वेमना : (सु. १४१२–१४८०). मध्ययुगीन तेलुगू संतकवी. या योगी पुरुषाचा जन्म कापू जातीच्या एका सधन शेतकरी कुटुंबात झाला असावा. त्याची मातापितरे, जन्मस्थान आणि काळ यांबद्दल विश्वसनीय अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. तथापि गुंतूर जिल्ह्यातील कोंडवीडू येथे त्याचा जन्म झाला असावा. त्याचा जीवनावधी सतराव्या शतकाच्या मध्यापासून ते अठराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकापर्यंत असावा, असेही एक मत आहे. वेमना अर्धशिक्षित असावा. त्याची समजली जाणारी चार सहस्रांहून अधिक पदे त्याने प्रत्यक्षतः लिहिलेली नाहीत. गावोगाव फिरत असताना जिज्ञासूंनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने तेथल्या तेथे पद्यमय उत्तरे दिली, ती त्याच्या शिष्यांनी लिहून त्यांचा संग्रह केला. वेमनाशतकम् या नावाने ती प्रसिद्ध आहेत. तारुण्यात त्याने ऐहिक सुखोपभोगांचा यथेच्छ आस्वाद घेतला. कालांतराने मात्र त्याचा वीट येऊन त्याने वैराग्यमय आयुष्य कंठावयास आरंभ केला पण पुढे यातही त्याला आयुष्याची इतिकर्तव्यता वाटेनाशी झाली. मानवी जीवनातील संघर्षाकडे पाठ फिरविणे त्याला पटेना. जीवनातील उदात्त निष्ठा त्या संघर्षात तावूनसुलाखून निघाल्या पाहिजेत, असे त्याच्या मनाने घेतले आणि मानवजातीच्या उद्धारार्थ प्रबोधन- संचार आरंभला. वेमनाला स्वानुभवांतूनच सत्याचे आकलन घडले. त्याने ते लोकांना ऐहिक व्यवहारातील घटनांच्या साहाय्याने पटवले. मानवी जीवनातील अनावर दुष्प्रवृत्तींच्या विरुद्ध त्याची प्रतिक्रियाही तीव्र आहे. स्वतःला पटलेले शुचित्व, सदाचार, नीतितत्त्वे आणि अद्वैत तत्त्वज्ञान यांचा जोरदार पुरस्कार करीत असतानाच त्याने अंधश्रद्धा, दुष्ट सामाजिक रूढी, कर्मठपणा आणि दंभाचार यांवर कडाडून प्रहार केले. मूर्तिपूजेला त्याचा विरोध होता. अस्पृश्यतेचा, वर्णव्यवस्थेचा त्याने धिक्कार केला. त्याचे कवित्व हे नीतिपाठकाचे आहे. त्यातील भाषेची आणि शैलीची सुगमता वचकाच्या अंतःकरणाला सहजच भिडते. व्यवहारातील उपमा, दृष्टांत आणि सूत्रबद्धता ही त्याच्या शैलीची वैशिष्ट्ये होत. अकारण पांडित्यप्रदर्शनाबरोबरच अनुचित ग्राम्यताही त्याने टाळली आहे. अकारण पांडित्यप्रदर्शनाबरोबरच अनुचित ग्राम्यताही त्याने टाळली आहे. त्याच्या समकालीनांना त्याचे सूत्रमय प्रभावी विचार, कठोर टीकास्त्र आणि तीव्र उपरोध आवडले नाहीत, तरी आधुनिक सुधारकांनी मात्र त्याच्या शतकांतील विचारांचे ऋण मान्य करून त्यांपासून स्फूर्ती घेतली आहे. त्याचे सूत्रमय विचार अजूनही लोकांच्या तोंडी आहेत. सी. पी. ब्राउन (द व्हर्सेस ऑफ वेमना, १८२९) आणि अगदी अलीकडे मीर महमूद अलीखान यांनी वेमनाच्या शतकांचा इंग्रजी अनुवाद केला आहे.
2. Rao, C. Ramakrishna, Vemana the Telugu Poet and Saint, Madras, 1913.
3. Topa, Iswara, Saint Vemana : His Philosophy, Hyderabad, 1950.