी पंचवार्षिक योजना) आणि (१५) एड्‌स नियंत्रण कार्यक्रम (१९८५).

सार्वजनिक आरोग्य सेवेच्या व्यापक कार्यक्रमांसाठी आवश्यक अशा प्रशिक्षित वैद्यकीय व परावैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकार काही शिक्षण संस्था चालविते (संस्थांच्या यादीत पुढे पाहणे). देशव्यापी सेवेच्या जाळ्यांची कार्यक्षमता ही मर्यादित वाहतूक साधने, अपुऱ्या संपर्क सुविधा आणि सामाजिक बंधनांमुळे प्रवर्तनातील (प्रयोजकतेतील) अडथळे या अडचणींमुळे सर्व राष्ट्रांमध्ये सारखीच विकसित होत नाही. तरीही अशा सेवांचे यश देवी निर्मूलन, हिवतापावर बव्हंशी नियंत्रण, कावीळ, अलर्क रोग, कुष्ठरोग, निद्रारोग, हत्तीरोग, बालमृत्यू, बाळंतरोग यांमधील लक्षणीय घट यांमधून प्रकट होते. वाढती लोकसंख्या, कुपोषण आणि आर्थिक विषमता यांमुळे सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या प्रयत्नांना मर्यादा पडतात, असे तज्ञ अहवालामधून दिसून येते. (→रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य).

इतर विशेष शाखा : वैद्यकीय ज्ञानाचे उपयोजन काही विशेष क्षेत्रांमध्ये आरोग्यरक्षणासाठी होत असते व त्यातून वैद्यकीय ज्ञानातही भर पडते. अलीकडच्या काळात विकसित झालेली वैद्यकीय क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

औद्योगिक वैद्यक : कामगारांमध्ये होणारी दीर्घकालीन विषाक्तता, संभाव्य अपघात, बालकामगारांची उद्योगातील धोक्याच्या ठिकाणी उपस्थिती, सुरक्षिततेचे उपाय,⇨प्रथमोपचार, नियमित वैद्यकीय तपासणी, सक्तीची विश्रांती यांसारखे प्रश्न या क्षेत्रातील तज्ञांना हाताळावे लागतात. तसेच संरक्षक कपडे, विशिष्ट रसायनांसाठी उतारे, अपघातजन्य विकलांगतेचे मूल्यमापन व व्यवस्थापन आणि परिसरातील आरोग्यविघातक धोके यांबाबतही उद्योगांना मदत करावी लागते. यांत्रिक व रासायनिक कारखान्यांपासून सुरू झालेल्या औद्योगिक विकासाचा आवाका आता खूपच विस्तीर्ण झाल्यामुळे औद्योगिक वैद्यकात विविध विकारांचा परामर्ष घेतला जातो. अति-उष्ण, अतिशीत, अंधारमय किंवा अतिप्रकाशयुक्त, अतिदाबाचे, गोंगाटमय, धूलिकामय, किरणोत्सर्गयुक्त अशा विविध वातावरणांमध्ये कामगारांवर सतत आघात होत असतात. त्यामुळे शारीरिक व मानसिक विकारांची शक्यता वाढते. खाणकामगारांचे आजार, ॲस्बेस्टसजन्य श्वसनविकार, कर्करोग, मनोदुर्दशा, दृष्टिदोष, बहिरेपणा, अल्परक्तता अशी अनेक उदाहरणे देता येतील. अलीकडील काळातील भोपाळ येथील वायुगळती हे ठळक उदाहरण या क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट करते. [→ औद्योगिक वैद्यक औद्योगिक मानसशास्त्र व्यावसायिक चिकित्सा].

लष्करी वैद्यक : यात हाताळल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये युद्धजन्य जखमा, विकलांगता, प्रतिकूल परिस्थितीत राहिल्याने होणारे शारीरिक व मानसिक आजार, मनोधैर्य कमी होणे, लष्करी सेवेसाठी आवश्यक शारीरिक पात्रता व तिची जपणूक, छावणीतील अन्न व पाणी, पर्यावरण, गुप्तरोगांपासून रक्षणासाठी लैंगिक शिक्षण, दुखण्याचा बहाणा करणारे कामचुकार इत्यादींचा समावेश होतो. सैनिकांच्या कुटुंबियांसाठी सर्व प्रकारची तज्ञ सेवा असलेली रुग्णालये लष्कर चालविते. त्यांचा फायदा आसपासच्या नागरी लोकवस्तीलाही मिळतो. यांशिवाय हवाई दलाकडून कमी दाबाच्या वातावरणाचे परिणाम आणि अवकाश उड्डाणाशी संबंधित बदल व विकार यांवर संशोधन केले जाते. नाविक दलाचेही वातावरणसंबद्ध खास प्रश्न असतात. [→ सैनिकी वैद्यकीय सेवा].

अणुकेंद्रीय वैद्यक : जपानमधील १९४५ सालच्या पहिल्या अणुबॉंब स्फोटामुळे किरणोत्सर्गजन्य भयानक परिणामांचे चित्र वैद्यकीय जगापुढे उभे राहिले. तेव्हापासून अणुऊर्जेच्या विकासातील आरोग्यविषयक धोके कोणते आहेत व ते कसे कमी करता येतील यांबद्दल विस्तृत अभ्यास झाला आहे. संभाव्य अपघाती अणुस्फोटामुळे लोकांमध्ये दीर्घकालीन आजारांचे (वंध्यत्व, रक्तक्षय, श्वेतकोशिकामयता, कर्करोग इ.) प्रमाण अनेक पटींनी वाढेल, हा चिंतेचा विषय झाला आहे. तसेच अणुहल्ल्यापेक्षा कमी तीव्रतेचे विकिरण जेथे संभवते अशा क्षेत्रांमध्ये (उदा., अणुऊर्जानिर्मिती, वैज्ञानिक संशोधन, वैद्यकीय निदान व चिकित्सा) दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात हेही स्पष्ट झाले आहे. अशा अनिष्ट परिणामांची वैद्यकीय तपासणीने दखल घेणे व वेळीच योग्य ते प्रतिबंधक उपाय सुचविणे हे या शाखेचे कार्य आहे. किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचा) वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयोग विकसित करण्यासाठी संशोधनही अणुकेंद्रीय वैद्यक करीत असते. आयोडीन, फॉस्फरस, लोह, क्रोमियन, कार्बन, हायड्रोजन यांचे समस्थानिक वैद्यकीय निदान, चिकित्सा व संशोधन यांसाठी वापरले जातात. [→ अणुऊर्जेचे शांततामय उपयोग].


