सुप्रजाजननशास्त्र : (यूजेनिक्स). आपली अपत्ये सुदृढ तसेच गुणवान असावीत आणि आपला समाज निर्व्यंग व निरोगी व्यक्तींचाच बनलेला असावा, अशी इच्छा प्राचीन काळापासून सर्वत्र आढळत आली आहे. त्यासाठी वैज्ञानिक माहितीचा आधार घेऊन प्रयत्न करण्याची कल्पना यूरोपमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस उदयास येऊ लागली. इंग्लंडमध्ये ⇨ चार्ल्स रॉबर्ट डार्विन  यांनी उत्क्रांतिवादाचा सिद्घांत (१८५७) मांडला, त्याचवेळी त्यांचे एक आप्त ⇨सर फ्रान्सिस गॉल्टन यांनी सुप्रजाजननाचा विचार प्रथम मांडला. डार्विन यांच्या प्रेरणेने त्यांनी आनुवंशिकतेच्या संशोधनास प्रारंभ केला. मानवी प्रजननावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवून मनुष्य जातीची सुधारणा घडवून आणणे शक्य आहे, असे त्यांचे मत होते. यासाठी आवश्यक अशा अभ्यासात माणसाच्या उपजत गुणांचा आणि त्यावर सुप्रभाव पाडू शकणाऱ्या बाह्य घटकांचा समावेश करून त्यांनी या शास्त्रास सुप्रजाजननशास्त्र असे नाव दिले (१८८३).

मनुष्य जातीची सुधारणा केवळ आनुवंशिकता सुधारुन होणार नाही तर पर्यावरणातही योग्य ते बदल घडवून आणावे लागतील. ह्या दृष्टीने विचार करणाऱ्या सुप्रजाजननशास्त्राच्या शाखेला ‘ सुजीवनविज्ञान ‘ (यूथेनिक्स) म्हणतात. मनुष्याच्या विकासात कोशिका आणि रेणूमध्ये बदल घडवून इच्छित ते परिवर्तन करणाऱ्या किमयेस ‘ जनुक-कार्यकिमया’ (यूफेनिक्स) म्हणतात. जनुक-कार्यकिमयेचा उपयोग मानवी जीवन सुधारण्यासाठी करता

येणे शक्य आहे.

गॉल्टन यांनी अनेक विख्यात कुटुंबांच्या वंशावळींचा अभ्यास करून बुद्घिमत्ता हा गुण आनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसरीकडे येतो असा निष्कर्ष काढला. त्यासाठी त्यांनी आपल्या अभ्यासास संख्याशास्त्रीय विश्लेषणाची जोड दिली, तसेच समरुप (समबीज) जुळ्यांचा समावेश आपल्या संशोधनात केला. परंतु माणसाच्या आसपासच्या परिस्थितीला व परिपोषणाला (पालनपोषणाला) महत्त्व देणाऱ्या शास्त्रज्ञांकडून बराच विरोध झाला. गॉल्टन यांच्याकडून (१९११) लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजला सुप्रजाजननशास्त्र या विषयाचे अध्यासन निर्माण करण्यासाठी बरीच मोठी देणगी मिळाली. गॉल्टन यांचे अनुयायी आणि प्रख्यात जीवमापनशास्त्रज्ञ ⇨कार्ल  पीअर्सन  यांनी या अध्यासनावर दीर्घकाळ (१९११–३३) काम केले. या काळात गॉल्टन यांची सामग्री वापरुन पीअर्सन यांनी राष्ट्रीय अधोगतीचा अभ्यास  ही प्रकाशनमालिका (१९०६–२४) प्रसिद्घ केली. त्यानंतर त्यांनी ॲनल्स ऑफ यूजेनिक्स  या नियतकालिकाची स्थापना करुन त्याचे संपादकत्व मृत्युकाळापर्यंत (१९२५–३६) सांभाळले.