क्रीडावैद्यक : क्रीडाक्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि विक्रमी यश मिळविण्याचे प्रयत्न यांमुळे क्रीडापटूंसाठी शरीरक्रियाविज्ञानावर आधारित व्यायाम, क्रीडासराव, पोषक आहार, विश्रांती, निरोगी जीवनपद्धती यांची आवश्यकता असते. तसेच क्रीडापटूंना होणाऱ्या दुखापती व आजार यांवर क्षमता कमी न करणारे व त्वरित परिणामकारक ठरणारे उपचार करावे लागतात. खेळात भाग घेण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून शारीरिक ताणाने वाढू शकणारा एखादा दोष किंवा आजार आधीच नसल्याची खात्री करणेही आवश्यक ठरते. यांशिवाय विशिष्ट कार्यदर्शी चाचण्यांच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेचे मापन करून तिच्या संभाव्य कामगिरीचा अंदाज बांधण्यास वैद्यक मदत करू शकते. अशाच अभ्यासांच्या मदतीने प्रशिक्षणामुळे होणारी प्रगतीही मोजता येते व प्रशिक्षणात योग्य ते बदल सुचविता येतात.

सामान्य माणसाच्या आधुनिक राहणीमध्ये शारीरिक हालचाली कमी होऊन शरीरक्रियात्मक क्षमता मर्यादित होत असते. तिला योग्य व्यायामाने पुन्हा इष्ट पातळीवर आणण्यासाठी क्रीडावैद्यकात बरेच संशोधन होत आहे. अशा विविध प्रकारच्या शारीरिक प्रशिक्षणाने कष्टकारक आणि ताण निर्माण करणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यायला शरीर जास्त सक्षम होते व आजार टाळता येतात. रोमन काळात व आयुर्वेदीय वैद्यकात व्यायामाचे महत्त्व सिद्ध झालेच होते. त्याचा शरीरक्रियात्मक पुनर्विचार करून क्रीडावैद्यक संतुलित व्यायामांवर भर देते [→ व्यायाम].

वैद्यक व आरोग्याशी संबंधित संस्था : या क्षेत्रासाठी आवश्यक ते मार्गदर्शन, संघटन, परस्परसंपर्क, प्रशिक्षण, संशोधन, प्रकाशन आणि व्यावसायिक नियंत्रण या सर्व आघाड्यांवर सक्रिय राहण्यासाठी अनेक संस्था अस्तित्वात आहेत. उद्दिष्टांच्या प्राधान्यानुसार त्यांचे पुढीलप्रमाणे वर्ग करता येतील.

मार्गदर्शक व साहाय्यक : जागतिक पातळीवर आरोग्यविषयक समस्यांचा सर्वंकष अभ्यास करून सर्व राष्ट्रांना त्यांच्या धोरणांच्या आखणीसाठी मार्गदर्शन ⇨जागतिक आरोग्य संघटना करते. `जगातील सर्व समूहांनी आरोग्याची शक्य तेवढी उच्च पातळी गाठावी’ हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. ते साधण्यासाठी ही संघटना पुढील कार्ये अंगिकारताना दिसते : (१) सभासद राष्ट्रांच्या आरोग्य विभागांशी आणि विविध व्यावसायिकांच्या गटांशी संबंध ठेवून आरोग्य कार्यास दिशा दाखविणे (२) स्थानिक गरजेनुसार रोगनिर्मूलन व नियंत्रण, आरोग्य सेवकांचे प्रशिक्षण आणि राष्ट्रीय आरोग्य सेवांना बळकटी आणण्याच्या इतर कार्यक्रमांना मदत करणे (३) नैसर्गिक आपत्ती व इतर आणीबाणीच्या आरोग्यदुर्घटनांमध्ये साहाय्य करणे (४) जगातील अग्रेसर अशा नऊशे राष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने वैज्ञानिक माहितीची देवघेव घडवून आणणे व आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प कार्यान्वित करणे (५) साथीच्या रोगांवर सतत लक्ष ठेवून अचूक माहितीची देवाणघेवाण तत्परतेने घडविणे, आंतरराष्ट्रीय नियमांचे (लसीकरण, विलग्नवास, वाहनांचे निर्जंतुकीकरण इ.) पालन कसोशीने घडवून आणणे (६) विस्तृत प्रमाणात उपद्रवकारी अशा उष्ण कटिबंधीय संसर्गजन्य रोगांवर विशेष भर देऊन संबंधित देशांमध्ये संशोधनक्षमता विकसित करणे (७) औषधे, लशी व इतर पदार्थांच्या गुणवत्तेसंबंधी मानके ठरविणे व मानकीकृत पदार्थांच्या निर्मितीसाठी मानक पदार्थ निर्माण करून पुरविणे (८) आरोग्यविषयक प्रदत्तांचे (माहितीचे) संकलन करून सांख्यिकीय विश्लेषण करणे, कर्करोग, हृद्‌रोग, मानसिक विकास इत्यादींच्या तुलनात्मक अभ्यासास यामुळे मदत होते (९) औषधांच्या अनिष्ट प्रतिक्रियासंबंधी सर्व देशांतून माहिती गोळा करून ती प्रसृत करणे, परिसर प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या विघातक परिणामांची चिकित्सापूर्ण छाननी करून तीही प्रसृत करणे (१०) वैज्ञानिकांच्या व व्यावसायिकांच्या गटांमधील सहकार्य वाढविण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय मेळावे, करार, शिष्यवृत्त्या इत्यादींना प्रोत्साहन देणे आणि (११) आरोग्यविषयक प्रश्नांबद्दल जनतेत प्रबोधनाने मत परिवर्तन घडविणे.

जागतिक आरोग्य संघटनेचे काही उल्लेखनीय कार्यक्रम पुढीलप्रमाणे असून सतत चालू असणाऱ्याच कार्यक्रमांची फक्त प्रारंभीची वर्षेच येथे दिली आहेत : देवी निर्मूलन (१९५८–७७) रोगवाहक कीटक नियंत्रण (१९६०) विस्तारित लसीकरण (१९७४) उष्ण कटिबंधी रोग संशोधन व प्रशिक्षण (१९७५) नवीन लशींचा विकास (१९८४) आंतरराष्ट्रीय पेय जल पुरवठा व स्वच्छता दशक (१९८१–९०) अतिसारी विकार नियंत्रण सुरक्षित मातृत्व उपक्रम मातेच्या दुधाला पर्यायी अन्नांच्या विक्रीबद्दल आंतरराष्ट्रीय संहिता (१९८१) अन्नमानकांची स्थापना व अन्नसमावेशकांची सुरक्षितता (१९६३) अत्यावश्यक औषधांची आदर्श यादी (१९७७) औषधव्यसनाधीनता मार्गदर्शन (१९८६) आंतरराष्ट्रीय निर्वासितांना साहाय्य जागतिक पोषण साहाय्य (१९८७) आणि एड्‌स कार्यक्रम (१९८७, रक्तपेढ्या, प्रशिक्षण, सर्वेक्षण, निदान व उपचार).

सर्वांसाठी आरोग्य : १९७८ मध्ये रशियातील आल्माआता येथे युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त परिषदेत आरोग्य सेवांच्या तत्कालीन स्थितीबद्दल विचार झाला. या कार्यातील अपयशाची दखल घेऊन आरोग्यस्थितीबद्दल अस्तित्वात असलेल्या विषमतेवर उपाय म्हणून १३४ राष्ट्रांनी आणि अनेक स्वयंसेवी संघटनांनी ` इ. स. २००० सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टाची पूर्ती करावी’ असे ठरविले. `प्राथमिक आरोग्य निगा’ हा या उद्दिष्टासाठी स्वीकारलेला मार्ग आहे असे घोषित झाले. १९८१ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या धोरणास पूरक अशी कार्यावली स्वीकारली. जगातील सर्व नागरिकांना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या उत्पादक (निर्मितिक्षम) जीवन व्यतीत करता येईल, अशी आरोग्य पातळी गाठण्याचा हा प्रयत्न आहे. याचा अर्थ २००० सालापर्यंत सर्व लोक निरोगी होतील असा नसून, उपलब्ध आरोग्य सेवांची सर्वांच्या आवाक्यात येतील अशी मांडणी करणे असा होता. पुढील किमान गरजांची पूर्तता यात अंतर्भूत आहे : (१) घरात किंवा पंधरा मिनिटे चालण्याच्या अंतरावर सुरक्षित पिण्याचे पाणी, तसेच घरात किंवा अगदी जवळच स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध होणे (२) घटसर्प, डांग्या खोकला, बालपक्षाघात (पोलिओ), धनुर्वात, गोवर व क्षय यांविरुद्ध लसीकरण करणे (३) एका तासाच्या प्रवासाच्या अंतरावर स्थानिक वैद्यकीय देखभाल म्हणजे सु. वीस अत्यावश्यक औषधे उपलब्ध असलेली सेवा मिळणे (४) प्रसूती, प्रसूतिपूर्व काळजी आणि कमीतकमी एक वर्षापर्यंत मुलांची देखभाल यांसाठी प्रशिक्षित सेवकवर्ग उपलब्ध असणे (५) पोषक आहारांसाठी योग्य असा अन्नपुरवठा होणे आणि (६) स्थानिक रोगांबद्दल प्रतिबंध आणि नियंत्रण यांसंबंधी लोकशिक्षण व योग्य ते उपचार.

सभासद राष्ट्रांनी योग्य ते बदल करून आपली धोरणे १९८१ नंतर आखली व त्यांच्या मूल्यमापनासाठी सूचक निर्देशक ठरविले.

जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न संस्था : आंतरराष्ट्रीय पातळीवरील आरोग्यविषयक संस्थांना संभासद करून घेण्यासाठी १९४९ मध्ये कौन्सिल फॉर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मेडिकल सायन्सेस ही परिषद जागतिक आरोग्य संघटनेने स्थापन केली. तिच्यातर्फे त्रैवार्षिक सभा, विशेष गोलमेज सभा, जागतिक परिषदांचे वेळापत्रक, रोगांची आंतरराष्ट्रीय नामावली यांसारखी कामे होतात. हिचे सु. शंभर संघटना सभासद वा सहयोगी सभासद आहेत. यांखेरीज आणखी सु. शंभर संघटना जागतिक वा प्रादेशिक पातळीवर काम करीत आहेत.

व्यावसायिकांच्या संघटना : वैद्यकीय शाखोपशाखांच्या आणि परावैद्यकीय व्यावसायिकांच्या अनेक संघटना आहेत. त्या आपल्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी ज्ञानसत्रे, परिषदा, कार्यशाळा, नियतकालिके इत्यादींचा उपयोग करतात. सभासदांमध्ये व्यावसायिक, संशोधक व शिक्षक यांचा समावेश असतो. जागतिक वैद्यक संघटनेने अनेक प्रश्नांसंबंधी व्यावसायिक आचारसंहिता तयार केल्या आहेत उदा., वैद्यकीय नीतिसंहिता, युद्धकाळातील कर्तव्ये, मृत्युदंडासंबंधी कर्तव्ये, उपचारार्थ गर्भपात, गोपनीय माहिती इत्यादी. भारतातील इंडियन मेडिकल असोसिएशन, ब्रिटन व अमेरिकेतील तशाच स्वरूपाच्या संघटना, अखिल भारतीय दंतवैद्य संघटना, भारतीय प्रशिक्षित परिचारिका संघटना, भारतीय औषधनिर्माण संघटना यांचा उल्लेख उदाहरणादाखल करता येईल.

विशिष्ट रोग किंवा समस्या यांना वाहिलेल्या सामाजिक व व्यावसायिक संस्था : मर्यादित क्षेत्रातील वैज्ञानिक प्रगतीचा लाभ सर्व रुग्णांना पोहोचविणाऱ्या या संस्था विशिष्ट आजारांची सामाजिक व आर्थिक बाजू विशेष आस्थेने हाताळतात. सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती व विश्वस्त न्यास यांचा विशेष हातभार या कामासाठी आवश्यक असतो. हिंद कुष्ठ निवारण संघ, भारतीय क्षयरोग संघटना, भारतीय बालकल्याण परिषद, भारतीय कुटुंबनियोजन संघटना, राष्ट्रीय अंध संघटना, अंध साहाय्यक समाज, कस्तुरबा वैद्यकीय निधी असे अनेक संघ भारतात आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर रेडक्रॉस, युनिसेफ, फोर्ड प्रतिष्ठान, रॉकफेलर प्रतिष्ठान, यू. एस. केअर या संस्थांची उदाहरणे देता येतील. यांशिवाय मधुमेह, अधरपक्षाघात, दमा, आकडी, संधिवात, दंतक्षय, मतिमंदता, अपंगत्व, बहुविध कर्कशीभवन, द्राक्षार्बुद विकार, कवचयुक्त (द्रवार्बुदीय) तंत्वात्मकता या आजारांसाठी स्वतंत्र संस्था कार्य करीत आहेत.