सुप्रजाजननशास्त्राच्या शास्त्रशुद्घ आणि वस्तुनिष्ठ अभ्यासात प्रारंभीच्या काळात बऱ्याच अडचणी आल्या. या शास्त्राच्या नावाखाली जर्मनीमध्ये व अमेरिकेत आणिइतरत्र वंशश्रेष्ठतेचे राजकीय सिद्घांत प्रचारात येऊन वंशविद्वेषात भर पडली. त्यामुळे अभ्यासक संस्थांनी सुप्रजाजनन शास्त्राविषयी आपली ध्येयधोरणे अधिक स्पष्ट व शास्त्रशुद्घ केली. इंग्लंडमधील संस्था यूजेनिक्स सोसायटी या नावाने १९२६ पासून ओळखली जाऊ लागली. अमेरिकेतील संस्थेचे नाव सोसायटी फॉर स्टडी ऑफ सोशल बायॉलॉजी असे १९७१ मध्ये बदलण्यात आले. मानवी प्रजनन, आरोग्य आणि विकास यांना अनुकूल अशा जीवशास्त्रीय, आनुवंशिकी, सामाजिक, सांस्कृतिक इ. घटकांच्या संशोधनास चालना देणे असा आधुनिक प्रजाजननशास्त्राचा उद्देश आहे असे म्हणता येईल. त्यामुळे वैद्यकीय आनुवंशिकी, गर्भवतीचे आरोग्य व पोषण, रोगप्रतिबंध, स्त्रीशिक्षण, समाजप्रबोधन यांसारख्या अनेकविध क्षेत्रांना हे शास्त्र स्पर्शून जाते.

आनुवंशिक विकारांची निर्मिती आईवडिलांपैकी एका किंवा दोघांकडून सदोष जनुके अपत्यास प्राप्त झाल्यामुळे होत असते. सदोष जनुकामुळे घडणारा परिणाम ते जनुक दुसऱ्या जनक व्यक्तीकडून ( माता अथवा पिता ) मिळणाऱ्या जोडीदार-जनुकाच्या तुलनेत प्रभावी आहे अथवा अप्रभावी आहे यावर अवलंबून असते  [⟶ आनुवंशिकी ]. अप्रभावी जनुकाचा परिणाम एखाद्या पिढीमध्ये प्रकट झाला नाही तरी तो गुणधर्म ( गुण ) त्याच्या पुढील पिढीकडे संक्रामित होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुप्रजाजननात किमान दोन-तीन पिढ्यांचा तरी विचार करणे आवश्यक ठरते. तसेच विशिष्ट दोषास (विकारास) जबाबदार असलेले जनुक हे ४६ गुणसूत्रांपैकी लिंगनिर्धारक गुणसूत्रावर ( एक्स आणि वाय) आहे अथवा इतर ४४ पैकी एखाद्या अलिंग गुणसूत्रावर आहे, याचीही माहिती असावी लागते. काही विकार आनुवंशिक असले तरी त्यांची लक्षणे आहार, विषाणुसंक्रामण व परिसरातील प्रदूषण यांसारख्या घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे ती दीर्घकाळानंतर (साधारण वयाच्या चाळीशीनंतर) दिसू लागतात. याउलट काही उपजत दोषांमागे जनुकीय कारणे असली, तरीही ती केवळ त्या पिढीत एखाद्या गुणसूत्रास विभाजनाच्या वेळी झालेल्या इजेमुळे किंवा विभाजन दोषामुळे उद्‌भवलेली असतात.


 उपजत आनुवंशिक विकारांची काही कारणे :(अ) वर्चस्वी ( प्रभावी ) जनुकाच्या दोषामुळे : (१) अपूर्ण अस्थिजननामुळे हाडे आपोआप मोडणे, (२) तंत्रिकातंत्वार्बुदांचे बाहुल्य, (३) कोलेस्टेरॉल अतिरिक्तता, (४) हंटिंग्टन कोरिया (मेंदूचे कार्यऱ्हसन) व बालकंपवात, (५) मार्फन लक्षणसमूह ( डोळे, हाडे, हृदय व रक्तवाहिन्या यांच्या संयोजी ऊतकांचे दोष).  

(आ) वर्चस्वी जनुक आणि त्याबरोबरचे अप्रभावी जनुक या दोहोंचाही थोडा थोडा परिणाम झाल्याने सौम्य दोष (सहप्रभावी परिणाम): (१) दात्रकोशिका पांडुरोग, (२) सौम्य थॅलॅसीमिया.  