व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कायदेशीर अधिकारप्राप्त निमसरकारी संस्था : भारतीय वैद्यक परिषद ( मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया एमसीआय), राज्यांच्या वैद्यक परिषदा (उदा., महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल), देशी वैद्यकांसाठी मध्यवर्ती परिषद (सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन), भारतीय औषधनिर्माण परिषद (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया), भारतीय दंतवैद्यक परिषद (डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया) आणि भारतीय रुग्णपरिचर्या परिषद ( इंडियन नर्सिंग कौन्सिल) या संस्थांचा समावेश यांत होतो. त्यांपैकी भारतीय वैद्यक परिषद ही महत्त्वाची संस्था उदाहरणादाखल घेतली आहे. १९३३ पासून अस्तित्वात असलेली ही परिषद १९५८ च्या कायद्याने पुनर्घटित झाली. केंद्र व राज्य सरकारे, विद्यापीठे व व्यावसायिक यांचे प्रतिनिधी एकत्र येऊन तयार झालेली ही संस्था असते. राज्यांमधील आपल्या संलग्न परिषदांमार्फत आधुनिक वैद्यकाच्या सर्व व्यावसायिकांची नोंदणी करून मध्यवर्ती नोंदणी पुस्तक तयार करणे व ते दरवर्षी अद्ययावत करणे हे हिचे मुख्य काम असते. नोंदलेल्या व्यक्तींना भारतात कोठेही व्यवसाय करता येतो. शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये पद धारण करता येते, न्यायालयात तज्ञ म्हणून साक्ष देता येते आणि जन्म, मृत्यू, व्यंग, शारीरिक पात्रता यांसंबंधीच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर सही करण्याचा अधिकार प्राप्त होतो.

परिषदेची इतर प्रमुख कार्ये : वैद्यकीय शिक्षणाच्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांबद्दल विद्यापीठांना मार्गदर्शन, शिक्षण संस्थांनी पूर्ण करावयाच्या किमान अटींचे निकष आखून देणे, ते पूर्ण करणाऱ्या संस्थांना तपासणी करून मान्यता देणे, विद्यापीठांच्या परीक्षा चालू असताना भेटी देऊन त्यांची पद्धती तपासणे, किमान गुणवत्तेचे निकष ठरवून देणे, विविध कायदेशीर बाबींसाठी पदव्यांच्या अनुसूची तयार करणे, परदेशी पदव्यांची मान्यता व परस्पर मान्यता यासंबंधी धोरण ठरविणे, आवश्यक तेव्हा संस्था अगर पदव्या यांची (नोंदणीसाठी) मान्यता काढून घेणे, व्यावसायिक वर्तन व शिष्टाचार यांचे मानदंड ठरविणे आणि कोणत्या प्रकारचे नियमभंग अपकीर्तिकारक किंवा निंद्य आचरण समजावेत यांबद्दल निर्देशन करणे.

राज्यातील परिषदा विविध राज्यांमध्ये स्वतंत्र कायद्यांनी स्थापन झाल्या आहेत. त्यांच्या रचनांमध्ये थोडेफार फरक आहेत. व्यावसायिकांची नोंदणी, प्रशिक्षण काळात तात्पुरती नोंदणी, आचारसंहिता, नियमभंगाबद्दल ताकीद देणे किंवा नोंदणी स्थगित करणे अशा उपायांविरुद्ध अपीलांची सुनावणी, शिक्षण संस्थांची पाहणी ही कार्ये या परिषदा करतात. तसेच या परिषदा नवीन पदव्या, अर्हता, संस्था यांचा अनुसूचीमध्ये समावेश करण्याबद्दल भारतीय वैद्यक परिषदेला शिफारशी करू शकतात.

भारतीय वैद्यक परिषदेप्रमाणेच नोंदणी व व्यावसायिक शिक्षणाचे नियंत्रण करण्याचे कार्य इतर परिषदा आपापल्या क्षेत्रात करतात व त्यांची राज्यातील साहाय्यक मंडळे असतात. भारतीय रुग्णपरिचर्या परिषद नोंदणीसाठी परिचारिकांचे विभाजन परिचारिका, सुईण, साहाय्यक परिचारिका तथा सुईण आणि स्वास्थ्य परिचर (आरोग्यप्रचारक किंवा सार्वजनिक आरोग्य परिचारिका) या चार गटांमध्ये करते. भारतीय दंतवैद्यक परिषद आपली नोंदणी दंतवैद्य, दंतस्वच्छक आरि दंतयामिक अशा तीन विभागांत करते. भारतीय औषधनिर्माण परिषदेकडून केली जाणारी नोंदणी औषधनिर्माता या एकाच सदराखाली होते. अशी नोंदणी केल्याशिवाय औषध निर्माण व वितरण करणे ही कामे वैद्यकीय व्यावसायिक आपल्या स्वत:च्या रुग्णांसाठी करू शकतात परंतु त्यांनाही घातक औषधांचे मर्यादित साठे ठेवणे, त्यांचा हिशोब ठेवणे, साठवणीची योग्य पद्धती यांबद्दल अन्न व औषध विभागाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. देशी वैद्यकाची परिषद आयुर्वेदिक, सिद्ध, युनानी यांसारख्या वैद्यकांच्या व्यावसायिकांची नोंदणी करते आणि त्यांची स्वतंत्र नोंदपुस्तके ठेवते. अशा रीतीने वैद्यक व्यवसायाच्या सर्व अंगांवर नियंत्रण ठेवले जाते आणि अनभिज्ञ व अनधिकृत व्यक्तींपासून समाजाला संरक्षण मिळते. देशात कोणकोणत्या वैद्यक पद्धतींना मान्यता द्यायची याबद्दल निरनिराळे धोरण विविध राष्ट्रांमध्ये अनुसरलेले आढळते. [→ वैद्यकीय संस्था व संघटना].

वैद्यकीय संशोधन : आधुनिक वैद्यकातील संशोधनात सुनियोजित, संघटित आणि अनेक पातळ्यांवरील प्रयत्नांना आता महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रयोगशाळेतील संशोधनात प्रगत भौतिकी व रासायनिक तंत्रांचा वापर अपरिहार्य झाल्यामुळे हे संशोधन बरेच खर्चिक असते. त्यातून शरीरक्रिया व रचना, विकृतीची प्रक्रिया, रासायनिक बदल यांबद्दल नवीन माहिती मिळत जाते व तिचा उपयोग प्रतिबंध व उपचार यांच्या विकासासाठी करता येतो उदा., रक्तदाब, संधिवात व कर्करोगावरील औषधे. हे संशोधन मुख्यत: प्रायोगिक प्राणी, शस्त्रक्रियेने काढलेले मानवी ऊतक आणि मृतदेह यांचा वापर करून होत असते. चिकित्सेय संशोधनात रुग्ण आणि निरोगी स्वयंसेवक यांचा उपयोग होतो. त्यांना पूर्ण माहिती देऊन त्यांची संमती घेतलेली असते. विकृतिजन्य बदलांच्या निदानासाठी उपयुक्त आविष्कार, रोगांच्या विविध अवस्थांमधील सूक्ष्म फरक आणि प्रयोगशाळेत यशस्वी ठरलेल्या उपचारांच्या मानवी चाचण्या यांचा समावेश या संशोधनात होतो. उपलब्ध उपचार तंत्रांचा तौलनिक अभ्यासही करता येतो. सर्वेक्षणस्वरूप संशोधन रुग्णांमध्ये किंवा साधारण लोकसमूहामध्ये केले जाते. रोगांची मुख्य व साहाय्यक कारणे (उदा., व्यवसाय, वयोगट, सवयी, व्यसने, परिसर, आहार) शोधण्यासाठी, तसेच साथीचे रोग, प्रदेशनिष्ठ रोग यांचा विनाविलंब शोध घेण्यासाठी ही सर्वेक्षणे उपयोगी ठरतात.