(इ) अलिंगी गुणसूत्रावरील दोन्ही अप्रभावी जनुकांच्या दोषामुळे: (१) द्रवार्बुदी तंत्वात्मकता, (२) टे-झॅक्स विकार (अंधत्व व मतिमंदता), (३) फिनिलकीटोन मूत्रता, (४) संपूर्ण वर्णहीनता, (५) गंभीर मिश्र प्रतिरक्षान्यूनता, (६) तीव्र थॅलॅसीमिया.  

(ई) स्त्रीच्या ‘एक्स’या लिंगनिर्धारक गुणसूत्रावरील जनुकांमुळे होणारे विकार : स्त्रीमध्ये ‘एक्स एक्स’ अशी दोन गुणसूत्रे असल्यामुळे त्यांपैकी एकावर सदोष जनुक असले तरी असा विकार फक्त पुढील पिढीकडे नेण्याचे कार्य ती करते (वाहक). तिच्यात तो प्रकट होत नाही. उलट तिच्या पुरुष अपत्यात केवळ एकच ‘एक्स’ असून दुसरे गुणसूत्र ‘वाय’असल्याने विकार प्रकट होतो परंतु त्याचे पुढे वहन होत नाही.  

(१) रक्तस्रावी विकार, (२) लाल व हिरव्या रंगांसाठी रंगांधत्व, (३) डोळ्यांची वर्णहीनता, (४) ड्यूकेनची स्नायू कष्टपोषिता, (५) आनुवंशिक वृक्कशोथ, (६) आनुवंशिक मुडदूस (डी जीवनसत्त्वास प्रतिरोध दाखविणारा), (७) एक्स गुणसूत्राच्या भंगुरतेमुळे होणारी मतिमंदता, (८) इतर विकारांचे काही दुर्मिळ, आनुवंशिक प्रकार उदा., गाऊट संधिवात, प्रतिरक्षान्यूनता, अंगग्रही पक्षाघात, रंजित नेत्रपटलशोथ, रक्तलयी पांडुरोग, खंडतालू इत्यादी.  

उपजत, परंतु आनुवंशिक नसलेले विकार :(अ) गुणसूत्रांच्या विभाजनाच्या प्रक्रियेत दोष निर्माण झाल्यामुळे दोन ऐवजी तीन गुणसूत्र एकत्र येणे (त्रिसमसूत्री) : (१) डाऊन लक्षणसमूह (मंगोलिझम्) : २१ क्रमांकाच्या गुणसूत्रात हा त्रिसमसूत्रीचा दोष असतो. (२) क्लाइनफेल्टर लक्षणसमूह (एक्सएक्सवाय) : पुरुषात वंध्यत्व, वृषणाचा लहान आकार व बायकीपणा. (३) टर्नर लक्षणसमूह : स्त्रीमधील वंध्यत्व, एकच एक्स गुणसूत्र असल्याने जननग्रंथीची अवृद्घी. (४) क्रमांक १८, १३ किंवा अन्य गुणसूत्रातील त्रिसमता निर्माण झाल्याने उद्‌भवणारे लक्षणसमूह.

(आ) गर्भवतीच्या आहारातील कमतरतेमुळे होणारे दोष: उदा., फॉलिक अम्लाअभावी तंत्रिका तंत्रातील दोष ( द्विखंडित ओष्ठ किंवा अन्य दोष) कॅल्शियम, आयोडीन, प्रथिने, फ्ल्युओराइड इत्यादींच्या उणिवांमुळे होणारे विकार.  

(इ) गर्भवतीच्या शरीरात प्रवेश झाल्यामुळे भ्रूणाच्या रक्तात किंवा गर्भजलात आलेल्या द्रव्यांची विषाक्तता: उदा., धूम्रपान, मद्यपान, व्यंग निर्माण करणारी औषधे, कर्करोगावरील कोशिकाघातक औषधे, क्ष-किरण अथवा अन्य प्रकारचा किरणोत्सर्ग इत्यादी.  

(ई) मातेमधील संक्रामणजन्य विकारामुळे भ्रूणात निर्माण होणारे संक्रामण किंवा दोष: उदा., एचआयव्ही, उपदंश, जर्मन गोवर, कावीळ इत्यादी.