रुग्णालयातून घरी परतलेल्यांचे पुनर्वसन, दीर्घकालीन विकारांमुळे राहणीच्या गुणवत्तेत पडणारा फरक, रुग्णालयीन समस्यांचे व्यवस्थापन, रुग्ण-वैद्य परस्परसंबंध हे विषयही आता संशोधनात हाताळले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने १९६० सालानंतर पारंपरिक वैद्यक, सांस्कृतिक पार्श्वभूमी, पूरक उपचार पद्धती यांसारख्या क्षेत्रांकडेसुद्धा संशोधकांचे लक्ष जात आहे.

संशोधनाचे कार्य महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय किंवा खाजगी प्रयोगशाळा, व्यापारी औषध-उत्पादक संस्था, कृषी विद्यापीठे, पशुवैद्यक संस्था यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये चालते. त्यांना आर्थिक साहाय्य, मार्गदर्शन व नियंत्रण यांची जबाबदारी घेणाऱ्या संस्थांमध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंधान (संशोधन) परिषद ( इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च), वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषद (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च सीएसआयआर), ब्रिटनमधील मेडिकल रिसर्च कौन्सिल यांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय संशोधनातील अग्रगण्य संस्थांपैकी काही अशा : सिबा फौंडेशन, वेलकम ट्रस्ट, नफ्‌फील्ड फौंडेशन, रॉकफेलर इन्स्टिट्यूट, इंपीरियल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट, कार्नेजी इन्स्टिट्यूट, साल्क इन्स्टिटयूट, पाश्चर इन्स्टिट्यूट समूह, कॉख इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शस डिसीजेस, रशियन इन्स्टिट्यूट फॉर एक्स्परिमेंटल मेडिसिन वगैरे.


वैद्यकीय संशोधन करणार्यान भारतातील प्रमुख संस्था पुढील आहेत : (१) सेंट्रल जल्मा इन्स्टिट्यूट फॉर लेप्रसी, आग्रा (२) सेंट्रल पब्लिक हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली (३) फूड अँड ड्रग टॉक्सिकॉलॉजी रिसर्च सेंटर, नवी दिल्ली (४) सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट, लखनौ (५) इंडियन टॉक्सिकॉलॉजी रिसर्च सेंटर, लखनौ (६) इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन मेडिकल स्टॅटिस्टिक्स, चेन्नई (७) इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्शन, परळ, मुंबई (८) इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहीमॅटॉलॉजी, मुंबई (९) लॅबोरेटरी ॲनिमल्स इन्फॉर्मेशन सेंटर, हैदराबाद (१०) नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कॉलरा अँड एंट्रेसिक डिसीजेस, कोलकाता (११) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्‌फेअर, नवी दिल्ली (१२) नॅशलन इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, बंगलोर (१३) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद (१४) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे (१५) नॅशनल ट्युबरक्युलॉसिस इन्स्टिट्यूट, बंगलोर (१६) व्हेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटर, पॉंडिचेरी (१७) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, अहमदाबाद (१८) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, दिल्ली (१९) मलेरिया रिसर्च सेंटर, दिल्ली आणि (२०) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायॉलॉजी, कोलकाता (२१) नॅशनल एड्‌स रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी), पुणे (२२) मायक्रोबियल कन्‌टॅमिनेट कॉंप्लेक्स, पुणे (२३) एंटेरोव्हायरस रिसर्च सेंटर, मुंबई (२४) जेनेटिक्स रिसर्च सेंटर, मुंबई (२५) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमिऑलॉजी, चेन्नई (२६) सेंटर फॉर रिसर्च इन मेडिकल एंटॉमॉलॉजी, मदुराई.

जागतिक पातळीवर वैद्यकीय संशोधने प्रकाशित करणाऱ्या नियतकालिकांची संख्या वीस हजारांहून जास्त आहे, १९८५ मधील एका पाहणीनुसार भारतातील आधुनिक वैद्यकविषयक नियतकालिकांची संख्या ११३ होती व ती ४२ विषय हाताळत होती. नियतकालिकांची प्रचंड संख्या व त्यांतून आवश्यक ते संदर्भ शोधून काढण्यातील अडचणींवर मात करण्यासाठी सारांशरूपाने त्यांचे संकलन करणारीही अनेक प्रकाशने आहेत. तसेच महत्त्वाच्या नियतकालिकांचा अंतर्भाव करणारे संगणक कार्यक्रमणही (सॉफ्टवेअरही) जगात सर्वत्र वापरले जातात.

आधुनिक वैद्यकाचे भवितव्य : आधुनिक वैद्यकाची विज्ञानाशी झालेली जवळीक आणि त्यामुळे त्याला लाभलेली विज्ञानाधिष्ठता गेल्या दोन-तीन शतकांमध्येच विकसित झालेली आहे परंतु त्याचे मानवी संस्कृती, लोककल्पना आणि धर्म यांच्याशी असलेले नाते फार जुने आहे. वाढत्या वैज्ञानिक वस्तुनिष्ठतेमुळे व्यावसायिकांची रुग्णांकडे पाहण्याची दृष्टी आणि त्यांच्या सेवेची कार्यपद्धती यांमध्ये यांत्रिकपणा येत आहे, असा काही विचारवंतांचा आक्षेप आहे. वस्तुनिष्ठतेचा लाभ घेत असतानाच हे व्यावसायिक आपल्या रुग्णाकडे एक संपूर्ण व्यक्ती किंवा समाज घटक म्हणून पाहण्याऐवजी रोगग्रस्त शरीर धारण केलेला सजीव प्राणी म्हणून पाहतात, असा त्यांचा सूर असतो. याउलट काटेकोर वैज्ञानिक तंत्रांच्या पलीकडे जाणारे वैद्यक हे एक मानवी तत्त्वज्ञान आहे आणि त्यात मानवजातीच्या सामुदायिक इच्छा-आकांक्षाच प्रतीत होत असल्यामुळे ते नेहमी अपूर्णच परंतु असमाधानी राहणार असा अन्य पक्षाचा दावा आहे. या अपूर्णतेतून आरोग्याचा कधीही न संपणारा शोध चालू राहील व आरोग्याची संकल्पना बदलत राहील, अशी भूमिका या प्रगतिवादी विचारवंतांनी घेतली आहे. या प्रक्रियेत साकल्यवादी दृष्टीचा थोडाफार र्हालस होणे अपरिहार्य ठरते. या पार्श्वभूमीवर वैद्यकाचे विज्ञान व व्यवहार यांतील संभाव्य बदलांकडे बघावे लागेल. रोगप्रतिबंध, निदान व उपचार या तिन्ही क्षेत्रांत हे बदल आढळून येतात.