  

जनुकीय समुपदेशन : आधुनिक सुप्रजाजननामध्ये जनुकीय समुप-देशन ही एक महत्त्वाची पायरी ठरते. आनुवंशिक विकारांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये विवाहाचे किंवा अपत्यास जन्म देण्यासंबंधीचे निर्णय घेण्यासाठी असे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. समुपदेशकाला आपले अनुमान तयार करण्यासाठी अनेक साधने उपलब्ध असतात. कमीतकमी तीन पिढ्यांची वंशावळ, त्यातील सर्व व्यक्तींचा वैद्यकीय इतिहास व मृत्यूची कारणे, संदिग्ध कारणांच्या वेळी शक्य तर वैद्यकीय अहवालांची छाननी, कुटुंबातील गर्भपाताच्या घटनांची नोंद यांसारख्या माहितीचा उपयोग करुन समुपदेशक काही अंदाज बांधू शकतात. अधिक तपशीलासाठी मातापित्यांची जनुकीय ठेवण (रक्ताचा किंवा तोंडातील श्लेष्मलपटलाचा सूक्ष्म नमुना घेऊन त्यातील कोशिकांच्या संवर्धावरुन) निश्चित करता येते. गर्भ राहिल्यावर करावयाच्या तपासणीत मातेच्या रक्तातील आल्फाफीटोप्रोटीन या प्रथिनाची १६–१८ आठवड्यांमधील पातळी, गर्भजलातील किंवा अपरेमधील कोशिकांचे जनुकीय विश्लेषण (गुणसूत्रचित्रण ), गर्भाशयात असलेल्या नाळेतील रक्ताचा नमुना, श्राव्यातीत चित्रण आणि मातेच्या रक्तातील हॉर्मोनांची (संप्रेरकांची) पातळी यांचा वापर होतो.  

अपत्यात आनुवंशिक विकार असण्याची शक्यता असल्यास ती लक्षात घेऊन अनेक प्रकारे नियोजन करता येते. अपत्यप्राप्ती टाळण्यासाठी गर्भनिरोधक उपाय अवलंबणे, कृत्रिम वीर्यसेचनाने ( आनुवंशिक दोष असण्याची शक्यता नसलेल्या व्यक्तीचे वीर्य वापरुन) गर्भधारणा घडविणे, मूल दत्तक घेणे, सदोष अपत्याचा जन्म स्वीकारण्याची तयारी असल्यास त्यासाठी भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या सज्ज राहणे, विकाराची तीव्रता कमी होण्यासाठी आवश्यक असे आहारविषयक किंवा परिसरविषयक बदल घडविणे यांसारख्या गोष्टींबद्दल तज्ञ सल्ला  देऊ शकतात. विषाणूंच्या मदतीने निरोगी जनुकद्रव्य (डीएनए) रुग्णाच्या श्वेतकोशिकांमध्ये प्रविष्ट करणे ऊतकसंवर्धनाच्या तंत्राने शक्य असते. अशा श्वेतकोशिकांचे सु. १,००० पट गुणन झाल्यावर त्या रुग्णाच्या शरीरात परत सोडल्या जातात. काही आठवडयांच्या अंतराने असे जनुकीय उपचार अनेकदा केले जातात.  

आनुवंशिकीशिवाय इतर क्षेत्रातही सुप्रजाजननाचे मार्ग अवलंबणे शक्य असते. मातेच्या आहारातील फॉलिक अम्ल या जीवनसत्त्वाचे प्रमाण सुनिश्चित ठेवल्यास तंत्रिका तंत्राच्या विकासातील दोष टाळता येतात. तसेच बालकांच्या आहारातील प्रथिनजन्य ऊष्मांक, कॅल्शियम, फ्ल्युओराइड, जीवनसत्त्वे इत्यादींच्या कमतरतेमुळे होणारे दोष आहारविषयक कार्यक्रमांमुळे कमी करणे शक्य असते. मातेकडून भ्रूणास पारेषित होणारी संक्रामणे ( उदा., उपदंश, एचआयव्ही, जर्मन गोवर, कावीळ इ.) वेळीच लक्षात आल्यास ती टाळणे, त्यावर उपचार किंवा वैद्यकीय गर्भपात यांसारख्या उपायांचा विचार करता येतो.  

श्रोत्री, दि. शं.  


सुप्रजाजननशास्त्र :(आयुर्वेदीय). प्रत्येक समाज हा व्यक्तींनी बनलेला असतो आणि प्रत्येक व्यक्ती समाजाचा घटक असते. म्हणून व्यक्ती सुदृढ व निरोगी असेल, तर आपोआपच समाज तसा बनेल. त्यामुळे जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाची काळजी घेणे, सुदृढ अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणे सुप्रजाजननात अत्यावश्यक ठरते. सुदृढ अपत्यप्राप्तीसाठी आयुर्वेदात ‘गर्भसंस्कार’सांगितलेले आहेत. गर्भसंस्काराचे तीन टप्पे म्हणजे गर्भधारणा होण्यापूर्वीचा काळ, गर्भावस्था व अपत्य जन्मानंतरचे संस्कार हे होत.  

(१) गर्भधारणा होण्यापूर्वीचा काळ : उत्तम व संपन्न गर्भासाठी योग्य वेळ, निरोगी गर्भाशय व स्त्रीशरीर, गर्भाच्या विकासाला आवश्यक असणारे पोषण व संपन्न बीज या सर्व गोष्टींचा समन्वय आवश्यक असतो. गर्भधारणेपूर्वी मातापित्यांनी स्वतःच्या शारीरिक आरोग्यासाठी केलेली तयारी, योग्य गर्भधारणा होण्यासाठी केलेली उपाययोजना व गर्भ राहिल्यानंतर प्रसूतीपर्यंत घ्यावयाचे उपचार या बाबी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. गर्भाधानापूर्वी स्त्री-पुरुष दोघांनाही त्रिदोष संतुलनासाठी पंचकर्माद्वारे शरीरशुद्घी करुन घेणे आवश्यक असते. शरीरशुद्घीमध्ये वात, पित्त व कफ या त्रिदोषांचे संतुलन ठेवण्याकरिता विविध उपाय योजले जातात. सर्व प्रकारच्या शुक्र व आर्तव दोषांमध्ये स्नेहन, स्वेदन, वमन व विरेचन बस्तीकर्माने तसेच विशेषतः अनेकवेळा उत्तरबस्तीकर्माने लाभ होतो परंतु प्रत्येकालाच या सर्व प्रकारच्या शुद्घींची गरज असेलच असे नाही. याची आवश्यकता प्रकृतिनुरुप ठरविली जाते. शरीरशुद्घीमुळे बीजाची ताकद वाढली जाऊन त्याचा उपयोग गर्भधारणा होण्यास, तो नऊ महिने टिकण्यास व आरोग्यपूर्ण अपत्यप्राप्ती होण्यास मदत होते.  

सुप्रजाजननासाठी ऋतू, क्षेत्र, अम्बू व बीज या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. ऋतू म्हणजे मासिक पाळी सुरु झाल्यापासून आठव्या ते पंधराव्या रात्री गर्भाधान होणे इष्ट ठरते. ऋतुकाळ उलटल्यानंतर ( साधारण सोळाव्या रात्रीनंतर ) गर्भ बहुधा राहतच नाही राहिल्यास अशा संततीत आरोग्य, बल, वर्ण, इंद्रिय शक्ती, ओज वगैरे कमी असण्याची शक्यता असते. गर्भधारणेच्यावेळी स्त्रीचे वय १६–३५ वर्षे व पुरुषाचे वय २०–६० वर्षे यांदरम्यान असावे. स्त्रीच्या बाबतीत संपन्न बीजाबरोबरच प्रसूतीसाठी आवश्यक लवचिकता, गर्भाशयाची ताकद व एकंदर शरीरशक्ती यांचा विचार करुन स्त्रियांची ३५ वर्षांनंतर गर्भधारणा होऊ न देणे श्रेयस्कर असते. स्त्री-बीज साधारण २४ तास सक्रिय असते, या २४ तासांत जर त्याचा शुक्राणूशी संयोग झाला तरच गर्भधारणा होते.  

क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी बीजारोपण करणार ते गर्भाशय सुपीक, शुद्घ व गर्भाचे पालनपोषण करण्यास सक्षम असले पाहिजे.

अम्बू म्हणजे जसे शेतात बी पेरल्यानंतर पाणीपुरवठा करावा लागतो तसे गर्भाचे पोषण स्त्रीच्या रक्ताद्वारे चांगले होणे आवश्यक असते. 