प्रतिबंधात्मक उपायांमध्ये प्रतिरक्षाविज्ञानाचा अभ्यास प्रकर्षाने जाणवतो. बहुसंख्य सूक्ष्मजंतू आणि बालपक्षाघात, देवी, गोवर यांसारख्या रोगांचे विषाणू यांच्याविरुद्ध यश मिळाल्यावर आता हिवताप, एड्‌स (AIDS → रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग) या संसर्गजन्य रोगांसाठी लशी विकसित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. विषाणू व परजीवी यांच्याबरोबरच संततिप्रतिबंध, कर्कार्बुद या क्षेत्रांतही रोगप्रतिकारक यंत्रणा राबविण्यासाठी अभ्यास सुरू आहे. संसर्गाचा प्रतिबंध जंतुनाशनाने करण्याच्या पद्धतींमध्ये रासायनिक द्रव्यांऐवजी गॅमा किरणांचा उपयोग वाढत्या प्रमाणात होत आहे. अणुऊर्जेच्या विकासाबरोबर ही पद्धत जास्त रूढ होत जाईल.

जीवनसत्त्वे, ऊष्मांक देणारे प्रमुख अन्नघटक (प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेटे) आणि कॅल्शियम, लोह इ. खनिजे यांनी पोषणातील भूमिका आता सर्वज्ञातच आहे. त्यापुढे जाऊन तांबे, जस्त, सिलिनियम, कोबाल्ट, फ्ल्युओरीन यांसारख्या अनेक मूलद्रव्यांचा सूक्ष्मपोषके म्हणून उपयोग आता समजू लागला आहे. स्निग्ध पदार्थांतील विविध वसाम्ले, त्यांची संपृक्तता (कमाल प्रमाण) आणि अन्नातील परस्परप्रमाण, जीवनसत्त्व-ई यांचा अपचयावर (भंजक चयापचयावर) होणारा परिणामही लक्षात आल्याने रक्तवाहिन्यांचे काठिण्य टाळण्यासाठी हे ज्ञान हळूहळू उपयोगी ठरत आहे. तांबे, ॲल्युमिनियम, अँटिमनी यांसारख्या घातक पदार्थांचा अन्नावाटे निर्माण होणाऱ्या दीर्घकालीन व मंदगती विकारजनकतेचा अभ्यासही आता काही चयापचयी रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी पडेल असे दिसते. उदा., विल्सन रोग, अल्‌झहाईमर रोग, विषाक्तता आणि काही व्यक्तींमध्ये आढळणारे चयापचयी विपथन यांमधील भेद या अभ्यासातून लक्षात येत असतो. परिसर प्रदूषणाचे रोगांच्या उद्‌भवात असलेले महत्त्व जाणण्यासाठी अनेक विषय आता हाताळले जात आहेत उदा., धूळ, धूर, औद्योगिक रसायने, ध्वनिप्रदूषण, धूम्रपान करणाऱ्याच व्यक्तींचे सान्निध्य वगैरे. या घटकांमुळे शारीरिक इजा, मानसिक ताण व मनोविकार होऊ शकतात. जलद आंतरराष्ट्रीय प्रवासाने निर्माण होणारे शारीरिक लयबध्दतेमधील बदल, सामाजिक परिसराने निर्माण होणारे मनोविकार, आधुनिक उपकरणांमधील सूक्ष्मविकिरणाने (सूक्ष्म प्रारणाने म्हणजे तरंगरूपी ऊर्जेने) घडून येणारे बदल यांच्या अभ्यासातूनही नव्या विकारांबद्दल वैद्यकशास्त्राला मिळणारी माहिती पुढे उपयोगी ठरणार आहे.

जननिक अभियांत्रिकीमुळे आनुवंशिक विकारांवर नियंत्रण ठेवण्याची शक्यता आता स्पष्ट दिसत आहे परंतु तिचा लाभ मानवाला मिळण्यास बराच काळ जावा लागेल. सध्या या तंत्रज्ञानाने सूक्ष्मजीवांमध्ये इष्ट असे फेरफार घडविणे शक्य होत आहे व त्याचा उपयोग कावीळ, अलर्क रोग यांसारख्या संसर्गाच्या लशी तयार करण्यासाठी होऊ लागला आहे. पुन:संयोगी डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल (रिकॉंबिनंट डीएनए) म्हणून ओळखले जाणारे हे तंत्र इतर विषाणू विकारांच्या लशी तयार करण्यासाठीही उपयोगाय येईल. संसर्गाच्या साथी किंवा देशज उद्‌भव यांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळत असतानाच रासायनिक प्रदूषणाचा धोका उद्‌भवू नये म्हणून जैव पद्धतींचा विकास अशा कामासाठी होत आहे उदा., कीटकांची पैदास रोखणे, जलशुद्धीकरण, शेतीशी संबंधित प्रक्रिया यांमधील जैव तंत्रे.

लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली वैद्यकीय तंत्रे अजून मर्यादित स्वरूपाची आहेत. सध्या उपलब्ध पद्धतीमध्ये स्त्रीपरुषांच्या शस्त्रक्रिया, निरोध आणि योनिपटलासारखी भौतिक साधने, जननमार्गातील श्लेष्मकलेत बदल घडवून आणणारी रसायने, हॉर्मोने व तांबीसारखी साधने आणि कृत्रिम गर्भपात यांचा समावेश होतो. या पद्धतींची स्वीकारार्हता सुधारणे व त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर प्रसार करणे ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून त्यांमध्ये अनेक सुधारणा होत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९८९ मध्ये वर्तविलेल्या अंदाजानुसार एकविसाव्या शतकाच्या अखेरीस जागतिक लोकसंख्या सु. १,३५० कोटींवर जाईल परंतु कुटुंबनियोजन जास्त प्रभावीपणे राबविण्यात यश आले, तर ही स्थिरावणूक ८५० कोटींच्या पातळीवर २०५० सालापर्यंत साधणे शक्य होईल. या यशप्राप्तीसाठी कमीत कमी मात्रेत व कमी वेळा ( महिन्यातून फक्त एकदा किंवा फक्त संभोगानंतर) घेण्याच्या गोळ्या, दीर्घकाल प्रभावी ठरणारी अंत:क्षेपणे (इंजेक्शने) किंवा त्वचेखालील रोपणमात्रा, पुरुषांनी घेण्याची औषधे, गर्भारपणात आवश्यक अशी नैसर्गिक हॉर्मोनांविरुद्ध प्रतिपिंड निर्माण करणाऱ्या लशी हे संभाव्य उपाय विकसित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

भारताची लोकसंख्या आणि आरोग्य यांविषयीची निवडक आकडेवारी कोष्टकामध्ये दिली आहे. त्यावरून हे लक्षात येईल की, वाढत्या लोकसंख्येला आरोग्यविषयक सेवासुविधा सतत कमी पडत राहतात.

उपचाराच्या क्षेत्राकडे पाहिल्यावर वैद्यकीय वैज्ञानिक प्रगतीच्या अनेक शक्यता लक्षात येतात. संसर्गजन्य रोगांच्या उपचारात नवीन प्रतिजैव पदार्थांचा शोध आणि जुन्यांचा त्याग ही प्रक्रिया आता जवळजवळ स्थायी स्वरूपाचीच होणार, असे दिसते परंतु त्याबरोबरच प्रतिजैव पदार्थाशिवाय रासायनिक द्रव्यांचे प्रमाणही उपचारात वाढत जाईल. परजीवींमुळे होणारे रोग आणि बहुतेक सर्व सूक्ष्मजंतुजन्य संसर्ग यांचा यशस्वी रासायनी चिकित्सेनंतर आता विषाणू व कर्क यांच्या रासायनी

भारताची लोकसंख्या आणि आरोग्य यांविषयीची निवडक आकडेवारी 

परिमाण 

पूर्वी (वर्ष) 

विसाव्या शतकाची अखेरची दशके (वर्ष) 

एकविसाव्या शतकाचा प्रारंभ 

एकूण लोकसंख्या (कोटी)

२३·८३ (१९०१)

८४·४ (१९९१)

१०२·८८ (२००१)

दर १,००० पुरुषांमागे स्त्रियांची संख्या

९७२ (१९०१)

९२९ (१९९१)

९३३ (२००१)

जन्मसमयी अपेक्षित आयुर्मर्यादा (वर्षे)

पुरुष २३·१ (१९०१) 

स्त्री २४·१ (१९०१)

पुरुष ५८·१ (१९९१) 

स्त्री ५९·१ (१९९१)

पुरुष ६१·८ (२००१) 

स्त्री ६४·१ (२००१)

साठपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ (प्रतिशत)

७·० (१९९१)

७·२ (१९९५)

७·८ (२००४)

दर १,००० लोकसंख्येस दरसाल – 

अ) जन्मदर  

आ) मृत्युदर 

इ) नैसर्गिक वाढ

४९·२ (१९१०) 

४३·६ (१९१०) 

६·६ (१९१०)

३०·४ (१९८९) 

१०·२ (१९८९) 

२०·२ (१९८९)

२६·१ (२००१) 

८·७ (२००१) 

१७·४ (२००१)

दर १,००० जन्मामागे 

अ) बालमृत्यू – एक वर्षात 

आ) शिशुमृत्यु – पाच वर्षात 

इ) प्रसूत मातेचा मृत्यू

२०४ (१९१५) 

२८२ (१९६०) 

२० (१९३८) 

६८ (१९९०) 

१४८ (१९९०) 

५·०० (१९९०) 

५८ (२००१) 

८१ (२००१) 

४·०७ (१९९८) 

प्रशिक्षित व्यक्तींचे प्रमाण 

दर १,००० लोकांमागे 

अ) डॉक्टर 

आ) दंतवैद्य 

इ) परिचारिका 

ई) दाया 

ड) औषधनिर्माते 

—- 

१९८७ सालामधील  

०·४२५ 

०·०१२ 

०·२८२ 

०·२३२ 

०·२०० 

२००४ सालामधील 

०·६० 

०·०६ 

०·८० 

०·४७ 

०·५६ 


चिकित्सेचे यश वाढत आहे आणि एकविसावे शतक हे अशा प्रकारच्या संशोधनाचे युग म्हणून ओळखले जाण्याची शक्यता आहे. एड्‌सवरील संशोधनाच्या प्रगतीवरून असे दिसते की, विषाणू व कर्क यांच्या क्षेत्रांत अनेक नवीन द्रव्ये आता उपलब्ध होतील आणि अगदी लवकर निदान झालेल्या रुग्णांना त्यांचा फायदा मिळेल. अशा निदानांच्या शक्यताही रोगप्रतिकारक्षमता तंत्रीय पद्धतींमुळे वाढत आहेत. शल्यचिकित्सेमध्ये इंद्रियांचे आरोपण, इंद्रियपेढ्या, ऊतकपेढ्या, संश्लेषणजन्य ऊतकपदार्थ इत्यादींच्या विकासामुळे शरीरातील अनेक अवयवांना किंवा शरीरक्रिया तंत्रांना पुनरुज्जीवनाची संधी देणे शक्य होणार आहे. ढोबळ आरोपणांच्या तंत्राबरोबरच सूक्ष्म ऊतक आरोपणाच्या शक्यताही आता वाढत आहेत. त्यामुळे जे विकार प्रामुख्याने औषध वैद्यकीय समजले जातात, अशा काही विकारांवरही (उदा., पार्किनसन कंपवातावर मेंदूच्या विशिष्ट भागांचे आरोपण, मधुमेहासाठी स्वादुपिंडातील बीटा पोषिकांचे आरोपण) हे तंत्र उपयोगी ठरेल. कुटुंबनियोजनाच्या वाढत्या प्रसाराबरोबर लोकसंख्येमधील वृद्ध आणि अतिवृद्ध व्यक्तींचे प्रमाण तुलनेने वाढत जाईल, तसे वृद्धांच्या विकारांवर, विशेषत: र्हवसनकारी (अपकर्षकारी) क्रियांवर, जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे रोग, मनोविकार, विकलांगता यांच्या उपचारांना जास्त महत्त्व प्राप्त होऊन त्यांच्यासाठी केवळ नवीन औषधांच्या शोधावर भिस्त न ठेवता जुन्या वैद्यक पद्धतींचा शोध घेणेही आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हेच उद्दिष्ट समोर ठेवून पारंपरिक वैद्यक पद्धतींच्या संशोधनास सु. १९६० पासून प्रोत्साहन दिले आहे. उदा., आयुर्वेद, युनानी, ईजिप्शियन, दक्षिण अमेरिकन, चिनी, मेक्सिकन इ. प्राचीन वैद्यकाबराबरच सध्या अस्तित्वात असलेल्या इतर उपचार पद्धतींपैकी कोणते उपचार आधुनिक वैद्यकास परस्परपूरक म्हणून स्वीकारता येतील, हेही आता पडताळले जात आहे. त्यांची संख्या सु. शंभराच्या घरात जाईल व त्यांतील अनेक केवळ एखाद्या देशापुरते किंवा सांस्कृतिक गटापुरते मर्यादित आढळतात. परंतु अन्य काही मात्र जगभर माहीत आहेत व त्यांच्या उपयुक्ततेमुळेच त्यांचा प्रसार झाला असावा. उदा., सूचिचिकित्सा, योग, आहारचिकित्सा, लंघन, निसर्गोपचार अशा पूरक उपचारांमध्ये रुग्णाची मानसिकता, सांस्कृतिक पार्श्वभूमी, रोगाबद्दलच्या त्यांच्या संकल्पना यांना अनेकदा फार महत्त्व असते, हेही आता जाणवत आहे.