सकस बीजाचा संबंध काही आनुवंशिक विकारांच्या बाबतीत उपयोगी पडतो कारण शरीरातील मृदू घटक जसे मांस व रक्त हे मातेकडून येतात. म्हणजेच यासंबंधी होणाऱ्या आनुवंशिक विकारांचा संबंध मातेशी येतो तर केस, शिरा, हाडे इ. कठिण घटक पितृज असतात, म्हणजे यासंबंधीच्या आनुवंशिक विकारांचा स्रोत पित्याकडून येतो.  

अनोळख्या व नव्या जागी गर्भाधान करणे इष्ट ठरत नाही. जेथे शुद्घता व पावित्र्याची खात्री आहे, अशी वास्तू गर्भाधारणेसाठी निवडणे योग्य ठरते. गर्भाधारणेपूर्वी तसेच गर्भधारणेवेळी मनात येणारे विचार यांचा गर्भाची मानसिक स्थिती घडविण्यावर मोठा प्रभाव पडतो. स्त्री-पुरुषांचे मन ज्या प्रकारच्या भावांनी युक्त असेल तसाच प्रभाव गर्भाच्या मनावर पडत असतो. म्हणूनच गर्भधारणेवेळी पावित्र्य व सकारात्मक मानसिकता यांचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. चिंता, शोक, चिडचिड वा निराशा यांमुळे शुक्रधातूचा ऱ्हास होतो. त्यामुळे गर्भधारणेवेळी अशा नकारात्मक भावना टाळणे इष्ट ठरते.  

गर्भधारणेतील तसेच सुप्रजाजननातील यशापयश गर्भातील रचनात्मक किंवा क्रियात्मक असलेले दोष, मानसिक क्षोभ, शुक्राणू वा बीजांडा-तील दोष, योग्य व प्रकृतिनुरुप आहार-आचरण न ठेवणे, हार्मोन्समधील असंतुलन, मासिक पाळीतील दोष किंवा अनैसर्गिक वर्तन यांवर अवलंबून असते.  


(२) गर्भावस्था : सुप्रजाजननातील दुसरा भाग म्हणजे स्त्री-पुरुष बीजांच्या संयोगातून निर्माण झालेल्या गर्भाचे रोपण गर्भाशयात झाल्यापासून ते प्रसूती होईपर्यंतचा टप्पा होय. यामध्ये आधिक्याने जबाबदारी मातेची राहते. मातेच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा परिणाम गर्भाच्या वाढीवर व त्याच्या विकासावर होत असतो.  

       बाळाची बुद्घी, कांती व बल यांचे स्वरुप गर्भावस्थेतच रोवले जाते. उत्तम मानसिक व शारीरिक आरोग्य असलेली अपत्यप्राप्ती होण्यासाठी गर्भवतीचे डोहाळे पुरविले जाणे गरजेचे असते. डोहाळे म्हणजे एक प्रकारे आईद्वारे गर्भाच्या प्रकट होणाऱ्या इच्छाच असतात, असे समजतात. या इच्छा पूर्ण न झाल्यास वाताचा प्रकोप होऊन गर्भावर विपरित परिणाम होऊ शकतो, असेही समजतात. जन्मणाऱ्या मुलामध्ये शारीरिक विकृती, मानसिक उद्विग्नता वा असमाधान येऊ शकते. याउलट डोहाळे योग्य तऱ्हेने पुरविल्यास जन्मणारे मूल आनंदी, समाधानी, स्वस्थ व दीर्घायू होण्यास मदत होते.  

गर्भावस्थेच्या कालावधीत गर्भवतीला स्वतःचे व गर्भाचे पोषण आणि स्तन्यनिर्मिती अशी तिहेरी जबाबदारी आहाराद्वारे पार पाडावयाची असते. गर्भवतीचा आहार षड्‌रसपूर्ण, गरम, सात्त्विक आणि घन-द्रव अशा प्रकारचे संतुलन असलेला असावा. तसेच न्याहारी व जेवणाच्या वेळाही ठरलेल्या असाव्यात. ‘नऊ महिने नऊ दिवस’ या गर्भारपणाच्या आदर्शकाळाच्या आसपास सहज प्रसूती होणे, स्त्री आणि गर्भ या दोघांच्या दृष्टीने उत्तम असते. यासाठी योग्य आहारासोबतच योग्य व्यायामाचा समावेश असणे आवश्यक असते. नैसर्गिक प्रसूतीसाठी गर्भारपणात विशिष्ट योगासने व व्यायाम योग्य तऱ्हेने केल्यास त्याचा इष्ट परिणाम दिसून येतो. गर्भवतीचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी तिचे आचरण, वाचन, श्रवण, लेखन, आहारविहार व घरातील वातावरण हे मनावर ताण निर्माण करणारे नसावे. कारण स्त्रीच्या भावभावनांचा परिणाम गर्भावर होतो. उदा., गर्भवतीने एखादे भीतिदायक दृश्य पाहिले तर गर्भाच्या हालचाली जोराने होऊ लागतात.  

कोणतेही आजार होऊ नयेत म्हणून गर्भवतीने सतत प्रयत्नशील असावे. काळजी घेऊनसुद्घा आजार झाल्याने औषधे घ्यावी लागली, तर शक्यतो तीव्र औषधे टाळावीत. गर्भारपणात बरीच औषधे वर्ज्य असल्याने तज्ञांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत. गर्भारपणात निरनिराळ्या वेगांचे अवरोध (मलावरोध, मूत्रावरोध, ढेकर, उचकी, शिंक इ.) करु नये. घट्ट कपडे, मोठा आवाज व अवजड शारीरिक कष्ट टाळावेत. धूम्रपान, मद्यपान व जागरण पूर्णपणे टाळावे तसेच अकारण फिरणेही टाळावे. गर्भवतीने आपल्या हालचाली आणि वर्तणुकीवर नियमन घालून घ्यावे की जेणेकरुन अपरेसंदर्भातील अडचणी निर्माण होणार नाहीत. गर्भारपणात गर्भस्राव किंवा गर्भपात होण्याचा संभव असू शकतो म्हणून गर्भावस्थेतील कोणत्याही विपरित लक्षणांकडे दुर्लक्ष करणे अनिष्ट ठरु शकते.  

(३) अपत्य जन्मानंतरचे संस्कार : जन्मानंतर बाळाचा विकास निसर्गनियमानुसार टप्प्याटप्प्याने होत असतो. एका ठराविक कालमर्यादेत त्याचा होत असलेला ठराविक विकास लक्षात यावयास हवा. उदा., मान धरणे, कुशीवर वळणे वगैरे क्रिया बाळाने वेळेवर न केल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. बाळाचे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व साकारण्यामध्ये आईवडील तसेच घरातील सर्व सदस्यांची भूमिका महत्त्वाची असते. लहान मुले शारीरिक दृष्ट्या नाजुक, मानसिक दृष्ट्या संवेदनशील, संस्कारक्षम आणि अनुकरणक्षम असतात. मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक व बौद्घिक विकास व्यवस्थित आणि सहज होण्यासाठी मुलांना वाढविताना त्यांच्या लहानसहान गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.  

प्रथम मातापिता, घरातील सदस्य व नंतर समाजातील अनेक घटक यांचाही चांगली प्रजा तयार होण्यात मोलाचा सहभाग असतो. परंतु बाह्य जगातील वावर सुरु होईपर्यंत पहिल्या दोन टप्प्यांतील संस्कार पक्के होणे आवश्यक असते. बालकाच्या मनातील चांगल्या-वाईट गोष्टींविषयींच्या संकल्पना स्पष्ट व ठाम असतील, तर तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी व सुदृढ व्यक्ती म्हणून विकास पावेल. त्यायोगे समाजात सुयोग्य अशा प्रजेची निर्मिती होऊन सुप्रजाजननामधील सर्व उद्दिष्टे सफल होऊ शकतील.  

चौंडे, के. ल.  

पहा : आनुवंशिकता व आसमंत आनुवंशिकी गुणसूत्र.  

संदर्भ :1. Berkow, R. ED., Merck Manual of Medical Informattion, N. J., U.S.A., 1997.

    2. Peters, M. Ed., The British Medilcal Association, A-Z  Family  Medilcal Encyclopaedia, Londan, 2004.

   3. Thicodeau, G.A. patton K. T. Anthony’s Anatomy and Textbook of Physiology, 14th Ed., St. Louis, Mo U.S.A., 1994.

           ४. तांबे, बालाजी, गर्भसंस्कार, पुणे, २००७.   

           ५. वाग्भट, अष्टांग-संग्रह.