वैद्यकीय व्यवसायात रुग्ण-वैद्य संबंधात मूलभूत असे बदल झालेले अनेक देशांत, विशेषत: पाश्चिमात्यात, दिसून येतात. रुग्ण हा ग्राहक असून त्याचे व त्याच्या आप्तांचे वैद्यकीय सेवांबद्दलचे काही हक्क असतात, ही जाणीव स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे या हक्कांच्या पूर्ततेसाठी जरूर तर कायद्याची मदत घेण्यात काहीही अयोग्य नाही, अशी विचारसरणीही मूळ धरत आहे. तीनुसार रुग्णहक्क संरक्षणाच्या यंत्रणांची व कायद्यांची निर्मिती, आजाराबद्दल पूर्ण वैद्यकीय माहिती प्राप्त करून घेण्याचा आग्रह आणि प्रसंगी निष्काळजीपणाबद्दल नुकसानभरपाईचे दावे यांचे प्रमाण वाढत आहे. वैद्यकीय व्यवसायातील कायद्याची वाढती उपस्थिती लक्षात घेऊन व्यावसायिकांसाठी अशा प्रसंगांसाठी विमायोजना उपलब्ध होत आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षणात कायदेशिक्षणावर भर देणे आणि व्यवसायातील सावधता या गोष्टीही अपरिहार्यपणे येत आहेत. वैद्यकीय व्यवसायात अनेकदा व्यक्ती किंवा संस्थांना जे निर्णय घ्यावे लागतात त्यांत नैतिकतेचा प्रश्न कठीण असतो. उदा., दयामरण, सुलभमृत्यू, इच्छामरणास साह्यभूत होणे, गर्भपात, इंद्रिय आरोपणासाठी जिवंतपणी इंद्रियदान, पर्यायी उपचारांचा बेसुमार खर्च, रुग्णालयातील शय्यांसाठी प्राधान्यक्रम ठरविणे वगैरे. या प्रश्नांचा मूलभूत विचार करणारी वैद्यकीय नीतिमत्ता ही एक अभ्यासशाखा आता आकार घेऊ लागली आहे. टेक्सस विद्यापीठातील अशा अभ्यासक्रमात धर्म, कायदा, इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान, कला, जराविज्ञान यांसारख्या विषयांचे वाचन व रुग्णसंपर्क यांचा समावेश आहे. या विषयांची पार्श्वभूमी असलेले नीतिज्ञ रुग्णालयातील निर्णयप्रक्रियेत उपचारकर्त्या डॉक्टरांना व प्रशासकांना मदत करतात. व्यवसायातील या बदलत्या वातावरणामुळे वैद्यकीय व्यवसायाचे केवळ एक परोपकारी सेवा असे स्वरूप बदलून त्याला व्यावसायिक व्यवस्थापनाची शिस्त लागेल, असे काही विचारवंतांचे मत आहे.

पहा : अंतस्त्य – प्रतिरोपण अपंग : कल्याण व शिक्षण अर्बुदविज्ञान आयुर्वेद आरोग्यविज्ञान इब्न सीना औषधिकोश औषधिक्रियाविज्ञान गेलेन चिकित्साशास्त्र जागतिक आरोग्य संघटना जीवरसायनशास्त्र दंतवैद्यक धन्वंतरि निसर्गोपचार न्यायवैद्यक पॅरासेल्सस, फिलिपस ऑरिओलस पशुवैद्यक प्रथमोपचार प्रसूतिविज्ञान बाराक्षार चिकित्सा बालरोगविज्ञान भौतिकी चिकित्सा भ्रूणविज्ञान मर्दन चिकित्सा मानसचिकित्सा युनानी वैद्यक योग चिकित्सा रासायनी चिकित्सा, रुग्णपरिचर्या रुग्णालय रुग्णवाहक रेझिस (राझी) रेडक्रॉस रोग रोगनिदान रोगप्रतिबंधक व सामाजिक वैद्यक वर्णचिकित्सा विकृतिविज्ञान विद्युत्‌ चिकित्सा विषविज्ञान विज्ञान वैद्यकीय उपकरणे वैद्यकीय प्रतिमादर्शन वैद्यकीय संमोहन वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय संस्था व संघटना वैमानिकीय वैद्यक व्यायाम व्यावसायिक चिकित्सा शरीरक्रियाविज्ञान शवपरीक्षा शुद्धिहरण सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य सूचिचिकित्सा     सूक्ष्मजंतुविज्ञान सूक्ष्मजीवविज्ञान स्त्रीरोगविज्ञान हिपॉक्राटीझ होमिओपॅथी क्ष-किरण वैद्यक ज्ञानेंद्रिये.

संदर्भ : 1. Byrne, P. Medicine, Medical Ethics and the Value of Life, New York, 1990.

           2. Camp, J. The Healer’s Art ( The Doctor through History), London, 1978.

           3. Moulvi, H. S. Indian Medical Council Act and Medical Practitioner’s Act, Nashik, 1992.

           4. Rhodes, P. An Outline History of Medicine, New yourk, 1985.

           5. Trotter, W. R. Man the Healer, London, 1975.

श्रोत्री, दि. शं.